जंगलांना लागणारे वणवे व त्यामागील कारणे

जंगलांना लागणारे वणवे व त्यामागील कारणे

ऑस्ट्रेलियातील जंगलातील वणवे व अन्य आपत्ती या वैश्विक तापमानवाढीमुळे घडून येत आहेत हा सर्वसाधारण समज लोकांच्यात बळावत चाललेला आहे. पण तेच एकमेव कारण नाही.

साऱ्या जगभर जंगलच्याजंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. काही महिन्यापूर्वी अमेझॉन व कॅलिफोर्नियाची वनराई जळून बेचिराख झाली होती. तर काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील दक्षिणपूर्व भागातील न्यू साऊथ वेल्सची जंगलं पूर्णपणे जळत आहेत. खरेतर तिथल्या प्रशासनाने नैसर्गिक आणीबाणी जाहीर केलेली आहे कारण आतापर्यंत शेकडो दशलक्ष हेक्टर जमीन आगीच्या लोळात जळून खाक झालेली आहे. वैश्विक तापमानवाढीमुळे या साऱ्या नैसर्गिक आपत्ती घडून येत आहेत हा सर्वसाधारण समज लोकांच्यात बळावत चाललेला आहे. पण हा कांगावा फारसा संयुक्तिक ठरत नाही कारण भूशास्त्रीय पूर्वेइतिहासात अशा आगी अनेक वेळा व अनेक ठिकाणी लागल्याची भरमसाट उदाहरणे अस्तित्वात आहेत. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे, आधीच खराब झालेली पर्यावरणीय परिस्थिती, अधिकच बिकट होत चालली आहे यात कोणतीही शंका नाही.

जंगलांना आग का लागते?

ताडमाड उंच वाढलेल्या झाडांची आगीने कत्तल करण्यासाठी खरेतर पहिल्यांदा एका ठिणगीची गरज असते. ही ठिणगी विजेच्या कडकडाटमुळे मिळू शकते किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे. पण यासाठी परिस्थिती अनुकूल असावी लागते. जर स्थानिक पर्यावरण उष्ण व शुष्क असेल व जेव्हा पाण्याची पातळी खाली गेलेली असेल तेव्हा आगीसाठी पर्यावरणीय परिस्थिती अनुकूल बनते. त्या ठिकाणची आर्द्रता सुद्धा कमी असावी लागते व जळण्यासाठी लाकूड व पालापाचोळा पार सुकलेला असावा लागतो. त्याचबरोबर स्थानिक संरचनासुद्धा आग लागणे व ती पसरवण्यामध्ये फार महत्त्वाचे कार्य पार पडत असते. सपाट जागेत आग लवकर पसरत नाही. पण डोंगरांच्या चढावर ती द्रुतगतीने पसरते. खालची पेटती झाडे वरच्या झाडांना आगीच्या जंजाळात पटकन ओढून घेतात. पण या साऱ्या घटनांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक जो असतो तो आहे वारा, त्याची गती आणि त्याची वाहण्याची दिशा. जास्त व कमी दाबाचे जे पट्टे निर्माण होतात त्याच्यामुळे वाऱ्याची गती व दिशा सतत बदलत राहते. आगीची दिशा जास्त आर्द्रता असणाऱ्या वनाकडे कललेली असेल तर ती आग लवकर आटोक्यात येते किंवा आटोक्यात आणता येते. पण जर तिचा रोख कोरड्या व जळाऊ वनस्पतीकडे गेला तर तो वणवा शमवणे कठीण होऊन बसते.

कोल्ड फ्रंट म्हणजे काय?

ऑस्ट्रेलियातील आग अनेक दिवस सुरू धगधगत होती व आहे. या आगीने फार मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे नुकसान केलेले आहे ज्याचा हिशोब अनेक कोटी रुपयात गेलेला आहे. हे एव्हढे नुकसान तिथे कधीकधी कोल्ड फ्रंट निर्माण झाल्यामुळे सुद्धा होत असते. १९३९ सालचा काळा शुक्रवार, १९८३चा राख (ash) बुधवार व २००९चा काळा शनिवार या कोल्ड फ्रंटमुळेच निर्माण झाले होते. या तिन्ही दिवशी आगीच्या लोळामुळे ऑस्ट्रेलियात फार मोठ्या प्रमाणावर वित्त व पर्यावरणीय हानी झाली होती. काही लोकांचे प्राणही गेले होते. हवामानविषयी परिक्षेत्रात जेव्हा कमी व जास्त दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा तिथे तापमानविसंगती तयार झालेली असते. किंबहुना, या तापमानविसंगतीमुळेच कमीजास्त दाबाचे पट्टे तयार होतात. अशावेळी थंड हवेचा पट्टा आपल्याबरोबर किंवा आपल्यासमोर असणाऱ्या उष्ण हवेला पुढे ढकलत राहतो. या ‘धक्क्या’मुळे आगीची तीव्रता कैकपटीने वाढतेच वाढते पण त्याचबरोबर हवेची दिशा बदलत राहण्यामुळे अनेक नवीन प्रदेशही आगीच्या प्रभावशाली व विनाशकारी पट्ट्यात येत राहतात.

अन्य कोणत्या कारणामुळे आग लागते?

जेव्हा हजारो हेक्टर जंगल जळत असते तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा उत्पन्न होत असते. ही ऊर्जा आगीचे लोळ व धुराच्या रूपात आपल्या नजरेसमोर येत असते. अशावेळी तिथले पर्यावरण अस्थिर बनते व त्या वातावरणातील हवेच्या गुणवैशिष्ट्यात बदल घडून येतात. तिथे वेगळ्या प्रकारचे ढग सुद्धा निर्माण होतात व ढगातील भौतिकीय व रासायनिक क्रियाप्रक्रियांमुळे विजेचे कडकडाट निर्माण होतात. या घडामोडीत वीज पडून नवीन आगही दुसऱ्या ठिकाणी सुरू होते. त्याचबरोबर जळते निखारे सुक्या व कोरड्या पानांवर पडून आगीचे साम्राज्य वाढवत राहतात. हे निखारे घरांवर जेव्हा पडतात तेव्हा तिथेही आग पसरते.

 पक्षीही कधीकधी मुद्दाम आग लावतात

काही वेळेला आग चुकून किंवा मुद्दामहून लावल्याचे पुरावे मिळाले आहेत ज्याच्यामुळे आग भडकून संपूर्ण जंगल जळून खाक झाले आहे. पण असे क्वचित घडते. पण अलीकडच्या काळात काही पक्षी मुद्दाम आग लावतात याचे दाखले मिळाले आहेत. काही आदिवासी जमाती पक्ष्यांचा हा खोडकरपणा जाणून आहेत. तसे उल्लेख त्यांच्या नेहमीच्या कथा व भाकड कथांतून लोकांसमोर येत असतात. पण आतापर्यंत शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोनातून याबद्दल कोणी अभ्यास केला नव्हता.

पण ऑस्ट्रेलियात पक्ष्यांच्या तीन प्रजाती आहेत ज्या स्वतः फांद्या घेऊन जंगलांना आग लावतात. अशा प्रजाती खरोखरच अस्तित्वात आहेत हे सिद्ध झाले आहे. ते तीन पक्षी म्हणजे ब्लॅक काईट, व्हीसलिंग काईट व ब्राउन फाल्कन. हे पक्षी एखादी जळणारी काडी घेऊन जातात व जेथे आग नसते त्या ठिकाणी त्या काडीने आग लावायचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात ते कधी यशस्वी होतात तर कधी अपयशी ठरतात. हा प्रयत्न ते एकट्याने करतात किंवा कधी समूहाने करायचा प्रयत्न करतात. एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकच प्रयत्न करून थांबत नाहीत, तर आग लागेपर्यंत सतत प्रयत्न करत राहतात. या प्रयत्नातूनच त्यांना आपले भक्ष्य शोधणे सोपे जाते. काहीवेळेला तर हे पक्षी घात लावून बसतात व आगीपासून जीव वाचवत पळत जाणाऱ्या जीवांना अचूक टिपतात. पक्ष्यांची ही आग लावण्याची प्रवृत्ती लक्षात आल्यानंतर जंगलात पेटलेल्या वणव्याकडे आता संशोधक एका नव्या दृष्टीने बघत आहेत. वैज्ञानिकांना आता आपला दृष्टिकोन बदलावा लागणार आहे. आता फक्त मानव व विजेला दोष देऊन चालणार नाही.

ऑस्ट्रेलियात जो वणवा आज धगधगतो आहे त्याने सुमारे पन्नास कोटी जंगली प्राण्यांना कंठस्नान घातले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर क्वचितच केव्हातरी अशी कत्तल झाली असेल.

या वणव्याला थांबवायचे कसे?

सर्वात सोपा उपाय हा आहे की ही आग लागूच देता काम नये. पण अशी अपेक्षा करणे व्यवहार्य तर नाहीच पण नैसर्गिकसुद्धा नाही. जंगलात जी आग लागते त्याला पर्यावरणीय कारण व आधार आहे. आग ही निसर्गाची गरज आहे आणि याचा फार मोठा फायदा तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीला मिळतो. या आगीमुळे निसर्गाला प्रतिकूल ठरणाऱ्या अनेक गोष्टींना अटकाव करता येतो. ज्या प्रजातींची गरज उरलेली नसते किंवा त्यांची पुढची वाटचाल खडतर असते अशांचे समूळ उच्चाटन करणे जंगल वणव्यामुळे शक्य होते. जंगल आगीमुळे नवनवीन प्रजातींचा अंतर्भाव तिथल्या परिक्षेत्रात करण्याची उत्तम संधी सुद्धा निर्माण होते.

ऑस्ट्रेलियातील, तसेच अन्य अनेक देशातील आदिवासी जमाती, स्वतः होऊन आपल्या जंगलातील काही भागात आग लावतात. असे केल्याने जंगलातील इतर ठिकाणी आग लागत नाही व त्यांची जंगले सुरक्षित राहतात. आधुनिक विज्ञानाने या आदिवासी जमातींकडून ज्ञान मिळवले व नियंत्रित व संयमित पद्धतीने जंगलांना आग लावून कशा प्रकारे मोठी हानी टाळायची कला आत्मसात केली आहे. या प्रकारात जंगलाच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत किमान ८% परिसर आगीला आहुती द्यावा लागतो. आदिवासींची ही संयमित आग जंगलवाढीसाठी अतिशय अनुकूल असते.

पण एखाद्या मोठ्या जंगल आगीनंतर ऑस्ट्रेलियातील आदिवासी पुन्हा त्या आगीच्या प्रभावक्षेत्रात जातात व आणखी एक नवी छोटी हलकी आग लावतात. याला ते सांस्कृतिक आग म्हणतात. या आगीने तिथे एक नवी ऊर्जा उत्पन्न होते व गवताची आणि अनेक छोट्याछोट्या झाडांची वाढ झपाट्याने सुरू होते. ही आग दाहक नसते. ती सौम्य असते. त्यामुळे जमिनीत जी काही बियाणे व पोषक द्रव्ये असतात ती नष्ट होत नाहीत. आपले शेतकरी सुद्धा चांगल्या पिकासाठी तृण जाळत असतात.

आगीवर नियंत्रण कसे करता येईल?
अनेक देशात जंगल आगीची समस्या फार बिकट होत चाललेली आहे. एकेठिकाणी लागलेली आग अतिशय जलदगतीने साऱ्या दिशांना पसरत जाते ही आता एक सामान्य व नित्याची बाब झालेली आहे. त्यातच लोकसंख्या वाढीमुळे लोकं नैसर्गिक आपत्तीची जाणीव असूनही त्या ठिकाणी आपले राहतं घर बांधत आहेत. आदिवासी जंगलातच राहतात पण त्यांच्यावर इतके निर्बंध घातले जात आहेत की नैसर्गिक आपत्तींशी लढण्याची अनेक पारंपरिक पद्धती लुप्त होत आहेत. जंगलांवर त्यांचे सद्यस्थितीत स्वामित्व नसल्या कारणाने जंगल आगीशी दोन हात करणे त्यांना दुरापास्त होते आहे. जिथे जिथे नैसर्गिक आपत्तीची समस्या बिकट होत चालली आहे तिथे तिथे लोकप्रबोधन होणे गरजेचे आहे.

जंगल आगीबाबत भारताची काय अवस्था आहे?

भारतात भीषण जंगल आगी लागल्याची फार कमी उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी २१ तारखेला बंदीपूर अभयारण्यात मोठी आग लागली होती जी फेब्रुवारी २५ तारखेला विझवण्यात प्रशासनाला यश आले होते. यात सुमारे ८७,४०० हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. जंगल आगीमुळे भारताचे दरवर्षी सुमारे ११०० कोटी रुपयाचे नुकसान होत असते. भारतातील १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०१९ मधील एकूण जंगल आगींपैकी ३७% आगी या आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ येथे लागल्या होत्या.

एका सरकारी अहवालानुसार भारतात जंगलांना आगी मुद्दामहून लावल्या जातात. या आगी लावून शेतीसाठी जमीन मिळवली जाते किंवा शिकारीसाठी जमीन तयार केली जाते. लाकडाच्या वापरासाठीही जंगलाला आग लावली जाते. उत्तर भारतात कमी प्रमाणात जंगल वणवा पेटतो.

जंगल आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच आहे. पण कार्बन डायऑक्साईडही वातावरणात वाढतो आहे. हा हरितगृह वायू आहे व त्याचा प्रतिकूल परिणाम विश्वाचे तापमान वाढीमध्ये दिसून येतो. खरेतर हा हरितगृह वायू वातावरणातून कसा बाहेर काढता येईल याच्यावर गांभीर्याने संशोधन होते आहे. पण जंगलांची व्याप्ती वाढवली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हा वायू नैसर्गिकपणे झाडात कैद होईल व तापमानवाढीची समस्या कमी होईल.

प्रवीण गवळी, भारतीय भूचुंबकत्व संस्था, नवी मुंबई येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS