काश्मीरमध्ये बँक मॅनेजरची हत्या; पंडितांचा पलायनाचा इशारा

काश्मीरमध्ये बँक मॅनेजरची हत्या; पंडितांचा पलायनाचा इशारा

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी राजस्थानच्या एका बँक मॅनेजरची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या अधिकाऱ्याचे नाव विजय कुमा

सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार
कमलनाथ सरकारचे भवितव्य २६ मार्चला
व्यंगचित्रकार मंजुलच्या ट्विटर खात्यावर केंद्राचा आक्षेप

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी राजस्थानच्या एका बँक मॅनेजरची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या अधिकाऱ्याचे नाव विजय कुमार असे असून ते द. काश्मीरमधील अरेह मोहनपोरा शाखेचे मॅनेजर होते. विजय कुमार यांच्यावर गोळ्या झाडून दहशतवादी पसार झाले. या नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत विजय कुमार यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

विजय कुमार यांच्या हत्येनंतर गुरुवारी श्रीनगरमध्ये काश्मीर पंडितांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. मोदी सरकारने पंडितांना दिलेले नोकरीचे पॅकेज कागदावरच असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. काश्मीर खोऱ्यात पंडितांचे संरक्षण करता येत नसेल तर ते जम्मूला जातील असाही इशारा काश्मीर पंडितांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अमित कौल यांनी दिला. अमित कौल गेले तीन दिवस दहशतवाद्यांकडून पंडितांच्या केल्या जाणाऱ्या हत्येसंदर्भात निदर्शने करत आहेत.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून १ मे पासून झालेली ही तिसरी हत्या असून हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे या एकूण घटनाक्रमातून दिसून येते. याच आठवड्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी रजनी बाला या हिंदू शिक्षिकेची हत्या केली होती. त्या कुलगाम जिल्ह्यात गोपालपोरा येथील सरकारी शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या हत्येच्या तपासात अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही.

विजय कुमार हे राजस्थानच्या हनुमानगढ या गावातले मूळचे रहिवासी होते. गेल्याच आठवड्यात त्यांची कुलगाम शाखेत बदली झाली होते व तिथे ते रुजू झाले होते. या अगोदर विजय कुमार केंद्र सरकार, जम्मू-काश्मीर प्रशासन व भारतीय स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या कोकरनाग शाखेत कार्यरत होते.

विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले असून घटनास्थळी जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर व निमलष्करी दलाचे एक संयुक्त पथक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. या पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

राहुल गांधी, अशोक गेहलोत यांची सरकारवर टीका

विजय कुमार हे राजस्थानचे नागरिक असल्याने त्यांच्या हत्येचा निषेध राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. केंद्र सरकार काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांचे बळी पडत असून हे सहन केले जाणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय कुमार यांच्या हत्येवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काश्मीर पंडितांना संरक्षण देणे हे सरकारचे काम आहे. जे काश्मीर पंडितांचे संरक्षण करण्याचे दावे करत आहेत ते सिनेमा पाहण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. काश्मीरमधील परिस्थितीचा फायदा फक्त सत्ता मिळवण्यासाठी भाजपने घेतला. काश्मीर खोऱ्यात बँक मॅनेजर, शिक्षक व निष्पाप नागरिकांना ठार मारले जात आहे, काश्मीर पंडित पलायन करत आहेत, पण काश्मीर पंडितांना संरक्षण देण्याचा दावा करणारे सिनेमा पाहण्यात गर्क आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधानांनी त्वरित पावले उचलावीत असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

अफवेचे खंडन

विजय कुमार यांच्या हत्येनंतर श्रीनगर विमानतळावर काश्मीर पंडितांकडून पलायन केले जात असल्याची अफवा उठली. विमानतळावरची गर्दी काश्मीर सोडून जात असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियात पसरले पण विमानतळ प्राधिकरणाने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. श्रीनगर विमानतळावर १५ ते १६ हजार प्रवाशांची गर्दी नेहमीच असते असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

दरम्यान काश्मीरमधील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हाही उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0