डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार

डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार

मुंबई: डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास

ग्रामीण विकास – एक मृगजळ
स्थलांतरित, विद्यार्थी, पर्यटकांना घरी जाण्याची मुभा
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

मुंबई: डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व उद्योग विभागाने केलेल्या पाहणीनुसार १५६ कारखाने रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात तसेच प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर येथील कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत.  

प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये ५२५ औद्योगिक भूखंड आहेत. तर ६१७ निवासी भूखंड  आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून ५० मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सध्याच्या धोकादायक कारखान्यांना उत्पादनात बदल करून व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाणार आहे. डोंबिवलीतील कारखान्यांना पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रचलित दराने भूखंड उपलब्ध करून दिले जातील. कारखाने स्थलांतरित होत असताना कामगार, पर्यावरण आदींबाबत योग्य निर्णय़ संबंधित विभाग घेतील. 

महापे येथील जेम्स ज्वेलरी पार्क वेगाने पूर्णत्वाकडे

नवी मुंबईतील महापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ८६०५३ चौरस मीटर भूखंड वितरित करण्यात आला. एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत भूखंड विकासाचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील हे रत्न आणि आभूषणे उद्योग उद्यान नमुनेदार पद्धतीने जेम्स व ज्वेलरी एक्सोर्ट प्रमोशन काऊन्सिलतर्फे विकसित केले जात आहे. या ठिकाणी १३५४ दागिने उत्पादक कारखाने सुरू होतील. तर १ लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी सुमारे १४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 

नंदूरबार जिल्ह्यात पाचशे कोटींची गुंतवणूक

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात उद्योग उभारण्यासाठी पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीने पुढाकार घेतला असून सुमारे पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे. याद्वारे आदिवासी भागात सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथे येणाऱ्या कंपन्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली आहे. दरम्यान, लगतच्या सुरत परिसरातील अनेक उद्योगांनी नवापूर येथे उद्योग विस्तार करण्यात स्वारस्य दाखविले आहे. 

इव्ही चार्जिंग स्टेशनसाठी प्राधान्याने भूखंड

विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसीकडून प्राधान्यांने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दुचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भूखंड उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने अलिकडेच घोषित केलेल्या ईव्ही धोरणाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0