1984: टोकाला गेलेली हुकूमशाही आणि यंत्रवत मनुष्य

1984: टोकाला गेलेली हुकूमशाही आणि यंत्रवत मनुष्य

जॉर्ज ऑरवेलने कादंबरीसाठी 1984 हे नांव का मुक्रर केले यावर जगभर समीक्षक आणि वाचकांत मोठी चर्चा झाली आहे. आजही होते आहे. काहींच्या मते तो 1884 साली

ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांचे पहिले पान काळे
पिगॅससः याचिकाकर्त्यांचे फोन जमा करण्याचे आदेश
फडणवीस सरकार कोसळले
जॉर्ज ऑरवेल

जॉर्ज ऑरवेल

जॉर्ज ऑरवेलने कादंबरीसाठी 1984 हे नांव का मुक्रर केले यावर जगभर समीक्षक आणि वाचकांत मोठी चर्चा झाली आहे. आजही होते आहे. काहींच्या मते तो 1884 साली स्थापन झालेल्या फेबिअन सोसायटीच्या शतकोत्तर वर्षाकडे निर्देश करतो आहे तर काही लोकांच्या मते 1984 या नावाचा संदर्भ जॅक लंडनच्या ‘द आयर्न हील’ या कादंबरीशी संबंधित आहे. (या कादंबरीत 1984 साली एक राजकीय चळवळ सत्तेवर येते. 1984 या कादंबरीतही चळवळीतून सत्तेत आलेल्या पक्षाचे साम्राज्य असल्याने तसे वाटणे साहजिक आहे.) वस्तुतः जॉर्ज ऑरवेलने ही कादंबरी 1948 साली लिहून पुरी केली होती.  त्यामुळे 84 हा केवळ 48 ला उलटा करून लिहलेला अंक आहे. त्यातून ऑरवेलला दुसरे काही सांगायचे नव्हते असेही काहींचे म्हणणे आहे. ते काहीही असो. एक मात्र खरे की, 70 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही तितकीच ताजीतवानी आहे. समकालीन राजकीय स्थितीवर आजही तेवढ्याच जोरकसपणे ती भाष्य करते. खरेतर स्थळ आणि काळाच्या साऱ्या मर्यादा उल्लंघून जाणारी अशी ती महान कलाकृती आहे. सत्तर वर्षांपूर्वी जेंव्हा ती प्रथम प्रकाशित झाली तेंव्हा काळाच्या फार पुढे असणारी कादंबरी असे तिचे वर्णन केले गेले. आज एकविसाव्या शतकात ती लिहिली गेली असती तरी तिच्यासाठी तेच शब्द वापरले गेले असते यात शंका नाही.

ऑरवेलने कादंबरीत भविष्यातील एका dystopian समाजाचे वर्णन केले आहे. यात बिग ब्रदर सर्वांवर करडी नजर ठेवून आहे. रोखून पाहणाऱ्या डोळ्यांचे त्याचे पोस्टर्स साऱ्या देशभर हरेक भिंतीवर डकविले आहेत. ‘बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे’ असा मथळा त्या पोस्टरखाली लिहिलेला आहे. आणि हे केवळ लोकांवर वचक बसविण्यासाठी केलेले नाही. बिग ब्रदरच्या पक्षाचे खरेच प्रत्येक व्यक्तीवर लक्ष आहे. त्यासाठी देशात प्रत्येक शहरांत, इमारतीत आणि खुल्या मैदानावरही प्रकाशवाणी (television)  आणि मायक्रोफोन्स बसविले आहेत. प्रकाशवाणीतून लोकांवर आणि विशेषतः पक्षाच्या सभासदांवर लक्ष ठेवण्यासाठी थॉटपोलीसांची नेमणूक केली आहे. सभासद काय बोलतात काय करतात यांवर तर हे पोलीस लक्ष ठेवतातच पण ते काय विचार करतात. एखादया घटनेला कसा प्रतिसाद देतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव काय दर्शवित असतात यांवरही थॉटपोलिसांचे लक्ष असते. पक्षाचे सगळे सभासद आणि देशाचा हरेक नागरिक काय विचार करतो यावर थॉटपोलीस लक्ष ठेऊन आहेत. पक्ष जे सांगेल केवळ त्यावरच साऱ्या लोकांचा विश्वास आहे. पक्षाशी प्रतारणा होईल अशा कुठल्याही प्रकारचा विचार त्यांच्या मनात नाही यावर पक्षाची बारीक नजर आहे. तसे नसेल तर त्या व्यक्तीला unperson करण्यात येते. एखाद्या व्यक्तीचे रूपांतर unperson मध्ये झाले की काय होते ते कुणालाच समजत नाही. त्याला मारून टाकण्यात आले की तुरुंगात डांबण्यात आले की आणखी काही हे संपूर्णपणे अज्ञात राहते. कारण त्या व्यक्तीचे सर्व प्रकारचे अस्तित्व नष्ट करण्यात येते. त्यांच्याबरोबरच जुन्या कागदपत्रांतून त्याचे नांव नष्ट करण्यात येते. तो मनुष्य कधीकाळी या जगात होता हे संपूर्णपणे पुसून टाकण्यात येते. केवळ कागदोपत्री नव्हे तर लोकांच्या स्मृतीतूनही त्याला नष्ट करण्यात येते. Unperson केला गेलेला तो व्यक्ती कधीकाळी अस्तित्वात होता असा विचार करणाऱ्याचीही अखेरीस तीच गत होते.

विन्स्टन स्मिथकडे नेमके हेच काम देण्यात आले आहे. नको असलेला भूतकाळ कागदपत्रांतून नष्ट करणे आणि भूतकाळातील संदर्भ पक्षाला हवे असतील तसे बदलणे हे त्याचे काम आहे. पक्षाला तसे करणेच अपेक्षित आहे. कारण ‘जो भूतकाळावर नियंत्रण ठेऊ शकतो, तोच भविष्यकाळावर नियंत्रण ठेऊ शकतो आणि जो वर्तमाकाळावर नियंत्रण ठेऊ शकतो, तोच भूतकाळावर नियंत्रण ठेऊ शकतो.’ असे पक्षाचे तत्व आहे. भूतकाळातील संदर्भ बदलण्याच्या या प्रक्रियेला शासकीय भाषेत ‘शुद्धीकरण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ बिग ब्रदरने एखादे भाकीत केले आणि भविष्यात ते खोटे ठरले, तर जुन्या कागदपत्रांतून ते भाकीत नष्ट करून त्यात असा बदल केला जातो की बिग ब्रदरने अगदी नेमके आणि अचूक भाकीत केले होते असे वाटावे. विन्स्टन हे काम करण्यात प्रवीण होता. तो बिग ब्रदरच्या भाषणातही अनुकूल बदल करत असे. देशद्रोही अणि विचारगुन्हेगार यांच्या नेहमीच्या धिक्काराने तो भाषण सजवत असे. पक्षाने शासकीय कामांसाठी एक नवी भाषाही उपयोगात आणली आहे. ‘न्यूस्पीक.’ पक्षाची सगळी कागदपत्रे याच भाषेत लिहिली जातात. जुन्या भाषेतील सगळ्या शब्दांचा नाश करण्यात येत आहे. जुनी भाषा निरर्थक आहे. ‘आता जर तुम्हाला गुड शब्दापेक्षाही त्याच अर्थाचा, पण अधिक ठासून भरलेला अर्थ हवा असेल, तर एक्सलंट, splendid आणि अशाच अनेक शब्दांची मालिका कशासाठी हवी? Plusgood म्हटले की काम भागते। त्याहीपेक्ष जोरदार अर्थ हवा असेल, तर doubleplusgood शब्द वापरावा.’ असे पक्षाचे धोरण आहे. जुन्या भाषेची सारी वैशिष्ट्ये, अस्पष्टपणा, अर्थांच्या निरुपयोगी छटा या साऱ्या नष्ट करण्यात येत आहेत. केवळ न्यूस्पीक हीच जगातील एकमेव भाषा पक्ष मुक्रर करीत आहे आणि पक्ष जे निश्चित करेल त्यासमोर लोक विनातक्रार मान तुकवीत आहेत. पक्ष सांगेल त्याहून वेगळ्या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवण्याचे साहस कुणीच करत नाही. तसा विचारही कुणी करत नाही. थॉटपोलीस हे एक त्याचे कारण आहेच. शिवाय आपला भाऊ, आपले मूल कुणावरही विश्वास ठेवता येणे शक्य नाही. आपल्या वडिलांचा पक्षाच्या धोरणावर विश्वास नसल्याचे अनेक मुलांनी थॉटपोलीसांना कळविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

विन्स्टन स्मिथही वरवर तसेच वागत असला तरी आतून त्याला पक्षाच्या साऱ्याच गोष्टींवर शंका आहे. पक्ष राबवत असलेल्या धोरणांतील फोलपणा त्याला पुरता ठाऊक आहे. खरेतर सारे जग यंत्रवत झाले असताना विन्स्टन आपले माणूसपण जागे ठेऊ पाहत आहे. ज्युलिया या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध आहेत. असे संबंध पक्षाच्या दृष्टीने निषिद्ध आहेत. आणि थॉटपोलिसांना त्याचा सुगावा लागला तर त्या दोघांची गतही तीच होईल जी अज्ञात केल्या गेलेल्या अनेक लोकांची होते हे ठाऊक असूनही दोघांच्या भेटीगाठी चालू आहेत. या भयंकर जगात तेवढा एकच काय तो आधार विन्स्टनला वाटतो. विन्स्टनला अशीही एक शंका आहे की त्याच्याप्रमाणेच विचार करणारे इतरही लोक आहेत. विशेषतः ओब्रायनवर त्याला संशय आहे. ओब्रायनने त्याला एकदा कुजबुजत ‘आपण अशा ठिकाणी भेटू जिथे अंधार नाही’ असे म्हटल्याचे आठवते. मात्र ते स्वप्न होते, एक भ्रम होता की सत्य होते हे त्याला सांगता आले नसते. मात्र ओब्रायन ब्रदरहूड या पक्षविरोधी काम करणाऱ्या भूमिगत संघटनेचा सदस्य असल्याची त्याला शंका आहे. ज्युलियाला घेऊन एकदा तो ओब्रायनला भेटायला जातो. ओब्रायन हा पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातील वरच्या स्तरावरील सदस्य असल्याने त्याला प्रकाशवाणी बंद करण्याची मुभा असते. विन्स्टनला तो ब्रदरहूडच्या सदस्यत्वाची शपथ देतो. ओब्रायन विन्स्टनला ब्रदरहूडचा प्रमुख असलेल्या गोल्डस्टीनचे काळ्या रंगाचे कव्हर असलेला एक ग्रंथ देतो. ब्रदरहूड संघटनेसाठी आणि पक्षाला उलथवून टाकण्यास साहाय्यभूत होईल अशी कुठलीही गोष्ट करण्याची विन्स्टनची तयारी असते. मात्र तसे होण्याआधीच विन्स्टन आणि ज्युलियाला एकत्र असताना अटक केली जाते. थॉटपिलीसांपासून काहीच लपविणे शक्य नसते. आणि ते विन्स्टनच्या मागावर गेली सात वर्षे असतात. विन्स्टनने आणि ज्युलियन उच्चारलेला हरेक शब्द त्यांनी रेकॉर्ड केलेला असतो. विन्स्टन आणि ज्युलिया दोघांची रवानगी तुरुंगात होते.

अमानुष मारहाण, विजेचे धक्के, अपमान आणि मानहानी हेच तुरुंगातले जीवन असते. विन्स्टनच्या वाट्यालाही तेच येते. तुरुंगात विन्स्टनला सर्वाधिक आश्चर्य कशाचे वाटते तर ते ओब्रायनला सुद्धा थॉट पोलिसांनी आपल्या कह्यात घेतल्याचे. एवढेच नव्हे तर ओब्रायन आता थॉट पोलिसांचा अधिकारी म्हणून काम करत असतो. तुरुंगात विन्स्टनच्या मनाची तीन टप्प्यात पुनर्रचना केली जाते. प्रथम शिकणे, नंतर समजावून घेणे आणि सरतेशेवटी स्वीकारणे. असह्य मार, भूक आणि वेदना यांमुळे विन्स्टन पहिल्या दोन स्तरावर मान झुकवितो. पण आतून आणि पूर्ण विश्वासाने पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवणे त्याला शक्य होत नाही. दोन अधिक दोन हे चारच असतात. पक्षाने पाच म्हंटले तरी त्यात काही बदल होत नाही. दोन अधिक दोन यांची बेरीज चारच होते यावर त्याचा विश्वास कायम राहतो. आणि पक्षाला हे नामंजूर असते. पक्ष जर दोन अधिक दोन पाच म्हणत असेल तर, सर्वांनी तसेच म्हटले  पाहिजे असे पक्षाचे धोरण असते. थॉटपोलीस म्हणतील त्या साऱ्या गोष्टी विन्स्टन कबूल करतो मात्र ज्युलियाशी आपण प्रतारणा केली नाही असे तो ओब्रायनला सांगतो. शेवटी त्याची रवानगी 101 नंबरच्या खोलीत होते. एका भयंकर पिंजऱ्यात भुकेले उंदीर सोडलेले असतात आणि विन्स्टनच्या शरीरावर तो पिंजरा घातला जाईल असे त्याला सांगितले जाते. विन्स्टन भयाने हादरून जातो. पिंजरा त्याच्या चेहऱ्यासमोर आणताच आपल्याशिवाय ही शिक्षा कुणा दुसऱ्याला दिली जावी असे त्याला वाटते. त्याला आठवते. ज्युलियाला उंदरांची भीती वाटते. विन्स्टन किंचाळतो, माझ्याऐवजी ज्युलियाला ही शिक्षा देण्यात यावी. ज्युलियाशी प्रतारणा न केल्याचा विन्स्टनचा बंड पोलीस सहज मोडीत काढतात. त्यानंतर मात्र त्यांना सोडून देण्यात येते. मात्र हा विन्स्टन आधीच्या विन्स्टनहून पूर्णपणे निराळा असतो.  तो दोन अधिक दोन यांची बेरीज पाच होते हे त्याला आता पटू लागते. बिग ब्रदरविषयी त्याला आता केवळ आता आदरच नव्हे तर प्रेमही वाटू लागते. पक्षाची धोरणे आता तो अतीव प्रेमाने आळवू लागतो.

युद्ध म्हणजेच शांतता.

स्वातंत्र्यात गुलामगिरी आहे.

अज्ञानातच ताकद सामावलेली आहे.

अशा तर्हेने एका माणसाचे यंत्रात रूपांतर केले जाते. विन्स्टनचे व्यक्तित्व पूर्णपणे संपवून पक्षाच्या हातातील एक बाहुले एवढीच त्याची ओळख निर्माण केली जाते. केवळ विन्स्टन नव्हे तर टोकाला गेलेल्या हुकूमशाहीच्या अंमलात आलेल्या प्रत्येक नागरिकाची हीच गत केली जाते. सुरवातीच्या काळात विन्स्टनला बहुसंख्य असलेला मजूर वर्ग हा पक्ष आणि बिग ब्रदरला उलथवून टाकू शकेल असे वाटत असते. पण बहुसंख्यांचे मौन आणि निष्क्रियता यांमुळे तसे होत नाही. पक्ष अधिक मजबुतीने आपले जाळे पसरू लागतो.

एखाद्या देशातील हुकूमशाही टोकाला गेली तर ती किती भयावह रूप धारण करू शकते याचे काल्पनिक चित्र ऑरवेलने या कादंबरीत रंगविले. मात्र ऑरवेलची कादंबरी इतकी परिणामकारक होती की वाचकांना 1984 साली खरीच अशी हुकूमशाही जगात अवतरेल असे वाटले. यातून ऑरवेलच्या लिखाणाची ताकद ध्यानात येते. अर्थात कादंबरीत वर्णन केलेली लोकशाही एका दिवसात अवतीर्ण होत नाही. एक एक पाऊल टाकत, एक एक धोरण राबवत आपली चाहुलही न लागू देता ती येते. आणि एकदा तिने देशाला आपल्या कह्यात घेतले की, त्यातून सुटका करून घेणे अशक्य बनते. हे लक्षात घ्यायला हवे. अशी हुकूमशाही कितीही टोकाची असली तरी तिचे खरे सामर्थ्य हे खुद्द हुकूमशाही चालविणारे लोक नसतात तर बहुसंख्येने असलेल्या नागरिकांचे मौन असते. ऑरवेलच्या पुस्तकांतून ध्वनित होणारा हा संदेश ध्यानात घेणे गरजेचे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: