भारतीय क्रिकेट संघाने ‘टी-२०’ वर्ल्ड कपमध्ये पहिला पाकिस्तानविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी गुडघ्यावर बसून ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठिंबा दिल
भारतीय क्रिकेट संघाने ‘टी-२०’ वर्ल्ड कपमध्ये पहिला पाकिस्तानविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी गुडघ्यावर बसून ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठिंबा दिला. पाकिस्तानच्या संघानेही छातीवर हात ठेऊन अशीच कृती केली.
भारतीय संघ हा पारंपरीकरित्या अराजकीय समजला जातो. म्हणजे भारतीय संघाने सामूहिकरित्या कोणतीही राजकीय भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही. किंवा संघामध्ये खेळत असताना कोणत्याही खेळाडूने आपली राजकीय मतं व्यक्त केलेली नाहीत. भारतीय संघातील खेळाडूंना राजकीय समज असल्याचेही कधी दिसलेले नाही.
मात्र तरीही भारतीय संघाने गुडघ्यावर बसून ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठींबा दिला. पाठींबा देणे ही चांगलीच गोष्ट असली, तरी भारतीय संघाची ती कृती म्हणजे दांभिकतेची कमाल आहे.
भारतामध्ये यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये दिल्लीत मोठी दंगल झाली आणि अनेक निरपराध लोक हकनाहक मारले गेले. त्यापूर्वी नागरीकत्व कायद्यावरून देशभरामध्ये मोठे आंदोलन झाले. दिल्लीमध्ये सर्व वयोगटातील स्त्रिया रस्त्यावर बसल्या होत्या. दिल्लीतील सर्व सीमांवर हजारो शेतकरी वादग्रस्त शेती कायद्यांच्या विरोधात गेले एक वर्षभर आंदोलन करत आहेत. उन्हात, पावसात शेतकरी बसले आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये एका मंत्र्याच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले आणि गेल्याच वर्षी उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार झाला. या आणि अशा अनेक घटना नजीकच्या काळामध्ये घडल्या मात्र भारतीय क्रिकेट संघाने त्यावर आपले मत व्यक्त केल्याचे ऐकीवात नाही.
भारतामध्ये अनेक लोकांना झुंडीने ठेचून मारल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यावर अनेक साहित्यिक कलावंतांनी आपापले पुरस्कार परत करून निषेध केला. त्यावेळीही भारतीय संघ अथवा खेळाडू काही बोलल्याचे ऐकीवात नाही.
दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यावर जगभरात त्याची चर्चा झाली. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने या आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले तर संपूर्ण सरकार संतापले आणि कॉपी पेस्ट केलेले ट्विट अनेक मंत्र्यांनी केले. त्यात अनेक क्रिकेट खेळाडू सामील झाले. अचानकपणे या क्रिकेट खेळाडूंमध्ये राष्ट्रवादाची लहर आल्याचे दिसून आले. त्यात सचिन तेंडुलकर, विराट, यांचा सहभाग होता. दिशा रवी नावाच्या एका लहान मुलीला या वेळी खोटे आरोप ठेऊन अटक करण्यात आली,पण एकाही खेळाडूने याविषयी ब्र काढला नाही. पॅंडोरा पेपर्समध्ये नाव आलेला आणि परदेशात लपवून पैसे ठेवण्याच्या यादीत नाव आलेल्या सचिन तेंडुलकर याने, शेतकरी आंदोलन हा आमचा अंतर्गत मामला आहे, अशा आशयाचे ट्विट केले होते. त्या तेंडुलकर विषयी एकही खेळाडू बोललेला नाही.
अनेक अन्याय्य घटना घडल्यानंतर गेल्या सह-सात वर्षांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना तर सोडाच पण काही नोंद घेतल्याचा उल्लेखही कधी केलेला नाही. पंतप्रधान जसे देशातील प्रश्नांवर मत व्यक्त करायचे सोडून परदेशांतील घटनांवर प्रतिक्रिया देतात, त्याच प्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचेही झाले आहे.
आता हे समोर आले आहे, की संघ व्यवस्थापनाने जे सांगितले त्याप्रमाणे खेळाडूंनी कृती केल्याचे भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली याने सांगितले. या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा तर खेळाडूंना आपण काय करत आहोत, याचेही भान नव्हते असेच म्हणावे लागेल.
‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीला पाठिंबा देणे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांनी पाठिंबा देणे आणि भारतीय संघाने पाठींबा देणे यात फरक आहे. ज्याविषयी काहीच माहिती नाही, अशा प्रश्नांवर बोलताना भारतातील फॅसिस्ट शक्तींच्या विरोधी बोलण्याचे टाळणे, जातीयवादाविषयी आणि देशातील धार्मिक ध्रुवीकरणाविषयी बोलण्याचे टाळणे म्हणजे दुटप्पीपणाचा, दांभिकतेचा कळस आहे.
भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि मंत्री, तसेच अनेक अभिनेते, कॉँग्रेस सत्तेमध्ये असताना पेट्रोल दरवाढीवर सातत्याने टीका करायचे, ते लोक आज पेट्रोल लीटरला ११० रुपयांच्या पुढे गेल्यावरही जसे मुग गिळून गप्प आहेत, त्याच प्रकारचे वर्तन भारतीय क्रिकेट संघाने केले आहे.
COMMENTS