रायमुनिया

रायमुनिया

शेतकरी आणि रंगीत रायमुनिया यांचं घनिष्ठ नातं आहे. गवतावर नियंत्रण ठेवणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. गवताची पाती घरट्यासाठी.  बिया पोटासाठी फस्त करतात.

वृक्षः शाश्वत जीवनाचा अशाश्वत अंश
मुंबईकरांचे सखे शेजारी
माणूस झाला छोटा, निसर्ग झाला मोठा!

चोरट्या रानवाटेतल्या पिकलेल्या कामुन्या पाहून रंगीत रायमुनियाची आठवण हमखास येतेच. गुडघ्याएवढं वाढलेलं झाड अन्  त्यावर रसरसलेली ज्वारीच्या आकाराएवढी लहान फळं सगळ्यांना आवडतात. रंगीत रायमुनिया या पक्ष्यानं कामुन्याचा रंग अंगावर ओतून घेतलाय असंच वाटतं. आकारानं चिमणीपेक्षाही लहान असलेला पक्षी. आकारानं मोठे असणारे पक्षी सहज ओळखता येतात. कावळा, चमचा, बगळा, शेराटी, रोहीत, कांडीमार अशा पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचाली डोळ्यांनी सहज टिपता येतात. परंतु लहान आकाराचे पक्षी नेहमी चकवा देतात. त्यांचं निरीक्षण करणं तसं अवघडच! वटवट्या, शिंपी, सुभक, रंगीत रायमुनिया अशी पाखरं जास्त वेळ पाहता येत नाहीत. सायंकाळी कमी वेळेत भाराभर गवत कापावं लागतं अगदी तसंच कमी वेळेत या पाखरांच्या अनेक सवयीच्या नोंदी कागदावर उतराव्या लागतात.

रंगीत रायमुनिया उंच वाढलेल्या गवताच्या आत एखाद्या खुरट्या झाडात आपलं घरटं विणते. या पक्ष्याची अनेक घरटी जवळून पाहता आली. पक्षीमित्र डॉ. विनायक कुलकर्णी यांच्यासोबत ‘पक्ष्यांचा अधिवास’ पाहण्यासाठी इंद्रायणी माळावर गेलो होतो. तेव्हा गवताच्या पात्यापासून विणलेलं सुंदर घरटं कॅमेऱ्यात टिपता आलं. ती मुनिया मनपटलावर सारखी भिरभिरत राहिली. तिची बदामी रंगाची दोन अंडी त्या घरट्यात सुखरूप होती. आम्ही काही अंतर ठेवून निरीक्षण करत होतो.

नर गवताची हिरवीगार पाती आणून द्यायचा. मादी त्यापासून घरटं विणत होती. नर दूरवरून येताना घरट्याजवळील झाडावर बसायचा. गवताचं पातं वार्‍यासोबत हलायचं. तेथून तो खुरट्या झाडावर बसायचा. आजूबाजूचा कानोसा घेत झुडपात दिसेनासा व्हायचा. काही वेळानं भुर्रकन बाहेर पडायचा. मला वाटलं तो एकटाच असावा. आमची चाहूल लागताच घरट्यात अंड्यावर बसलेली मादी भुर्रकन बाहेर पडली. त्यानंतर घरटं पाहता आलं. परंतु त्यांनी आम्हाला ओळखलं. खूप वेळ त्यांनी घरट्याकडे पाठ फिरवली होती. आम्ही दूरच्या लिंबाखाली आडोशाला बसलो. तिथेच जेवण केले. परंतु मुनिया आलीच नाही. कंटाळून जमिनीवर अंग टाकलं. चक्क ती जोडी लिंबाच्या झाडावर बसलेली. त्यांनी आमच्यावर पाळत ठेवलेली. आम्ही अजून दूर गेलो. डोळ्याला कॅमेरा लावला. त्यांच्या हालचाली पूर्ववत सुरू झाल्या.

पक्षीमित्र धनंजय गुट्टे यांच्या सोबत परभणी विद्यापीठात भटकंती केली. पहाटेची वेळ. पानगळ झालेल्या उंच झाडावर बसलेल्या गरुडाच्या हालचाली टिपत होतो. हळूहळू अंतर कमी करत जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू होता. अचानक रंगीत रायमुनिया पुढ्यात उभी. जमिनीवर काहीतरी टिपत होती. आम्ही खाली बसलो. ती गवताच्या दांड्यावर बसली. तिच्या पायाची पकड मजबूत होती. गवतानं मान टाकली तेव्हा गवता सोबत हळुवारपणे खाली येताना तिला हिंदोळ्यावर बसल्याचा आनंद होत असेल! यावेळी तिला डोळे भरून पाहता आलं. तिच्या अंगावरील विलोभनीय रंगाचे दर्शन झालं. कोवळ्या उन्हात ती न्हावून निघालेली. लपंडाव खेळणारी मुनिया आज एवढी स्तब्ध ! माणूस मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अगदी असंच झालं.

पिंगळगड नाल्याच्या दिशेने आम्ही चालत होतो. पुन्हा एकदा रंगीत रायमुनियाची जोडी गवताची पाती घेऊन जाताना दिसली. त्यांचा पाठलाग केला. उंच गवताच्या झुडपात दिसेनाशी झाली. पण जवळ जाण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही. कारण इंद्रायणी माळावर घरटी पाहून गेल्यानंतर दोन दिवसांनी त्या घरट्याचं निरीक्षण केलं होतं. त्यात बदामी रंगाची अंडी नव्हती. एखाद्या शिकारी पक्ष्यांनं फस्त केली असणार?

आम्हाला कधीकधी पक्षीमित्र म्हणून घ्यायची लाज वाटते. पाणथळ जागा शोधताना, रानवाटा धुंडाळताना आपली चाहूल लागताच पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचाली थांबतात. त्यांचं खाणं बंद होतं. चिमणीला शेकडो वेळा पिलांना भरवावं लागतं. तिच्या क्रियेत फरक पडतो. असं निरीक्षण काय कामाचं?

रंगीत रायमुनिया अंगावर बकुळीच्या फुलांचा रंग गोलाकार धारण करते. लाल अन् तपकिरी रंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके अधिक खुलतात. पंखाच्या दोन्ही बाजूवर आणि छातीला या ठिपक्यांची संख्या अधिक असते. पोटाखाली ठिपके विरळ होताना पाहायला मिळतात. मानेजवळील ठिपक्यांचा आकार लहान असतो. चिमणीपेक्षा जाड चोच. चोचीचा वरचा भाग तपकिरी काळानिळा दिसून येतो. डोळ्याच्या कडा काळपट तर पापणीखाली पांढरा भाग अधिक स्पष्ट दिसतो. डोके तपकिरी लाल रंगाचे. शेपटी काळसर तर कडा पांढरी. मागच्या बाजूचे लालसर पिसे शेपटीची शोभा वाढवतात. चातकाच्या शेपटीची कडा आणि रायमुनियाच्या शेपटीची कडा यामध्ये काही अंशी साम्य दिसते.

गवताच्या बिया आणि किडे हे या पक्ष्याचे मुख्य खाद्य. त्यांच्या चोचीची रचना विशेष असते. ज्वारीची दाणे जात्यात भरडून निघावी तशा गवताच्या बिया त्यांच्या चोचीत भरडून निघतात. नव्हे पीठच होते.

शेतकरी आणि रंगीत रायमुनिया यांचं घनिष्ठ नातं आहे. गवतावर नियंत्रण ठेवणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. गवताची पाती घरट्यासाठी.  बिया पोटासाठी फस्त करतात. तणनाशक मारण्याची गरज पडणार नाही. परंतु तणनाशकाने फवारलेल्या गवताच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर आघात होतो. त्यांची वीण थांबते. प्राण्यांसाठी टेस्ट ट्यूब बेबीची सुविधा उपलब्ध आहे. पक्ष्यांचं काय? कोणी करायचं त्यांचं बाळंतपण?

त्यांची वीण व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी रानवाटा धुंडाळाव्या लागतात. अन्नसाखळीतील सर्वच घटक फार महत्त्वाचे असतात. तणमोर, माळढोक, बेंडूकतोंड्या, गुलाबी मानेचे बदक, सुवर्णगरुड, काळा गरुड हे पक्षी अतिदुर्मिळ आहेत. बोटावर मोजण्याएवढी यांची संख्या आहे. रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर वाढतच राहिला तर रायमुनिया पक्षांची प्रजाती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

लाल रंगाची फुलं सर्वांना आवडतात. लाल तपकिरी रंगाच्या गुंजाच्या बिया सर्वांना मोहित करतात. ही लाल तपकिरी रंगाची रंगीत रायमुनिया का बरं आवडू नये?

‘ठिपकेवाली रायमुनिया’ रंगीत रायमुनियापेक्षा मोठ्या संख्येने आढळतात. तिला ‘खवलेधारी मुनिया’ असेही म्हटले जाते. दोन्ही पक्ष्यांचा आकार सारखाच. ठिपकेवाली मुनिया काही अंशी मोठी दिसते. तिचा रंग तपकिरी असून पोटाखाली पांढऱ्या पिसावर काळसर रंगाचे खवले धारण केलेले असतात म्हणून ती खवलेधारी मुनिया. या पक्ष्यांची वीण पावसाळ्यात होते. त्यांना पाहण्यासाठी सकाळची वेळ उत्तम.

मी अनेक वेळा त्यांचं निरीक्षण केलंय. गवताच्या बियावर तुटून पडलेल्या मुनिया आजही मला स्पष्ट दिसतात. सकाळची वेळ होती. गुडघाभर वाढलेल्या गवतातून वाट काढत चालत होतो. पुढे गवताची उंची कमी झालेली. रात्री पाऊस पडल्यामुळे चालायला त्रास होत होता. थोडा उंचवटा पाहून पळसाची पानं अंथरली. विश्रांतीसाठी खाली बसलो. झुडपात बसलेले हरिण गडबडीने उठले. माझा अंदाज घेत ते दूर गेले. हरणाची जागा चाचपून पाहिली. ती जागा उष्ण होती. तिथं हरणाऐवजी मी बसलो. काही वेळातच ठिपकेवाली रायमुनियाचा थवा पुढ्यात बसला. एकूण १४ होत्या. गवताच्या बियावर तुटून पडल्या. काही जणी गवताच्या पाती घेऊन जात. सगळ्या निघून गेल्यावर त्या गवताचं निरीक्षण केलं. गवताच्या बिया एकाड एक खाल्लेल्या आढळल्या. काही गवताच्या सर्वच बिया भरडून काढलेल्या. ती आठवण मोरपिसासारखी जपून ठेवलीय.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0