मेगा ब्लॉक, मेगा मार्ट, मेगा मॉल असे शब्द आपण ऐकले होते पण एखाद्या राजकीय पक्षामध्ये मेगा भरती, हा शब्द आजच भारतीय जनता पक्षाने तयार केला आणि त्याची प्रचीती दिली. मुंबईत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चार आमदारांनी आणि इतर अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबईमध्ये गरवारे क्लब येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड यांनी देखील प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे हे मंत्री उपस्थित होते. भोसले, नाईक, कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे मंगळवारी राजीनामा दिला होता.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नव्यानेच प्रदेशअध्यक्ष झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी ही भरती घडवून आणल्याची चर्चा आहे. यांशिवाय अनेकजण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण आज केवळ इतक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की ‘भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही.
वैभव पिचड हे राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे मोठे नेते मधुकर पिचड यांचे वैभव हे पुत्र आहेत. पिचड हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना, ते अनेक वर्षे मंत्री होते. पवारांची साथ सोडून जाण्याचा विचारही आपल्या डोक्यात कधी येणार नाही, असे त्यांनी काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. ‘राष्ट्रवादी पक्ष हा स्वाभिमान, धर्मनिरपेक्षता आणि विकासाची कामं करुन मोठा करायचा आहे. आणि शरद पवार यांनी दिलेल्या शिकवणीबद्दल, आदिवासी विकासमंत्री असताना नाशिक येते मधुकर पिचड यांनी एक भाषण दिले होते. ते युट्यूबवर उपलब्ध आहे.
संदीप नाईक, हे नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघाचे आमदार आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे ते पुत्र आहेत. गणेश नाईक पूर्वी शिवसेनेमध्ये होते. नंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मंदाम्हात्रे यांनी त्यांचा विधानसभेसाठी पराभव केला होता. त्यांनी नाईक यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्याही भाजपमध्ये आहेत आणि नाईकही.
शिवेंद्रराजे भोसले, सातारा जिल्ह्यातील जावळीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे चुलतबंधू आहेत. त्यांच्या दोघांमधून विस्तव जात नाही. एकमेकांच्या समर्थकांना धमकावणे, गाड्या फोडणे, विरोधात उमेदवार उभे करणे, असे प्रकार साताऱ्यात नेहमी होत असतात. त्यांच्यामध्ये समेट घडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कसरत करावी लागत होती.
कालीदास कोळंबकर अगोदर शिवसेनेत होते. नंतर ते नारायण राणे यांच्याबरोबर २००५ मध्ये काँग्रेसमध्ये आले होते.
चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या तडफदार नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या पाटीवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून गुन्हा दाखल झाल्यामुळे आरोपातून वाचण्यासाठी, त्या भाजपमध्ये गेल्याचे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडपणे सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे जवळचे नातेवाईकही लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहेतच. यांपुर्वी अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहेच. थोडक्यात काय तर भाजपने मेगा मॉल सुरु केला असून, आज त्यामध्ये मेगा भरती केली.
प्रवेश करणाऱ्या अनेकांना यापूर्वीच्या पक्षांमध्ये अनेक पदे मिळाली, संधी मिळाली आणि त्या संधीचा उपयोग त्यांनी स्वतःचा मेगामार्ट उभा करण्यासाठी केला. त्यातून त्यांच्यावर अनेक आरोप झाले. अनेक केसेस झाल्या. त्यातून त्यांच्यामागे अनेक चौकशा लागल्या. त्यातून सुटायचे, तर मेगा मॉलमध्ये विलीन व्हायला हवे, हे ओळखण्याचे शहाणपण त्यांनी सत्तेतून मिळवले आहेच.
सर्व प्रकारची सत्ता अनेकवर्षे आणि पिढ्यानपिढ्या उपभोगल्यानंतरही अनेक मराठा नेत्यांनी, मराठा आरक्षणाला हवा दिली आणि आता भाजप सरकारने हा निर्णय पुढे नेल्याने, मराठा मते तिकडेच झुकणार असल्याचेही, या नेत्यांच्या लक्षात आले आहेच. त्यामुळे निवडून यायचे असेल, तर तिकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेकांचे गणित आहे.
विधानपरिषदेचे आमदार असणारे चंद्रकांत पाटील, यांना भावी मुख्यमंत्री म्हणून, अनेक पत्रकार नेहमी स्पर्धेमध्ये आणत असतात. त्यांनीही मग भविष्यात स्पर्धा झालीच, तर तयारी असावी म्हणून अशा भरतीमध्ये लक्ष घातले असून, आता तर त्यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेकजण, हे पक्ष काही एका विचारांवर उभे आहेत, म्हणू या पक्षात नव्हतेच. केवळ आपण आणि आपली सत्ता आणि त्यातून आर्थिक ताकद उभी राहावी आणि शाबूत राहावी, म्हणून त्या पक्षांमध्ये होते. सत्तेचा काटा आता तिकडे येत नाही, म्हंटल्यावर आता काट्याच्या दिशेने हे तालुक्यांचे सरदार सरकू लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही, याची कल्पना होती आणि त्यांनीही आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी या लोकांना चुचकारले आणि मोठे केले. बाकी विचार-बिचार केवळ सभेपुरते आणि वाहिन्यांच्या चर्चेपुरतेच, हे आता लोकांनाही कळून चुकले आहे.
भाजपने मेगा मॉल उभा केल्याने, इनकमिंग चालू राहणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक धक्केही बसणार आहेत. आता उत्सुकता केवळ नावांचीच आहे!
COMMENTS