केविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा

केविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा

धक्कादायक निकालांसह भाजप आणि शिवसेना युती १६१ जागांवर तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ९८ जागा मिळाल्या आहेत. सत्ता नेमकी कोण स्थापन करणार याबाबत अजूनही संभ्रम निर्माण झाला असून, जागा कमी होऊनही शिवसेनेची ताकद वाढली आहे.

ममता रस्त्यावर, प्रियंकाचे धरणे, सोनियांची टीका
बाबरी मशिदीच्या खाली मंदिर असल्याबाबत पुरातत्ववाद्यांमध्ये मतभेद
व्यवस्था बळकविण्याचा मोदी-शहा पॅटर्न

शिवसेना जोर लावत असून, राष्ट्रवादीने नामोहरम केल्याने सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये  भाजपच्या १२२ जागा होत्या. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये सेनेला ६४ जागा होत्या. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी १४४ जागा आवश्यक असल्याने ते एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतील. भाजपच्या गेल्यावेळी पेक्षा १७ जागा कमी झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या असून, त्या पक्षाने भाजपला रोखल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये रोखले असून, कॉंग्रेसने भाजपच्या विदर्भातील जागा कमी केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचे आव्हान पेलल्याचे चित्र निर्माण झाले असून, ५४ जागा मिळवूनही राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली.

काँग्रेसचे कोणतेही मोठे नेते प्रचाराला महाराष्ट्रात आले नाहीत. तरीही कॉंग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्रात एकूण मतदानाच्या २५.७ टक्के मते भाजपला मिळाली आहेत. राष्ट्रवादीची मतांची टक्केवारी १६.७ टक्के आहे. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी १६.४ टक्के इतकी आहे. संख्याबळात दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा कमी मते मिळाली आहेत. काँग्रेसला १५.८७ टक्के मते मिळवता आली आहेत. मनसेला २.२५ टक्के तर एमआयएमला १.३४ टक्के मते मिळाली असून, १.३५ टक्के मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय वापरला आहे.

नव्या विधानसभेत २३ महिला आमदार असतील असे चित्र असून त्यात ११ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मावळत्या विधानसभेत २२ महिला आमदार होत्या. २३५ महिला उमेदवारांनी विविध पक्षांकडून निवडणूक लढविली होती.

भाजप-सेना महायुतीला २२० ते २५० जागा मिळतील असा भाजपचा कयास होता. आज सकाळीही इतक्याच जागा मिळतील असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी व्यक्त केला होता. पण संध्याकाळपर्यंत निकाल जसजसे येऊ लागले तसे राज्याचे चित्र बदलत गेले.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०१४ च्या निवडणुकीमध्ये गेलेले आपले बहुतांशी मतदारसंघ परत मिळविले आहेत. राष्ट्रवादीने पुणे, कोल्हापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे विजय मिळविले. विशेषतः साताऱ्यामध्ये भाजपचे उद्यनराजे भोसले पराभूत झाले. तेथे लोकसभेसाठी पोट निवडणूक झाली. त्या ठीकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी मोठा विजय मिळविला.

राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून, परळीमधून धनंजय मुंडे, बारामतीमधून अजित पवार, नाशिकमध्ये छगन भुजबळ, श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे या विजयी झाल्या.

पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, राम शिंदे, मुक्ताईनगर मधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचे पराभव झाल्याने भाजपला धक्का बसला आहे.

भोकरमधून ८७ हजार मतांनी अशोक चव्हाण विजयी झाले तर ८ हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण कराड मधून जिंकले. काँग्रेससाठी हे विजय मोठे होते. यांशिवाय परिणीती शिंदे, अमित आणि धीरज देशमुख, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये १५ हजार मतांनी विजयी झाले, आशिष शेलार २५ हजार मतांनी विजयी झाले तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील २१ हजार मतांनी कोथरूडमधून विजयी झाले.

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे प्रमोद पाटील यांचा विजय झाल्याने मनसेला एक जागा मिळाली.

ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य आदित्य ठाकरे ६२ हजार मतांनी वरळीतून विजयी झाले. तर कणकवली येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे २३ हजार मतांनी विजयी झाले आहेत. मुंबईचे महापौर शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये पराभव झाला. तेथे कॉंग्रेसचे झीशान सिद्दिकी निवडून आले.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि काँग्रेसमधून ३५ जण महायुतीमध्ये गेले होते. त्यापैकी १९ जण पराभूत झाले आहेत. त्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिलीप सोपल, भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. तर भाजप सेनेच्या ७ विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला.

शिवसेनेला कमी जागा मिळाल्या असल्या तरी सेनेची सत्तेत सहभागी होण्यासाठीची ताकद वाढली आहे. आम्ही आमचा पक्ष वाढविणार असून, मी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे म्हणाले, की जनतेने सगळ्यांचेच डोळे उघडले आहेत. ते म्हणाले, “जी काही भाजप बरोबर चर्चा होईल, ती पारदर्शकपणे केली जाईल.” सत्ता एकत्रितपणे राबविण्यासाठी ५०-५० टक्के सहभाग ठरविला जाईल.

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी तसेच महत्त्वाची खाती मिळविण्यासाठी शिवसेना दबावतंत्राचा वापर करणार असल्याचे चित्र आहे.

संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भाजपचा स्ट्राईकरेट वाढला आहे. ते म्हणाले, “यावेळी आम्ही केवळ १६४ जागा लढवल्या, त्या तुलनेत आमच्या चांगल्या जागा आल्या आहेत. आमचा स्ट्राईकरेट ७० टक्के आहे. पण विरोधकांच्या जागा फार काही वाढलेल्या नाहीत. आम्हाला उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा धक्का आहे. आमचे काही मंत्री पराभूत झाले आहेत, त्याचं आम्ही विश्लेषण करू, दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली, त्याचा फटका आम्हाला बसला.” फडणवीस म्हणाले, की अपक्ष निवडून आलेल्या १५ जणांनी आपल्याशी संपर्क साधला आहे.

शरद पवार यांनी एकहाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे. त्यांनी भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आणि पर्याय असल्याचे महाराष्ट्रात जाणवून दिले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “२२० जागा मिळविण्याचे जे चित्र उभे करण्यात आले होते, ते महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. सत्तेमध्ये गेल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्तेचा दुरुपयोग करायचा नसतो. डोके ताळ्यावर ठेऊन निर्णय घ्यायचे असतात. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ला करण्याचा जो प्रकार झाला, त्याला जनतेने नाकारले आहे. हे शासन आणि मुख्यमंत्री याना लोकांनी नाकारले आहे” मात्र आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल मिळाला असल्याचेने सहकारी काँग्रेस आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीमध्ये ३७० चा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी खूप वापरला. याशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरे काहीच नाही, असे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. पण ग्रामीण मतदारांनी हा मुद्दा नाकारल्याचे चित्र आहे. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग- कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आणि कलम ३७० जे संसदेने रद्द केले आहे. ते परत आणण्याचा प्रश्नच नाही, तरी पंतप्रधान आव्हान देत होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: