संगणकाचे जाळे निर्माण झाल्यामुळे स्वतंत्र कामांबरोबरच एकाहून अधिक व्यक्ती अथवा संगणकांना एकाच वेळी एखाद्या कामात सहभागी होणे शक्य झाले. त्यापूर्वी कामाची वाटणी करून, ती कामे वेगवेगळ्या वेळी अथवा एकाच वेळी पण वेगळ्या संगणकावर करत असत. सर्व्हरमार्फत त्याला जोडलेल्या संगणकांचे आणि त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींचे परस्परांना छेद देणारे गट तयार झाले.
खोलीभर आकाराचा संगणक ट्रान्झिस्टर, पी.सी.बी. आणि आय.सी. या त्रिकूटाने एका व्यक्तीला सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल इतका लहान आणि हलका केल्यानंतर त्याला वैयक्तिक वापराच्या संगणकाचे स्थान मिळाले. सुरुवातीच्या काळात सर्वसामान्यांच्या वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध झाला असला तरी आर्थिकदृष्ट्या तो अजूनही सामान्यांच्या कुवतीबाहेरचा होता. त्यामुळे तेव्हा संगणकाचा वापर हा प्राधान्याने कार्यालयीन मालकीच्या संगणकावरच केला जाई.
परंतु मुळात हा संगणक वापरण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान आधी मिळवणे गरजेचे होते. ज्याप्रमाणे टाईपरायटर यंत्राच्या वापराचे प्रशिक्षण घेण्यासाठी संगणकपूर्व काळात टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट होत्या, त्याच धर्तीवर संगणक-प्रशिक्षणासाठी स्वतंत्र क्लासेस सुरू झाले. तसेच शैक्षणिक संस्थाच्या अभ्यासक्रमातही विविध विषयांचे संगणकाधारित प्रशिक्षण समाविष्ट करण्यात आले. यांतील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र संगणक ही चैन अर्थातच परवडण्याजोगी नव्हती. तेव्हा प्रत्येक संगणकाचा वापर एकाहून अधिक व्यक्तींकडून, पण वेगवेगळ्या वेळेला होत असे. अशा वेळी एका विद्यार्थ्याने केलेल्या कामामध्ये दुसऱ्याने ढवळाढवळ करू नये, किंवा एकाने केलेले काम आयते दुसऱ्याने वापरू नये यासाठी एकाचे काम दुसरीला उपलब्ध असू नये याची सोय करणे आवश्यक होते. यासाठी ‘लॉग-इन’ (log-in) पद्धतीचा वापर सुरू झाला.
हे लॉग-इन अथवा लॉगिन तंत्र साधारणपणे उत्पादक कंपन्यांच्या कामाच्या शिफ्ट्स अथवा पाळीच्या धर्तीवर काम करते. उत्पादक कंपन्यांमध्ये लॉगिनचे काम स्वतंत्र असे हजेरी-कार्ड करे आणि प्रत्यक्ष काम यंत्रावर होत असे. रात्रपाळीमध्ये एका व्यक्तीने वापरलेले यंत्रच दिवसपाळीची व्यक्ती वापरत असे. या प्रकाराला Time-Sharing म्हटले जाते. (पर्यटनाच्या ठिकाणी हॉटेल-रुम भाडेतत्वावर घेणे हे, वारंवार वापर नसल्याने तात्पुरते, पण एक प्रकारचे टाईम-शेअरिंगच आहे) एकाच संगणकावर ही दोनही कामे होऊ लागली. लॉग-इन प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे असे लॉग-इन नाव अथवा ओळख दिली जाते. आणि ती प्रक्रिया पुरी करण्यासोबत त्याचा एक विशिष्ट पासवर्ड अथवा संगणकीय किल्ली त्या व्यक्तीने तयार करावी लागते. हे नाव आणि हा पासवर्ड दिल्यावरच तो संगणक वापरता येऊ शकतो. त्या लॉग-इन मार्फत त्या व्यक्तीची त्या संगणकावर एक विशिष्ट ओळख अथवा प्रातिनिधित्व तयार होते. संगणकाच्या जगात माणसाने निर्माण केलेले आपले हे पहिले आभासी अस्तित्व! ज्याप्रमाणे शालेय अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सारा लेखाजोखा त्याच्या नावासोबत जोडला जातो, त्याचप्रमाणॆ त्या व्यक्तीने त्या संगणकावर केलेले सारे काम हे त्या लॉग-इन नावाशी – त्याच्या आभासी ओळखीशी – जोडले जाते.
त्या संगणकावर त्याच्या कामांतून निर्माण झालेली माहिती साठवण्यासाठी त्या नावामार्फतच त्याला अधिकार दिले जातात. अन्य लॉग-इन मार्फत, अन्य व्यक्ती या माहितीचा वापर करू शकत नाही. एकाच संगणकावर असूनही ती माहिती तिला उपलब्ध नसते. यातून एकाच संगणकाच्या दोन वापरकर्त्यांना एकमेकांची माहिती अनाधिकाराने वापरता येणार नाही याची खातरजमा केली जाते.
लॉग-इन आणि पासवर्ड ही जोडगोळी साधारणपणे तुमचा बँक अकाऊंट क्र. आणि तुमची सही, किंवा तुमचे एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्र. या धर्तीवर काम करते. पूर्वी उत्पादक कंपन्यांमध्ये हजेरीसाठी हजेरी-पुस्तक असे, किंवा पंच-कार्ड मशीन असे. आता हे काम बव्हंशी बोटाच्या ठशांवरून (काही प्रगत राष्ट्रातील अति-महत्त्वाच्या केंद्रावर डोळ्याच्या बाहुलीवरून) हजेरी नोंदवणारी उपकरणे करतात.
संगणकावर हेच काम ही जोडी करते. त्यातून त्या व्यक्तीने केलेल्या साऱ्या कामाच्या नोंदी त्या आभासी अस्तित्वाचा लेखाजोखा म्हणून केल्या जातात. पण लॉगिन या संकल्पनेपासून संगणक टाईम-शेअरिंगच्या बाबतीत अन्य यंत्रांपेक्षा वेगळा ठरला. अन्य यंत्रांवर मागील व्यक्तीने आपले काम संपल्यावर त्यातून तयार झालेले उत्पादन यंत्रापासून वेगळे करत अन्यत्र नेऊन पुढील व्यक्तीसाठी यंत्र मोकळे करून द्यावे लागे. किंवा त्या दोन व्यक्तींच्या कामाच्या स्वरुपात फारसा फरक नसल्याने पुढील व्यक्ती जणू ‘मागील कामावरून पुढे’ पद्धतीने मागच्या व्यक्तीचे कामच पुढे चालवत असे. संगणकावर दोन व्यक्तींना स्वतंत्र कामे, परस्परांना बाधा न येता करणे शक्य झाले. एक व्यक्ती दस्तनिर्मितीचे काम करून गेल्यावर पुढची व्यक्ती त्यावर केवळ संगीत ऐकण्याचे काम(?) करू शकते.
पण ‘एकाच संगणकावर, दोन भिन्न व्यक्ती, दोन भिन्न कामे (वेगवेगळ्या वेळेला) करू शकत असतील, तर एकच व्यक्ती दोन कामे का करू शकत नाही?’ असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. इथे मायक्रोसॉफ्ट विंडोज या प्रणालीने (जरी ती पहिली नसली तरी) प्रसिद्ध केलेली ‘ग्राफिक्स यूजर इंटरफेस’ अथवा GUI पद्धती मदतीला आली. यापूर्वी संगणकावर एकावेळी एकच काम करता येई, कारण प्रत्येक संगणकाला एकच पडदा उपलब्ध होता, ज्याच्यामार्फत वापरणारी व्यक्ती संगणकाशी माहितीची, आदेशांची देवाणघेवाण करत असे. आता वेगवेगळ्या कामांसाठी स्वतंत्र विंडोज (windows) मिळू लागल्या. प्रत्येक विंडो जणू एका स्वतंत्र संगणकाचा पडदा असल्याप्रमाणॆ काम करते. एका विंडोमधील कामाचा दुसऱ्या विंडोमधील कामाशी संबंध येणार नाही याची काळजी संगणक- म्हणजे तो जिच्या आधारे चालतो ती विंडोजसारखी प्रणाली घेते.
एका विंडोमध्ये दस्तनिर्मितीसाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, दुसरीमध्ये इतर कुणी पाठवलेला दस्त वाचण्यासाठी अडोब-रीडर, तिसरीमध्ये सोप्या गणिती आकडेमोडीसाठी एक्सेल अशा विविध प्रणाली एकाच वेळी काम करू शकतात. एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे जाण्यासाठी लॉग-इन बदलण्याची गरज उरली नाही. दोन कामे करण्यासाठी आता दोन व्यक्तींची गरज उरली नाही. एकाच वेळी, एकच व्यक्ती, त्या संगणकावर एकाहून अधिक कामे करू लागली. आधुनिक युगाचा मूलमंत्र ठरलेल्या मल्टि-टास्किंग (multi-tasking)चा संगणकप्रवेश झाला.
सर्व्हरच्या आणि संगणकाच्या जाळ्याच्या आगमनानंतर व्यक्तींच्या या ‘लॉग-इन’चे तंत्रच संगणक-जाळ्यात एखाद्या संगणकाचा प्रवेश करण्यासाठी वापरले गेले. हा सर्व्हर त्याला जोडलेल्या प्रत्येक संगणकाला एक विशिष्ट क्रमांक देतो, जी त्या संगणकाची त्या जाळ्यामधील विशिष्ट ओळख बनते. त्या ओळखीच्या आधारे तो संगणक त्या सर्व्हरशी आणि त्या जाळ्यातील अन्य संगणकांशी माहितीची देवाणघेवाण करू शकतो. याशिवाय त्या संगणकाचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या लॉग-इनच्या प्रक्रियेची आणि तिच्याशी निगडित माहिती साठवणुकीची जबाबदारी देखील सर्व्हरकडे गेली. आज तांत्रिकदृष्ट्या सुट्या संगणकावर लॉगिनची सोय अजूनही उपलब्ध असली, तरी तिचा वापर नगण्य झाला आहे. जाळ्यात जोडलेले संगणक आणि त्यांचे वापरकर्ते यांचे नियंत्रण बव्हंशी सर्व्हरकडे गेले आहे.
संगणकाचे जाळे निर्माण झाल्यामुळे स्वतंत्र कामांबरोबरच एकाहून अधिक व्यक्ती अथवा संगणकांना एकाच वेळी एखाद्या कामात सहभागी होणे शक्य झाले. त्यापूर्वी कामाची वाटणी करून, ती कामे वेगवेगळ्या वेळी अथवा एकाच वेळी पण वेगळ्या संगणकावर करत असत. सर्व्हरमार्फत त्याला जोडलेल्या संगणकांचे आणि त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींचे परस्परांना छेद देणारे गट तयार झाले. याचा याचा फायद घेऊन एकापाठोपाठ होणारी कामे, एकाच वेळी, समांतर पातळीवर करणे शक्य झाले. त्यातून एकूण कामाच्या पूर्तीसाठी लागणारा वेळ नाही तरी काळ घटवणे शक्य होते आहे. त्याशिवाय या सामूहिक कामांचे नियोजनदेखील त्या कामासाठी विकसित केलेल्या संगणक-प्रणालींमार्फत करणे सुकर झाले.
केवळ माहितीची देवाण-घेवाणच नव्हे तर सोबत काम करणाऱ्यांच्या कामाचे नियोजनदेखील परस्परांना उपलब्ध करून देण्याची सोय एकाच जाळ्यात जोडलेल्या संगणकावर, आउटलुकसारख्या माध्यमांतून उपलब्ध झाली. आपल्या कार्यालयीन अथवा वैयक्तिक कामाचे नियोजन करून त्याची कामे- टास्क या स्वरूपात, दिवस आणि वेळेसह आपल्या आठवड्याच्या/मासिक कामांचे नियोजन प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक कॅलेंडर अथवा प्लानर स्वरूपात आउटलुकसारख्या प्रणालीमध्ये साठवून ठेवते. त्याच्या इच्छेनुसार हे कॅलेंडर त्याच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीला उपलब्ध करून देण्याचा पर्याय उपलब्ध झाला. शिवाय एखाद्या सामूहिक कामाचे नियोजन करताना, ते ज्या वेळी नियोजित केले आहे त्याच वेळी त्यात सहभागी एखादी व्यक्ती अन्य कामांत व्यग्र असेल अशा स्वरूपाचा इशारा आऊटलुकसारखी प्रणाली स्वत:च देऊ लागली. त्यासाठी सर्व सहभागी व्यक्तींना व्यक्तिश: विचारून नियोजन करण्याची गरज उरली नाही. या शिवाय त्या कामासाठी आवश्यक असणारी माहिती त्या टास्कमध्येच समाविष्ट करून सर्व सहभागी व्यक्तींपर्यंत पोचेल याची व्यवस्था करणे शक्य झाले.
इतकेच नव्हे तर एकाच व्यक्तीला कार्यालयीन कामांव्यतिरिक्त स्वत:ची अशी वैयक्तिक वापराची, कौटुंबिक, आर्थिक अशी वेगवेगळी कॅलेंडर्स अथवा आराखडे (plans) तयार करणे आणि त्यांना वेळेच्या दृष्टीने सुसंगत राखणे शक्य झाले. इतकेच नव्हे तर कार्यालयीन, स्थानिक अथवा देशपातळीवरील सुट्यांचे असे आराखडे तयारच मिळू लागल्याने त्यांना थेट समाविष्ट करून त्याची नियोजनाशी सांगड घालणे शक्य झाले.
संगणक जाळ्याचा आणखी उपयोग म्हणजे एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाला एखाद दोन वाक्यातील मेसेज पाठवणे. यातून एकाच वेळी, परस्परावर अवलंबून असलेली दोन कामे करणाऱ्या व्यक्तींना त्यासंबंधाने काही माहिती, स्पष्टीकरणे परस्परांना विचारणे अथवा पुरवणे शक्य झाले. याच संकल्पनेवर पुढे मोबाईलमध्ये ‘शॉर्ट मेसेजिंग सर्विस’ अर्थात एस.एम.एस.ची सोय देण्यात आली. संगणकामार्फत पाठवल्या जाणाऱ्या अशा संदेशांच्या पूर्वी, असा संवाद हा मुख्यत: पत्रांमार्फतच होई. पण या आदानप्रदानाला काही मिनिटांचा नव्हे तर काही दिवसांचा वेळ लागे. त्यामुळे त्यातून माहितीची देवाणघेवाण सोयीची असली, तरी व्यक्ति-संवादाचे माध्यम म्हणून त्याला खूपच मर्यादा होत्या.
प्रत्यक्ष संवादासाठी पुढे टेलिफोनचे माध्यम उपलब्ध झाले. पण ते केवळ ध्वनि-माध्यम होते. आता संगणक हे एकच उपकरण ध्वनि, चित्र, चलच्चित्र यांची हाताळणीही करू शकत असल्याने त्याच्या मार्फत होणाऱ्या संवादाला या सर्वांची जोड देणे शक्य झाले. निव्वळ संवादापलीकडे जाऊन माहितीचे, दस्त-ऐवजांचे, कामाच्या नियोजनाचे, विभागणीचे, आदान-प्रदान करणे शक्य झाल्यामुळे हे माध्यम अधिकच महत्त्वाचे ठरू लागले. यातून संगणकवर ‘ईमेल’ या बहुउपयोगी माध्यमाचा जन्म झाला.
‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस’ या प्रणालीमध्ये एमएस वर्ड आणि एमएस एक्सेल या अनुक्रमे दस्त आणि गणिती प्रक्रियांसाठी असलेल्या उप-प्रणालींसोबत असलेल्या ‘आउटलुक’ या प्रणालीच्या कार्यक्षेत्रात निव्वळ नियोजनाबरोबरच या ईमेल्सचे आदानप्रदान करण्याची सोयही समाविष्ट केलेली आहे. पण ‘मायक्रोसॉफ्ट’प्रमाणेच इतरही कंपन्यांनी कार्यालयीन वापराच्या या तीन प्रकारच्या प्रणाली समाविष्ट असलेल्या आपल्या संगणक-प्रणाली बाजारात आल्या आहेतच.
ईमेल पाठवणारी व्यक्ती आणि ज्याला पाठवली ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रणाली वापरत असतील तरीही पाठवलेली ईमेल ज्याला पाठवली त्याला वाचता यायला हवी. यासाठी ईमेल ही संकल्पना अशा संगणक-प्रणाली निरपेक्ष राहील याची दक्षता घेण्यात आलेली आहे. यासाठी या सर्व प्रणालींना समजावेत असे नियम पाळणारा संगणकीय दस्त म्हणून ईमेलची निर्मिती झाली आहे. या नियमांना प्रोटोकॉल (protocol) म्हटले जाते. एकूणच दोन संगणकांमधील, दोन संगणक-प्रणालींमध्ये सुसंवाद राहावा यासाठी असे प्रोटोकॉल तयार केले जातात नि त्या नियमांच्या अंतर्गत राहून दोन भिन्न ईमेल प्रणालींनी केलेली परस्पर देवाण-देवाण सार्थक होईल याची दक्षता घेतली जाते. एकमेकांशी बोलताना दोन व्यक्ती ज्याप्रमाणे दोघांना समजणाऱ्या एकाच बोली-भाषेचा उपयोग करतात, तसाच काहीसा हा प्रकार म्हणता येईल.
पण एका लॉग-इन नावाने दुसऱ्या तशाच नावाकडे ईमेल माहिती पाठवण्यात एक अडचण होती. ती म्हणजे ते लॉग-इन नाव त्या संगणक-जाळ्यापुरते मर्यादित होते. त्यामुळे कार्यालयीन माहिती ईमेलने पाठवल्यास ती फक्त कार्यालयीन संगणकावरच वाचता येईल अशी अडचण होती. त्यामुळे संवादाचे हे माध्यम केवळ एकाच कार्यालयात अथवा संगणक-जाळ्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना वापरता येई. ही अडचण दूर करून जगात कोणत्याही व्यक्तीला अशी ईमेल पाठवता यावी यासाठी ‘ईमेल आयडेंटिटी’ किंवा (email id) ही आणखी एक आभासी ओळख माणसाने निर्माण केली. जरी ती एका सर्व्हरशी (उदाहरणार्थ gmail) निगडित असली तरी ही ओळख फक्त त्या व्यक्तीची होती. पुन्हा अंतर्गत जाळ्याप्रमाणेच काही नियम (protocol) पाळून कोणत्याही वेगळ्या सर्व्हरशी निगडित email id ला अन्य सर्व्हरशी निगडित id करवी ईमेल पाठवणे शक्य व्हावे, यासाठी त्या दोन सर्व्हरमध्ये एका दुव्याची किंवा अशा सर्व्हर्सच्या एका जागतिक जाळ्याची गरज होती. ‘इंटरनेट’ या नावाने असे जाळे लवकरच अवतरले.
डॉ. मंदार काळे, संख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.
(लेखाचे छायाचित्र – श्रेय: eblast-email-marketing.weebly.com)
COMMENTS