स्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र

स्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र

केरळ हा पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली महिलांची लोकशाहीवादी आत्मविश्वास जागवणारी प्रयोगशाळा म्हणून उदयास येत आहे.

आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?
हिंदुत्ववादाची दोन घराणी
‘पीएफआयवरील बंदीचे स्वागत; पण आरएसएसवरही बंदी घाला

बिंदू आणि कनक दुर्गा या केरळमधील दोन महिलांचे मी अभिनंदन करतो. सबरीमाला मंदीरातील बाह्मणी पितृसत्तेतील अंधश्रद्धावादी, भेदभाव करणाऱ्या प्रथांना मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. नुसत्या केरळमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील दबलेल्या सर्व स्त्रियांच्या मुक्ततेचा आणि सक्षमीकरणारचा हुंकार या दोघींनी दिला आहे.

नववर्षाच्या प्रारंभीच महिलांची भिंत उभी करून केरळमधील महिलांनी आपली संघटित शक्ती दाखवून दिली आहे. ही एक अत्यंत धाडसी अनुकरणीय अशी कृती आहे, ज्यात अन्यायाविरूद्ध प्रत्येक महिलेची जबरदस्त इच्छाशक्ती दिसत आहे. अंधश्रद्धावादी धार्मिक प्रथा आणि रितीरिवाज यांची दडपशाही त्या आता सहन करणार नाहीत हे स्पष्ट जाणवत आहे.

जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात हिंदुत्वाचे निर्मिती क्षेत्र बनू शकते तर पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली केरळ हे महिलांमध्ये लोकशाहीवादाचा आत्मविश्वास जागवणारे कार्यक्षेत्र निश्चितच बनू शकते. महत्त्वाचे म्हणजे महिला स्वत: या ऐतिहासिक विरोधाच्या लाटेवर अग्रभागी उभ्या आहेत. महिला ज्या पद्धतीने ठामपणे आणि धाडसाने हे सारं धसास लावत आहेत, त्यातून केरळमधील भाडोत्री संघ परिवार आणि अराजकतावादी आक्रमण यांना धक्का बसणार याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.

शिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या महिलांनी फॅसिस्ट शक्तींविरूद्ध ‘नवोधना’ भिंत उभारली त्या मुख्यत्वे करून हिंदू आहेत. त्या अस्सल हिंदू असून हिंदू असण्यासाठी ‘हिंदुत्व’ ही किती भयंकर बाब आहे, याची त्यांना पुरेशी जाण आहे. हिंदू विचारसरणीमध्ये महिलांचा आदर करणे अपेक्षित आहे. त्याउलट आक्रमक पुरुषसत्ताक हिंदुत्ववादी विचार, महिलांना दुय्यम राखून त्यांच्यावर सत्ता गाजवणे यावर विश्वास ठेवते. मात्र केरळच्या महिलांनी, त्या आता या दडपशाही शक्ती संपविण्यासाठी लढा देतील असे एकत्रितपणे घोषित केले आहे.

मी भारतीय लोकांना आवाहन करेन की त्यांनी केरळमधील  लोकांसोबत एकतेने उभे राहणे गरजेचे आहे. तुमच्या मदतीने केरळचे लोक ह्या ऐतिहासिक अवघड परिस्थितीवर मात करू शकतील. भाजपचे बालेकिल्ले असणाऱ्या राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाची घसरण सुरू झाली आहे. त्या घसरणीची शिक्षा महिलांना दिली जात आहे. शिवाय उत्तर भारतात भाजपची हार झाल्याने आरएसएस व भाजप यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच नैराश्यातून, तो पराभव भरून काढण्यासाठी, आरएसएस व भाजप केरळात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मोदींचा सत्तेचा हव्यास आणि नेतृत्वाच्या उन्मादी आकांक्षापायी केरळला किंमत मोजावी लागत आहे. परंतु संघ परिवाराचा पाडाव या ‘देवभूमी’मध्येच होणार अशी मला पूर्ण खात्री वाटते. उपरोधाने म्हणेन, भाजप व संघ परिवाराचा पाडाव भाजपचे चमको नेते निभावू शकणार नाहीत, मात्र भेदभावाविरूद्ध आवाज उठवलेल्या या महिलाच हाताळू शकतील. या महिलांनी स्वत:साठी एक लढा उभा केला आहे आणि उर्वरित भारताने त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे.

(स्वामी अग्निवेश हे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक आणि आर्यसमाजाचे जागतिक अध्यक्ष आहेत.)

अनुवाद:    हिनाकौसर खान-पिंजार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0