नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत-पाकिस्तान दरम्यान चिघळलेली परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न करण्यास व्हाइट हाऊसची तयारी नसतानाही
नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत-पाकिस्तान दरम्यान चिघळलेली परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न करण्यास व्हाइट हाऊसची तयारी नसतानाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान उद्भवलेला तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे. ‘उभय देशांमध्ये संवाद साधण्यासाठी मी माझ्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करेन. या महिन्याच्या अखेरी, फ्रान्समध्ये ‘जी-७’ देशांची शिखर परिषद होत असून त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करेन असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या पुन्हा अशा मध्यस्थीच्या भूमिकेमुळे मोदी व ट्रम्प यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या ३० मिनिटांच्या चर्चेचा ट्रम्प यांच्या भूमिकेवर काही परिणाम झालेला नाही असे दिसते.
मंगळवारी ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काश्मीर प्रश्न हा अत्यंत जटील, गुंतागुंतीचा असून तेथे हिंदू व मुसलमान या दोघांमध्ये फारसे सख्य नाही पण त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे विधान केले.
भारत व पाकिस्तानचे प्रमुख नेते माझे चांगले मित्र आहेत. तेथील जनताही चांगली आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान खान मला भेटून गेले होते व या आठवड्याअखेर मी मोदी यांना फ्रान्समध्ये भेटणार आहे, त्यावेळी काश्मीर प्रश्नावर मी मोदींशी बोलणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी मध्यस्थीची तयारी दाखवण्याअगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही दूरध्वनीवर संवाद साधला होता. त्यांनी काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तानने भडकाऊ विधाने टाळावी व संयम राखावा, असे सांगितले. काश्मीरप्रश्न अधिक गंभीर असून उभय देशांनी संयम बाळगावा असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर सोमवारी ट्रम्प यांनी मोदी यांच्याशीही अर्ध्यातासाहून अधिक वेळ चर्चा केली. या चर्चेत मोदींनी पाकिस्तानच्या नेत्यांकडून भारताविरोधात हिंसा व चिथावणीखोर विधाने केली जात असल्याचे ट्रम्प यांच्या लक्षात आणून दिले.
‘काश्मीर हा अंतर्गत मामला असला तरी त्याचे पडसाद बाहेर उमटतात’
दरम्यान मंगळवारी व्हाइट हाउस प्रशासनाने काश्मीरमधील मानवाधिकाराबाबत चिंता व्यक्त करत सर्व राजकीय कैद्यांची सुटका करून त्यांना स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिला पाहिजे असे स्पष्ट केले. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार व्हाइट हाऊसने काश्मीरमधील परिस्थितीवर थोडक्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत व्हाइट हाऊसच्या प्रशासनाने काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत मामला असला तरी त्याचे परिणाम अन्यत्र उमटत असून भारत व पाकिस्तानशी अमेरिकेने संवाद साधला असला तरी दोघांनी संयम ठेवावा असे सांगितले.
काश्मीरमध्ये अनेक राजकीय कैद्यांना तुरुंगात डांबले आहे, तेथील नागरिकही संतप्त झाले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये, संवादाचा मार्ग ठेवावा अशा सूचना केल्याचे व्हाईट हाऊसने सांगितले.
काही पत्रकारांनी ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत विचारले असता व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने, ट्रम्प यांनी दोन्ही देशांची इच्छा असल्यास मध्यस्थीसाठी तयारी दर्शवली आहे पण दोघांनी तसे सांगितलेले नाही, असे स्पष्ट केले.
मूळ बातमी
COMMENTS