राष्ट्रपती भवनाच्या मैदानात राष्ट्रपती अश्रफ घनी ईदची प्रार्थना करत होते. शेदोनेशे माणसं साताठ रांगा करून उभी रहात होती, गुढग्यावर बसत होती. समोर एक म
राष्ट्रपती भवनाच्या मैदानात राष्ट्रपती अश्रफ घनी ईदची प्रार्थना करत होते. शेदोनेशे माणसं साताठ रांगा करून उभी रहात होती, गुढग्यावर बसत होती. समोर एक मुल्ला लाऊड स्पीकरवर अल्ला हो अकबर म्हणत होता.
स्फोटाचा आवाज झाला. नमाज करणारी माणसं काहीच न झाल्यासारखी गुडघ्यावर बसली. दोघे जण सुटात होते, त्यांनी रिव्हॉल्वर काढली आणि ते बाहेर पडले. एक माणूस सलवार खमीज आणि जाकीट घातलेला होता. तो गोंधळला. चारी बाजूला पाहिलं. बाकीची मंडळी गुडघ्यावर होती, हा मात्र उभाच होता.
पुन्हा स्फोट झाला.
नमाजी शांत. आता सेक्युरिटीचे आणखी लोक नमाजींभोवती गोळा झाले, हालचाल करू लागले.
तिसरा स्फोट झाला. चौथा स्फोट झाला.
अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या जवळ रॉकेटं कोसळली. रॉकेटांची रेंज तोकडी असल्यानं ती आतपर्यंत पोचू शकली नाहीत. रॉकेटं सोडणारे भवनापासून बऱ्याच अंतरावर होते.
त्यांना जर लांब पल्ल्याची रॉकेटं मिळाली असती तर अश्रफ घनींचं काही खरं नव्हतं.
रॉकेटं काबूलमधे कोसळत होती तेव्हां दोहामधे (कतार) तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यात शस्त्रसंधीच्या वाटाघाटी चालल्या होत्या.
तालिबानचे प्रतिनिधी म्हणत होते तुरुंगातल्या सर्व लोकांना सोडा, आम्ही म्हणतो तो इस्लामी कायदा अमलात आणू असं म्हणा. आम्ही स्त्रियांना एकटं बाहेर पडू देणार नाही, त्यांच्याबरोबर नवरा, भाऊ किंवा वडील वगैरे असायला हवं, तसं कोणी सोबत नसेल तर आम्ही त्यांना मारुन टाकू…
सरकारचे प्रतिनिधी या टोकदार मागणीबद्दल न बोलता आपण सहकार्यानं आणि शांततेनं देश चालवूया असं म्हणत होते.
अमेरिकेचे प्रतिनिधी झलमे खालीझाद वाटाघाटीच्या दालनात नव्हते, शेजारी एका खोलीत बसून लक्ष ठेवून होते. अमेरिका सर्व सैनिक माघारी घेण्याच्या निर्णयावर ठाम होती, अमेरिकेचे केवळ शेदोनेशे सैनिक काबूलमधे उरले होते, आवराआवर करत.
खालिझादना अल जझिराच्या पत्रकार महिलेनं विचारलं ” काबूलमधला दूतावास बंद करणार?”
खालिझाद म्हणाले ” बंद नाही करणार.. दूतावास चालू ठेवायचा म्हणजे काबूल विमानतळ सुरक्षीत हवा. तो सुरक्षित ठेवण्यासाठी, अफगाणिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी, अमेरिकन सरकारला काही तरी करावंच लागणार. शेजारच्या देशात तळ ठेवून किंवा तंत्रज्ञानाचा वापर करुन आम्हाला अफगाणिस्तानवर लक्ष ठेवावं लागेल. आम्ही नेटोमधला सहकारी देश, तुर्कीशी बोलत आहोत ”
या घटना घडत असताना विविध वाहिन्या अफगाणिस्तानातल्या धुमश्चक्रीची दृश्यं दाखवत होता, मोजकी मोठी शहरं सोडली तर दोन तृतियांश अफगाणिस्तान तालिबाननं ताब्यात घेतला आहे असं जाणकार निरीक्षक सांगत होते.
काबूलमधेच एक मुलींचं वसतीगृह आहे. तिथं देशातल्या शंभरेक मुली शिक्षण घेण्यासाठी रहातात. त्या वसतीगृहाच्या चालक म्हणत होत्या ” या क्षणापर्यंत काबूल सुरक्षीत आहे, मुली शाळेत जाताहेत. पण तालिबाननं शहराचा ताबा घेतला तर काय होईल ते सांगता येत नाही.” सांगता येत नाही असं म्हणत होत्या खरं पण त्यांना आतल्या आत माहित होतं की शाळा आणि वसतीगृह त्यांना बंद करावं लागणार.
या शाळेत शिकवणारी एक शिक्षिका सांगत होती. ” तालिबाननं सत्ता हस्तगत केली तेव्हां मी साताठ वर्षांची होते. तालिबाननं शाळा बंद केल्या होत्या, मुलींचं शिक्षण बंद केलं होतं. आम्हाला बाहेर पडायचं तर बुरखा घालावा लागे आणि कोणा तरी पुरुषाला (अर्थातच तो नवरा, बाप, काका असा कोणी तरी असायला हवा) सोबत घेतल्या शिवाय बाहेर पडता येत नसे. मारून टाकीत. ..माझ्या वडिलांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये. एका घरात शाळा चाले. दरवाजे बंद करून. माझी बहीण त्या शाळेत जात असे. दररोज. तिला शाळेत पोचवायला आणि आणायला मी पुरुषाचे कपडे घालून जात असे. आम्ही दररोज ठराविक वेळी बाहेर पडून ठराविक घरात कां जातो यावर तालिबांचं लक्ष होतं. एके दिवशी आमचा पाठलाग झाला. त्या घराच्या कपाऊंडचा दरवाजा आम्ही धाडकन बंद करून टाकला, पाठलाग करणारे तालिब बाहेर थांबले. आम्ही वाचलो…पण नंतर शाळा बंद झाली…आता पुन्हा एकदा तालिबानची सत्ता येणारसं दिसतंय. शिक्षणाचं काही खरं दिसत नाही…”
नहरे शाही या गावात मुसाखान शुजायी (३४) रहातो. गावात त्याचं एक दुकान आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तू या दुकानात शुजायी विकतो. अमेरिकन सैन्यानं माघार घ्यायला सुरवात केली आणि शुजायीवरच्या संकटांना सुरवात झाली.
नहरे शाही आहे बल्ख प्रांतात. बल्ख प्रांताचं मुख्य ठिकाण आहे मजारे शरीफ. तालिबाननं मझारे शरीफच्या आसपासची ठिकाणं काबीज केली. मझारे शरीफही केव्हां पडेल ते सांगता येत नाही अशी स्थिती. आता मोटार सायकलवरून आणि पिक अप ट्रकांतून तालिबान केव्हां गावात येतील आणि हाणामारी सुरु करतील ते सांगता येत नाही.
मझारे शरीफवर तालिबानची खास नजर आहे. या ठिकाणी हजारा,शिया, उझबेक लोकांची वस्ती आहे. तालिबाननं कित्येक वेळा मशिदी, शाळांवर हल्ले करून हजारांना घाऊक प्रमाणावर मारलं आहे.तेच आता पुन्हा होणार अशी भीती शुजायीला भेडसावते आहे.
शुजायीनं आता आपल्या गावाच्या रक्षणाची तजवीज सुरु केलीय. त्यानं अठरा वर्षाच्या वाहिदला बोलावलं आणि त्याच्या हातात कलाश्निकॉव सोपवलीय, काडतुसंही दिलीत. आपल्या कुटुंबातलेही लोकं त्यानं गोळा केलेत, त्यांना कलाश्निकॉव दिल्यात. झाली त्याची फौज तयार. फौजेत एक सोळा वर्षाचा तरूणही आहे. फौजेतल्या कोणालाही लष्करी प्रशिक्षण नाही. कलाश्निकॉव लोड कशी करावी, नेम कसा धरावा, चाप कसा ओढावा याचाच काहीसा सराव या मंडळींनी केलाय.
” गाव, माझं घर सुरक्षित नसेल, आम्हीच तालिबानच्या गोळ्यांना बळी पडणार असू तर दुकानात येणार कोण, दुकानात वस्तू घेणार कोण, दुकान चालवण्याचा फायदा काय. ” असं म्हणत शुजायीनं आपली तयारी सुरु केलीय. खंदकासारखे चर खणलेत. एका पडक्या घराच्या गच्चीवर आऊट पोस्ट तयार केलीय, तिथं त्याचे सैनिक मशीन गन घेऊन तय्यार असतात.
या सैनिकांना पगार बिगार काही नाही. घरचं खाऊन, शुजायी कधी कधी चार पैसे देतो तेवढ्यावरच हे सैनिक तालिबानशी लढणार आहेत.
काही अंतरावरच अफगाण-उझबेकिस्तान सरहद्द आहे. उझबेकिस्तानातून इथं शस्त्रं येतात. मार्शल अब्दुल रशीद दोस्तुम या उझबेक या वॉरलॉर्डचा प्रभाव या विभागात आहे. दोस्तुमची स्वतःची फौज, मिलिशिया, आहे. दोस्तुम पहिल्यापासून तालिबानचा विरोधक आहे. अफगाणिस्तानात १९९० ते ९६ या काळात यादवी झाली तेव्हां काबूल ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दोस्तुम होता. नंतर २००१ साली तालिबानचा पाडाव करण्याच्या प्रयत्नात दोस्तुमच्या मिलिशियानं अमेरिकन सैन्याला मदत केली होती.
दोस्तुम आता लढाईसाठी सज्ज आहे.
शुजायीला दोस्तुमची मदत होणार आहे.
शुजाईच्या गावापासून काही अंतरावर नहरे शाही हे मोठं गाव आहे. तिथं अट्टा महंमद नूरनं त्याचा मिलिशिया तयार केला आहे. त्यात तीनेकशे सैनिक आहेत. प्रत्येकाकडं कलाश्निकॉव आहे. शिवाय मशीन गन, खांद्याच्या आधाराने फेकता येणारी रॉकेटंही त्यांच्याजवळ आहेत.
त्या गावातला एक सधन बिझनेसमन अब्बास इब्राहीमझादा देरा ए सुफी या फौजेची व्यवस्था करतो. त्यानं त्याच्या घराच्या कंपाऊंडमधे एक भटारखाना उघडला आहे. भल्यामोठ्या चुलाण्यावर सहासात फूट व्यासाची भांडी ठेवून त्यात फौजेचं अन्न शिजवलं जातं. काही काळ या फौजेचा कमांडर अश्रफ घनी सरकारमधे मंत्री होता, बल्ख प्रांताच्या मंत्रीमंडळात सदस्य होता तेव्हां या सैनिकांना थोडाफार तनखा मिळत असे. आता तो मिळत नाही. तरीही सैन्य लढायला सज्ज आहे कारण तालिबानशी त्यांचं वैर आहे.
या फौजेत हजारा लोक आहेत. हजारा शिया असतात. तालिबान शियांचा नायनाट करू इच्छितं. त्यामुळ तालिबान आणि हजारा यांच्यात हाडवैर आहे.
काबूलवर तालिबानचा ताबा आल्यानंतर ही मंडळी तालिबानशी पंगा घेणार, त्यांच्याशी लढणार, आपापला भूभाग तालिबानपासून मुक्त ठेवणार.
COMMENTS