शालीन रजनीगंधा

शालीन रजनीगंधा

विद्या सिन्हा ‘रजनीगंधा’ फुलासारख्या शांत, शालीन, सौम्य व कायम दरवळत राहणाऱ्या सुगंधासारख्याच होत्या. त्यांच्या निधनाने या फुलांचा दरवळ कायमचा गेल्याची भावना चित्रपट रसिकांमध्ये पसरली.

‘द डिसायपल’ हा व्यक्तिनिष्ठ आणि भावनिकः चैतन्य ताम्हाणे
‘जय भीम’: जागर संविधानाचा
आज बौद्धिक सहिष्णुतेची गरज आहे

 

विद्या सिन्हा यांच्या जवळपास सर्वच भूमिका अस्सल शहरी तोंडवळाच्या होत्या. त्या साध्या, सोज्वळ, शांत, सालस स्वभावाच्या होत्या. त्यात कोणताही अभिनिवेश नसायचा. सामान्य शहरी मुली डोळ्यात काजळ घालून हलकासा मेकअप करत साड्या नेसून स्वत:चे बेअरिंग सांभाळत नोकरीला जात असत, अगदी हुबेहूब तशा स्वरुपाच्या भूमिका विद्या सिन्हा यांनी पडद्यावर साकारल्या. त्यामुळे मेनस्ट्रीम बॉलीवूड नट्यांच्या ज्या प्रतिमा समाजावर फिट्‌ट बसल्या होत्या त्या प्रतिमांना किंचित का होईना छेद विद्या सिन्हा यांनी दिला.

त्यांच्या अदाकारीला बासू चॅटर्जी यांचे साधी माणसं असलेले वास्तवाच्या जवळपास जाणारे, तुमच्या आमच्या जीवनात घडू शकतील अशा घटना व कथा असणारे चित्रपटदेखील हातभार लावत होते. त्यामुळे विद्या सिन्हा यांच्या भूमिकेत मादकता नव्हे शालीनता असायची. नखरेलपणा नव्हे तर सुसंस्कृतपणा असायचा. प्रेमातल्या धुसमुसळेपणाऐवजी अबोलपणा असायचा. जे व्यक्त व्हायचे ते कमी शब्दांत, डोळ्यातून. त्यामुळे केवळ आपलं निर्व्याज हसू आणि टपोरे डोळे यांच्या जोरावर त्यांनी रसिकांना घायाळ न करता त्यांच्या हृदयात कायमचं घर केलं.

म्हणून जेव्हा १५ ऑगस्टला गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी पसरली तसे ७०-८० च्या दशकातले चित्रपट पाहणाऱ्या तमाम चित्रपट रसिकांना त्यांचे ‘रजनीगंधा’मधील

‘रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूँ ही जीवन में
हाँ यूँही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में’

हे गाणं राहूनराहून आठवतं होतं. प्रत्येक रसिकाच्या मनाला चटका देणारी ती बातमीच होती. रजनीगंधा म्हणजेच निशिगंधाच्या फुलाचा दरवळ कायमचा गेल्याची ती भावना होती. कारण आपली प्रेयसी कशी असावी, तर विद्या सिन्हासारखी असं त्या काळात असणाऱ्या सर्वच युवकांना वाटत असायचे. विद्या सिन्हा ही बॉलीवूडची हिरोईन नव्हे तर ती आपल्या सोबत असणारी, आपल्या भावविश्वाला साद देणारी, आपल्या आजूबाजूला राहणारी असे त्या काळातल्या तरुणाईला वाटायचे. हे यश अर्थातच विद्या सिन्हा यांच्या अदाकारीलाच होते यात शंका नाही.

अनेकांना माहिती नसेल, प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील गावच्या मुलीच्या ‘रूपा’च्या भूमिकेसाठी विद्या सिन्हा यांची निवड केली होती. पण त्या भूमिकेसाठी आवश्यक असणारे तोकडे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्याने आपल्याला अवघडल्यासारखं वाटेल म्हणून विद्या सिन्हा यांनी राज कपूरसारखा दिग्गज दिग्दर्शक असताना ती भूमिका नाकारली. पुढे झीनत अमानने तो रोल मिळवला ही एक वेगळी कहाणी आहे. पण आपल्या व्यक्तिमत्वाशी प्रतारणा करणारे, कोणतेही रोल त्यांनी केले नाही. त्यामुळे त्याच काळात समांतर सिनेमात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या स्मिता पाटील, शबाना आझमी यांच्यासारख्या अभिनेत्री व बासू चटर्जी यांच्या मध्यमवर्गीय जाणीवा व्यक्त करणारे चित्रपट यातील असणारी दरी विद्या सिन्हा यांनी आपल्या सहज अभिनयाने भरून काढली.

एखाद्या कलाकाराचे आयुष्य पडद्यावर दिसते तसे नसते. विद्या सिन्हा यांचे आयुष्यच तसे अस्थिरतेचे होते. विद्या यांचा जन्म एका चित्रपट निर्मात्याच्या घरात झाला. वडील राणा प्रताप सिंग हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे निर्माते होते. विद्याचं दुर्दैव असं की लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तिचा सांभाळ आजोबांनी केला. तिचे आजोबा होते जुन्या जमान्यातील दिग्दर्शक मोहन सिन्हा, ज्यांनी मधुबालाला ‘मधुबाला’ हे नाव दिले होते. आणि जीवन, मदनपुरीसारख्या अभिनेत्यांना ब्रेक दिला होता. विद्या कॉलेजमध्ये जाऊ लागली तेव्हा तरुण वयात आपल्या घराशेजारी राहणाऱ्या वेंकटेश्वरण अय्यर या तामिळ मुलाच्या प्रेमात पडली वय होतं अवघे १८ वर्षे. पुढे जाऊन १९६८ साली दोघांनी लग्न केले.

विद्या जेव्हा १७ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या एका काकूने त्यांना बळजबरीने एका सौंदर्य स्पर्धेत भाग घायला लावला. फारशी तयारी न करताच त्यांनी भाग घेतला आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर ‘मिस बॉम्बे’ हा किताब पटकावला. तोवर त्यांच्या मनात सिनेमात जाणं, अभिनय करणं असं काही नव्हतं. मात्र ‘मिस बॉम्बे’ मुळे विद्याला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर येण्यास सुरूवात झाली. ‘कोलगेट’, ‘लिप्टन टी’ या त्यांच्या गाजलेल्या जाहिराती होत्या. अनेक सुप्रसिद्ध मॅगझिनसाठी त्यांनी फोटो शूट केले. लग्न झाल्यानंतर देखील त्यांनी मॉडेलिंग सुरू ठेवले होते.

एकेदिवशी मॅगझीन चाळत असताना बासू चॅटर्जी यांना मुखपृष्ठावर विद्या सिन्हा यांचं चित्र भावलं. त्यांच्या मनात तेव्हा मनू भंडारी यांनी लिहिलेल्या ‘यही सच है’ या कथेवर आधारित चित्रपट बनवण्याचे विचार घोळत होते. चित्रपटात मध्यमवर्गीय मुलीची प्रेमकथा होती. विद्याचा चेहरा त्यात अगदी चपखल बसत होता. तोवर नायक म्हणून बँकेत काम करणारा आणि नाटकं करणारा अमोल पालेकर व दिनेश ठाकूर या नाट्यकर्मीची वर्णी लागली होती. बासूदांनी विद्याचा शोध घेतला आणि चित्रपटाची ऑफर देखील आल्या हाती देऊन टाकली. तो चित्रपट होता १९७४ साली प्रसिद्ध झालेला ‘रजनीगंधा’. या चित्रपटाबद्दल विद्या सिन्हा सांगतात,

‘मुझे न तो एक्टिंग आती थी, न कैमरा और लाइटिंग की समझ थी. बासु ने मुझे जीरो से सिखाया’

विद्या सिन्हा यांचा १९७४ साली आलेला ‘राजा काका’ हा पहिला चित्रपट. पण तो ‘रजनीगंधा’ नंतर रिलिज झाला. ए. छोटू या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात किरण कुमार व प्रेमनाथ होते. पुढे बासुदांचा ‘रजनीगंधा’ आला आणि त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. पुढच्याच वर्षी बसुदांनीच दिग्दर्शित केलेला ‘छोटीसी बात’ हा अमोल पालेकर व दादामुनी अशोक कुमार यांनी अभिनित केलेला चित्रपट आला. त्यानेही रसिकांची मने जिंकली. या चित्रपटांतील

न जाने क्यूं होता है ये जिन्दगी के साथ

अचानक ये मन किसी के जाने के बाद

करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात

या गाण्याने तर अनेक प्रेमीयुगुलांना विव्हल केले. प्रेमातला एकाचवेळचा विरहपणा व अबोलपणा यांना व्यक्त करणारे गाणे विद्या सिन्हा यांनी ताकदीने पेश केले. गुरुवारी त्यांच्या निधनाच्या बातमीने याही गीताच्या आठवणी सोशल मीडियावर उमटत होत्या.

‘रजनीगंधा’ व ‘छोटीसी बात’चे यश एवढे मोठे होते की या दोन चित्रपटांनी विद्या सिन्हा यांना घराघरात नेऊन पोहचवले. मध्यमवर्गीय आशाआकांक्षा, जाणीव असलेले जे काही मोजके चित्रपट या काळात तयार होत होते, त्यात या दोन चित्रपटांचे स्थान अढळ झाले. अत्यंत साधी सरळ पटकथा, जगण्याचा संघर्ष नाही पण सामान्य मध्यमवर्गीय जीवनात येणारी मनाला अपार वेदना देणारी छोटीशी वादळं, त्यानिमित्ताने पात्रांमधील निर्माण होणारा मनोव्यापार पण जगण्याची तीव्र आसक्ती अशा परिघांना कवेत घेणाऱ्या या चित्रपटांनी रसिकांच्या मनात आजही घर केले आहे.

विद्या सिन्हा यांनी या दोन चित्रपटानंतर विनोद खन्ना सोबत (इन्कार), संजीव कुमार सोबत (पती पत्नी और वो), विनोद मेहरा, शशी कपूर या तेव्हाच्या अव्वल नायकांसमवेत काम केले. त्यांनी १२ वर्षांत ३० चित्रपटात काम केले. दरम्यानच्या काळात त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. जान्हवी सिन्हा तिचं नांव. तिच्या पालनपोषणाकडे नीट लक्ष देता यावं म्हणून त्यांनी चांगलं करियर सुरू असताना चित्रपट संन्यास घेतला.

१९९६ साली प्रदीर्घ आजाराने त्यांच्या पतीचं निधन झाले. काही वर्षांनी त्या ऑस्ट्रेलियात निघून गेल्या, तिथे नेताजी भीमराव साळुंखे या डॉक्टरांना त्या ऑनलाइन भेटल्या, गाठीभेटी वाढत गेल्या पुढे त्याचं रूपांतर २००१ साली त्यांचं पुनर्विवाह होण्यात झालं. हे लग्न काही फार काळ टिकलं नाही आणि २००९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. (मारहाण, भांडणं याला कंटाळून) तत्पूर्वी २००४ साली त्या भारतात परत निघून आल्या होत्या. इथे आल्यावर त्यांनी अभिनयाची सेकंड इनिंग सुरू केली ती एकता कपूरच्या ‘काव्यांजली’ या टीव्ही सिरीयलपासून. नंतर त्यांनी अनेक टीव्ही सीरियलमध्ये काम केले. २०११ सालचा सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट.

विद्या सिन्हा आता या जगात नाहीत पण ‘छोटी सी बात’मधील ‘ना जाने क्यूँ’ या गाण्यातील उर्वरित ओळी आपल्याला आयुष्याचा अर्थ सांगत राहतील.

जो अन्जान पल, ढल गए कल
आज वो, रंग बदल बदल
मन को मचल मचल रहे है छल
न जाने क्यों वो अन्जान पल..
सजे भी ना मेरे नैनों में,
टूटे रे हाय रे सपनों के महल

वोही है डगर, वोही है सफ़र
है नहीं साथ मेरे मगर, अब मेरा हमसफ़र
इधर उधर ढूंढें नजर, वही है डगर..
कहा गयी शामें, मदभरी,
वो मेरे मेरे वो दिन गए किधर

डॉ. प्रशांत पाटील

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0