नवी दिल्ली : जातीय तेढ वाढतील अशा पद्धतीने चिथावणीखोर भाषण देणाऱ्या व राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या भा
नवी दिल्ली : जातीय तेढ वाढतील अशा पद्धतीने चिथावणीखोर भाषण देणाऱ्या व राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत नथुराम गोडसेला पुन्हा देशभक्त म्हटले. प्रज्ञा ठाकूर यांच्या अशा वादग्रस्त विधानामुळे लोकसभेत गदारोळ माजला. अनेक सदस्य प्रज्ञा ठाकूर यांच्यावर खवळले. एकूणात परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून लोकसभा अध्यक्षांनी ठाकूर यांचे हे विधान कामकाजातून गाळण्याचे आदेश दिले.
एसपीजी सुरक्षा नियमातील काही बदलांवर बुधवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली. या चर्चेत द्रमुकचे नेते ए. राजा यांनी नेत्यांची सुरक्षा काढण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयावर टीका करताना म. गांधी यांच्या हत्येचा संदर्भ वाचून दाखवला. त्यात ते म्हणाले, ‘नथुराम गोडसेच्या मनात ३२ वर्षे म. गांधींविषयीची घृणा होती आणि या घृणेतून त्याने म. गांधींची हत्या केली. ’
ए. राजा यांच्या या विधानावर समोरच्या आसनावर बसलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत ‘देशभक्तों का उदाहरण मत दिजिए’ असे वाक्य उच्चारले, त्यावर द्रमुकच्या सदस्यांनी व नंतर सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला. नंतर गोंधळ वाढत असलेला पाहून लोकसभा सभापतींनी ठाकूर यांचे वादग्रस्त विधान कामकाज नोंदीतून वगळण्याचे आदेश दिले.
विरोधकांची प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कडक टीका
नथुराम गोडसेला पुन्हा देशभक्त म्हणण्याच्या प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर सर्व विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी प्रज्ञा ठाकूर या गुन्हेगार असून, त्यांनी नथुराम देशभक्त असल्याचे विधान पूर्वीही केले होते. पण त्यांच्यावर त्यांचा पक्ष भाजपने अद्याप कारवाई केली नसून, भाजप ठाकूर यांच्या विधानाशी सहमत असल्याचा आरोप केला. ठाकूर यांनी संसदेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विटरवर ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेत प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मोदींकडून कारवाई केली जात नाही, याचा अर्थ ते ठाकूर यांना समर्थन देतात, असा आरोप केला.
असीदउद्दीन ओवेसी यांनीही प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानावर टीका करताना नथुरामला देशभक्त म्हटल्याने संसदेचा अपमान झाल्याचा आरोप केला. काल भाजपने संविधान दिवस साजरा केला व दुसऱ्या दिवशी गोडसेला ते देशभक्त म्हणतात. पंतप्रधान कार्यालयाने ‘भारत गोडसेंचा की गांधींचा याचे स्पष्टीकरण द्यावे असा सवाल त्यांनी केला.
मूळ बातमी
COMMENTS