संयुक्त राष्ट्रेः गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये सुमारे ४ कोटी ५८ लाख महिला तर जगभरात १४ कोटी २६ लाख महिला बेपत्ता झाल्याचा धक्कादायक अहवाल युनाएटेड स्ट
संयुक्त राष्ट्रेः गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये सुमारे ४ कोटी ५८ लाख महिला तर जगभरात १४ कोटी २६ लाख महिला बेपत्ता झाल्याचा धक्कादायक अहवाल युनाएटेड स्टेट्स पॉप्युलेशन फंडने (यूएनएफपीए) मंगळवारी जाहीर केला. १९७०मध्ये जगभरातल्या बेपत्ता महिलांचा आकडा ६० लाख १० हजार इतका होता. हा आकडा गेल्या ५० वर्षांत दुप्पट झाल्याचे यूएनएफपीएचे म्हणणे आहे. भारत व चीन या दोन देशांमधील महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चीनमध्ये बेपत्ता महिलांचा या घडीला आकडा ७ कोटी २३ लाख इतका आहे.
महिलांचे बेपत्ता होण्यामागील महत्त्वाचे कारण प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात होणारी लिंगनिवड असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
२०१३ ते २०१७ या काळात भारतातल्या ४ लाख ६० हजार मुली जन्माआधीच ‘नाहीशा’ झाल्या. नाहीशा होणार्या एकूण मुलींमध्ये गर्भलिंग परिक्षणामुळे दोन तृतीयांश तर प्रसूतीपश्चात मुली झाल्याने १ तृतीयांश मुली नाहीशा होतात असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार भारतात जन्माला आलेल्या एक हजार मुलींमधील १३.५ टक्के मुलींचा मृत्यू त्या ५ वर्षे वयाच्या आत होतो. भारतासारख्या अनेक विकसनशील देशांनी मुलींचे मृत्यू रोखण्यासाठी मोहीमा हाती घेतल्या आहेत. त्यांना अल्पसे यश येत असून ‘अपनी बेटी, अपना धन’ या योजनेत थेट बँक खात्यात पैसा जात असल्याने मुलींचे मृत्यू रोखण्यात यश येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
विवाह विलंबाची समस्या
जन्मतःच वा जन्माअगोदर मुलींच्या अशा नाहीसे होण्यामुळे त्याचा परिणाम विवाह व्यवस्थेवर झाला असून मुलींची संख्या घटल्याने मुलांची लग्ने उशीरा होणे वा लग्न न करणे असे नवे सामाजिक प्रश्न निर्माण झाल्याचे या अहवालातले एक निरीक्षण आहे. मुलांच्या विवाहात हे प्रश्न निर्माण झाल्याने परिणामी बालविवाहही वाढले असून याचा मोठा परिणाम कमी उत्पन्न असलेल्या तरुण पुरुष वर्गावर झाला आहे.
२०५५ मध्ये भारतामध्ये विवाह न झालेल्या पुरुषांची संख्या सर्वाधिक होईल व ५० वर्षाहून अधिक वयाचे व लग्न न झालेल्या पुरुषांचे एकूण प्रमाण १० टक्के राहील, असे निरीक्षण या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मूळ बातमी
COMMENTS