‘गेल्या ७ वर्षांत ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’

‘गेल्या ७ वर्षांत ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’

कोलकाताः नरेंद्र मोदी सरकारच्या २०१४-२०२० या काळात देशातील श्रीमंत समजल्या जाणार्या ३५ हजार उद्योजकांनी देश सोडला असल्याचा दावा प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केला आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मित्रा यांनी मॉर्गन स्टॅनले, एफ्रआशिया बँक व जीडब्लूएम या तीन वित्त संस्थांच्या संशोधन अहवालांचा पुरावा दिला आहे. देशातील भयाचे वातावरण हे उद्योजकांनी देश सोडण्यामागचे कारण असल्याचे मित्रा यांचे म्हणणे आहे. सरकारने या संदर्भात संसदेत श्वेत पत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवर मित्रा यांनी ३५ हजार भारतीय उद्योजकांनी देशातून पलायन करण्यामागचे कारण मोदी सरकारने देशात निर्माण केलेले भय आहे का, असा सवाल केला आहे.

२०१४-२०१८ या दरम्यान २३ हजार भारतीय उद्योजकांनी (मॉर्गन स्टॅनली), २०१९मध्ये ७ हजार भारतीय उद्योजकांनी (एफ्रएशिया बँक) व २०२०मध्ये ५ हजार भारतीय उद्योजकांनी (जीडब्लूएम रिव्ह्यू) देश सोडला असल्याचे ट्विट अमित मित्रांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात सीआयआयच्या बैठकीत भारतीय उद्योजकांच्या विरोधात १९ मिनिटांचे भाषण दिले होते. त्या भाषणात भारतीय उद्योजक राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. टाटा स्टील आपले उत्पादन चीन व जपानमध्ये का विकू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी टाटा स्टील कंपनीला तसे आव्हानही दिले होते. गोयल यांनी चीन व जपानमधील कंपन्या राष्ट्रवादी असल्याचे सांगत त्या पोलादाचे आयात करत नसल्याचे भारतीय उद्योजकांना सांगितले होते.

गोयल यांच्या वक्तव्याचा दाखला देत मित्रा यांनी अशा केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधानांनी वेळीच कारवाई का केली नाही, असा सवालही केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS