नवी दिल्लीः भीमा कोरेगाव- एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते-लेखक वरवरा राव यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे क
नवी दिल्लीः भीमा कोरेगाव- एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते-लेखक वरवरा राव यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे कायमस्वरुपी जामीन मंजूर केला. वरवरा राव २८ ऑगस्ट २०१८ पासून तुरुंगात आहेत. ८२ वर्षांच्या वरवरा राव यांनी प्रकृतीच्या कारणावरून या आधी ८ मार्च २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरुपी जामीन मागितला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यावर राव यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. राव हे कंपवाताने आजारी आहेत.
आपल्या युक्तिवादात राव यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाची प्रकृती गेल्या वर्षभरात सुधारली नसल्याचे न्यायालयात सांगितले. या घडीला एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तरी ती पुरी होण्यास १० वर्षे पुरी होतील आणि या प्रकरणात १६ अन्य आरोपी आहेत. एकाचे निधन झाले, त्यामुळे ही प्रक्रिया प्रदीर्घ असल्याचे राव यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी न्यायालयाला सांगितले. पूर्वी ग्रोव्हर यांनी आपले अशील मरेपर्यंत तुरुंगात राहणार का, तपास यंत्रणांना आमच्या अशिलाचे मरण फादर स्टॅन स्वामी यांच्या प्रमाणे तुरुंगात व्हावे अशी इच्छा आहे का, असा सवालही सुनावणीत उपस्थित केला होता.
वरवरा राव यांच्याविरोधात आरोपपत्र जरी दाखल झाले असले तरी आरोप निश्चिती झालेली नाही. राव यांची चौकशी करण्याची संधी या आधी तपास यंत्रणांना मिळाली होती त्यामुळे त्यांना प्रकृतीच्या कारणावरून कायमस्वरुपी जामीन द्यावा लागेल असे आदेश न्यायालयाने दिले.
मूळ वृत्त
COMMENTS