शस्त्रक्रिया प्रसूती बालकांपुढे आरोग्य समस्या

शस्त्रक्रिया प्रसूती बालकांपुढे आरोग्य समस्या

शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या बालकामध्ये, निरोगी व्यक्तीमधील नेहमी असणारे पण अपायकारक नसलेल्या जीवाणूंचा अभाव होता. पण हे जीवाणू योनी प्रसूती झालेल्या बालकांच्यामध्ये अस्तित्वात होते. याऐवजी रुग्णालयात आढळणारे आगंतूक एन्टेरोकोकस व क्लेबेसिला हे फिरस्ते जीवाणू शस्त्रक्रिया प्रसूती बालकामध्ये होते.

पक्ष्यांच्या आवाजाची किमया
चांदवा
माणूस झाला छोटा, निसर्ग झाला मोठा!

बाळाचा जन्म कसा व कोठून झाला आहे याचा बाळाच्या शरीरावरील व शरीरातील जीवाणूंवर मोठा परिणाम होतो. कारण हे जीवाणूच बाळाच्या प्रतिक्षमतेस कारणीभूत असतात. अशी एक महत्त्वपूर्ण माहिती इंग्लंडमधील एका संशोधनातून बाहेर आली आहे. ‘द नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

सध्या भारतात नैसर्गिक पद्धतीने मूल जन्मास घालावे की प्रसूती शस्त्रक्रिया करावी यावर शल्यतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे, वाद होत असताना दिसतात. बरेच डॉक्टर माता व मूल यांची काळजी वाटल्याने आम्ही शस्त्रक्रिया प्रसूतीचा निर्णय घेतला असे सांगतात. उशीरा गर्भधारणा असलेल्या मातेची प्रकृती नाजूक असणे, मध्येच कळा थांबणे, अर्धवट प्रसूती, गर्भाशय मुख पूर्णपणे न उघडणे अशी अनेक कारणे यासाठी दिली जातात.

पण नवजात अर्भकाच्या जीवाणूसंहती (मायक्रोबायोम) वर संशोधन करण्यात आले. त्यानुसार नैसर्गिक योनी प्रसूती झालेल्या बाळाच्या अन्न मार्गात जीवाणू असतात. अशा जीवाणूंचा अभाव शस्त्रक्रिया प्रसूतीमधून जन्मलेल्या बाळाच्या अन्नमार्गात असतो. त्याऐवजी शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या बाळाच्या अन्नमार्गात रुग्णालयातील घातक जीवाणू आढळले आहेत.

या अभ्यासात इंग्लंडमधील सुमारे ६०० बालकांच्या जन्मपद्धतीचा समावेश होता. बालकांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला असे ट्रेव्हॉर लॉले (Trevor Lawley) या वेलकम सॅन्गर इन्स्टिट्यूट हिंग्स्टन यूकेमधील सूक्ष्म जीववैज्ञानिकाचे म्हणणे आहे. या संशोधनाचे नेतृत्व यांनी केले होते. त्यांचा संशोधन लेख ‘नेचर’ या जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात १८ सप्टेंबरच्या आठवड्यात प्रसिद्ध झाला आहे. आरोग्यास घातक जीवाणू शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या बालकामध्ये आढळल्यावर माझा त्यावर विश्वास बसला नाही असे ते म्हणतात.

अर्भक वॉर्ड

अर्भक वॉर्ड

या पूर्वी झालेल्या संशोधनातून शस्त्रक्रिया प्रसूतीने झालेल्या बालकामध्ये योनी प्रसूतीमधून मिळणारे काही जीवाणू मिळत नाहीत एवढेच उजेडात आले होते. योनीस्त्रावामधील जीवाणू बालकास कसे मिळतील याचेही प्रयत्न झाले होते. पण असे जीवाणू बालकापर्यंत पोहोचवण्यामधील सुरक्षितता व परिणामकारकता यावर वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी शंका घेतल्या होत्या. तसेच अशा संशोधनामधील अपुऱ्या रुग्णसंख्येमुळे एका निश्चित निष्कर्षापर्यंत जाता आले नव्हते असे लॉले सांगतात.

या संशोधनात लंडन व लायकेस्टरमधील तीन हॉस्पिटलमधील ५९६  बालकांच्या विष्ठेतील जीवाणूंचा अभ्यास लॉले यांच्या टीमने केला . त्यातील ३१४ बालके योनी प्रसूतीमधून तर २८२ शस्त्रक्रिया प्रसूतीमधून जन्मलेली होती. जीवाणूंचे नमुने जन्मानंतर ४, ७ व २१ दिवसांनी घेण्यात आले.

अन्नमार्गातील जीवाणूमधील फरक स्पष्ट होता. शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या बालकामध्ये निरोगी व्यक्तीमधील नेहमी असणारे पण अपायकारक नसलेल्या जीवाणूंचा अभाव होता. पण हे जीवाणू योनी प्रसूती झालेल्या बालकांच्यामध्ये अस्तित्वात होते. याऐवजी रुग्णालयात आढळणारे आगंतूक एन्टेरोकोकस व क्लेबेसिला हे फिरस्ते जीवाणू शस्त्रक्रिया प्रसूती बालकामध्ये होते. हा फरक एवढा स्पष्ट होता की बालकाच्या जीवाणू नमुन्यावरून बालकाचा जन्म कसा झाला होता याचे निदान मी करू शकत होतो, असे लॉले दावा करतात.

शस्त्रक्रिया प्रसूती

शस्त्रक्रिया प्रसूती

बालकाच्या जन्मानंतर कित्येक महिन्यांनी बालकांच्या जीवाणूमध्ये सारखेपणा येत होता. याला अपवाद अपायकारक नसलेल्या बॅक्टेरिऑइड नावाच्या जीवाणूचा. हा जीवाणू शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या सर्व बालकांच्यामध्ये अत्यंत कमी संख्येने आढळला. नऊ महिन्यानंतर साठ टक्के बालकांच्या अन्नमार्गात अत्यंत कमी किंवा शून्य टक्के बॅक्टेरिऑइड  होते. बॅक्टेरिऑइड जीवाणू आश्रयीच्या शरीरात प्रतिक्षमता निर्मितीचा कारक आहे हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. तसेच दाह कमी करण्यात याचा वाटा आहे.

शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या बालकांच्या अन्नमार्गातील जीवाणूचा अभ्यास करताना लॉली यानी शेकडो जीवाणूंची वृद्धी मिश्रणात वाढ केली, त्याची जनुकीय वैशिष्ठ्ये तपासली. त्यांच्या जनुक वैशिष्ट्ये प्रतिजैविक प्रतिबंधक व काही प्रमाणात विषारी अशी होती. हे सर्व जीवाणू संसर्गजन्य असे होते. वाचकांना आठवण करून देण्यासाठी एक संदर्भ म्हणजे बहुतेक अतिदक्षता विभागात पहिल्या दोन तीन दिवसात न्यूमोनियाचा संसर्ग झालेला असतो. सध्या रुग्णालयीन संसर्ग ही मोठी काळजी करण्याची बाब रुग्णालय व्यवस्थापनास करावी लागते. म्हणजे जेवढे लवकर रुग्ण अतिदक्षता विभागातून बाहेर दुसऱ्या खोलीत रवाना होईल तेवढी त्याला न्यूमोनिया होण्याची शक्यता कमी होते.

बालक जीवाणू अभ्यास (बेबी बायोम स्टडी ) या मोठ्या संशोधनाचा लॉली यांचा एक लहान भाग होता. हजारो बालकांच्या अभ्यासातून याचे निष्कर्ष काढले गेले होते. रोगपरिस्थिति विज्ञान (इपिडिमॉलॉजी ) अभ्यासातून असे आढळले की, शस्त्रक्रिया प्रसूतीमधून जन्मलेल्या बालकामध्ये पुढे अस्थमा व अतिवजन वाढण्यासारख्या समस्येस तोंड द्यावे लागते. आणखी काही चाचण्यामधून हे अधिक स्पष्ट होईल असा विश्वास लॉली व्यक्त करतात. जन्मत: झालेल्या जीवाणूंचा यात किती वाटा असेल याची निश्चिती लवकरच होईल असेही ते म्हणाले.

बालकास मिळालेले जीवाणू त्याच्या प्रतिक्षमता यंत्रणेसाठी उपयुक्त 

जीवाणूमधील विविधता व बदल जन्म कोणत्या पद्धतीने होतो याच्याशिवाय इतरही घटकावर अवलंबून असतो असे जोसेफ निऊ या अर्भकविशेषज्ञाचे (फ्लोरिडा कॉलेज ऑफ मेडिसीन जेंसविले) मत आहे. त्यांच्या अभ्यासात शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या मातांच्या अपरेमधून (प्लासेंटा मधून) बालकांपर्यंत प्रतिजैविके पोहोचत असल्याचे आढळले. अशा बालकांना अधिक दिवस रुग्णालयात राहावे लागते. मातेच्या दुधाबरोबर त्यांच्या आहारात जीवाणू सुद्धा मिळतात. मातेचे दूध निर्जंतुक नाही हे सर्व मातांनी लक्षात ठेवावे. तुलनेने योनी प्रसूती बालकांना जीवाणू असलेले दूध उशीरा मिळते.

रॉब नाइट या सूक्ष्मजीव वैज्ञानिकाने नेमके कोणत्या जीवाणूंचा अभाव शस्त्रक्रिया प्रसूती झालेल्या बालकांना करता येईल याचाही अभ्यास केला. सूक्ष्मजीव उपचार करणारी त्याने कंपनी सुरू केली. पण अशा अनोळखी जीवाणूंचा उपचार करण्याच्या पद्धतीस मान्यता मिळालेली नाही.

मोहन मद्वाण्णा, हे प्राणिविज्ञान ज्ञानमंडळ , मराठी विश्वकोशाचे समन्वयक आहेत.

लेखाचा आधार Ewen Callaway  Shao, Y. et al. Nature, https://doi.org/10.1038/s41586-019-1560-1 (2019). doi: 10.1038/d41586-019-02807, 18 September 2019

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0