एका देश(द्रोही)भक्ताची कहाणी

एका देश(द्रोही)भक्ताची कहाणी

अमेरिकेनं देशद्रोही असा शिक्का मारलेल्या फिलिप्स एजी (Philip Agee) या माणसाचं प्रोफाईल 'अ ड्रॉप ऑफ ट्रीझन'  या पुस्तकात आहे. एका परीनं ते धाडस आहे असंच म्हणायचं.

अमेरिकेनं देशद्रोही असा शिक्का मारलेल्या फिलिप्स एजी (Philip Agee) या माणसाचं प्रोफाईल ‘अ ड्रॉप ऑफ ट्रीझन’  या पुस्तकात आहे. एका परीनं ते धाडस आहे असंच म्हणायचं.

फिलिप एजी सीआयएमधे केस ऑफिसर होते, हेर होते. अमेरिकेचं देशोदेशींची सरकारं उलथवण्याचं परदेश धोरण मान्य नाही असं कारण सांगत, उघडपणे वाच्यता करत त्यानी नोकरी सोडली आणि उरलेलं आयुष्य अमेरिकेबाहेर काढून त्यांनी अमेरिकन धोरणांचे वाभाडे काढले.

जोनाथन स्टीवन्सन हे ‘अ ड्रॉप ऑफ ट्रीझन’ या पुस्तकाचे लेखक संरक्षण, परदेश संबंध, दहशतवाद, इस्लामी प्रभाव या विषयांचे जाणकार आहेत. त्यांनी या विषयावर पुस्तकं लिहिली आहेत. ‘सर्व्हावर’ या नियतकालिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांनी अमेरिकन लष्कर, नौदल आणि व्हाईट हाऊसमधे काम केलं आहे.

।।

फिलिप्स एजी हा माणूस सीआयएमधे केस ऑफिसर होता. सीआयए म्हणजे गुप्त कारवाया करणारी संघटना. या संघटनेत अधिकृतरीत्या नेमलेल्या गुप्तहेरांना ऑफिसर म्हणतात आणि अधिकृत नोकरीत नाही पण कामं करवून घेण्यासाठी नेमलेल्या माणसांना, हस्तकांना, एजंट म्हणतात. सीआयएमधे काम करणारी माणसं कुठल्या तरी कव्हरखाली, बुरख्याखाली वावरत असतात. अनेक वेळा अमेरिकन दूतावासात किंवा अमेरिकन सरकारच्या कुठल्यातरी खात्यात ते असतात पण काम मात्र हेरगिरीचंच करतात. कधी कधी त्यांना एखाद्या कॉर्पोरेशनमधे वा कंपनी कर्मचाऱ्यांचा बुरखा दिला जातो.

अमेरिकन सरकारचं हित लक्षात ठेवून ही माणसं काम करतात. अमेरिकन सरकारला, अमेरिकेला, अमेरिकन माणसांना धोका असेल तर त्या धोक्याची माहिती काढणं आणि किंवा तो धोका निस्तरणं ही यांची कामगिरी असते.

फिलिप एजी

फिलिप एजी

इराण या तेल उत्पादक देशात समाजवादी सरकार आलं तर ते तेल उद्योगाचं राष्ट्रीकरण करून अमेरिकन तेल उद्योगाला काम करू देणार नाहीत. म्हणून समाजवादी माणसं सत्तेत न येणं आणि शहा याला राज्यावर आणणं असा उद्योग सीआयएनं केला. त्यासाठी दंगे घडवले, आंदोलनं घडवली, खूनबीन केले. या सर्व उद्योगासाठी भरपूर सामग्री, पैसा, हस्तक पुरवले. व्हिएतनाममधे कम्युनिष्ट पुढाऱ्यांचे खून झाले. वगैरे वगैरे.

एजी यांनी इक्वेडोर, उरुग्वे आणि मेक्सिकोत काम केलं. चोरून संभाषणं ऐकण्यासाठी उपकरणं खुबीनं बसवणं, सरकारी अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना लाच देणं हे उद्योग त्यांनी केले. मेक्सिकोच्या सरकारनं विद्यार्थी आंदोलन दडपलं, विरोधी आवाज दडपला, शेकडो माणसं मारली. या उद्योगात मेक्सिकोच्या राज्यकर्त्यांना नाना प्रकारची मदत सीआयएनं दिली, त्यात एजी यांचा हात होता. शेकडो निःशस्त्र विद्यार्थी आणि नागरीक मारले गेले असताना सीआयएनं फक्त चारच माणसं मेली आणि आंदोलक सशस्त्र होते, सरकार उलथवू पहात होते असे अहवाल प्रसिद्ध केले. अमेरिकन दूतावास हा उद्योग करत होतं आणि त्याला हस्तेपरहस्ते एजी यांची मदत होती.

क्यूबा, व्हेनेझुएला, चिले इत्यादी दक्षिण अमेरिकन देशांत डावी सरकारं पाडणं, डाव्यांचे खून करणं, उजवे पुढारी निवडून आणणं, उजव्यांना नाना प्रकारे मदत करणं हा उद्योग अमेरिका करत होती. हा सर्व उद्योग अमेरिकन उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या हातात त्या देशातली संपत्ती पडावी यासाठी असे. एजी यांना हे आवडलं नाही. लोकशाही, स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी केवळ नावाला असत, अमेरिकन उद्योगपतींचे हितसंबंध जपण्यासाठी अमेरिकन सरकार हिंसा करतं, झोटिंगशाह्यांना मदत करतं, लोकशाह्या उलथवून लावतं असा आरोप करत एजी १९६९ साली नोकरीतून बाहेर पडले.

नोकरी सोडल्यावर ते अमेरिकेत परतले नाहीत. १९७१ साली त्यांनी ‘इनसाईड कंपनी’ नावाचं पुस्तक लिहिलं आणि आपण काय काय केलं ते तपशीलवार त्या पुस्तकात मांडलं. सीआयएतल्या ४०० माणसांची नावं आणि कामाचे तपशील त्यांनी त्या पुस्तकात प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी ‘ऑन द रन’ नावाचं पुस्तक लिहून त्यात पुन्हा एकदा अमेरिकेच्या कारवायांवर प्रकाश टाकला.

झालं! अमेरिकेनं त्यांना देशद्रोही ठरवलं. अमेरिकेच्या दबावाखाली त्यांना युरोपातला कोणताही देश थारा देईना. ‘जिझेल रोबर्ग’ या जर्मन स्त्रीशी लग्न केल्यानंतर तिथल्या स्थानिक कायद्यामुळं त्यांना जर्मनीत रहाता आलं. तिथून ते जगभर प्रवास करत. नंतर ते क्यूबात स्थाईक झाले. १९६९ पासून २००८ साली मृत्यू होईपर्यंत त्यांनी अमेरिकेला उघडं पाडलं.

अमेरिकेनं अपेक्षेनुसार त्यांच्यावर व्यसनी असल्याचा, बदफैली असल्याचा आणि पैशाचा अपहार केल्याचा आरोप चिकटवला, त्यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारला. रशिया आणि क्यूबासाठी त्यांनी हेरगिरी केल्याचा आरोपही करण्यात आला. एकही आरोप अमेरिकेला सिद्ध करता आला नाही.

युरोपीय देशांनी त्यांना बोलावलं, त्यांची भाषणं ठेवली, त्यांचं पुस्तक प्रसिद्ध करायला मदत केली. अमेरिकेतल्या युनिव्हर्सिट्या आणि संशोधक संस्थांनी त्यांना मदत केली, संशोधनासाठी आवश्यक सामग्री दिली.

अमेरिकेनं नाकारलं, इतर देशांनी त्यांना थोडीफार मदत केली पण अधिकृत थारा दिला नाही. आर्थिक ओढग्रस्तीत त्यांनी दिवस काढले. जिवाला धोका असे, त्यांना मारण्याचा प्रयत्न होणार हे त्यांना दिसत होतं कारण सीआयए कसे खून करते ते त्यांनी प्रत्यक्षच अनुभवलं होतं.

स्टीवनसन यांनी प्रस्तुत पुस्तकात त्यांचं प्रोफाईल लिहिलं आहे. प्रोफाईल तटस्थ आहे. स्टीवनसननी जगभरातून आणि न्यू यॉर्कमधल्या सार्वजनिक संग्रहालयातून माहिती गोळा केली. एजी यांचे बालमित्र, त्यांच्याबरोबर् काम केलेले त्यांचे सहकारी, अमेरिकन लष्कर आणि हेरखात्यातली माणसं अशा शेकडो माणसांच्या मुलाखती या पुस्तकासाठी घेतल्या. सिद्ध करता येतील अशा पुराव्यांच्या आधारावर स्टीवनसन यांनी लिहिलं आहे, पुरावेच बोलतात. एजी हा देशभक्त होता, देशद्रोही होता, हीरो होता, क्रांतीकारी होता की कसा होता हे ठरवण्याचं स्टीवनसन यांनी वाचकांवर सोडलं आहे.

हेरगिरी, गुप्तहेरगिरी, त्यातल्या हिंसक कारवाया हा विषय चित्तथरारक असतो. तुम्ही कोणत्या बाजूला असता यावरून तुमचे निर्णय ठरतात. तुम्ही इस्रायलच्या बाजूचे असाल तर मोसादचे एजंट तुमचे हीरो होतात. तुम्ही पॅलेस्टाईनच्या बाजूनं असाल तर ते एजंट राक्षस ठरतात. अशी पुस्तकं, त्याचे नायक हे सापळे असतात, त्यात देशद्रोह, देशभक्ती इत्यादी भावनाचिंब गोष्टी गुंतलेल्या असतात.

परंतू वरील पुस्तकात त्यातला थरार, भावना इत्यादी गोष्टी दूर रहातात, बरंचसं अलीकडचं पलीकडचं लक्षात येतं. या पुस्तकात एजीवरचे धार्मिक संस्कार आणि अमेरिकेचा ख्रिस्ती परिसर चांगलाच लक्षात येतो. अमेरिकन शाळा कॉलेजात चर्च घुसलेलं असतं. चर्च ही संस्था लवचीक असते. चर्चमधे डावे असतात, मार्क्सवादी असतात, उजवे असतात, तटस्थ अद्यात्मिक असतात, कडवे अमेरिकन असतात. चर्चमधे भरपूर छटा असतात आणि त्या त्या छटांचा प्रभाव घेऊन अमेरिकन माणसं सार्वजनीक जीवनात येत असतात.

पूर्व युरोपमधल्या चर्चनं कम्युनिझमविरोधी भूमिका घेतल्या. दक्षिण अमेरिकेतलं चर्च समाजवादी विचारांनी वागतं, गरीबांना आणि शोषितांना न्याय दिला पाहिजे असं म्हणतं, त्या त्या चळवळींना पाठिंबा देतं, सरकारला विरोध करतं.

अमेरिकन सरकार, अमेरिकन लष्कर आणि हेरगिरी संस्थामधे कॅथलिकांचा वावर असतो. दक्षिण अमेरिका, कोरिया, व्हिएतनाम या ठिकाणचं अमेरिकन धोरण योग्य आहे असं काही काळ कॅथलिक चर्चनं मानलं, तिथल्या अमेरिकन उद्योगांना पाठिंबा दिला. पण यथावकाश वास्तव लक्षात आल्यावर न्यू यॉर्कमधे युनायटेड नेशन्सच्या इमारतीसमोर स्वतःला जाळून घेणारा प्रीस्टही कॅथलिकच निघाला.

न्यूयार्क टाईम्सने छापलेला फिलिप एजी यांचा फोटो.

न्यूयार्क टाईम्सने छापलेला फिलिप एजी यांचा फोटो.

अमेरिकन समाजावर चर्चचा प्रभाव असतो आणि चर्च लवचीक असतं असे दोन मुद्दे या पुस्तकातून लक्षात येतात. चर्च अद्यात्मिक असतं आणि सेक्युलरही असतं, राजकारण प्रभावित करत असतं, हेही अमेरिका आणि युरोपच्या बाबतीत लक्षात येतं.
सरकारात नोकरी करणारा माणूस सरकारातले दोष उघड करतो. संस्थेमधे काम करणारा माणूस आपल्याच संस्थेतला गैरकारभार उघड करतो. याला व्हिसल ब्लोअर असं म्हटलं जातं.

डॅनियल एल्सबर्ग यांनी प्रेसिडंट जॉन्सन यांनी व्हिएतनाममधे माजवलेला उत्पात प्रसिद्ध केला होता. त्याच्यावरही निक्सन यांनी देशद्रोहाचा आरोप लावला होता. पण वॉशिग्टन पोस्ट इत्यादी पेपरांनी त्याची बाजू उचलून धरली.

एखाद्या गोष्टीची वाच्यता केली जाते, तेव्हां वाच्यता करणारा माणूस कोण आहे, कोणत्या हेतूसाठी त्यानं वाच्यता केली तेही पाहिलं जातं. चार पैसे मिळवण्याच्या लोभानं किंवा कोणावर तरी खुन्नस असेल तर अशा वाच्यतेचा गंभीर विचार होत नाही. एल्सबर्ग, एजी यांना पैसे कमवायचे नव्हते. अमेरिकन सरकारच्या धोरणाबद्दल त्यांचे गंभीर मतभेद होते. त्या त्या काळात अमेरिकेतल्या कित्येक म्हणजे कित्येक लोकांनी अमेरिकन धोरणाबददल तेच आक्षेप घेतले होते. नॉम चॉम्सकी हे आक्षेप घेणाऱ्यात आघाडीवर होते. न्यू यॉर्क रिव्ह्यू, न्यू यॉर्क टाईम्स, बोस्टन ग्लोब, वॉशिंग्टन पोस्ट इत्यादी पेपरही माहिती प्रसिद्ध करून अमेरिकन धोरणावर टीका करत असत. फरक असा की हे पेपर आणि चॉम्सकी ही बाहेरची माणसं होती आणि एल्सबर्ग आणि एजी हे आतले होते.

आतल्या माणसानं माहिती फोडणं. एल्सबर्ग, एजी यांनी घालून दिलेल्या उदाहरणानंतर अमेरिकेनं १९८९ साली व्हिसल ब्लोअर कायदा करून सार्वजनिक हितासाठी माहिती फोडणाऱ्याला संरक्षण दिलं.

अगदी कालपरवा फ्रान्सेस हॉगेन या फेसबुक कर्मचारीनं फेसबुकबद्दलची माहिती उघड केली, त्यांना वरील कायद्याचं संरक्षण आहे, फेसबुक त्या बाईंवर कारवाई करू शकत नाही.

या पुस्तकात भरपूर माहिती आहे. अमेरिकन कुटुंब आणि सरकार याचं अंतरंगही या पुस्तकातून लक्षात येतं.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

A DROP OF TREASON
Jonathan Stevenson
University of Chicago Press

COMMENTS