लेखातून उमजलेल्या शांताबाई शेळके

लेखातून उमजलेल्या शांताबाई शेळके

शांताबाई शेळके यांचा आज ९८ वा वाढदिवस. सरस्वती नदीसारख्या त्या लुप्त पावल्या असल्या तरी त्यांच्या साहित्यस्रोताने आपल्या भावविश्वाची वनराई अजून हिरवीगार आणि टवटवीत ठेवली आहे.

कॅनरा बँकेने ४७ हजार ३१० कोटी राईट ऑफ केले
आरोग्य यंत्रणेवर लक्ष हवे; आमदारांचे मत
अति महत्त्वाकांक्षेचा बळी-विनोद तावडे

शांताबाई –

आप सरस्वती की तरह ही मिली
और सरस्वती की तरह ही गुम हो गयी
ये त्रिवेणी
आप ही को अर्पित कर रहा हूँ।

-गुलज़ार

(‘त्रिवेणी’ या पुस्तकाची अर्पणपत्रिका)

शांताबाई शेळके यांचा आज ९८ वा वाढदिवस. सरस्वती नदीसारख्या त्या लुप्त पावल्या असल्या तरी त्यांच्या साहित्यस्रोताने आपल्या भावविश्वाची वनराई अजून हिरवीगार आणि टवटवीत ठेवली आहे.

शांताबाई म्हणजे एक कल्पवृक्ष आहेत असेच कायम वाटत राहते. त्या वृक्षाच्या खाली बसून फक्त म्हणायचे बालसाहित्य की झालाच बघा बालसाहित्याचा वर्षाव.. म्हणा कविता, गीत, लेख, समीक्षा, भाषांतरे, मुलाखत….

आपल्या रसिक मनाच्या एक, एक इच्छा पुऱ्या होत राहतात… त्यातील वैविध्य बघून आपण थक्क होत राहतो. काव्य, गीते या एका प्रांतातील शांताबाईची विविधता विस्मयचकित करणारी आहे. त्याबद्दल बरेच लिहिलं, बोललं गेलं आहे. इतर प्रांतात त्यांची मुशाफिरी बघून वाटत त्यांची प्रतिभा ही विशिष्ट वर्तुळात फिरणारी नाही. ती एखाद्या निरागस बालिकेसारखी मुक्त आहे. कधी ती झाडावर चढेल तर कधी माळरानात मनसोक्त हुंदडेल.. तर कधी इंद्रधनुष्याचे पंख लाऊन आकाशात भरारी घेईल तर कधी नदीत सूर मारून तिचा तळ शोधेल..

‘धुळपाटी’ या पुस्तकांला त्याचे आत्मचरित्र समजले जाते. पण ते माझे आत्मचरित्र नाहीये तर त्या आठवणी आहेत, असे त्यांनीच सांगितले आहे. मग शांताबाईंनी आत्मचरित्र हा प्रकार का हाताळला नसावा? हा प्रश्न पडणाऱ्यांना माहिती नसेल तर आहे की शांताबाईचे आत्मचरित्र. शांताबाईंनी जे लेख लिहिले आहेत ते म्हणजेच त्यांचे आत्मचरित्र आहे. एका नामवंत लेखकाला विचारले की तुम्ही आत्मचरित्र का नाही लिहिले? त्यावर त्यांनी म्हटले की इतके वर्ष जे मी लिहितो आहे ते माझे विचार हेच माझे आत्मचरित्र आहे.

अशाच शांताबाई आपल्याला समजत जातात ते त्याच्या वेगवेगळ्या लेखातून. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची ताकद, त्याबद्दलचे मार्मिक विश्लेषण आणि त्यातून व्यक्त होणारी त्यांची मते आणि भूमिका.

लेखातून उलगडलेल्या शांताबाईबद्दलची काही उदाहरणे.

‘सलगी देणे’ या शब्दाचा भावार्थ त्यांनी एका लेखात इतका अप्रतिम उलगडून सांगितला आहे. त्यांनी लिहिले आहे की-

शिवरायाचे कैसे बोलणे। शिवरायाचे कैसे चालणे। शिवरायाचे सलगी देणे। कैसे असे ।।

या वर्णनातील ‘शिवरायाचे सलगी देणे’ ही शब्दसंहती फार सुंदर आहे. शिवाजी महाराजांच्या थोरवीचे अनेक पैलू आहेत; पण त्यांचे इतरांना ‘सलगी देणे’ हे जे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्यही ओळ मी जेव्हा वाचते, तेव्हा एक चित्रच माझ्या डोळ्यांसमोर उभे राहते. भोवताली पोट खपाटी गेलेले, कमरेला केवळ लंगोटी लावलेले, विळ्या-कोयत्यावाचून दुसरे हत्यार माहित नसलेले अडाणी, हीनदीन, परिस्थितीने दबलेले व गांजलेले मावळे गोळा झाले आहेत आणि स्वत:चे खानदान, ऐश्वर्य, नेतेपण पूर्णपणे विसरलेले शिवाजी महाराज त्यांना ‘सलगी’ देत आहेत! ही सलगी ते कशी देत असतील? कुणाच्या फडक्यात बांधलेल्या चटणीभाकरीचा घास ते आपुलकीने खात असतील, कुणाच्या म्हाताराम्हातारीची किंवा लेकराबाळांची आस्थेने चौकशी करीत असतील, कुणाच्या भीमथडी तट्टाची पारख करण्यासाठी स्वत: त्यावरून फेरफटका मारून येत असतील किंवा कुणाला आपले लहानसे काम प्रेमाच्या हक्काने सांगत असतील त्यांनी लोकांना सलगी देऊन आपलेसे केले. प्रेमाने त्यांना जिंकले आणि लोकसंग्रह केला. हे उत्कट जिव्हाळ्याचे निरभिमानी वर्तन हृदय हेलावून टाकते. कुठे हे लोकसंग्राहक वृत्तीचे शिवाजी महाराज आणि कुठे आपल्या परीटघडीची इस्त्री सांभाळीत लोकसमुदायातून अलिप्त शरीराने व कोरड्या मनाने वावरणारे आजचे मंत्री, पुढारी, लोकनेते?

आता या ‘सलगी देणे’ यांचे फक्त विवेचन शांताबाईंनी केलं नाही तर वैयक्तिक आयुष्यात शांताबाई स्वतः तशाच वागल्या. विद्यार्थी असो, रिक्षेवाला, भाजीवाली असो कोणाशीही शांताबाईचे एकदम जिव्हाळ्याचे नाते. शांताबाई माणसांच्या भोक्त्या होत्या. माणसांच्या आपुलंकीचं बंधन त्या मानीत.

अरुणा ढेरे यांनी त्यांच्या एका लेखात या त्याच्या स्वभावाची गंमत सांगितली आहे. एकदा खूप पाऊस पडत होता. बार्शीवरून पुण्याला यायला रात्रीचे दोन वाजले. अपरात्री घरी येण्याची किंवा रस्ता निर्मनुष्य आहे यांची शांताबाईना काळजी वाटली नाही. पण ड्रायव्हर गप्पीष्ट नाही याची मात्र त्यांना खंत वाटली. शांताबाई कुणाशीही गप्पा मारत आणि सवयीने रिक्षावालाही सापडे. त्या त्याच्याशी रुचेल ते बोलत. तो त्यांना ‘आजीबाई जरा जपून..’ असे म्हणाला की त्यांना ते भारी आवडे. वयाप्रमाणे मिळणाऱ्या या उपाध्या त्यांना आनंद देत असे. सलगी देणे याचा अर्थ त्यांच्या लेखणी इतकाच त्यांच्या वागण्यातून त्यांनी अधिक चांगला समजावून सांगितला.

त्या कायम माणसांत राहिल्या. सर्व प्रकारच्या माणसांवर त्यांनी भरभरून प्रेम केले. अगदी रागालोभासकट प्रेम केले. राग या गोष्टींकडे त्याचा दृष्टिकोन ही बघा हं कसा भारी आहे.

त्या लिहितात-माणसांचे जे षड् रिपू आहेत त्यांमध्ये ‘क्रोध’ या रिपूवर विजय मिळवावा असे सांगितले जाते. अगदी साध्या व्यावहारिक दृष्टिकोनातून एकूण रागवणे, संतापणे योग्य नाही असे आपण मानतो. खूप संताप आला की शंभर अंक मोजावेत हा संकेतही आपल्याला ठाऊक आहे. पण लगेच दुसरा विचार येतो. राग ही गोष्ट खरोखरीच इतकी वाईट आहे का? कामक्रोधादी रिपूंवर विजय मिळवलेले जे संयमी पुरुषोत्तम असतात त्यांची गोष्ट वेगळी, पण आपणासारख्या सर्वसामान्य, व्यवहारात गुंतलेल्या आणि दैनंदिन कटकटींनी गांजलेल्या माणसांसाठी राग किंवा क्रोध हा रिपु नसून सखा आहे. संतापाने तत्काळ भडकून उठणारे लोक घडीभराने लगेच शांत होतात. त्याच्या या भडक्याबरोबर मनातले किल्मिष जळून खाक होते. उफाळलेल्या द्वेष भावनेचा निचरा होतो आणि माणसामाणसांतले संबंध अधिक मोकळे, निरोगी, प्रसन्न होतात. भीती वाटते ती रागावर विजय मिळवलेल्या तथाकथित शांत, ‘संयमी’ लोकांची. ते राग प्रकट करीत नाहीत, पण वर्षानुवर्षे तो मनात धुमसत ठेवतात. आणि कधीतरी या रागाचा असा विलक्षण स्फोट होतो की आपण हादरूनच जातो. कुणाचाही क्षणिक क्रोध परवडला. पण आतल्या आत जळणारे दीर्घद्वेषी लोक नकोत. ते खरे धोकेबाज.

बाईचा हा दृष्टिकोन विलक्षण आहे. आपल्याकडे दमन या गोष्टीवर भर दिलेला असतो. शांताबाई शेवटपर्यंत मनमोकळ्या, दिलखुलास जगल्या. कोणता वेगळा मुखवटा चढवण्याची त्यांना गरज भासली नाही.

प्रवीण दवणे यांच्या एका लेखात त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. एकदा शांताबाईच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यांच्या एका मुलाखतीचं शीर्षक होतं, ‘शांताबाई : एक शांत, तृप्त व्यक्तिमत्त्व.’ त्या मुलाखतीच्या आरंभीच शांताबाईंनी मोकळेपणाने सांगून टाकलं, ‘मी शांत तर नाहीच, तृप्त तर अजिबातच!’ श्रोत्यांना धक्काच बसला. शांताबाई असं काय म्हणतात!

शांताबाई बोलल्या ते खरेच होतं. खरा जातिवंत, कलावंत कधीही शांत, तृप्त नसतो. त्याची अस्वस्थता त्याच्या नवतेचा शोध, त्याची तडफड, त्याची तहान हेच निर्मितीचे स्रोत आहेत. शांताबाईंनी हे स्रोत जपले. म्हणून त्या कायम काळाबरोबर राहिल्या. म्हणून त्या कधीच जुन्या झाल्या नाहीत. त्याच्या डोळ्यात जगाबद्दलचे कुतूहल, प्रत्येक क्षणीचे प्रेम, भरभरून देण्याची उर्मी, व्यक्तीबद्दलचा आदर यामुळे त्या मराठी रसिकजनाला आपल्या घरातल्या वाटल्या.

त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गोष्टीवर उगाचच टीका न करणे. ‘चोली के पिच्छे क्या है..’ या गाण्यावर टीका होत असतांना त्यांना मात्र त्या गाण्यात अश्लील काही जाणवले नाही. त्यांनी एक लेख लिहून आपल्या परंपरेतल्या अनेक लोकगीतात चोळीगीतांचा अभ्यासपूर्ण उल्लेख केला.

‘पंख गळालेली परी’ या लेखात त्यांनी लेडी डायना हिच्या विषयीची एक वेगळी बाजू वाचकांपुढे मांडली. प्रिन्स चार्ल्स आणि डायनाचे लग्न म्हणजे एखादी परीकथा साकार होताना आपण प्रत्यक्ष बघत आहोत, असा भास झाला. पुढे वास्तवाला ग्रहण लागले. नंतर झालेली त्यांच्या नात्याची फरपट त्यांनी विस्तृत मांडली. पुढे जाऊन त्यांनी एक विचार करायला लावणारी गोष्ट लिहिली की राजघराण्यात प्रविष्ट झाल्यानंतर तिथल्या विविध रितीरिवाजांनी डायनाला बांधून टाकले. तिची बौद्धिक आणि मानसिक कुवत तिच्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांना पुरी पडू शकली नाही. त्यानंतर ती भरकटत गेली. आजच्या गुंतागुंतीच्या, व्यवहारी, धूर्त, मतलबी जगात डायना ही वाट चुकून एक परी होती हेच खरे!

शांताबाईंनी इतक्या दूरवर डायनाच्या मानसिकतेचा विचार केला हे बघून आश्चर्य वाटत असेल ना! एखाद्या घटनेकडे शांताबाई किती संवेदनशीलपणे बघतात याबद्दलची अजून एक घटना.

आचार्य अत्रे यांच्यावर ‘आचार्य’ नावाचे एक नाटक आले होते. पुढे अत्रे यांनी प्रत्युत्तरी एक नाटक लिहिले. त्यानंतर प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर हीन पातळीवरून नाटक लिहिण्याचे खूळ तयार झाले. मनोरामाबाई कर्वे यांच्या खूनप्रकरणी अटक झालेले डॉ. अ. चिं. लागू यांच्यावर अत्रे यांनी ‘डॉ. लागू’ नावाचे नाटक आणले. जनमानसात रोष असलेल्या या घटनेवर नाटकाद्वारे आपण नरराक्षसांचे स्वरूप लोकांच्या समोर आणतो आहे, असे अत्रेनां वाटत होते. त्यावेळी शांताबाईं नाटकाच्या सेन्सॉर समितीवर होत्या. त्या आचार्य तर यांच्या शिष्या. तरीही या नाटकाचे नाव बदलण्यासाठी त्या आग्रही होत्या. अत्रे यांनी ‘डॉ. लागू’ ऐवजी ‘डॉ. भागू’ केलं. तरी ते नामंजूर केलं. त्यावेळी शांताबाईंनी एक मानवतावादी मुद्दा मांडला. डॉ. लागूंच्या कुटुंबातील मुलांना या नाटकावरून त्यांच्या शाळेतील सवंगडी चिडवतील. समाजात त्याला वावरताना असा पण त्रास होणार आहे. त्यात ही भर कशाला? गुन्हेगारांच्या निरागस आप्तांबद्दलची ही संवेदना दाखवणाऱ्या शांताबाईबद्दल अधिक काही बोलायची गरज आहे का?

अशा या ऋजु, भावुक, प्रसन्न, स्नेहाळ शांताबाई!

त्यांनीच ज्ञानेश्वरीतील काही ओळीचा भावार्थ सांगितला आहे.

तेथ अंतरबाह्य गेले निर्मळत्व एक जाले किंबहुना उरले शुचित्वचि॥ म्हणोनि सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत स्फटिकगृहीचे डोलन दीप जैसे॥

शेवटच्या ओवीचा अर्थ आहे, ‘स्फटिकाच्या घरात उजळलेल्या दिव्यांच्या ज्योती जशा बाहेरून डोलताना दिसतात तसे सज्जनांचे अंगभूत सद्भाव त्यांच्या व्यक्तित्वातून बाहेर प्रकट होतात.’

या ओळी वाचताना डोळ्यासमोर उभा राहिला तो साहित्यातून आपल्या घरातल्या झालेल्या शांताबाईचा शांत, शीतल निर्मळ चेहरा..

आज त्या नक्कीच आपल्यात आहे..

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0