गोष्ट गिधाडांची…

गोष्ट गिधाडांची…

गिधाडे हे निसर्गातील सफाई कामगार आहेत, तशीच ती अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवाही आहेत. नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण शिकारी पक्ष्यासारखी (लांब बाकदार चोच, टोकदार नखे, इत्यादी) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. डोक्यावर पिसे नसल्याने त्यांना मृतदेहाच्या आत डोकावून मांस खाणे सोपे जाते.

असहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये!
मपिल्लाः आठवणीतले नायक
फी वाढीविरोधात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच

कित्येक जण विचारतात की आपल्याला पक्ष्यांचा उपयोग कोणता? आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी पक्षी उपयुक्त ठरतात. आर्थिकदृष्ट्यादेखील त्यांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडीवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदरांवर व घुशींवर काही पक्षी उपजीविका करत असल्याने ते शेतीसाठी उपकारक ठरतात. घुबडाची एक जोडी कीटक आणि उंदरांपासून १ हेक्टर शेतजमिनीचे रक्षण करते. याशिवाय पक्षी फुलांचे परागीकरण आणि बियांचे स्थलांतर करतात.
गावातील मृत झालेले कीटक, सरपटणार्या आणि कुरतडणार्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळ ही घाण नाहीशी करतात. घारी व गिधाडे मृत जनावरांवर तुटून पडतात. एक प्रकारे हे सर्व पक्षी घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात. परंतु शहरातून किंवा खेडेगावातून या सर्व पक्ष्यांची मुख्यत्त्वेकरून मानवाला घाण, मेलेली जनावरे नाहीशी करून निसर्गाचे समतोल राखण्याचे काम करणार्या गिधाडांची संख्या हल्ली कमी होऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे “डायक्लोफिनॅक” या मानवांमध्ये व जनावरांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणार्या औषधांचा अतिरेकी वापर. ही औषधे घेऊन अनेक गायी-गुरांसारखे प्राणी मरतात व त्यांचे सांगाडे, मांस गिधाडांच्या खाण्यात आल्यावर ती देखील मृत्युमुखी पडतात, किंवा जे पक्षी जगतात ते प्रजोत्पादन करू शकत नाहीत.
आपल्या भारतात “पांढरपाठी गिधाड, राज गिधाड, युरेशियन गिधाड, हिमालयीन ग्रिफोन, पांढरे गिधाड ( इजिप्तशियन गिधाड), काळे गिधाड ( सिनेरियस गिधाड), लांब चोचीचे गिधाड या जाती आढळून येतात.
अ‍ॅक्सिपिट्रिडी या कुळात गिधाडे मोडतात. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे गिधाड समुद्रसपाटीपासून १,५२५ मी. उंचीपर्यंत व बंगाली गिधाड २,४४० मी. उंचीपर्यंत आढळते.गिधाडे आकाराने पिसे काढून टाकलेल्या मोराएवढी मोठी आणि ताकदवान असतात. रंग गडद किंवा फिकट काळा, करडा व पांढरा असतो. पाय दणकट आणि चोच बाकदार व टोकदार असते. नखे आत वळलेली आणि टोकदार असतात. बहुतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. नजर तीक्ष्ण असते. ती दिवसा आकाशात खूप उंचावर पंख न हलविता तासनतास घिरट्या घालतात.
गिधाडे हे मृतभक्षक वर्गातील पक्षी आहेत. हे अंटार्क्टिका व ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात. पिसे नसलेले केस विरहीत डोके हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. रक्त वा इतर द्रव्यांनी अस्वच्छ होऊन पुन्हा स्वतःला स्वच्छ करणे अवघड असल्याने हा बदल त्यांच्यात निसर्गाने घडवला असावा. गिधाडे हे निसर्गातील सफाई कामगार आहेत, तशीच ती अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवाही आहेत. नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण शिकारी पक्ष्यासारखी (लांब बाकदार चोच, टोकदार नखे, इत्यादी) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. डोक्यावर पिसे नसल्याने त्यांना मृतदेहाच्या आत डोकावून मांस खाणे सोपे जाते.

गिधाडे मृतोपजीवी आहेत. ती सशक्त प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत नाहीत. मात्र जखमी किंवा आजारी प्राण्यांना ते ठार मारतात आणि त्यांचे मांस खातात. मृत जनावरांचे मांस खात असताना गिधाडांमध्ये सामाजिक क्रमवारी (सोशल ऑर्डर) आढळते. ही क्रमवारी त्यांच्या शरीराचा आकार आणि चोचीची ताकद यांनुसार ठरते. उदा. लहान आकाराची गिधाडे मोठ्या आकाराच्या गिधाडांनी सोडलेले मांस खातात. मृतोपजीवी असल्याने पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास ती मदत करतात. गिधाडांच्या जठरातील आम्ल अतिशय क्षरणकारी असते. त्यामुळे कृमी, पटकी आणि संसर्गजन्य काळपुळी यांसारख्या जीवाणूंनी संसर्गित झालेले (सडलेले) मृतदेहाचे मांस ते सहजरित्या पचवू शकतात. गिधाडे आपली अर्धद्रवरूप विष्ठा पायावरच सोडतात. त्यामुळे पायावरील जीवाणूंचा नाश होतो.

गिधाडांच्या अनेक प्रजाती आहेत. या सर्व प्रजातींचे कार्य एकच म्हणजे मृतदेहांचा फडशा पाडणे हे असले तरी या सर्व जाती एकमेकांच्या साहाय्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे आकाशात उडतात व कळपात अंतर ठेवून उडतात. बरेचदा भिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र उडतात. प्रत्येक गिधाड दुसर्यावर लक्ष ठेवून असते. यांच्यातील इजिप्शियन गिधाडांवर सर्व जण लक्ष ठेवून असतात. या प्रजातीच्या गिधाडांचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटरवरील भक्ष्यसुद्धा हे सहज हेरू शकतात. त्यामुळे या प्रजातींची गिधाडे जिथे उतरतात तिथे इतरही गिधाडे जमिनीवर उतरतात व सर्व गिधाडांना खबर मिळते की खाद्य मिळाले आहे. मग “राज गिधाडे” येउन मृतदेहाची जाड कातडी भेदली की बाकीच्या गिधाडांचे काम सुरू होते व मृतदेहाचा फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.

गिधाडांची घरटी काटक्या, चिंध्या व केस अशा वस्तूंनी बनविलेली असतात. ती उंच झाडांवर अथवा खडकांच्या कपारी आणि जुन्या पडक्या इमारतीच्या तटबंदीतील कोनाडे अशा दुर्गम ठिकाणी असतात. मादी दर खेपेस एक किंवा दोन अंडी घालते. नर आणि मादी उभयता घरटे बनविण्याचे, अंडी उबविण्याचे आणि पिलांना चारा भरविण्याचे काम करतात.

काळ्या गिधाडाला ‘गृध्रराज’ असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘टॉरगॉस काल्व्हस’ असे आहे. त्याचे डोके आणि मान शेंदरी रंगाचे असून त्या भागांवर पिसे नसतात. पाय शेंदरी असतात. मान आणि मांड्यांच्या सुरुवातीला पांढरी पिसे असतात. यांची घरटी झाडांवर असतात. मादी दर खेपेस एकच अंडे घालते. यांच्या विणीचा हंगाम डिसेंबर-एप्रिलमध्ये असतो.
बंगाली गिधाड हे गृध्रराजाएवढे मोठे असते. त्याचे शास्त्रीय नाव ‘जिप्स बेंगॉलेन्सिस’ आहे. त्याचे डोके आणि मान भुरकट काळ्या रंगाचे असून त्यावर पिसे नसतात. छाती व पोट तपकिरी काळे असून शेपटीच्या बुडाला रुंद पांढरा पट्टा असतो. यांची वीण ऑक्टोबरपासून-मार्चपर्यंत चालते. मादी दर खेपेस एकच पांढरे अंडे घालते.

भारतात आसामखेरीज सगळीकडे आढळणारी गिधाडांची आणखी एक जात म्हणजे इजिप्शियन किंवा पांढरे गिधाड. याचे शास्त्रीय नाव ‘निओफ्रॉन परक्नॉप्टेरस’ असे आहे. आकाराने हे घारीएवढे असून मळकट पांढरे असते. त्याचे डोके पीसविरहित व पिवळे असते. उड्डाणपिसे काळी असतात, पंख लांबट आणि टोकदार असतात, तर शेपूट पाचरीसारखे असते. मादी दरवेळी दोन अंडी घालते. ती पांढरी किंवा फिकट विटकरी रंगाची असून त्यांवर तांबूस किंवा काळे डाग असतात. याच्या विणीचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल असा असतो. ही गिधाडे दक्षिण युरोप आणि आफ्रिका येथेही आढळतात.

भारतात एके काळी गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता भारतातून गिधाडे नामशेष होणार की काय अशी भीती निसर्गअभ्यासकांना वाटू लागली आहे. गिधाडांची शिकार कोणी करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या चांगली असल्याने खाद्यही कमी नाही. परंतु त्यांच्या संख्येला फटका बसला आहे तो मुख्यत्त्वे औषधे व विषारी द्रव्यांमुळे. पाळीव प्राण्यांना “डायक्लोफिनॅक” नावाचे औषध देतात. या मेलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने ही गिधाडे अनेक व्याधी होऊन मरतात. गिधाडे सुंदर दिसत नाहीत व ते मृतदेहांवर जगतात त्यामुळे मानवांमध्ये त्याच्याबद्दल तिरस्काराची भावना असते.

‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ व ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्टन ऑफ द बर्ड्‌स’ या संस्थांनी भारतात हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम व महाराष्ट्र या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर, बुक्सा, रानी व फणसाड या ठिकाणी गिधाड संवर्धन केंद्र सुरू करून जगात केवळ १ टक्का उरलेल्या प्रजातींच्या संगोपनाचे काम सुरू केले आहे. हे संगोपन व्यवस्थित होते की नाही ते पाहण्यासाठी घरट्यांमध्ये कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. तसेच त्यांना विषारी द्रव्ये व औषध विरहीत मेलेले प्राणीही पुरवले जात आहेत व महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये “व्हल्चर रेस्टॉरंट”ही सुरू करण्यात आली आहेत. हा खरेच एक स्तुत्य उपक्रम म्हणता येईल.

आपल्या पुराणकाळात सीतेला रावणापासून वाचवणारा “जटायू” असो किंवा प्राचीन इजिप्तची “नेख्बेत” ही देवता असो किंवा “पेरूमधील नाझ्का पठारावरील” गिधाड स्वरूपातील आकृत्या असोत किंवा जीवविविधतेतील त्यांचे वरच्या क्रमांकाचे स्थान असो सर्वच ठिकाणी गिधाडांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशा गिधाडांना केवळ निसर्ग अभ्यासकांनी किंवा सरकारने प्रयत्न करून वाचवण्याऐवजी समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करून संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल व आपल्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण होऊ शकेल.

(छायाचित्रे – डाॅ. जितेंद्र कात्रे)

सौरभ महाडिक, हे वन्यजीव अभ्यासक व संशोधक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0