जयजीत पाल यांनी फेब्रुवारी २००९ ते ऑक्टोबर २०१५ या काळातील मोदींच्या ९००० पेक्षा अधिक ट्वीट्सचा अभ्यास केला. ४१४ प्रसंगी मोदींच्या ट्वीटमध्ये सेलिब्रिटींचा उल्लेख आढळला. वलयांकित व्यक्तींशी जोडून घेण्याची युक्ती मोदींनी कशी वापरली या संपूर्ण रणनीतीमध्ये ३ टप्पे होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेलिब्रिटींबाबतचे प्रेम सर्वश्रुत आहे. सेलिब्रिटींच्या जीवनातील विविध घटनांना ते नेहमीच प्रतिसाद देतात, त्यांच्या लग्नसमारंभांना आवर्जून हजेरी लावतात. त्यांच्या ट्वीटमध्ये अनेक वेळा ते अनेकप्रसिद्ध व्यक्तींना टॅग करत असतात. मागच्याच आठवड्यात पुन्हा एकदा #VoteKar वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याकरिता लोकांना प्रेरित करण्याचेआवाहन केले.या आवाहनामध्ये त्यांनी बॉलिवुडमधील हृतिक रोशन, अनुपम खेर, कबीर बेदी, आर. माधवन, अनिल कपूर, अजय देवगण, माधुरी दिक्षित अशा दिग्गजांबरोबरच सिद्धार्थ मल्होत्रा, राजकुमार राव, परिणिती चोप्रा, कार्तिक आर्यन, कृती सेनन वगैरे नव्या कलाकारांना तसेच हिमा दास, दिपा कर्माकार, साक्षी मलिक यांच्यासारख्या ऑलिंपिक खेळाडूंनाही टॅग केले. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या आवाहनाला प्रतिसाद दिला.
पंतप्रधान मोदी हे वलयांकित व्यक्तींना नेहमीच अशा प्रकारे जोडून घेतात. मागच्या निवडणुकीत मतदानाचे आवाहन करण्यासाठीच्या मोहिमेत, किंवा स्वच्छ भारत अभियानाच्या वेळी ही ते अनुभवले. मोदींचे हे सेलिब्रिटी प्रेम नक्की काय आहे याचा मिशिगन विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक जयजीत पालयांनीअभ्यास केला.त्यांनी फेब्रुवारी २००९ ते ऑक्टोबर २०१५ या काळातील मोदींच्या ९००० पेक्षा अधिक ट्वीट्सचा अभ्यास केला. ४१४ प्रसंगी त्या ट्वीटमध्ये सेलिब्रिटींचा उल्लेख आढळला.यात अनेक ट्वीटमध्ये एकाच वेळी अनेक व्यक्तींचाही उल्लेख होता.निवडणुकांपूर्वी आणि नंतरच्या काळात समाजमाध्यमांवरील आपला प्रभाव कायम राखण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींशी जोडून घेण्याची युक्ती कशी वापरली याबाबत त्यांनी काही रोचक निष्कर्ष आपल्या अभ्यासातून मांडले आहेत.
- २०००च्या दशकामध्ये मोदींची गुजरात वगळता इतरत्र जनमानसातील प्रतिमा फारशी चांगली नव्हती. गुजरातमधल्या धर्मांध दंगलींबाबत माध्यमे त्यांना जाब विचारत होती. अमेरिकेने त्याच कारणाकरिता त्यांना व्हिसा नाकारला होता. भारतीय राजकारणात विघटनकारी शक्ती म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते.
- साधारण २००५ पासून मोदींनी ब्रँड व्यवस्थापनाची मोहीम चालू केली. कट्टर हिंदुत्ववादी ही आपली प्रतिमा बदलून ती आर्थिक विकासाच्या भोवती केंद्रित करण्याला सुरुवात केली. त्यांच्या रणनीतीचा एक प्रमुख भाग हा तरुणांना लक्ष्य करण्याचा होता, ज्यांच्या राजकीय जाणिवेमध्ये गुजरात दंगलींना फारसे स्थान नव्हते.
- निवडणुकांमध्ये प्रमुख मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी सेलिब्रिटी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे संशोधनाने सिद्ध केले आहे. मोदींनी पंतप्रधानपदासाठीची आपली मोहीम भारतातील काही मोजक्या सुप्रसिद्ध व्यक्तींना घेऊन सुरू केली. त्याच काळात भारतात समाजमाध्यमांचा प्रसारही झपाट्याने होत होता. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींबरोबर अशा रितीने जोडून घेणे सोपे झाले. निवडणूक प्रचाराच्या काळात आणि नंतरही त्यांनी या गोष्टीचा पुरेपूर वापर केला.
- जयजीत पाल यांनी केलेल्या या अभ्यासानुसार या संपूर्ण रणनीतीमध्ये ३ टप्पे होते.
- विश्वसनीयता मिळवणे–पहिल्या टप्प्यामध्ये,‘टोकाचे विचार असणारा प्रादेशिक नेता’ या प्रतिमेपासून अधिक स्वीकारार्ह अशी ‘राष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा’ निर्माण करणे ही महत्त्वाची गोष्ट होती. त्यांच्या ट्वीटमध्ये दिसणारी पहिली सुप्रसिद्ध व्यक्ती होती अमिताभ बच्चन. २०१० मध्ये अमिताभ बच्चन हे गुजरात राज्य पर्यटन विभागाचे ब्रँड अँबेसिडर होते. या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याखेरीज नारायण मूर्ती, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, एपीजे अब्दुल कलाम, श्री श्री रविशंकर यांसारख्या भारतातील सुप्रसिद्ध व्यक्तींशी जोडून घेतले. त्यांच्या स्वतःच्या वैचारिक वर्तुळाखेरीज, ज्या लोकांचा मोठा चाहता वर्ग आहे असे अन्य लोकही आपल्यासोबत आहेत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- पाठिंबा मिळवणे– दुसऱ्या टप्प्यात, २०१३ च्या सुमारास, त्यांचे लक्ष्य होते त्यांच्या निवडणूक मोहिमेकरिता पाठिंबा मिळवणे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या ट्वीट्समध्ये विविध सेलिब्रिटींना ट्वीट करणे, त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढून ती पोस्ट करणे, व काही जणांच्या बाबतीत स्पष्ट पाठिंबा मिळवणे हे डावपेच अवलंबले. सप्टेंबर २०१३ मध्ये मतदारनोंदणीचे आवाहन करण्यासाठी एक ट्वीट केले आणि त्यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींना त्यात टॅग केले. अनेक व्यक्तींनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. परंतु या टप्प्यात मुख्यतः छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सेलिब्रिटींबरोबर असलेली आपली जवळीक प्रदर्शित केली.
- पुष्टी मिळवणे– तिसरा टप्पा होता तो निवडणुकांनंतर, सत्तेवर आल्यानंतर सेलिब्रिटींबरोबरच्या या जवळच्या संबंधांवर शिक्कामोर्तब करण्याचा. स्वच्छ भारत सारख्या मोहिमांमधून हे काम केले. या टप्प्यामध्ये अर्थातच सेलिब्रिटीही पंतप्रधानांबरोबर जोडून घेण्यास इच्छुक असल्यामुळे या टप्प्यात अनेक स्वच्छ भारत, फिटनेस चॅलेंज, सेल्फी वुइथ माय डॉटर, अशा अनेक मोहिमा, हॅशटॅगना या प्रसिद्ध व्यक्तींनीही चांगला प्रतिसाद दिला.
या विश्लेषणात आढळून आलेल्या गोष्टींवरून खालील निष्कर्ष उघड दिसतात.
- श्री श्री रविशंकर, रामदेव यासारख्या आध्यात्मिक गुरूंचा उल्लेख मोठ्या प्रमाणात होता.
- सुरुवातीच्या काळात ज्यांना मोदी सातत्याने टॅग करत होते, त्या सर्वांनी कधीच मोदींना आपला पाठिंबा जाहीर केला नव्हता. मात्र अभिनंदन करणे, त्यांच्याबरोबरच्या भेटींचा उल्लेख करणे, छायाचित्रे शेअर करणे या निमित्ताने मोदी त्यांना टॅग करत राहिले.समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांना मोदींची दीपिका पादुकोणशी ओळख तरी आहे किंवा नाही हे माहीत नसते, पण ती आहे असे त्यांच्या ट्वीटमधून सुचवले जाते.
- जगभरात सर्वमान्य असलेल्या व्यक्तींचा यात विशेष समावेश करण्यात आला होता. उदाहरणार्थ एपीजे अब्दुल कलाम. जगभर त्यांना एक स्वतःच्या कर्त़ृत्वाने वर आलेली व्यक्ती म्हणून मान होता. मोदी स्वतःचा ब्रँड ज्या प्रकारे उभारू पाहत होते, त्याच्याशी ते अगदीच मिळतेजुळते होते.
- मोदींनी प्रसिद्ध खेळाडूंनाही अनेकदा ट्वीटमध्ये टॅग केले. अर्थातच त्यात क्रिकेटपटूंचा भरणा जास्त होता. भारताला क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींचे वेड आहे या गोष्टीचा यामध्ये नक्कीच विचार करण्यात आला होता.
- नरेंद्र मोदींच्या या सेलिब्रिटींबरोबरच्या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे मोदी आणि देशहित या दोन्हींची घातली गेलेली सांगड. नोटाबंदी आणि जीएसटी यासारख्या धोरणांना मोदींनी देशभक्तीशी जोडले. या गोष्टींसाठी त्याग करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे बजावले. त्यामुळे अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी बचावात्मक पवित्रा घेऊन या गोष्टींना पाठिंबा जाहीर केला.
आज २०१९च्या निवडणुकांपूर्वी, मोदींच्या समाजमाध्यमांवरील पाठीराख्यांची संख्या अभूतपूर्व वाढली आहे. अजूनही ट्वीटमधून सेलिब्रिटींना टॅग करण्याची आपली रणनीतीही त्यांनी चालू ठेवली आहे.
COMMENTS