तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ५% पार करेल?

तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ५% पार करेल?

सरकारशी जोडलेले अनेक अर्थतज्ञ म्हणतात मागच्या काही महिन्यांमध्ये असे काही ‘नवे अंकुर’ दिसून आले आहेत, जे अर्थव्यवस्थेने कूस पालटल्याचे दर्शवतात.

नवी दिल्ली: भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) डिसेंबर २०१९ मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठीचे आकडे शुक्रवारी संध्याकाळी बाहेर येतील, पण देशातील आर्थिक मंदीने अद्याप तळ गाठला आहे का याबद्दलचे अंदाज आत्तापासूनच सुरू झाले आहेत.

अनेक विश्लेषक आणि सरकारशी जोडलेल्या अर्थतज्ञांनी अलिकडेच याकडे लक्ष वेधले आहे की मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक दृश्य ‘नवे अंकुर’ दिसून आलेले आहेत, ज्यातून भारतीय अर्थव्यवस्थेने कूस पालटल्याचे दिसत आहे. अलिकडच्या काही डेटा पॉइंट्समुळे त्याची पुष्टी झाली आहे, जसे की परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्समधील प्रचलने. आर्थिक आघाडीवर वातावरण अधिक सकारात्मक दिसू शकते असे त्यातून दिसत आहे.

मात्र असे असूनही, अनेक तज्ञांच्या मते तिमाही ३ (ऑक्टोबर-डिसेंबर २०१९) आणि तिमाही ४ (जानेवारी-मार्च २०२०) साठी जीडीपी वृद्धी ५% पेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप कमी आहे. उदाहरणार्थ, नोमुरा येथील विश्लेषकांच्या अनुमानानुसार २०१९-२० च्या चौथ्या तिमाहीत वृद्धी तिमाहीतील ४.५% पेक्षा आणखी खाली जाऊन ४.३% होईल तर २०-२१ या आर्थिक वर्षात ती ५.७% असेल.

१९-२० च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये वृद्धीच्या बाबतीत अर्थव्यवस्थेची कामगिरी अशी असेल असे अर्थतज्ञांना वाटते:

आर्थिक संशोधन विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया (मुख्य अर्थतज्ञ सौम्या कांती घोष)

आपला संयुक्त मुख्य निर्देशक (३३ मुख्य निर्देशकांचा संयुक्त निदेशांक) सुचवतो की जीडीपी वृद्धी १९-२० च्या तिसऱ्या तिमाहीसारखाच ४.५% राहील. आपले ३३ उच्च वारंवारिता मुख्य निर्देशक हे दर्शवतात की आर्थिक वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीत त्वरण दर ६५% होता, तो मोठ्या प्रमाणात खाली जाऊन आर्थिक वर्ष २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत २२% झाला आहे. जीव्हीए आणि जीडीपी मधील अंतर आणखी वाढेल अशी आमची अपेक्षा आहे कारण आर्थिक वर्ष २०२० च्या चौथ्या तिमाहीमध्ये सरकारी अदायगीची गती कमी झाली आहे.

रोचक गोष्ट ही, की आर्थिक वर्ष २०१९ साठी सुधारित जीडीपी वृद्धी दर खूपच कमी म्हणजे ६.१% आहे हे पाहता वृद्धीतील घसरणीची मुळे खूप खोलवर आहेत आणि ती एप्रिल २०१७ पासून पुढे सुरू झालेली दिसते. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये तिने ८.३% हे शिखर गाठले होते आणि त्यानंतर आर्थिक वर्ष १९ मध्ये तिची सातत्याने घसरणच झालेली दिसते. (ILF&S संकटानंतर). आर्थिक वर्ष २० मध्ये, सीएसओ द्वारे केलेल्या ५% (खालची दिशा गृहित धरून) या भाकितासह तिने आपला अधोबिंदू गाठला आहे.

बार्कलेज

सहा सलग तिमाहींमध्ये मंद होत गेल्यानंतर २०१९ च्या चौथ्या तिमाहीत आर्थिक वृद्धी सुधारेल अशी आमची अपेक्षा आहे. या वर्षातील अती पावसानंतरही पीक उत्पादन चांगले आहे. खाणउद्योग आणि संबंधित क्षेत्रांमध्ये हवामानामुळे येणारे व्यत्यय कमी झाले आहेत आणि कॉर्पोरेट करामधील कपातीमुळेही उद्योगांना मदत झाली आहे. हे सर्व वृद्धीच्या पुनरागमनासाठी महत्त्वाचे संचालक ठरतील. खाजगी उपभोग अजूनही कमी असला तरी सरकारी खर्चामुळे अर्थव्यवस्थेला मदत मिळत आहे. व्यापार तूट कमी होत आहे हे सुद्धा सकारात्मक आहे. एकंदरित, अर्थव्यवस्थेतील आऊटपुट अपेक्षेपेक्षा कमी असले तरीही २०१९च्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ५% असेल असे आम्हाला अपेक्षित आहे, जो आरबीआयच्या ४.९% या अंदाजापेक्षा किंचित अधिक आहे.

नोमुरा

आमच्या अपेक्षेप्रमाणे जीडीपी वृद्धी दर बेताचाच राहील. तिसऱ्या तिमाहीच्या ४.५% पेक्षा तो आणखी घसरू ४.५% असेल असा अंदाज आहे. (सर्वसंमत आकडा: ४.७%). आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपी वृद्धी आरबीआयच्या ६% भाकितापेक्षा कमी म्हणजे ५.७% असेल असे आमचे अनुमान आहे. नजिकच्या काळात एक धोका, जो पुरवठा आणि मागणी दोन्ही बाजूंना आहे, तो म्हणजे करोनाव्हायरस (सीओव्हीआयडी-१९) उद्रेकाचा विपरित परिणाम हा होय.

सीएआरई गुणांकन

सरकार आणि आरबीआय यांच्याद्वारे केलेल्या अनेक उपायांनंतरही डिसेंबर २०१९ मध्ये संपलेल्या तिमाहीपर्यंत उपलब्ध असलेले प्रमुख निर्देशक फारसे सशक्त नाहीत आणि काही भागांमध्ये झालेल्या अलिकडच्या करोनाव्हायरस उद्रेकाचा विचार करता देशातील काही क्षेत्रांवर विपरित परिणाम होऊ शकतो. आम्ही आर्थिक वर्ष २०२० साठी जीव्हीए वृद्धी ४.३% आणि जीडीपी वृद्धी ४.५% चे भाकीत केले आहे. जे एक वर्षापूर्वी याच काळासाठी नोंदवलेल्या जीडीपी वृद्धीदर ६.६% पेक्षा कमी आहे.

(बिझिनेस स्टँडर्डच्या इनपुट्स वरून).

मूळ लेख

COMMENTS