एक कृतीशील गांधीवादी

एक कृतीशील गांधीवादी

"जी माती लहानपणी दुडूदुडू धावणारया बाळाच्या पायाला लागते त्या मातीचे गुण मेंदूपर्यंत जातात आणि त्याची मेंदूत केलेली साठवण मातीच्या ऊत्त्कर्षासाठी कामी

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन निधीला मंजुरी नाही!
गाडीला हात लावला म्हणून दलित युवकाला मारहाण
निवृत्त गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

“जी माती लहानपणी दुडूदुडू धावणारया बाळाच्या पायाला लागते त्या मातीचे गुण मेंदूपर्यंत जातात आणि त्याची मेंदूत केलेली साठवण मातीच्या ऊत्त्कर्षासाठी कामी आणतात त्याला आपण त्या मातीचे संस्कार म्हणतो. मातीचे संस्कार आजन्म घेऊन समाज सेवेत आयुष्य वेचणारे मराठवाड्यातील जनतेला माहीत आहेत ते म.गांधी यांच्या “नयी तालीम” या शिक्षण विचारातून काम करणारे आलुरे गुरुजी म्हणून.

कर्मवीर भाऊराव पाटील ,पंजाबराव देशमुख ,जगदाळे मामा ,स्वामी रामानंद तीर्थ यांच्या परंपरेतील सिद्राम अप्पा आलुरे हे एक. सत्तर एक वर्षाची शैक्षणिक परंपरा ऊस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेने पाहिलेली आहे. विचाराला माणिक मोती करण्यासाठी केलेल्या काबाड कष्टाला घामाचा एक श्रमजीवी वास होता. म्हणूनच ते चार चौघांपेक्षा वेगळे वाटतात. वंचित ,गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी बाहू पसरविण्यात त्यांना कधीच अवघड वाटत नव्हते. माणसाला फक्त्त दोन हात असतात हे आलुरे गुरुजी यांनी अनेकदा असत्य ठरविले. शरीरावर दिसणारे दोन हात असले तरी स्वातंत्र्य चळवळीतील म.गांधी यांनी ऊभे केलेले कोट्यावधी हात, ही आलुरे गुरुजींची प्रेरणा होती. ती चळवळीतून आलेली होती.

स्वातंत्र्य मिळाल्या नंतर विषारी चुळा टाकणारे सर्प अचानक वारुळातून बाहेर पडल्या नंतरही ते मूळ हेतू पासून बाहेर पडले नाहीत. असं क्वचितच होतं. तसं पाहिलं तर साहसाचा वारसा नसलेल्या घरातून पुढे आलेल्या आलुरे गुरुजींनी ऊभ्या केलेल्या चोवीस शिक्षण संस्थांमधून हजारो विद्यार्थ्यांना हत्तीचे बळ दिले. त्याच बरोबर कासव गतीचे मोल सांगितले. शिक्षण संस्थांचे जाळे जादूची कांडी फिरवून होत नसते त्यासाठी विचाराची भक्कम पाया भरणी करावी लागते. ती करत असताना लोकांच्या मदती शिवाय होत नसते यावर त्यांची निष्ठा असल्याने पहिलं काम कोणतं केलं असेल तर सग्या सोयरयांना दूर ठेवण्याचे. कारण ते धंदेवाईक शिक्षण महर्षी नव्हते. हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे कुठून, कसे आले ? हा प्रश्न विद्वानांना पडू शकतो. परंतु त्याचे ऊत्तर कळले तरी त्यांना ते वळत नाही.ते ऊत्तर असे आहे की, ज्यांच्या मनात ट्रस्टीसिप रुजलेली आहे त्यांनाच वेगळ्या जीवन शैलीचा अनुभव देता येतो. खेड्यापाड्यातील आर्थिकद्दष्ट्या दुर्बल मुलांसाठी वसतिगृह चालवतांना त्यांचे मन कधी साने गुरुजींचे व्हायचे ते कळत नसे.

प्रा. सुधाकर अहंकारी, डाॅ. शशिकांत अहंकारी या परिवारामुळे त्यांच्या ‘जवाहर’ विद्यालयाच्या परिसरातील शिस्तबध्द काम पाहता आले. पुढे अनेकदा भेटी होत राहिल्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीवर आल्यानंतर अनेकदा भेटी होत राहिल्या. तेव्हां ते आमदार होते. एरवी लोकप्रतिनिधींना जी आदरतिथ्याची सवय असते ती आलुरे गुरुजींनी अंगवळणी पडू दिली नाही. मराठवाडा साहित्यपरिषदेला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. त्या वेळी शिवाजी पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होते. आजचा काळ फार वेगळा आहे.

हल्ली श्रीमंत लोकप्रतिनिधीचे सत्तेतील महत्व बघून साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीत घेतले जाते. आलुरे गुरुजी मात्र वाचन संस्कृतीचे पालन पोषण करणारे होते. साहित्यिक गुणवत्ता जोखणारे होते. पदोपदी आधुनिकता स्वीकारणारे असूनही जुने ते सोने अशांचा आग्रह न धरता शिक्षण संस्थेच्या कारभारात नव रक्ताला सतत अग्रभागी ठेवणारे व्यक्तीत्व होते असे अभिमानाने सांगावेसे वाटते.

शुभ्र कपड्यांसारखे चारित्र्यही स्वच्छ ठेवायचे असते हा विचार कृतीतून दाखवला. विधान सभेतील त्यांची चिंतनशील कारकीर्द अल्पकाळच होती. खरेतर त्यांची निवडणूक ही एक आदर्शवत ठरावी अशीच होती. कारण ती त्यांच्या विद्यार्थ्यांनी खांद्यावर त्यांच्या विचारांचा झेंडा घेऊनच लढवली होती. त्यांच्या शिक्षण संस्थांमधून शिकून कर्तेसवरते झालेल्या विद्यांर्थ्यांचे पालक त्यांचे कार्यकर्ते  बनले. प्रचारासाठी गाव विकत घेण्यासाठी पैसा नसलेल्या या माणसाकडून मतदार कोणतीच अपेक्षा ठेवत नसत. त्यांचा साधेपणा, निर्मोहीवृत्ती ,काम आणि कधीही,कोणत्याही वेळी अवेळी गरजूंना भेटण्याची तयारी एवढ्या एका सूत्रावर ते निवडून आले परंतु राजकारणात रमले नाहीत.त्याचे कारण त्यांना मान्य नसलेली तडजोड.

आधुनिक मतदारांना जे महत्व जाणवावे लागते ते त्यांच्याकडे कधीच नव्हते.त्यांच्या स्वभावाचे महत्वाचे वैशिष्ट्य असे होते की,त्यांना आसक्ती आणि विरक्ती यातील स्पष्ट फरक दिसत होता.ते जनसामान्यांची प्रतिमा ओळखून होते.म्हणून त्यांना ज्ञात -अज्ञात प्रेरक शक्तीची स्पष्ट कल्पना होती.कृती -ऊक्त्तीत विरोधाभास न जाणवणारा शिक्षण क्षेत्रातील एक सत् शील कार्यकर्ता म्हणून जे दर्शन झाले ते असे.ते म्हणजे आदर्श आणि उदात्तच.निसर्ग सृष्टीतील रम्य आणि आगम्य सहनशीलता त्यांच्याठायी संस्कारातूनच आलेली होती ,तो गांधीजींची मूल्ये  व कार्यनिष्ठा विसरत जाण्याने आपले आणि देशाचे काय होते ते आपण आज बघतच आहोत.

ओलेचिंब तरारलेल्या झाडाबद्दल जे मनाला वाटते तेच आलुरे गुरुजींबद्दल वाटते.कारण माळावर लावलेल्या झाडांची जोपासना कशी करावी ते अशा माणसांनीच शिकवले तेही मर्यादित साधन सामुग्री असतांना.जे कल्पनेत होते ते अस्तित्वात आणण्यासाठी जी प्रेमभावना ,आपुलकी लागते ती त्यांच्यात होती.त्यांनी कधीही सनातनी ,कर्मठपणाला जवळ फिरकू दिले नाही म्हणून ते नवी भावसृष्टी ऊभी करु शकले.

अवाढव्य ,असंख्य ,अगणित या शब्दात त्यांचे शैक्षणिक क्षेत्र मोडत नसले तरी जे कांही केले ते परिवर्तनासाठी खूप कांही देऊन गेले आणि गांधी वादाचा मूलतत्वाधार तोच आहे.नैतिक ,शैक्षणिक व आर्थिक संस्कृतीचा पाया म्हणून आपण त्याकडे पाहिले पाहिजे म्हणजे अशी माणसे काय तोलाची होती हे समजून येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0