२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत

२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत

स्फोटांमध्ये बाहेर पडणारी समस्थानिके महासागरांच्या पृष्ठभागापासून ६.५ किमी खोल अंतरावर राहणाऱ्या चिमुकल्या सजीवांच्या शरीरामध्ये सापडल्यामुळे शास्त्रज्ञांना हे समजले.

धगधगता व अस्वस्थ हाँगकाँग
पीएम केअर्सला चिनी कंपन्यांच्या देणग्या – काँग्रेसचा आरोप
इराणने चाबहार प्रकल्पातून भारताला वगळले

एका नवीन समस्येमध्ये, शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले आहे की मानवी कृतींमुळे निर्माण होणारी प्रदूषके अन्नसाखळी मार्फत जगातील महासागरांमधल्या सर्वात खोल भागांमध्येही अगदी जलद पोहोचतात. इतक्या खोलवरच्या सागरी जिवांच्या अन्नामध्ये ही प्रदूषके असतात असे दिसते.

चीनमधल्या काही संशोधकांनी ८ एप्रिल २०१९ मध्ये आपला अभ्यासप्रकाशित केला. त्यांनी अँफिपॉड नावाच्या चिमुकल्या जीवांचे निरीक्षण केले. हे जीव पृष्ठभागापासून ६,५०० मीटर किंवा त्याहून खोलवर राहतात. समुद्राच्या या भागाला हेडल झोन म्हणतात. हे नाव ग्रीक पुराणांमधील हेडीस नावाच्या पाताळाच्या देवावरून देण्यात आले आहे. या भागात पृथ्वीवरच्या काही अतिदूर आणि मानवी स्पर्श न झालेल्या जागा आहेत. संशोधकांच्या मते त्या ठिकाणची सामान्य वैशिष्ट्ये म्हणजे कमी तापमान, उच्च दाब, मर्यादित अन्न आणि वारंवार होणाऱ्या भूगर्भीय हालचाली. त्यामुळे या पाताळ देशातल्या रहिवाशांना त्यांचे अन्न कुठून मिळते याचा शोध घेतला तर अशा खोलीवर जैविक अनुकूलन कसे होते ते समजून घेणे शक्य होईल.

अँफिपॉड हे क्रस्टेशियन (कठीण कवचाचे प्राणी) असतात मात्र त्यांची प्रसिद्ध चुलत-मावस भावंडे म्हणजेच खेकडे, लॉबस्टर, झिंगे, कोळंबी यांच्यासारखे ते मोठे नसतात. या सर्वांना अनेक पाय आणि बाह्य कवच असते. फारसे ज्ञात नसणारे अँफीपॉड समुद्रकिनाऱ्यांवर आणि समुद्रात खोलवर आणि त्या दरम्यान सर्वत्र राहतात. ते समुद्राची साफसफाई करणारे असतात. पाण्यातल्या इतर वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत शरीरांवर ते जगतात आणि समुद्र स्वच्छ करतात. सजीव समुद्रात अती खोलीवरच्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतात हे समजून घेण्यासाठी अँफिपॉड हे संशोधनासाठी आदर्श सजीवमानले जातात. मानवी कृतींचा समुद्रात खोलवरच्या जीवनावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून जीवशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करतात.

वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशन (WHOI), मॅसेच्युसेट्स या संस्थेतील संशोधकांनी दिलेल्या अहवालानुसारअँफीपॉड हे खोल समुद्रातल्या इतर जीवांना तर खातातच, पण त्याबरोबर समुद्राच्या तळावर पडणाऱ्या सर्वच गोष्टी खातात, आणि पचायला अगदी कठीण अशा सामग्रीमधील पोषक द्रव्येही पुन्हा पर्यावरणाला परत करतात.

खोल समुद्र ही पृथ्वीवरील सर्वात मोठी पर्यावरणीय व्यवस्था आहे, परंतु ती पृष्ठभागापासून खूपच खोल आहे. मात्र, उथळ समुद्रातल्या प्रदूषकांचे तुकडे हळूहळू खाली बुडत जाऊन अखेरीस समुद्राच्या तळाशी विसावतात. या प्रवासात समुद्री प्राणी त्यांना खातात, त्यामुळे ही प्रदूषके प्राण्यांच्या शरीरात साठत जातात. हे प्राणी एकमेकांना खातात त्यामुळे प्रदूषके अधिकाधिक प्रमाणात साठण्यास सुरुवात होते.

अगदी आत्तापर्यंत, शास्त्रज्ञ असे मानत होते की अँफीपॉड हे खोल समुद्रात असलेल्या जीवांना खातात. पृष्ठभागाच्या जवळपासची जैविक सामग्री ते खात नाहीत. मात्र आता हेडल खोलीवरही एकत्र जमा झालेली प्रदूषके सापडल्याने शास्त्रज्ञांना त्यांच्या आजवरच्या गृहीतकांची पुनर्तपासणी करणे भाग पडले आहे. उदाहरणार्थ, न्यूकॅसल युनिव्हर्सिटी, यूके येथे खोल समुद्रातील जीवशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते असलेले अॅलन जेमिसन यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी समुद्रसपाटीखाली ७,००० मीटर ते १०,८९० मीटर या खोलीवरील पॅसिफिक रिमच्या भोवतीच्या सहा खंदकांचा अभ्यास केला. २०१४ मध्ये त्यांनी सादर केलेल्या अहवालातत्यांनी समुद्रात अत्यंत खोलवरही मायक्रोप्लास्टिक दूषित पदार्थ आढळल्याचे लिहिले आहे.

यापूर्वीच्या कामाची पुष्टी

चिनी गटाने प्लास्टिकचा शोध घेतला नाही. त्यांनी मागच्या शतकातील सर्वात भयंकर गोष्टीच्या, अणुबाँब चाचण्यांच्या अवशेषांचा शोध घेतला. त्यांनी विषुववृत्ताच्या जवळच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागरातील तीन खंदकांमध्ये विशेषतः कार्बन-१४ समस्थानिकांचा शोध घेतला, जे किरणोत्सारी असतात. त्यांना ते सहज सापडले कारण १९५० आणि १९६० मधील आण्विक चाचण्यांमुळे वातावरणात नैसर्गिकपणे तयार होणारे C-१४ चे प्रमाण दुप्पट झाले होते. या चाचण्यांमुळे तयार होणारे C-१४ सहजपणे पृष्ठभागीय समुद्रात आणि जमिनीवरच्या कार्बन साठ्यातही झटपट मिसळून गेले.

त्यांच्या डेटाच्या आधारे, त्यांना असा निष्कर्ष काढता आला की सॅन दिएगो येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीमध्ये समुद्री जीवशास्त्रज्ञ असणारे डग बार्टलेट यांनी म्हटल्याप्रमाणे हेडल अँफीपॉड त्यांचे अन्न पृथ्वीच्या आतील खोलवरच्या प्रक्रियांमधून तयार होणाऱ्या कार्बनपासून मिळवत नाहीत, तर पृष्ठभागावरील सजीवांपासूनच मिळवतात. संशोधकांनी त्यांच्या निबंधामध्ये असेही जोडले की मानवनिर्मित प्रदूषण हे अन्नसाखळीमार्फत अगदी खोलवरच्या समुद्री खंदकांपर्यंत वेगाने पोहोचू शकते हेच यातून दिसून येते.

हे निष्कर्ष असेही सुचवतात, की हेडल अँफीपॉडचे आयुष्य अपेक्षेपेक्षा खूपच दीर्घ, १० वर्षांहून अधिक असते. हे उथळ पाण्यात राहणाऱ्या सामान्य अँम्फीपॉडपेक्षा चौपटीहून अधिक आहे. संशोधक त्यांच्या निबंधात लिहितात, “ही गुणवैशिष्ट्ये हेडल झोनमधील टोकाच्या वातावरणामध्ये अँफीपॉडच्या झालेल्या उत्क्रांतीचा परिणाम असावीत, आणि या उत्क्रांतीच्या मागील प्रक्रियेचा अभ्यास करण्यामुळे जीवन आणि उत्क्रांती यांच्याबद्दलचे आपले ज्ञान विस्तारेल.”

चिनी संशोधकांनी हेडल सजीवांमध्ये C-१४ च्या साठ्यांची तपासणी आपणच पहिल्यांदा केली असल्याचा दावा केला असला तरी, बार्टलेट म्हणतात त्यांनी जुन्याच डेटाची पुष्टी केली आहे. त्यांचे सहकारी लिसा लेविन आणि जेमिसन यांच्या नेतृत्वाखालील “हेडल अँफिपॉडच्या पूर्वीच्या अभ्यासांचे निष्कर्ष पाहता हे निष्कर्ष फारसे आश्चर्याचे नाहीत,” ते म्हणाले, “पण रेडिओकार्बन पद्धत वापरून पूर्वीच्या कामाची पुष्टी झाली हे चांगलेच आहे.”

आण्विक राख दीर्घकाळ टिकून राहणारी म्हणून कुप्रसिद्ध आहे. आण्विक चाचणीमधून मुक्त होणारे किरणोत्सारी पदार्थ वातावरणात, गाळात आणि मातीत आणि सजीव ऊतींमध्ये दीर्घ काळ रेंगाळत राहतात. आपल्या उपकरणांना १९५० मध्ये केलेल्या अनेक चाचण्यांमधून मुक्त झालेली काही समस्थानिके, ज्यात C-१४ चाही समावेश होतो, अजूनही मोठ्या प्रमाणात साठून राहिलेली सापडतात. एका अंदाजानुसारअशा आण्विक राखेमुळे प्रदूषित झालेले भूजल पुढील हजारो वर्षे पिण्यायोग्य राहत नाही.

म्हणूनच अँफीपॉडसारखे पृष्ठभागापासून इतक्या दूरवरचे जलचरसुद्धा या प्रदूषणाच्या परिणामापासून मुक्त नाहीत हे अत्यंत चिंताजनक आहे. या शतकात माणसाचे अस्तित्व धोक्यात आणणारी गोष्ट शीतयुद्ध नसून चंगळवाद आहे आणि संपूर्ण जगभर मायक्रोप्लास्टिकचा पूर येत आहे हे लक्षात घेतले तर ती चिंता अजूनच वाढते.

टी. व्ही. पद्मा, या विज्ञानविषयक लिखाण करणाऱ्या मुक्त पत्रकार आहेत.

मूळ लेखयेथे वाचावा.

छायाचित्र – १ मार्च, १९५४ रोजी बिकिनी अटोल येथील अमेरिकेची कॅसल ब्राव्हो आण्विक चाचणी. छायाचित्र: यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0