हॉलीवूडचे अंधानुकरण

हॉलीवूडचे अंधानुकरण

भारतीय चित्रपट उद्योगातल्या अनेकांनी निर्लज्जपणे अमेरिकन चित्रपटांच्या संकल्पना, पटकथा आणि कथानके उचलली आहेत. सत्तेतील लोकांना सत्य सांगण्याची हॉलीवूडची ताकद मात्र त्यांनी आत्मसात केली नाही, जे खरे तर त्यांनी करायला हवे होते.

अनुराग ‘डिसेंट’ कश्यप
‘टाइम्स नाऊ’, ‘रिपब्लिक’च्या विरोधात उतरले बॉलीवूड
‘ऑस्कर’नंतर हिंदी सिनेमे मिळणे बंद झाले: रसुल पूक्कुटी

मध्यभागी दिलखुलास हसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अवतीभवती करण जोहर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, एकता कपूर, वरुण धवन, या आणि अशा बॉलीवूड प्रभूती – नवे वर्ष नुकतेच सुरु झाले असले, तरी या सेल्फीला आत्ताच ‘सेल्फी ऑफ दि इयर’ म्हंटले जात आहे. बॉलीवूडमधील अभिनेते व दिग्दर्शकांचा समावेश असलेला एक चमू १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईहून दिल्लीला पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेला.

चर्चेचा विषय होता, ‘राष्ट्र उभारणी’ मध्ये हे कलाकार कसे योगदान देऊ शकतील!
या भेटीचे कौतुक आणि चर्चा केवळ मुख्य प्रवाहातील वाहिन्यांनी केली असे नाही. चित्रपट निर्माते करण जोहर यांनीसुद्धा त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर याबाबत मोठे लक्षणीय भाष्य केले:

“प्रभावी आणि योग्य वेळी केलेल्या संवादांमधून बदल घडविता येतो… आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची मिळालेली संधी बहुमोल होती. एक समुदाय म्हणून, राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याची प्रचंड इच्छा आहे. आम्हाला खूप काही करायचे आहे… जेव्हा तारुण्याने सळसळणारा (सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या असलेला) देश जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाशी हातमिळवणी करेल, तेव्हा आम्ही एक मोठी शक्ती म्हणून समोर येऊ, अशी आम्हाला आशा आहे. परिवर्तनशील भारतामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करायला आम्हाला आवडेल.”

क्षणभर विचार करा की मेरील स्ट्रीप, जॉर्ज क्लूनी, अॅन हॅथवे आणि मायकल मूर, डोनल्ड ट्रम्प यांच्याभोवती गराडा घालून, दिलखुलास आणि मनमोकळे हसत सेल्फी किंवा ‘ग्रुपफी’ काढताहेत. मग जगानं आवर्जून बघावं यासाठी ती सेल्फी समाजमाध्यमांवर अभिमानाने पोस्टही करताहेत. हे चित्र जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटतेय ना… याचे कारण म्हणजे, हॉलीवूड सातत्याने, स्पष्टपणे आणि बेधडकपणे तिथल्या सरकारवर टीका करत आले आहे. या घडीला, बॉलीवूड असे काही करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही.

भारतीय चित्रपट उद्योगातल्या अनेकांनी निर्लज्जपणे अमेरिकन चित्रपटांच्या संकल्पना, पटकथा आणि कथानके उचलली आहेत. पण सत्तेतील लोकांना सत्य सांगण्याच्या हॉलीवूडच्या ताकदीचे अनुकरण मात्र त्यांनी खरेतर करायला हवे होते.

ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांबद्दल विविध हॉलीवूड विभूतींनी काय म्हंटले आहे, ते पाहूया:
जून २०१८ मध्ये, जॉर्ज क्लूनी आणि अमाल क्लूनी यांनी अशी घोषणा केली, की ‘यंग सेंटर फॉर इमिग्रंट चिल्ड्रन्स राईट्स’ या संस्थेला ते १,००,००० डॉलर देणगी म्हणून देत आहेत. ‘हॉलीवूड रिपोर्टर’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते दोघे म्हणतात, “भविष्यामध्ये कधीतरी आपली मुले आपल्याला विचारतील: ‘हे खरे आहे का? आपल्या देशाने खरेच पालकांपासून लहान मुलांना वेगळे करून त्यांना बंदीगृहांमध्ये टाकले होते का?’ आणि जेव्हा आपण याचे उत्तर ‘हो’ असे देऊ, तेव्हा ते विचारतील की मग तुम्ही याबाबत काय केले.”

अभिनेत्री क्रिस्टन बेल हिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले की त्यांनी त्यांच्या राज्यातील राज्यपालांना सांगावे, की ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणाच्या समर्थनार्थ संसाधने नाकारणाऱ्या अधिकृत हुकुमावर त्यांनी सही करावी.

मिया फॅरो हिनेसुद्धा ट्वीट केले – “एका हुकूमशाही राष्ट्रपतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला कायद्यांची गरज आहे.”

‘स्टार वॉर्स’ या चित्रपट मालिकेमध्ये ल्युक स्कायवॉकरची भूमिका केलेल्या अभिनेता मार्क हॅमिल यांच्या अनेक ट्वीट्स पैकी एक होते – तुरुंगामध्ये असलेली लहान मुले दाखवणारे एक राजकीय व्यंगचित्र! लहानपणी पडद्यावर जे आपले ‘हिरो’ होते, अशा अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यातही स्वातंत्र्य आणि न्यायासाठी लढताना पाहणे हे प्रेरणादायी असते. १९७७ मध्ये आलेल्या ‘स्टॉर्मट्रुपर्स’, ‘एक्स-विंग फायटर्स’ आणि ‘डेथ स्टार्स’मध्ये जेडी नाईट म्हणून हॅमिल ‘रेसिस्टंस’चे, प्रतिकार करणाऱ्या गटाचे भाग होते. तेच हॅमिल आता २०१९ मध्ये डोनल्ड ट्रम्प यांच्याविरुध्दच्या प्रतिकाराचाही भाग आहेत.

पण बॉलीवूडमधील अभिनेत्यांचे नायकत्व, धाडस आणि बेधडकपणा मात्र, चित्रपटांपुरताच मर्यादित आहे असे दिसते. पडद्यावर भ्रष्ट आणि शक्तिशाली राजकारण्यांविरुद्ध लढणारे हे नायक, खऱ्या आयुष्यामध्ये सत्ताधाऱ्यांपुढे लीन होतात. आणि नसीरुद्दीन शाहसारखा ज्येष्ठ अभिनेता जेव्हा वाढणाऱ्या सांप्रदायिक तणावाविरुद्ध बोलतो, तेव्हा त्यांच्याच क्षेत्रातील एक सहकारी ‘तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे?’ असे विचारून शहांची निंदा करतो.

‘राष्ट्र उभारणी’मध्ये इतका रस दाखविण्याऐवजी, करण जोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आताच्या घडीला जास्त गरज असलेल्या ‘राष्ट्र संवर्धना’च्या कार्याकडे लक्ष दिल्यास, ते अधिक उपयुक्त ठरेल. (जोहर यांच्या दृष्टीने ‘राष्ट्र उभारणी’ म्हणजे काय माहित नाही). ज्या लोकशाही व्यवस्थांनी भारताला इथवर आणले, त्यांच्या स्वायत्ततेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांचा आवाज अधिक उपयोगी ठरेल.

जोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भारतभर केल्या जाणाऱ्या लोकशाही, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि न्यायिक संस्थांच्या पद्धतशीर नुकसानाबद्दल निश्चितच माहित आहे. शेतकऱ्यांची दशा, पत्रकारांवरचे हल्ले, जमावांद्वारे केल्या जाणाऱ्या हत्या, बेरोजगारीची धोकादायक पातळी आणि देशभर मुद्दाम वाढीस लावण्यात आलेली सांप्रदायिकता आणि जातीयवाद या गोष्टीही त्यांना निश्चितच दिसतात. मग ते या ज्वलंत समकालीन प्रश्नांबाबत शांत का आहेत, असा प्रश्न पडतो?
माजी आयएएस अधिकारी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर त्यांच्या ‘लुकिंग अवे’ या प्रभावी पुस्तकामध्ये म्हणतात, बहुतांशी बॉलीवूड आणि अनेक समस्यांमधील पोखरला गेलेला भारत यांच्या अंतर आहे. अदृश्य दरी आहे. या वास्तवाचे वर्णन करताना ते लिहितात:
“व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट आणि संगीत हे समानतेच्या संकल्पनांचा पुरस्कार करायचे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःच्या जमिनीसाठी लढणारे शेतकरी, शोषित वर्गाच्या हक्कांसाठी लढणारे कारखान्यातील कामगार आणि आत्मसन्मानासाठी आणि घरासाठी लढणारे बेघर लोक दिसायचे. ‘मदर इंडिया’मध्ये (१९५७) नर्गिस यांनी दुष्काळ, पूर आणि दृष्ट सावकाराविरुध्द लढणाऱ्या कर्त्या स्त्रीचे पात्र उभे केले; ‘दो बिघा जमीन’मध्ये (१९५३) बलराज सहानी यांनी आपली शेतजमीन वाचविण्यासाठी कलकत्त्याच्या रस्त्यांवर रिक्षा ओढणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका केली आणि राज कपूर यांनी ‘श्री ४२०’मध्ये (१९८५) मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या माणसाचे पात्र निभावले.”

(सिनेमाचा) तो काळ सरल्याबद्दल मंदर पुढे खेद व्यक्त करतात. काही अपवाद सोडल्यास, “आजच्या हिंदी सिनेमामधून जर भारताची ओळख करून घ्यायची झाल्यास असे वाटेल, की या देशामध्ये कोणी गरीब माणूस उरलेलाच नाही. सगळेच गर्भश्रीमंत आहेत, ते डिझायनर कपडे घालतात व तशाच सुंदर आणि आखीव रेखीव घरांमध्ये राहतात; कर्जबाजारी शेतकरी, रोजंदारीवरचे कामगार आणि रस्त्यावर राहणारे लोक, व्यावसायिक सिनेमामधून हद्दपार झाले आहेत.”

अरुंधती रॉय हीच भावना काहीशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. ‘लिसनिंग टू ग्रासहॉपर्स’ या त्यांच्या भेदक निबंधामध्ये त्या म्हणतात: “भारतामध्ये लढण्यात आलेला सर्वात मोठा अलगाववादी संघर्ष हा मध्यमवर्ग आणि उच्च-मध्यमवर्गाचा आहे. या वर्गाने फुटून एक असा देश, असा स्तर निर्माण केला, जिथे त्यांचा व्यवहार फक्त जगभरातील उच्चभ्रूंसोबत होतो.”

परिवर्तनशील भारतामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करण्याची इच्छा व्यक्त करणारे आपले चित्रपट तारे, खरेतर देशातल्या अशाच स्तराचा भाग झाले आहेत. इतर देशाशी फटकून त्यांचे एक वर्तुळ आहे. जगभरातील उच्चभ्रूंसोबत यशस्वीपणे मिसळलेल्या या ताऱ्यांना, स्वतःच्या फायद्यासाठी लोकशाही संस्थांचा उघडपणे वापर करणाऱ्या पंतप्रधानांना पाठींबा देण्यात काहीही गैर वाटत नाही.

जोहर त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, “योग्य वेळी आणि प्रभावी संवादांमधून बदल घडविता येतो”. दिल्लीला गेलेल्या बॉलीवूड ताऱ्यांच्या या लवाजम्यामध्ये जर खरच पंतप्रधानांशी योग्य वेळी आणि थेट, प्रभावी संवाद साधण्याचे धाडस असते, तर त्यांनी पंतप्रधानांना आपल्या लोकशाहीच्या आजच्या अवस्थेविषयी विचारले असते.

– रोहित कुमार सायकोमॅट्रिक्स आणि सकारात्मक मानसशास्त्र यांची पार्श्वभूमी असलेले शिक्षणतज्ञ आहेत. माध्यमिक शाळांमधील किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांबरोबर भावनिक बुद्धिमत्ता या विषयात ते काम करतात. त्याच प्रमाणे समवयीन विद्यार्थ्यांमधील दादागिरीला आळा घालण्यासाठी शाळांना मदत करतात.

(अनुवाद – प्रवीण लुलेकर)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: