‘मुग़ल-ए-आज़म’ : ६० वर्षांची हुकूमत

‘मुग़ल-ए-आज़म’ : ६० वर्षांची हुकूमत

‘मुग़ल-ए-आज़म’ रिलीज झाल्यानंतर त्याची चर्चा गल्ली-गल्लीत, चौकाचौकात, शहर-गावांत होती. स्त्री वर्गात साड्या-दागिन्यांच्यापेक्षा जास्त मागणी या चित्रपटाच्या तिकिटांना होती. देश-विदेशात ‘मुग़ल-ए-आज़म’बद्दलचे आकर्षण वाढत होते. ‘मुग़ल-ए-आज़म’ला नुकतीच ६० वर्षे पुरी झाली त्याविषयी लेखमालेतील हा तिसरा व अंतिम भाग.

कर्णन : प्रतीकांचा उलटवलेला खेळ
‘वन्स अपॉन…इन हॉलिवूड’ – हॉलीवूड सुवर्णयुगाची दुरुस्ती
‘त्रिज्या’ युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये

४ ऑगस्ट १९६०च्या रात्री ९.३० वाजता ‘मुग़ल-ए-आज़म’चा शाही प्रीमियर ठेवण्यात आला होता. ‘मुग़ल-ए-आज़म’च्या प्रीमियरची खास नबाबी अंदाज असलेली निमंत्रण पत्रिका मान्यवरांना दिली होती. एखाद्या राजघराण्याचा विवाह सोहळा असावा, असे थाटामाटाचे वातावरण होते. मुंबईतले ‘मराठा मंदिर’ आकर्षक रोषणाईने सुशोभित केले होते. हत्तीच्या शाही स्वारीतून या चित्रपटाची प्रिंट वाजत गाजत ‘मराठा मंदिरा’कडे आणली गेली. हा सोहळा बघण्यासाठी संध्याकाळ पासून माणसांची गर्दी जमली होती. संध्याकाळच्या एका वृत्तपत्राचा मथळा असा होता की ‘आज मुंबईचे सर्व रस्ते मराठा मंदिरच्या दिशेकडे वळाले आहेत.’

कडक पोलीस बंदोबस्त असूनही या अलोट गर्दीमुळे त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना  पोहचायला एक तास लागला होता. कित्येक वर्षे उलट-सुलट चर्चा असलेल्या या चित्रपटाबाबत सर्वत्र कमालीचे औत्सुक्य होते. आलेल्या नामवंत लोकांमुळे ‘मराठा मंदिर’ला तारांगणाचे रूप आले होते. फक्त दोन लोकांची अनुपस्थिती खटकत होती ती म्हणजे दिलीपकुमार आणि मधुबाला यांची. दिलीपकुमार के.आसिफ यांच्यावर कमालीचे नाराज होते कारण त्याच्या लहान बहिणी अख्तरशी के. आसिफ यांनी पळून जाऊन निकाह केला होता. आणि मधुबाला यांची प्रकृती त्यावेळी ढासळत चालली होती.

यावेळी प्रीमियरची शूट केलेली काही दृश्ये उपलब्ध आहेत.

थेटरच्या मिट्ट काळोखात पडद्यावर अक्षरे उमटली के आसिफ कृत ‘मुग़ल-ए-आज़म’. या चित्रपटाचा शिल्पकार अनिमिष नेत्राने आपले स्वप्नं पडद्यावर साकार होताना बघत होता. जेव्हा चित्रपट संपून थेटर मध्ये लाईट लागले तेव्हा के.आसिफ यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या अश्रुंचा अर्थ के. आसिफ यांच्या प्रत्येक सहकाऱ्यांना समजला होता.

जिस दिन से चला हूँ मिरी मंज़िल पे नज़र है

आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा

पण…  हाय रे किस्मत!!

स्वप्न साकार झालं असले तरी त्याचे स्वागत खुल्या मनाने चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी केले नाही. प्रीमियर नंतर काही लोकांनी के. आसिफ यांची खूप टर उडवली. चित्रपटातील अवघड उर्दू संवाद लोकांना समजणार नाही, यात एकही विनोदी पात्र, प्रसंगाची पेरणी केली नाहीये, लोकांना असा चित्रपट आवडणे शक्य नाही. हा चित्रपट कंटाळवाणा आणि फ्लॉप आहे, असे घोषित केले.

‘मुग़ल-ए-आज़म’ या लेखमालेतील पहिला भागः झपाटलेला तपस्वी

अजून एक  सुर लागला की जातीय सलोख्याचे सतत आलेले संदर्भ चित्रपटाला मारक ठरतील. चित्रपटातील कृष्ण जन्माष्टमी साजरी करतानाचे दृश्य आणि ‘मोहे पनघट पर नंदलाल छेड़ गयो रे’.  या गाण्यावरून त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक विजय भट्ट यांनी के. आसिफ याची खूप थट्टा केली. चित्रपटांशी जोडलेले लोक या ‘निगेटिव रिएक्शन’मुळे विचलित झाले. पृथ्वीराज कपूर पण अत्यंत चिंताग्रस्त मनाने थेटरच्या बाहेर पडले. त्यांचा अभिनयाने प्रभावित झालेले सहकलाकार अजित यांनी पळत जाऊन पृथ्वीराज यांना गाठले आणि त्यांच्या पाया पडून, मुक्त कंठाने त्यांची प्रशंसा केली पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर उदास भाव कायम राहिले. पण दुसरीकडे आपल्या कामाबद्दल सुस्पष्ट कल्पना असलेल्या के. आसिफ यांच्यावर प्रतिक्रियांचा कोणताच परिणाम झाला नाही. प्रीमियरच्या रात्री शॅपेनच्या उसळणाऱ्या फेसासोबत सर्व नकारात्मक गोष्टीना उडवून लावत, उदास चेहऱ्याच्या आपल्या लोकांकडे बघत म्हणाले, “चिअर्स! बघा हा चित्रपट कसा सुपरहिट होतो ते! आपल्याला फार काळ प्रतीक्षा कारावी लागणार नाही. लवकरच हा यशाचे शिखर गाठेल.” त्यावेळी नियती वरून ‘तथास्तु’ म्हणाली असावी.

५ ऑगस्टला तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वी थेटरचे मालक कोठारी यांनी एक विधीवत पूजा केली, त्यात आसिफ देखील सामील होते. तिकीट विक्रीची खिडकी उघडण्याची वाट बघत लोकं आदल्या रात्रीपासून  रांगेत उभे होते. ही लांबलचक रांग कित्येक महिने मराठा मंदिराचा एक अविभाज्य भाग झाली होती. तिकिटाचे रूप हटके करण्यात आले होते. रंगीत कागदावर पुढे सलीम-अनारकलीचे, मागे अकबराचे छायाचित्र असलेली तिकिटे खास छापण्यात आली होती. ती तिकिटे अजूनही काहींच्या घरांत फ्रेम करून जपून ठेवली आहेत.

‘मुग़ल-ए-आज़म’ने आपली हुकूमत रसिकांच्या मनावर गाजवायला सुरवात केली. लोकं आपला नंबर लागेपर्यंत तिथेच अंथरूण-पांघरूण घेऊन मुक्काम करीत. त्यांच्या जेवणाचा डबा घरून पोहचवला जायचा. आजूबाजूच्या चहा, पान टपऱ्यांना सुगीचे दिवस आले होते. ‘मराठा मंदिर’च्या जवळपास राहणाऱ्यानां नातेवाईकाचा उपद्रव व्हायला लागला. त्या रांगेत ब्लॅकने तिकीट विकणारे महानग अधिक होते. ‘मुग़ल-ए-आज़म’मुळे कित्येक ब्लॅकने तिकीट विकणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती कायमस्वरूपी सुधारली. हा चित्रपट बघणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. गल्लीतला कोणी जर हा चित्रपट बघून आला असेल तर त्याचा भाव वधारायचा. त्याच्याकडे आदराने, कौतुकाने, असूयेने बघितले जायचे. तिकीट मिळेपर्यत त्याला गाठून चित्रपटाचे वर्णन ऐकण्यात लोकं धन्यता मानू लागले होते. गल्ली-गल्लीत, चौकाचौकात, शहर-गावांत सर्वत्र ‘मुग़ल-ए-आज़म’ची चर्चा होती. स्त्री वर्गात साड्या-दागिन्यांच्यापेक्षा जास्त मागणी या चित्रपटाच्या तिकिटांना होती. देश-विदेशात ‘मुग़ल-ए-आज़म’बद्दलचे आकर्षण वाढत होते. लोक मुंबईत चित्रपट बघायला येऊ लागले. शेवटी ‘मराठा मंदिर’ने तिकीटच्या दोन खिडक्यांची उपाययोजना केली. परदेशातून आलेल्या लोकांनी आपला व्हिसा दाखवून लगेच तिकीट मिळण्याची खास सोय करण्यात आली. या गर्दीत परत, परत चित्रपट बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी चित्रपटसृष्टीतील विविध विभागात काम करणारी लोक येत होती. त्यातील दोन ठळक नावं म्हणजे गुरुदत्त आणि फिरोज खान. यांनी अनेक वेळा हा चित्रपट बघितला. गुरुदत्त तर प्रत्येक वेळी हा चित्रपट बघून मूक व्हायचे. आपल्या मित्राने केलेले अफाट काम बघून स्तिमित व्हायचे. रसिकांनी चित्रपटसृष्टीचा खरा अधिपती म्हणून के.आसिफ यांचा राज्याभिषेक करून टाकला होता.

‘मुग़ल-ए-आज़म’ या लेखमालेतील दुसरा भागः प्रेमकहाणी वजा.. ‘मुग़ल-ए-आज़म’

१२ ऑगस्ट १९६०ला के. आसिफ यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत या चित्रपटातील शाही कपडेलत्ते, दागिने लढाईतील हत्यारे, राजप्रसादात वापरलेल्या वस्तू यांचे कलात्मक प्रदर्शन भरविले. चित्रपटासारखाच अभूतपूर्व प्रतिसाद या प्रदर्शनाला भारताच्या कानाकोपऱ्यातून, जगभरातून मिळाला.

सुरवातीला वृत्तपत्र-सिने मासिकांनी सावधगिरीची भूमिका घेत, लगेच कोणतीही प्रतिक्रिया द्यायचे टाळले. कारण के. आसिफ यांनी पत्रकारांना शूटिंगच्या दरम्यान जवळपास फिरकू दिले नव्हते. के आसिफ यांच्याशी जवळीक असलेल्या एका संपादकांनी शुटिंगचा एखादा साधा फोटो दिल्यास, माझ्या पेपरचा खप वाढेल, अशी मागणी केली होती तेव्हा आसिफ यांनी “चित्रपटात साधं असे काहीही नाहीये, सर्वच गोष्टी खास आहेत.” असे सांगून धुडकावून लावले होते. लोकप्रियतेचा अंदाज आल्यावर सर्वच वृत्तपत्रांनी कौतुकाचा वर्षाव केला.

त्यात ‘फिल्मफेअर’मधील समीक्षा बघा. “हा चित्रपट म्हणजे कल्पकता, उदार हृदय आणि कठोर मेहनत याच्या प्रति असलेली श्रद्धा, निष्ठा यांचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यातील भव्यता, सौंदर्यदृष्टी आणि सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय या सर्वाचा आश्चर्यकारक आविष्कार आहे. भारतीय चित्रपटाचे नाव जगभरात करणाऱ्या या चित्रपटाची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरात केली जाईल.”

आणि याच ‘फिल्मफेअर’ने आपल्या या कौतुकाच्या विधानापासून पारितोषिकांच्या वेळी मात्र फारकत घेतली.

पण या चित्रपटातील कोणालाच बक्षीस, हार-तुरे न मिळाल्याचे दुःख वाटले नाही. कारण प्रचंड लोकप्रियता जी त्यांनी कधी अपेक्षित केली नव्हती, ती त्यांना मिळाली होती.

‘मुग़ल-ए-आज़म’ च्या अवघड उर्दू संवादांनी लोकांच्यावर मोहिनी घातली. चित्रपटातील लहेजेदार, पल्लेदार संवाद म्हणण्याचे फॅड निर्माण झालं. एक माणूस तर अकबराचे संवाद म्हणता, म्हणता मागच्या जन्मात आपणच अकबर होतो, हे सांगायला लागला होता. सतत अकबराचे संवाद म्हणून त्याच्या गळ्याच्या नसा ताणल्या गेल्या.  शेवटी त्याला वेड्याच्या इस्पितळात हलवण्यात आले.

‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या शब्दांची भुरळ तरुणाईवर अजूनही कायम आहे. भोपाळ येथील ‘नदीम’ या उर्दू वर्तमानपत्राचा विक्रेता पेपरचा खप वाढविण्यासाठी भोपुचा वापर करत कोणत्याही बातमीसाठी या चित्रपटाचा संदर्भ चिटकून द्यायचा.

वो भाग गई! अरे लो वो भाग गई! अपने ने आशिक़ के साथ भाग गई. ज़माने से बेख़ौफ़ होकर भाग गई. जाते-जाते घर वालों के लिए पर्चा छोड़ गई – प्यार किया तो डरना क्या?’

अशा जाहिरातबाजीने पेपर हातोहात विकला जायचा. पुढे कधी कोणी पळून गेलेली मुलगी घरी परत आली तर हे महाराज परत जोरजोरात ओरडायचे.

लो वो लौट आई! भागी हुई लड़की घर लौट आईअब यूं गाती हुई आई – मुहब्बत की झूटी कहानी पे रोए’.

‘मुग़ल-ए-आज़म’ नाव अनेक पान- चहाच्या टपऱ्यांवर, हॉटेल, ज्वेलरी शॉपवर झळकले. ‘अनारकली’ चहासोबत ‘सलीम’ खारी बिस्किटं असा नवा ट्रेंड सुरू झाला होता.

दिल्लीच्या प्रसिद्ध करीम हॉटेलमध्ये ‘अनारकली’ बिर्याणी मेनूकार्ड मध्ये समाविष्ट करण्यात आली. ‘अनारकली’ ड्रेसची फॅशन आजही आहे. सर्वत्र ‘मुग़ल-ए-आज़म’चा हा प्रभाव पुढील कित्येक वर्षे राहिला.

गझलचे बादशहा मेंहदी हसन यांनी १९६९ला पाकिस्तानी चित्रपट ‘ज़ीनत’साठी ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ हे गाणं म्हटलं. त्यातील खास आकर्षणाचा भाग असा आहे की कडव्यात ग़ालिब आणि मीर यांच्या रचना वापरल्या आहेत.

८५% ब्लॅक अँड व्हाइट असलेला चित्रपट संपूर्ण रंगीत करण्याची मनीषा के. आसिफ यांची होती.

बाद मरने के भी छोड़ी न रिफ़ाक़त (साथी) मेरी

मेरी तुर्बत(कबर) से लगी बैठी है हसरत मेरी

चित्रपटाचे निर्माते शापूरजी मिस्त्री यांना आपल्या घराण्याचे नाव एका अमरत्व प्राप्त झालेल्या कलाकृती बरोबर जोडले गेले आहे, ही जाणीव  होती. तीच बांधिलकी त्यांच्या पुढच्या पिढीने देखील जपली. २००४ला शापुरजी मिस्त्री यांच्या पुढील पिढीने परत अशक्यप्राय गोष्टीला शक्य करून दाखवत हा चित्रपट रंगीत केला. १२ नोव्हेंबर २००४ला ‘इरॉस’ थेटर आकर्षकरित्या सजविण्यात आले. परत तशीच वाजत-गाजत हत्तीवरून प्रिंट आणली गेली. यावेळी सलीम शहजादा दिलीपकुमार उपस्थित होते. रंगीत ‘मुग़ल-ए-आज़म’ ला परत उदंड प्रतिसाद मिळाला.

२१ ऑक्टोंबर २०१६ ला प्रसिद्ध नाटककार फ़िरोज़ अब्बास ख़ान यांनी भव्यदिव्य, अनेक कलाकारांचा ताफा घेऊन ‘मुग़ल-ए-आज़म द म्यूज़िकल’ सादर केले. या म्युझिकल प्लेला जागतिक पातळीची अनेक पारितोषिकं प्राप्त झाली. या नाटकाची निर्माती शापुरजी मिस्त्री ग्रुपने केली आहे. ‘मुग़ल-ए-आज़म’ च्या ६० वर्षपूर्ती निमित्ताने चित्रपटाचे स्क्रिप्ट अकबर आसिफ यांनी ऑस्कर लायब्ररीला सुपूर्त केले. एम. एफ. हुसेन यांनी या चित्रपटातील दृश्यांवर ५०चित्रांची मालिका तयार केली. विविध भाषेत या चित्रपटावर अनेक पुस्तके लिहिली गेली. ‘रेड चिली’ प्रोडक्शनने शाहरुख खानचे सूत्रसंचालन असलेली एक डॉक्युमेंटरी तयार केली.

‘मुग़ल-ए-आज़म’च्या एडिटिंगच्या वेळी इतके प्रसंग, गाणी वगळावी लागली की त्यातून अजून तीन चित्रपट तयार झाले असते. तसेच या चित्रपटाचे किस्से-कहाण्या अजून बाकी आहेत.

तूर्तास ‘मुग़ल-ए-आज़म’ ची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण करत आहे.

(काही संदर्भ: ‘Dastane mughal e azam’ आणि ‘मुगले आजम ‘ या पुस्तकांतून)

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शक व निर्मात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0