हिंदू-मुस्लिम संवाद - बहामनी राज्यकर्त्यांना हे भान होते की, त्यांचे मुख्य प्रजाजन बहुसंख्येने हिंदू आहेत. त्यामुळे उत्तर भारतातल्या दिल्ली सल्तनतींनी हिंदू धर्माविषयी जशी कडक आणि अतिरेकी धोरणे अवलंबिली तशी धोरणे या दक्षिणी राजवटींनी फार मोठ्या प्रमाणात राबवलेली दिसत नाहीत.
आपण आधी बघितल्याप्रमाणे दिल्ली सल्तनतींपैकी खिलजी राजवटीचे लक्ष सर्वप्रथम दक्षिण भारताकडे गेले. १४व्या शतकाच्या सुरुवातीपासून आणि १३व्या शतकाच्या अगदी शेवटी दिल्ली सल्तनतीला राज्यविस्ताराची संधी दक्षिणेकडे दिसू लागली. म्हणजे मुसलमानांची, भारताच्या मुख्य भूमीवर आक्रमणे सुरू होऊन एकूण ३०० वर्षे उलटून गेली होती. पश्चिमेकडे सिंधपासून पूर्वेकडे बंगालपर्यंत या ३०० वर्षांत मुसलमानी सत्तांनी राज्यविस्तार केला होता. इथे एक महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात ठेवायची ती ही की, या राज्यविस्ताराकडे आपल्या २०व्या शतकाच्या निर्माण झालेल्या दृष्टिकोनातून न बघता तत्कालीन मध्ययुगीन राज्यविस्तार याच नजरेने बघायचे. कुठलेही सैन्य किंवा फौजा अमर्याद काळापर्यंत लढाया करू शकत नाही. दिल्ली सल्तनतींचा एवढा प्रचंड पसारा न्याहाळताना एवढेच लक्षात ठेवायचे की या विस्तीर्ण राज्यात अनेक हिंदू राज्येही राज्य करीत असत. मागे उल्लेख केलेला ग्वाल्हेरचा राजा मानसिंग तोमर याने सुमारे २५ वर्षे राज्य केले. यातला काही काळ त्याची दिल्ली सल्तनतीशी मैत्री असायची तर काही काळ शत्रुत्व! पुढे स्वतंत्रपणे आपण या काळातले राजकारण जेव्हा विचारात घेऊ तेव्हा याचा सविस्तर विचार करू. राजा मानसिंग यांना ‘मानकुतूहल’ हा संगीत विषयक ग्रंथ लिहून, उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचा आद्य प्रणेता म्हणावे इतकी फुरसद राज्य करताना मिळाली. हा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे ध्यानात ठेवूयात.
नर्मदेच्या खोऱ्याच्या आजूबाजूचा पूर्व-पश्चिम भूगोल बघितला आणि नर्मदेच्या दक्षिणेकडच्या सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगा बघितल्या तर हे लक्षात येईल की, खूप प्राचीन काळापासून उत्तर भारतातून दक्षिण भारतात खूप मोठ्या संख्येने स्थलांतर करणे हे भौगोलिकदृष्ट्या एक आव्हान होते. वैदिकांच्या दक्षिण भारतातील वसाहती करण्याच्या महत्त्वाकांक्षांबद्दलच्या कहाण्या सुप्रसिद्ध आहेत. हजरत निज़ामुद्दीन अवलियांच्या काळापासून इस्लामी धर्माच्या प्रसारासाठी विद्वान आणि पंडित असणाऱ्या सूफी संतांना दक्षिणेत पाठवण्यात येत होते. खिलजींनी देवगिरीचे राज्य खालसा केल्यावर देवगिरीचे नाव दौलताबाद असे करण्यात आले. देवगिरी जवळ चांगली जागा बघून खुलताबाद शहर वसविण्यात आले. इथेच जवळ हिंदूंचे सुप्रसिद्ध घृष्णेश्वर मंदीर आणि ऐतिहासिक वेरूळची शिल्पे असणारी लेणी आहेत. या पार्श्वभूमीवर खुलताबादच्या परिसरात एतद्देशीय मुसलमान पूर्व हिंदू संस्कृती आणि मुसलमान आल्यानंरची इस्लामी संस्कृती यांचा संवाद सुमारे ५०० वर्षे अव्याहत सुरू आहे. १४व्या शतकापासून जे सूफी संतपुरुष दख्खनमध्ये आले त्यांचा उद्देश जुलूम जबरदस्तीचा होता असे दिसत नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेतील उर्वरित पाच राज्यांमध्ये जागोजागी या संतांचे दर्गे म्हणजेच समाधीस्थळे आहेत. आणि आजही या दर्ग्यांकडे हिंदू-मुस्लिम एकोप्याची ठिकाणे म्हणून बघितले जाते.
उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचे ऐतिहासिक काळापासून पटत नाही! मुसलमान दक्षिणेत आल्यानंतर खिलजी राजवटीतच नेमलेल्या सुभेदारांनी बंड केले आणि पहिली दक्षिण भारतातील पहिली मुसलमानी सल्तनत बहामनी सल्तनत या नावाने अस्तित्वात आली. या राजवटीचा पहिला राजा हसन गंगू बहामनी हा गंगू नावाच्या ब्राह्मणाचा ग़ुलाम होता. त्यामुळे याला लहानपणापासून हिंदू धर्मविषयक संस्कार आणि ज्ञान मिळाले होते. मुख्य म्हणजे त्याने सुलतान बनत असताना स्वतःच्या पूर्व मालकाचे नाव गंगू बहामनी असे अभिमानाने मिरवलेले दिसते. बहामनी राजवटीची पहिली राजधानी गुलबर्गा ही होती. नंतर विजयनगर या हिंदू राजवटीने बहामनी राज्याला संपूर्ण हरवण्याच्या आधी ही राजधानी बिदरला हलविली गेली. बहामनी राजवटीने सुमारे २०० वर्षे राज्य केले. इ. स. १५२० मध्ये बहामनी राजवट संपविली गेली. परंतु मूळ बहामनी राज्यातून दक्षिणेतल्या पाच सुलतान शाह्या अस्तित्वात आल्या. या पैकी अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही जवळ जवळ १७व्या शतकापर्यंत टिकून होत्या.
बहामनी राज्यकर्त्यांना हे भान होते की, त्यांचे मुख्य प्रजाजन बहुसंख्येने हिंदू आहेत. त्यामुळे उत्तर भारतातल्या दिल्ली सल्तनतींनी हिंदू धर्माविषयी जशी कडक आणि अतिरेकी धोरणे अवलंबिली तशी धोरणे या दक्षिणी राजवटींनी फार मोठ्या प्रमाणात राबवलेली दिसत नाहीत. विजापूरच्या आदिलशहाने तर आपले एक बिरुद जगद्गुरू असे मिरवलेले आढळते. बहामनी राजवटीतील फिरोज बहामनी हा या संस्कृती संकरातला महत्त्वाचा राजा म्हणायला हवा. याचे समकालीन विजयनगरच्या राजांशी अनेक खटके उडाले. या युद्धांमध्ये ओदिशाचा राजा विजयनगर विरोधात बहामनी राजवटीच्या बाजूने असे. कधी कधी तर सैन्य आणि तत्सम मदतही ओदिशाचा राजा बहामनी राजवटीला करीत असे. थोडक्यात म्हणजे हे तत्कालीन राजकारण होते. बहामनी राजवटींनी संस्कृती संवर्धनासाठी भरपूर कष्ट घेतलेले आढळतात. त्यामध्ये ते एतद्देशीय इतिहास आणि परंपरा अजिबात विसरलेले दिसत नाहीत. बिदर हे राजधानीचे गाव बघितले तर ते एतद्देशीय वाकाटक, चालुक्य आणि काकतीय राजवटींशी संबंधित आहे हे दिसेल. बिदरच्या तीन बाजूंना तेलुगू, कन्नड आणि मराठी या तीन भाषा बोलणारे लोक राहात असत असे दिसते. फिरोजशहा बहामनीने विजयनगरच्या राजाला हरवल्यानंतर विजयनगरची राजकन्या विवाहासाठी मागितली. त्याने मागणी केलेल्या हुंड्याची यादी तपासली तर आजही थक्क व्हायला होते. भरपूर संपत्ती तर मागितलेली आढळतेच परंतु फिरोजशहाने दोन हजार कलाकार आणि कारागीर कायमस्वरूपी बहामनी राज्यात पाठविण्याची मागणी केलेली आढळते. या यादीत गायक आणि वादक यांचाही समावेश आहे.
पुरंदरदास आणि त्यागराज या सुप्रसिद्ध संतांना दक्षिणी संगीताचे जनक मानले जाते. दक्षिणी संगीत हे उत्तर भारतीय संगीताहून वेगळे अशाकरता आहे की ते मूलतः बंदिस्त आणि शब्दप्रधान आहे. भारतीय संगीतातले व्याकरण जरी फारसे दक्षिणेत बदलत नसले तरी, मूळ रचना किंवा बंदिशीमध्ये केलेली ढवळाढवळ दक्षिणेत फारशी खपवून घेतली जात नाही. उत्तर भारतीय संगीतात जसा रागविस्तार विचार आहे त्याचा अवलंब दक्षिणेत फारसा नाही. अगदी वाद्यवादनही गायकी अंगाने करण्याची परंपरा आहे. तसेच ही गायन परंपरा थेट सामवेदाशी नाते सांगते आणि मुख्य शैलीत कुठलेही बदल करण्यास तयार नसते. संगीताबाबत दक्षिणेत एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे दक्षिणी परंपरेने संगीत भक्तीशी निगडित ठेवले. दक्षिणेतील संगीत हे प्रामुख्याने मंदिरांमधून आणि धार्मिक स्थळांमधून जतन केले गेले. त्यामुळे कर्नाटकी शास्त्रीय संगीतात मात्र थेट काहीही संकर घडून आलेला दिसत नाही. नवीन वाद्येही फारशा स्वागत भावनेने दक्षिणेत स्विकारलेली दिसत नाहीत. एकोणिसाव्या शतकानंतर जेव्हा आधुनिक वाद्ये स्विकारली गेली तरीही त्या वाद्यवादनातही परंपरागत बंदिस्तपणा आणि मूळची कठोर शिस्त सुरुवातीला जपली गेली. अगदी अलीकडे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय शैलींचा मिलाप करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात.
सर्वसाधारणपणे दक्षिणेतील सर्व राजवटींनी दक्षिणेतील मंदिरे आणि मंदिर संस्कृती जपण्यासाठी आणि संवर्धनासाठी सढळहस्ते मदत आणि राजाश्रय दिलेला आढळतो. मग ते मंदिर कुठल्याही राजवटीमध्ये असूदेत. शिल्पकला, स्थापत्यकला, वस्त्रनिर्माण (वीणकाम, भरतकाम, कशिदाकारी वगैरे वगैरे) अशा अनेक तंत्रांमध्ये आणि उद्योगांमध्ये जो हिंदू आणि मुसलमान संवाद घडला तो तर आपण क्रमाने बघूच परंतु त्या आधी राज्यनिर्मिती, राज्य कारभार आणि राज्याला समृद्धी आणि सुबत्ता देणाऱ्या राजकारणाविषयी आधी विचार करूयात.
राजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.
COMMENTS