उत्तराखंड दुर्घटनाः विकासच नाशाला कारणीभूत

उत्तराखंड दुर्घटनाः विकासच नाशाला कारणीभूत

हिमालयाचा पट्टा अतिशय संवेदनशील आहे. पर्यावरणाचा समतोल अजूनही हिमालयात स्थापित झाला नाही. त्यामुळे तेथील पायाभूत सुविधा उभ्या करण्याची घाई सर्वनाशाला आमंत्रण देणारी आहे.

४ दिवसांत पुन्हा २५ रु.ची गॅस दरवाढ
‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण ५ एकरची अट शिथिल व्हावी’
‘रेनेसाँ स्टेट’: नवउदारमतवादी भांडवलशाहीचा चकवा

गेल्या आठवड्यात उत्तराखंडात महापूर येऊन गेला. त्याने फार मोठी वित्त व जीवितहानी झालेली आहे. मला आठवते २००४ साली आमच्या संस्थेतर्फे हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी उत्तराखंडच्या हिमालयात गेलो होतो. माझ्याबरोबर आमचा एक रिसर्च स्कॉलर होता व अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे काही वरिष्ठ वैज्ञानिक सोबत होते. आम्हा दोन्ही टीमना एकत्र सॅम्पल गोळा करायचे होते व दोघांचे लक्ष्यसुद्धा हवामान बदल संशोधनाचेच होते.

दिल्लीला आम्ही भेटलो व तिथून एकत्र डेहराडूनकडे निघालो. डेहराडूनला आमचा पहिला मुक्काम होता. आम्हाला बुरफू ग्लेशियर जवळ जायचे होते. त्यासाठी मुन्शियारीपर्यंत गाडीने व तिथून ३ दिवसाच्या पायपिटीने बुरफू गाठायचे होते. डेहराडूनला थोडे दिवस राहून पुढे जाण्याची तयारी करण्यात आली.

शिवालिक डोंगर

पण तत्पूर्वी दिल्ली ते देहराडूनच्या प्रवासात अनेक भूशास्त्रीय प्रतीकं व तथ्ये पाहावयास मिळाली. रुरकी शहर सोडल्यानंतर थोडीसी चढण सुरू होते व ही चढण डेहराडून येतायेता अधिकच वाढत जाते. दिल्लीजवळ गंगा-यमुना नदीचा गाळ फार मोठ्या प्रमाणावर जमा झालेला आहे. ही जमीन शेतीसाठी फार उपयुक्त आहे व काही वर्षांपूर्वी खताशिवाय सुद्धा मुबलक पीकं तेथील शेतकरी घेत होते. पण लोकसंख्या वाढीमुळे हे पीकसुद्धा अपुरे पडू लागले आहे. त्यातच पाण्याची पातळी अधिक खोल होते आहे व पाणी प्रदूषित होते आहे. या समस्येवर अनेक वैज्ञानिक काम करत आहेत व समाधान शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. असो. ही जमीन गाळसंचय झाल्यामुळे सरळ व सपाट आहे व हे सपाटीकरण रुरकीपर्यंत पाहावयास मिळते. रुरकीपासून डेहराडूनकडे कूच केल्यानंतर जमीन सपाट राहत नाही. ती फुगीर बनत जाते.

हा फुगीरपणा हिमालयपर्वतांच्या निक्षेपणामुळे, तसेच भूखंड स्थलांतरणामुळे निर्माण झालेला आहे. हिमालयात उद्गमित नद्या तिथल्या डोंगरदऱ्यांना कापत निर्माण झालेला गाळ खाली पठारावर आणतात व तिथे जमा करत राहतात. देहराडूनपासून जी पर्वतरांग दिसते तिला आपण शिवालिक पर्वतरांग म्हणतो. ही डोंगरमालिका हिमालयाच्या पायथ्याशी सुमारे १६ ते ५ दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाली आहे आणि ती सुमारे १,६०० किमी इतकी लांब आहे. हा डोंगर मुख्यत्वे सँडस्टोन व कॉन्ग्लोमेरेटपासून बनला आहे. या गाळात इतक्या प्रकारचे जीवाष्म सापडले आहेत की हजारो लाखो वर्षांपूर्वी आपल्या देशात इतकी जैविविधता होती हे पाहून अचंबित व्हायला होते. जसजसे आपण वर जाऊ तसतसे इथल्या दगडांना वळ्या पडल्याचे व विभंग झाल्याचे लक्षात येते. पूर्वीच्या काळी आपल्याकडे संसाधने पुरेशा प्रमाणात नव्हती व हिमालयाच्या उंच कडेकपारीत पोहोचणे अवघड होते. अशा काळात शिवालिक पर्वत रांगांतून घेऊन आलेले खडक व गाळाचे नमुने तपासून, त्यांचे अध्ययन करून हिमालयात कोणत्या प्रकारची भूभौतिकीय व भूरासायनिक परिस्थिती अस्तित्वात असेल याचे आडाखे बांधले जायचे. नंतर ते किती अचूक व किती चुकीचे होते याची पडताळणी सुद्धा झालेली आहे. शिवालिक डोंगर हे गरिबांचे हिमालय पर्वत होते. त्याचे छोटे मॉडेल.

हिमालय व पायाभूत सुविधा

डेहराडूनवरून आम्ही मुन्शियारीकडे गाडीने निघालो. हरिद्वार येता-येता थंडी वाढत गेली. त्याकाळी उत्तराखंड हे उत्तरांचल नावाचे राज्य होते. नुकतेच या राज्याला उत्तर प्रदेशपासून वेगळे करण्यात आले होते. त्यामुळे तिथे नसलेल्या पायाभूत सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नात हे नवे राज्य होते. त्यामुळे मुन्शियारीपर्यंत ठिकठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे, नवीन रस्ते खोदण्याचे, पूल बांधण्याचे, बोगदे खोदण्याचे व मोठे प्रकल्प उभारण्याचे काम जोमाने सुरू होते.

हिमालय पर्वत अजून यौवनात 

हिमालय पर्वत अजून यौवनात आहे असे बोलले जाते. सर्वात तरुण पर्वत असे त्याचे नेहमी वर्णन केले जाते. माझ्या अनेक मित्रांनी व परिचितांनी असे का म्हटले जाते याचे कारण विचारले होते. भारतात सह्याद्री, विंध्य, अरावली सारख्या पर्वतरांगा आहेत. उंचीनुसार सह्याद्रीचा अव्वल क्रमांक लागतो, तर विंध्य व अरावली पर्वतांची उंची सद्या फारशी दिसत नाही कारण सह्याद्री साधारण ६ कोटी वर्षांपूर्वी, व इतर पर्वत सुमारे २५०० दशलक्ष वर्षांच्या आधी निर्माण झालेले आहेत. एवढ्या मोठ्या कालखंडात या खडकांचे पाणी व वाऱ्यावाटे क्षरण झाले आहे त्यामुळे ते रंधा मारल्यासारखे सपाट व गुळगुळीत झाले आहेत.

हिमालयाचा उगम फक्त ५ कोटी वर्षांपूर्वी झाला आहे. त्याअर्थाने त्याची बाल्यावस्था संपून यौवनात प्रवेश झाला असे मानले जाते. आज जिथे हा डोंगर उभा आहे तिथे आधी समुद्र होता. या समुद्रात आजूबाजूच्या परिसरातून गाळ येऊन साठत होता. तो खडकात रूपांतरित झाला नाही कारण त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. पण हा समुद्र आकुंचन पाऊ लागला कारण भारतीय भू-तुकडा उत्तरेकडे सरकत होता. मात्र युरेशियन भू-तुकडा तसूभरही हलत नव्हता. त्यामुळे पाण्यात साठलेला गाळ ताण व दाब वाढू लागल्याने त्यांचा आकार बदलू लागला. ताण व तापमानाचा प्रभाव पडून त्यांच्यात भौतिकीय व रासायनिक बदल घडत गेले. पण त्यांच्यात जेव्हढा एकसंघपणा यायला हवा होता तितका तो आला नाही. ते अजूनही ठिसूळच आहेत.

 हिमालय व नैसर्गिक आपत्ती

मुन्शियारीपर्यंत अतिशय ओबडधोबड व कडेकपारीतून नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून आमचा प्रवास झाला. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला खोल दरी असा खतरनाक प्रवास होता. काही ठिकाणी तर या दरीची खोली अर्धा-एक किमी इतकी भासायची. मी भारतातील अनेक राज्यातील हिमालय पाहिला व अनुभवलेला आहे. ईशान्येचा हिमालय आल्हादायक आहे. पण उत्तराखंडचा हिमालय अक्षरशः अंगावर धावून आल्यासारखा वाटतो. त्याचे खरे रौद्र रूप मुन्शियारीनंतर ट्रेक करताना आम्ही अनुभवले आहे. पण ट्रेक करून जायचं असल्याकारणाने मुन्शियारीत आम्हाला खाण्याचे सामान, टेन्ट, व खेचरांची व्यवस्था करावी लागली.

खेचरांवर सारे सामान लादून आमची पायपीट सुरू झाली. आमच्याबरोबर डॉ. नवीन जुयाल व डॉ. आर के पंत होते. त्यांच्याकडून हिमालयाची अतिशय महत्वाची व उपयुक्त माहिती मिळत होती. डॉ. नवीन हे डेहराडूनचेच असल्याकारणाने व या पर्वतरांगांचा बारकाईने अभ्यास केल्यामुळे त्यांच्याकडे या विषयासंबंधी अफाट ज्ञानाचे भांडार जमा झाले होते. तथाकथित विकासकामांमुळे हिमालयातील पर्यावरणाचा कसा तीव्रगतीने ऱ्हास होतो आहे याचे अनेक दाखले त्यांनी आम्हाला दिले. मॅगसेसे पुरस्कार विजेते चंडी प्रसाद भट यांना भेटल्यानंतर तर पर्यावरण ऱ्हासाची अनेक उदाहरणे ऐकावयास मिळाली. यांनीच चिपको आंदोलनाची सुरुवात केली होती.

भूशास्त्रीय ज्ञानाचे उपासक असल्याकारणाने डॉ जुयाल यांची अनेक सरकारी व गैरसरकारी समित्यांवर नेमणूक झाला होती. एका समितीवर काम करत असताना त्यांना चारधामपैकी बद्रीनाथ व केदारनाथ मंदिरांची उंची वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला होता. त्यावेळी त्यांनी व समितीवरील इतर अनेक तज्ज्ञांनी हा प्रस्ताव अंमलात आणू नये असा अभिप्राय दिला होता. तसेच, त्या मंदिरांच्या संरचनेबरोबर कोणतीही छेडछाड केली तर त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील असा गंभीर इशारा त्या सर्वांनी दिला होता.

जर केदारनाथ मंदिराच्या स्थापत्यात त्याकाळी काही बदल केला गेला असता तर जून २०१३ मध्ये जी अचानक ढगफुटी झाली व पर्वतावरील बर्फ जलदगतीने वितळल्यामुळे जो महापूर येऊन गेला त्याने जे नुकसान झाले त्याच्याहीपेक्षा जास्त नुकसान झाले असते. मंदिरही कदाचित अधिक मोडकळीस आले असते. तिथल्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची सुद्धा एक विशिष्ट भूशास्त्रीय रचना आहे जी या मंदिराला नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करत राहते. काही वर्षांपूर्वी खंडाळा घाटात दरड कोसळून अनेक लोकांचा जीव गेला होता. इथला खडक हा हिमालयातील गाळासारखा ठिसूळ नाही. पण सततच्या गुरुत्वाकर्षणीय बल प्रभावामुळे व धुवांधार पावसामुळे या घाटात व माळीणसारख्या ठिकाणी दरडी कोसळत असतात. हिमालयात तर अजून एक बल सतत कार्यरत असते. खंडीय स्थानांतरामुळे इथल्या खडकांवर तसेच मातीवर सततचा ताण व दाब पडत राहतो. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना इथे इतर ठिकाणांपेक्षा अधिक प्रमाणात होतात.

हिमावसरण, बर्फ वितळणे, दरडी कोसळणे व पूर येणे नित्याचेच

ज्यावेळी आम्ही मुन्शियारीला पोहोचलो तेव्हा त्या गावात दुःखाची अवकळा पसरली होती. गावातील काही तरुण बॉर्डर सेक्युरिटी फोर्सेबरोबर गिर्यारोहणासाठी गेले होते. पण शिखरावर चढाई करताना बर्फ वितळून हिमावसरण किंवा हिमलोट झाला व त्यात सारे मृत्युमुखी पडले. आमचा ट्रेक सुरू असताना दोन दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. बुरफू हिमनदीकडे जाण्यासाठी फक्त एकच लहानसा रस्ता बॉर्डर सेक्युरिटी फोर्सवाल्यानी डोंगरात खोदलेला आहे. फक्त एकच माणूस एकावेळी जाऊ शकेल इतकीच त्या रस्त्याची रुंदी होती. या पायवाटेच्या एका बाजूला खोल दरी होती ज्यातून धोउलीगंगा नदी वाहत होती. या नदीच्या खळाळत्या पाण्याला इतका फोर्स होता की अगदी खवळलेल्या समुद्राच्या लाटांसारखा त्याचा आवाज साऱ्या परिसरात घुमत होता. एखादा माणूस किंवा जनावर जर त्या नदीत पडले तर त्याचे एकसंघ शव मिळणे अगदीच अशक्य बनते. तिथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा आम्हाला हेच सांगितले. काहीही झाले तरी अशा नद्यांच्या प्रवाहात उतरण्याचे दुःसाहस करू नका अशी त्यांनी आम्हाला कळकळीची विनंती केली होती. काही वर्षांपूर्वी कर्नाटकातील काही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असेच वाहून गेले होते व काहींचे शव शोधूनही सापडले नव्हते.

एकदा तर धोउलीगंगेला अचानक उधाण आले व बॉर्डर फोर्स वाल्यांनी बांधलेले अस्थायी पूल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे वाहून गेले. काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाल्याचे मी बघितले आहे. गेल्या आठवड्यात जी प्रलयकारी घटना उत्तराखंडमध्ये घडली व कित्येकांचा बळी घेऊन गेली ती अपवाद नव्हती तर अशा घटना तिथे नेहमीच घडत असतात.

पर्यावरण संवेदनशीलता

भूशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास हिमालयाचा पट्टा अतिशय संवेदनशील आहे. पर्यावरणाचा समतोल अजूनही हिमालयात स्थापित झाला नाही. पायाभूत सुविधा मिळवण्याचा व देण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. तो नाकारणे हा पर्याय होऊ शकत नाही. पण पर्यावरणाला हानी पोहोचवून तो अधिकार मिळवणे किंवा देणे हा काही शहाणा पर्याय होऊ शकत नाही. असा विकास आपल्याच नाशाला कारणीभूत ठरू शकतो. वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

(लेखक, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0