अग्रिमा जोशुआच्या ट्रोलिंगमध्ये वाढ

अग्रिमा जोशुआच्या ट्रोलिंगमध्ये वाढ

मुंबईस्थित कॉमेडियन अग्रिमा जोशुआला शिवीगाळ करत बलात्काराच्या धमक्या देणारा गुजरातमधील रहिवासी शुभम मिश्राचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडोदा पोलिसांन

देशद्रोह कायदाः २ महिला पत्रकारांची सुप्रीम कोर्टात याचिका
शेतकरी संघटनांशी चर्चेस तयारः कृषीमंत्री
कोरोना संकटातून सामाजिक परिवर्तन शक्य आहे का?

मुंबईस्थित कॉमेडियन अग्रिमा जोशुआला शिवीगाळ करत बलात्काराच्या धमक्या देणारा गुजरातमधील रहिवासी शुभम मिश्राचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडोदा पोलिसांनी शुभमला १२ जुलैला अटक केली. अग्रिमाचा त्रास मात्र शुभमच्या अटकेमुळे अधिकच वाढला आहे.

“मी तक्रार नोंदवली नव्हती. पोलिसांनी स्वत:हून ही कारवाई केली आहे. मात्र, त्याला अटक झाल्यामुळे लोक माझ्यावर संतापले आहेत. मला येणाऱ्या हत्येच्या व बलात्काराच्या धमक्यांमध्ये तेव्हापासून वाढ झाली आहे,” असे अग्रिमाने ‘द वायर’ला सांगितले.

१६ महिन्यांपूर्वी मुंबईतील एका कॉमेडी अँड म्युझिक कॅफेमध्ये दिलेल्या स्टॅण्ड-अप सादरीकरणावरून अग्रिमाला गेल्या आठवड्यापासून जोरदार ट्रोलिंगला तोंड द्यावे लागत आहे.

तिने हे सादरीकरण दिले तेव्हा काहीच घडले नाही, ते फारसे कोणाच्या लक्षातही आले नाही. मात्र, या शोमधील एक मिनिटांची क्लिप गेल्या आठवड्यात अचानक सगळीकडे फिरू लागली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पाबद्दल कोरा या “नॉलेज शेअरिंग” वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्सवर अग्रिमाने केलेला विनोद या क्लिपमध्ये होता.

या क्लिपमध्ये ती म्हणते, “आय वॉण्ट टू नो अबाउट इट, वॉण्ड टू रीड अबाउट इट. सो आय वेण्ट टू द मोस्ट ऑथेंटिग सोर्स ऑन द इंटरनेट- कोरा.’ त्यानंतर तिने कोरावरील काही पोस्ट्स उद्धृत केल्या आहेत. ‘धिस शिवाजी स्टॅच्यू इज अॅन अमेझिंग मास्टरस्ट्रोक बाय आवर प्राइम मिनिस्टर मोदीजी. इल विल हॅव सोलर सेल्स व्हीच विल पॉवर ऑल महाराष्ट्रा… इट विल ऑल्सो हॅव जीपीएस ट्रॅकर अँड इट विल शूट लेसर रेज आउट ऑफ इट्स आईज… ’’

यामुळे अनेकांच्या ‘भावना दुखावल्या’ गेल्या.

“पण हा विनोद शिवाजी महाराजांवर अजिबातच नव्हता. लोक इंटरनेटवर काय वाट्टेल ते कसे पोस्ट करतात, फेक न्यूज कशा पसरतात यावर केलेली टिप्पणी होती,” अग्रिमा सांगते. मात्र, त्यातील एक ठराविक तुकडा उचलून त्याला विपर्यस्त स्वरूप देण्यात आले आणि इंटरनेटवरील स्वयंघोषित ‘शिवाजीभक्त’ अग्रिमाला धमक्या देऊ लागले. तिच्या आठ मिनिटांच्या सादरीकरणातील केवळ मिनिटभराची क्लिप उचलून हा गोंधळ सुरू करण्यात आला. त्यात राज्य सरकार तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यामुळे तिला मूळ स्टॅण्डअप रुटिनही यूट्यूबवरून काढून टाकणे भाग पाडले. एका शिवसेना आमदाराने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करून केली.

“ट्रोलिंगमध्ये नवीन काही नाही. पण महाराष्ट्र सरकारने यावर जी प्रतिक्रिया दिली ती अस्वस्थ करणारी होती,” असे अग्रिमा म्हणते. सर्वप्रथम शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी, शिवाजी महाराजांचा ‘अपमान’ केल्याबद्दल, अग्रिमावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तिने एका व्हिडिओद्वारे ऑनलाइन माफीही मागितली पण तिच्यावरील हल्ल्याची तीव्रता कमी झाली नाही. गृहमंत्री देशमुख यांनी ११ जुलै रोजी एक ट्विट करून तिच्याविरुद्ध ‘कडक कारवाई’चे आदेश दिल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यानच्या काळात अनेक उजव्या विचारसरणीच्या अकाउंट्सद्वारे अग्रिमावर हल्ला चढवण्यात आला. तिच्या ख्रिश्चन आडनावावर तोंडसुख घेणे सुरू झाले, त्वरित कारवाई न केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचीही खिल्ली उडवण्यात आली.

अग्रिमाला काही स्टॅण्ड-अप कॉमेडियन्स, रंगकर्मी तसेच चित्रपटक्षेत्रातील सेलेब्रिटींनी पाठिंबा दिला. तिला सार्वजनिकपणे बेधडक दिल्या गेलेल्या हत्येच्या व बलात्काराच्या धमक्यांबद्दल अनेकांनी राग व्यक्त केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही अग्रिमाला धमकावणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या ‘उमेश दादा’ नामक व्यक्तीला अटक केली. १३ जुलैला महाराष्ट्रात आणखी एकाला अटक झाल्याचे देशमुख यांनीच जाहीर केले.  मात्र, पोलिस अग्रिमाविरुद्धही कारवाई करतील याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

राज्य सरकारने केलेल्या अटकांमुळे अग्रिमाला होत असलेल्या ट्रोलिंगमध्ये भरच पडत राहिली.

या घटनेपासून अग्रिमा तिच्या सोशल मीडियावर अधिक काळजीपूर्वक पोस्ट करत आहे. मात्र, अग्रिमाला १६ महिन्यांपूर्वीच्या एका सादरीकरणावरून लक्ष्य कसे करण्यात आले, हा मूळ मुद्दा आहे. अलीकडेच ट्रोल झालेल्या केनी सेबॅस्टियन या कॉमेडियनला दिलेल्या पाठिंब्याचा याच्याशी संबंध असू शकतो, असे अग्रिमा सांगते. उजव्या विचारसरणीच्या ट्रोल्सनी सेबॅस्टियनला “ट्रेटर” आणि “राइसबॅग” म्हणून शिवीगाळ केली, तेव्हा अग्रिमाने त्याला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. लगेचच ट्रोल्सचा रोख तिच्याकडे वळला, त्यांनी तिचा जुना व्हिडिओ शोधून काढला आणि तिला लक्ष्य केले. या व्हिडिओला १६ महिन्यांपूर्वी १० लाख व्ह्यूज होते, ट्रोलिंग सुरू झाल्यापासून त्यात वाढ होऊन तो आकडा २४ लाखांपर्यंत पोहोचला. त्यातील संपादित क्लिपही सगळीकडे फिरवली गेली. त्यातून ट्रोलिंग वाढले.

ऑनलाइन संतापाचे रूपांतर ऑफलाइन कृतीत झाले. राज ठाकरे यांच्या मनसेचे सदस्य म्हणवणाऱ्यांनी या स्टुडिओचे रेकॉर्डिंग झाले त्या हॅबिटाट स्टुडिओच्या परिसरात मोडतोड केली. ‘हे लोक मोडतोड करत आहेत आणि माझा फोन नंबर मागत आहे असे सांगणारा कॉल मला हॅबिटाट स्टुडिओतून आला. मी लेखी माफी मागितली नाही, तर  स्टुडिओ उद्ध्वस्त करू अशी धमकी ते देत होते.’

अग्रिमाने प्रत्यक्ष भेटून माफी मागावी अशी मागणी आणखी एका राजकीय पक्षाचे सदस्य असल्याची बतावणी करणारे करत होते. मात्र, आपण ज्या भागात राहतो तो सध्या कंटेनमेंट झोन असून, तेथून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही, असे ती म्हणाली.

सॅबेस्टियन आणि अग्रिमा यांच्याशिवाय मुनावर फारुकी आणि मोहम्मद सोहेल या दोन कॉमेडियन्सनाही शिवीगाळ आणि हल्ल्याला तोंड द्यावे लागले आहे. १४ जुलैला ट्रोल्सना कॉमेडियन आदर मलिकच्या रूपाने आणखी एक लक्ष्य मिळाले. गणेशोत्सवात नाचणाऱ्या लोकांची टिंगल केल्याचा आरोप मलिकवर ठेवण्यात आला.  हे लक्ष्य करण्याचे धोरण अगदी टोकदार आहे, याकडे अग्रिमा लक्ष वेधते. “देशातील कॉमेडीविश्वात अशी परिस्थिती आहे की, तुमचे नाव बघून, तुम्ही कोण आहात हे बघून, कोणती भाषा बोलता हे बघून एक प्रतिमा तयार केली जात आहे.”

कॉमेडी न्यूज वेबसाइट डेडअँटला दिलेल्या निवेदनात अग्रिमा म्हणते: “सर्व कॉमेडियन्सच्या समुदायासाठी सर्वोत्तम ठरेल असे काहीतरी करण्याचा निर्णय मी केला आहे. मी प्रत्येक कलावंताला पाठिंबा म्हणून या प्रकरणात शांतता व संयम राखून आहे. माझ्यासाठी सध्या त्यांना  बढावा देणाऱ्या जागा व संस्थानांना प्राधान्य आहे. आम्ही सगळे एकमेकांसाठी जबाबदार आहोत आणि आम्ही सगळे एकत्र आहोत”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0