यातनांची शेती

यातनांची शेती

१९९५ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७५,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची ‘शिक्षा' म्हणून त्यांच्या विधवांना जणू घरगुती जन्मठेप व सक्तमजुरी भोगावी लागत आहे, असं दृष्य हजारो घरांतून दिसत आहे. दीप्ती राऊत यांनी अशा अनेक होरपळलेल्या घरांची अवस्था जवळून पाहिली. या महिलांचं अंतरंग जाणून घेतलं आणि त्यातून हा ‘कोरडी शेतं.. ओले डोळे' हा प्रस्तूत दस्तऐवज वाचकांच्या हाती दिला आहे.

महाराष्ट्रातील पर्यावरणीय वृत्तांकनाचा व्यापक वेध
वंशवाद आणि वंशद्वेष
आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.

इ. स. ६४ साली तब्बल ६ दिवस रोम जळत होतं आणि त्या वेळी सम्राट नीरो हा धुंदीत फिडल वाजवण्यात मग्न होता. हे ‘ऐतिहासिक कर्तृत्व’ सर्वश्रुत आहे. नीरोचा ऐषोराम व शाही पाहुणचार यांच्याही अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. सध्याच्या धनाढ्यांना लाजवेल असं ते ‘इव्हेंट मँनेजमेंट’ होतं. पाहुण्यांची ‘खातीर’ करण्याकरता सूर्यास्तानंतर भव्य मेजवानी आयोजित केली जात असे. त्यासोबत गायन-नर्तन या कलांचा आस्वाद दिला जात असे. मधुर संगीत सुरू असतानाच सुंदर ललनांचं नृत्य व पदन्यास पेश होत असे. परंतु त्या काळी वीज नसल्यामुळे अंधार दूर कसा करावा ही समस्या होती. ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्याकरता ‘इव्हेंट’ तर आवश्यकच असतो. गरज ही शोधाची जननी असते ना? यातून एक अचाट कल्पना निघाली. ती सम्राटाला सुचली की त्याच्या दरबारी सेवकांना ही बाब स्पष्ट नाही. परंतु त्याची अमलबजावणी मात्र तातडीने झाली. शाही महालाला अनेक स्तंभांचा आधार असे. त्या स्तंभांना सुक्या गवताने लपेटायचं. गवताच्या ज्वलनातून उजेड पडत असे. परंतु तो फार काळ टिकत नसे. दीर्घकाळ परिसर प्रकाशमान व्हावा याकरता काय करावं असा पेच निर्माण झाला. आणि मग ही अडचणदेखील दूर करण्यासाठी मार्ग सुचला. त्यानुसार प्रत्येक स्तंभाला गवतासोबत एक गुलाम लपेटला जाऊ लागला. गुलाम जिवंत जळत असताना सभोवताल उजळत असे.

जवळपास दोन हजार वर्ष उलटत आली तरी नीरोची आठवण करून देणारे असंख्य नेते आजही जगभर सापडत असतात. परिसर प्रकाशमान करण्यासाठी जिवंत जळणाऱ्यां गरिबांना स्वस्थचित्ताने पाहणाऱ्या अतिथींच्या मूक संमतीने ते भीषण कौर्य चालू असे. आजही हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या निष्क्रियपणे पाहणारा समाज, सरकार व प्रसारमाध्यमं हे त्याच अतिथी परंपरेतील आहेत, विख्यात पत्रकार पी. साईनाथ यांनी असा घणाघाती हल्ला ‘नीरोज गेस्ट्स’ वृत्तपटात केला होता.

सर्व काळातील सरकार व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकऱ्यांची परवड’ त्रिकालबाधित सत्य बनवून टाकण्याचा कर्तरी प्रयोग केला आहे. त्यावर कोरडेे ओढण्याचे कार्य १८८३ साली महात्मा फुले यांनी  ‘शेतकऱ्यांचा आसूड’ मधून केलं. १९२५ साली ना. ह. आपटे यांच्या कथेवर बाबूराव पेंटर यांचा शेतकऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा ‘सावकारी पाश’ चित्रपट निघाला. तर, कर्ज फेडता न आल्यामुळे सावकाराच्या घशात गेलेल्या २ बिघा जमिनीवर बिमल रॉय यांनी १९५३ साली ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट काढला होता. त्याआधी १९४० साली मेहबूबखान यांनी शेतकऱ्याच्या निधनानंतर येणाऱ्या संकटांचा सामना करणाऱ्या लढवय्या विधवेचं दर्शन ‘औरत’ चित्रपटातून दाखवलं. पुढे १९५७ साली त्याचा रिमेक अवतार ‘मदर इंडिया’ प्रदर्शित झाला. त्या ‘मदर इंडिया’ची एकसष्टी उलटल्यावर खऱ्या ‘मदर इंडिया’ कशा जगत आहेत याचा धांडोळा म्हणजे ‘कोरडी शेतं, ओलेे डोळे’ हे पुस्तक.

शेती, त्यात शेतकरी महिला, त्यात विधवा आणि त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा अशा चोहोबाजूंनी आलेल्या वंचितावस्थेत दिवस काढणाऱ्या महिला म्हणजे उपेक्षितांतील उपेक्षित विश्व! आपल्या जगातून त्या जगाकडे पाहण्याची इच्छासुद्धा न होणाऱ्या काळात, अशा अनेक घरांना वारंवार भेटी देण्याची इच्छा पत्रकार दीप्ती राऊत यांना झाली. केवळ करुण कहाण्या सादर न करता त्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास, त्यांच्या समस्यांवर उपाय व अशा घन तमात लकाकणाऱ्या काही रेषांचं आशादायी चित्रदेखील त्यांनी रेखाटलं आहे.

१९९५ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७५,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची ‘शिक्षा’ म्हणून त्यांच्या विधवांना जणू घरगुती जन्मठेप व सक्तमजुरी भोगावी लागत आहे, असं दृष्य हजारो घरांतून दिसत आहे. दीप्ती राऊत यांनी अशा अनेक होरपळलेल्या घरांची अवस्था जवळून पाहिली. या महिलांचं अंतरंग जाणून घेतलं आणि त्यातून हा प्रस्तूत दस्तऐवज वाचकांच्या हाती दिला आहे. पतीच्या आत्महत्येनंतर या विधवांसाठी पहिले दहा दिवस सांत्वनाचे आणि नंतर पूर्णपणे उपेक्षेचे जातात. छायाचित्र व प्रदर्शनासाठी येणारे आमदार त्यांच्याच संस्थेच्या महाविद्यालयात अर्ज करणाऱ्या तरुण शेतकरी विधवेच्या डी.एड.साठी रद्दबदलीच्या अर्जासाठी सहानुभूतीपूर्वक विचार सोडा, त्यासाठी झालेली पैशाची मागणी, शेतकरी आत्महत्येनंतर शवविच्छेदनाच्या अहवालासाठी मोजावे लागलेले ३००० रुपये, पतीच्या आत्महत्येसाठी सासरच्यांनी तिच्यावर ठेवलेला ठपका, संसाराचा गाडा ओढण्यासाठी घराबाहेर पडल्यावर झेलाव्या लागणाऱ्या नजरा आणि खावे लागणारे टोमणे, विधवा म्हणून वाट्याला येणारा सामाजिक बहिष्कार, एकटी म्हणून होणारी सार्वजनिक चर्चा, जमिनीच्या हक्कावरून सुरू असलेला भाऊबंदांचा जाच, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन प्रसंगी तिची फाईल मंजूर करण्यासाठी शासकीय स्तरावरून होणारी अश्लाघ्य मागणी हा सारा संतापजनक प्रवास यात रेखाटण्यात आला आहे.

सोबतच कोलमडलेला संसार आणि करपलेली शेती सावरण्यासाठी, मुलांचे शिक्षण आणि सासरच्यांचे आरोग्य सांभाळत दिवस रेटणाऱ्या या महिलांचा भावनिक कोंडमारा यात भेदकपणे टिपण्यात आला आहे. लेखिकेच्या शब्दात सांगायचं म्हणजे, ‘एवढ्या बिकट परिस्थितीतही केवळ हिंमत, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी त्या संकटांनाच शिंगावर घेतलं आहे. फाशीचा दोर किंवा किटकनाशकाची बाटली तोंडाला लावण्याऐवजी मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून त्या जगत आहेत.’

सध्या तर शेतकरी हा तर केवळ चवीला तोंडी लावण्यापुरता विषय उरला आहे. अशा शोचनीय काळात राऊत यांनी शेती आणि निर्माती या दोघांचं करुणोपनिषद आपल्यापुढे ठेवलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कारणं याविषयी काही बोललं की ‘आत्महत्येचं उदात्तीकरण’, ‘निराशावादी’, ‘नकारात्मक’, ‘प्रलयघंटावादी’ असे संबोधून ‘जाऊ द्या नं’ हा वसा जपला जात आहे. देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी २.५ एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्यांची संख्या ७५ टक्के असून राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार त्यांचं दरमहा उत्पन्न ५,२४७ रुपये तर खर्च ६,२२३ रुपये आहे.

‘शेतीचं काय करायचं?’ ही समस्या एकविसाव्या शतकात पाऊल ठेवल्यापासून अक्राळविक्राळ रुप धारण करते आहे. त्यामुळेच पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १० फेब्रुवारी २००४ मध्ये कृषीमंत्री सोमपाल यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार जाऊन पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार आल्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १८ नोव्हेंबर २००४ रोजी शेतीतज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांची कृषी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. आर. बी. सिंग, वाय. सी. नंदा, अतुल सिन्हा, अतुलकुमार अंजान, जगदीश प्रधान, रमाकांत पितळे आणि चंदा निंबकर हे राष्ट्रीय कृषी आयोग सदस्य होते. या समितीने विलक्षण परिश्रम घेऊन राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा ६०० पानी अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी केंद्र सरकारकडे सुपूर्त केला. त्यामध्ये शेतीमालाच्या भावाव्यतिरिक्त अनेक सूचना केल्या आहेत. त्यात सातबारावर महिलांचे नाव असणं, त्यांनादेखील कर्जापासून सिंचनापर्यंत साऱ्या सवलती मिळाव्यात आणि आत्महत्याग्रस्त महिलांना विशेष निधी दिला जावा या शिफारसी आहेत.

भारतीय शेतीचा निम्मा भार महिला उचलत असतात. याची दखल घेऊन २०११ साली प्रा. स्वामीनाथन यांनी महिला शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत विशेष विधेयक मांडलं होतं. महिला शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांची मागणी करणाऱ्या या विधेयकाला कोणीही वाली मिळाला नाही, यावरून आपल्या लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता लक्षात येते. ती मागणी मान्य झाली असती तर हजारो शेतकरी विधवांच्या खस्ता नक्कीच कमी झाल्या असत्या.

शेतकरी आयोगाने, भारतीय शेतीपुढील सूक्ष्म व स्थूल समस्यांचा सखोल अभ्यास करून निरीक्षणं व सूचना केल्या आहेत. वरचेवर शेतजमिनीचा आकार आकसत आहे. ११ टक्के शेतकरी भूमीहीन आहेत. ४० टक्के शेतकऱ्यांना १ एकरपेक्षा कमी जमीन कसावी लागते. ३४ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते ५ एकर जमीन आहे. केवळ १२.६ टक्के शेतकरी ५ एकरपेक्षा अधिक जमीन बाळगून आहेत. सर्वेक्षणातील ही माहिती सांगून स्वामीनाथन जमिनीची पुनर्रचना करण्याचं आवाहन करतात. ‘लागवडीखालील जमीन व जंगलाचा अकृषी कारणांकरता उपयोग रोखला पाहिजे. विशेष आर्थिक क्षेत्रापेक्षा विशेष कृषी क्षेत्र’ अत्यंत महत्त्वाचे आहेत. अल्पभूधारक व भूमीहिनांना पडीक जमीन कसण्यास द्यावी, जंगलात राहणाऱ्यांना, आदिवासींना वनसंपत्तीचा लाभ घेऊ द्यावा, शेतजमिनीच्या विक्रीवर नियंत्रण आणावं’ अशा अनेक सूचना त्यांनी केल्या आहेत. यांचा विचार करणे अजिबात कठीण नाही. पंरतु विशेष आर्थिक क्षेत्रासाठी दिसणारी जबरदस्त राजकीय इच्छा विशेष कृषी क्षेत्रांबाबत दिसत नाही. हे मुद्दे कधीच व कुठल्याच चर्चेत येत नाहीत. पी साईनाथ म्हणतात, ‘स्वामीनाथन समितीच्या शिफारशींवर संसदेत तीन ताससुद्धा चर्चा होत नाही. यावरून शेतकऱ्यांना दिलं जाणारं महत्त्व सिद्ध होतं.’ अब्जाधीश धनदांडग्यांना सहजगत्या हजारो कोटींची कर्ज मिळतात आणि ते काखा वर करून शकतात. बँका भिकेला लागतात. परंतु त्यांना कुणीही हात लावू शकत नाही. त्याच वेळी लाखभराच्या कर्जासाठी हजारो शेतकरी आत्मनाश घडवतात. विचारवंत सर इसाया बर्लिन म्हणतात, ‘लांडग्यांना स्वातंत्र्य म्हणजे शेळ्यांचा विनाश!’

शेती व संस्कृती दोन्हींचा उदय व चरमावस्था ही स्त्रीमुळे आली. आता शेती व संस्कृती या दोन्हीही नकोशा झाल्या आहेत. निसर्गावर बलात्कार करून संपत्तीची निर्मिती करण्याचा काळ, काम व वेग वाढतच आहे. दुसरीकडे जगाची वाटचाल स्वयंचलित, काटेकोर, मानवरहित व यंत्रमानवाच्या शेतीकडे होत असताना शेतकरी ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा बिकट काळात शेती व कुटुंबाचा भार खांद्यावर क्रूसारखा घेऊन हजारो महिला वाट काढत आहेत. कुठे माहेरचे, क्वचित सासरचे मदत करणारे निघतात. कुठे काही स्वयंसेवी संस्था सहाय्य करतात. अकोला जिल्ह्यातील कट्यार गावच्या ज्योतीताई पतीच्या आत्महत्यानंतर चौदाव्याला शेतात पहिलं पाऊल टाकतात. ७ वर्षात सासरा, नवरा आणि दीर अशा ३ आत्महत्यांंनंतर ही रणरागिणी तडफेने शेतात उतरते. नवऱ्याने गहाण टाकलेली बैलजोडी सोडवतात. बोअरवेल घेतात. वीजेसाठी उपोषण करतात. जमीन हडपण्याचे इरादे करणाऱ्या नातेवाईकांपासून पोलीस पाटलांपर्यंत सर्व आघाड्यांवर थेटपणे लढतात आणि सर्वसामान्य मजूर ते तहसीलदार असे अनेकांची साथ घेऊन प्रगतीशील शेतकरी बनतात. अशाही झुंझार महिला आपल्या आसपास आहेत. त्यांचा हा संघर्ष आणि त्यांची जिद्द फक्त महिलाच नाही तर पुरुष शेतकऱ्यांसाठीही उर्जा देणारा आहे. म्हणूनच हे पुस्तक लेखिकेने ‘डोळ्याचा पदर कंबरेला खोचून जगण्याची लढाई जिंकणाऱ्या साऱ्याजणींना’ सार्थपणे अर्पण केलं आहे.

खरा प्रश्न आपण काय करणार हा आणि हाच आहे. आत्महत्या केलेल्या आणि त्या टोकावर असलेेल्या शेतकरी कुटुंबांचा शोध घेणं अवघड नाही. अशा कुटुंबांना थोडा तरी आधार आपल्यापैकी प्रत्येक जण देऊ शकतो.

कुणी मारावे, कुणी मरावे I कुणी जगावे खाऊनी दगड I

कुणी रडावे, रडवावे कुणी I कुणी हसावे पिऊन वायू I

कुणी दाबुनी जखम आजची, जरा उद्याचा काढावा पू II

मर्ढेकरांच्या या पंक्ती प्रत्यक्षात कंठणाऱ्या शेतकरी कुटुंबांकरता ती आशा असेल आणि लेखिकेने याचसाठी अट्टाहास करत आपल्यापुढे ‘ते जग’ आणून ठेवलं आहे. प्रस्तुत पुस्तक घराघरापर्यंत गेलं पाहिजे. यातील मजकूर वाचून समाजाच्या सर्व स्तरांंपर्यंत भिडला पाहिजे. बारा कोटींच्या महाराष्ट्राला काही हजार शेतकरी घरं अजिबात जड नाहीत, हे दाखवून समाज सुधारणेचं नवं पर्व सुरू झालं तरच आपली परंपरा व अस्मिता, अभिमान व संस्कृती, गर्जना व गर्व वैगरे सार्थ ठरण्याची शक्यता आहे.

(‘कोरडी शेतं.. ओले डोळे’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे संक्षिप्त रुप)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: