चाचणी टाळून ३०० प्रवासी विमानतळावरून पळाले

चाचणी टाळून ३०० प्रवासी विमानतळावरून पळाले

सिल्चरः आसाममधील सिल्चर विमानतळावर उतरलेल्या सुमारे ३०० प्रवाशांनी अनिवार्य कोविड-१९ चाचणीस आक्षेप घेत, विमानतळावर हैदोस घातला व पलायन केले. या सर्व प्रवाशांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे विमानतळावरील अधिकार्यांनी सांगितले.

बुधवारी सिल्चर विमानतळावर देशातून विविध ६ ठिकाणाहून विमाने आली होती. त्यातील ६०० प्रवासी विमानतळावर आले होते. या सर्वांची लस घेण्यासाठी विमानतळ प्रशासनाने विमानतळ व नजीकच्या तिकोल मॉडल रुग्णालयात कोविड-१९ चे नमुने घेण्यास प्रवाशांना सांगितले. या चाचणीचा दर प्रती प्रवाशी ५०० रु. इतका होता. या दरावरून ३०० हून अधिक प्रवाशांनी विमानतळावर हैदोस, गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

आसामच्या सरकारने हवाई मार्गाने येणार्या सर्व प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्या अंतर्गत रॅपिड अँटिजन चाचणी मोफत आहे आणि त्यानंतर केली जाणारी आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रु. शुल्क लावण्यात आले आहे. जे प्रवासी रॅपिड अँटिजन चाचणीत संक्रमण मुक्त आहेत त्यांनाही आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य आहे.

पण या सक्तीवरून गोंधळ उडाला. ६९० प्रवाशांपैकी १८९ प्रवाशांनी चाचण्या केल्या. त्यातील ६ प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले. काही प्रवासी जे मणिपूर, मिझोराम व त्रिपुराला जाणार होते, त्यांची चाचणी करण्यात आली नाही.

एका अधिकार्याने सांगितले की, ३०० प्रवाशांनी पलायन केले, या प्रवाशांची चौकशी सुरू केली जाणार आहे.

आसाममध्ये आजपर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २,२९,१३८ इतकी झाली असून मृतांचा आकडा १,१५० इतका झाला आहे.

मूळ बातमी

COMMENTS