नवी दिल्लीसह देशातील विविध शहरातून : केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशातल्या ८ प्रमुख कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारतबंदला संमिश
नवी दिल्लीसह देशातील विविध शहरातून : केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशातल्या ८ प्रमुख कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारतबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे देशातल्या बँकिंग सेवेवर परिणाम झालेला दिसून आला. प. बंगालमध्ये हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता देशात गुजरात, उ. प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, आसाम या राज्यात शांततेत बंद पार पडला. या राज्यातील जनजीवन सुरळीत होते. काही ठिकाणी बँकिंग सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तर सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती नियमित होती पण अनेक कर्मचारी संघटनांची निदर्शने सुरू होती.
८ कामगार संघटनांनी या बंदमध्ये २५ कोटी नागरिक सामील होतील असा दावा केला होता. याचा परिणाम काही ठिकाणीच दिसून आला पण जीवनावश्यक सेवांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.
महाराष्ट्रात या बंदचा फारसा परिणाम दिसला नाही. राजधानी मुंबईत लोकल सेवा, टॅक्सी, रिक्षा यांच्यावर बंदचा परिणाम दिसला नाही. एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रो व मोनोरेल वेळापत्रकानुसार धावत होत्या. बेस्टच्या बसही सुरळीत होत्या.
प. बंगालमध्ये हिंसाचार
भारतबंदचा परिणाम प. बंगालमध्ये दिसून आला. तेथे हिंसाचाराच्या किरकोळी घटना घडल्या. माल्दा जिल्ह्यात सुजापूर येथे आंदोलकांनी टायरींना आगी लागल्या व काही बसेसच्या काचा फोडल्या तर काही वाहनांना आगी लावण्याचे प्रयत्न केले. मिदनापूर व कूचबिहार जिल्ह्यात काही बसेसवर दगडफेक झाली.
कोलकात्यात सेंट्रल अव्हेन्यू भागात आंदोलक जमा झाले होते. पण पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. जाधवपूर येथे रेल्वेमार्गावर आंदोलक ठिय्या मारून बसले होते. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. सिलदाह ते हावडा विभागातील १७५ लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या.
ऊर्जा क्षेत्रातील १५ लाख कर्मचारी रस्त्यावर
भारतबंदमध्ये देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील १५ लाख कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करण्याची मागणी केली. एकट्या उ. प्रदेशातील २५ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी होते. आमचा संप यशस्वी झाला असा दावा ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी केला.
त्रिपुरा, आंध्र, राजस्थान, पंजाब, हरयाणातात संपाला किरकोळ प्रतिसाद
त्रिपुरामध्ये भाजपसरकारच्या विरोधात सीटू रस्त्यावर उतरली होती. राज्यात काही ठिकाणी दुकाने, आस्थापने बंद होती. सरकारी कार्यालयांमध्ये बंदचा परिणाम जाणवला नाही.
आंध्र प्रदेशात विजयवाडामध्ये माकप व भाकपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. विशाखापट्टणममधील बँका बंद होत्या. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांमध्ये उपस्थिती नगण्य होती.
राजस्थानात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बँकिंग व परिवहन सेवेवर फारसा परिणाम दिसला नाही. पण बँका व एलआयसीमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली.
पंजाबमध्ये अमृतसर, नवानशहर, लुधियाना, रुपनगर, कपूरथळा येथे परिवहन सेवा विस्कळीत होती. हरियाणा परिवहन सेवेवरही बंदचा परिणाम दिसून आला. सिरसा, हिसार येथे निदर्शकांनी रस्त्यावर अडथळे निर्माण करून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.
राजधानी दिल्लीत मायापुरी व वझीराबाद भागात निदर्शने झाली. आयटीओमध्ये अनेक डाव्या संघटनांनी कामकाजावर बहिष्कार घातलेला दिसत होता. माकपच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
मूळ बातमी
COMMENTS