दिल्लीत ‘आप’चा एकतर्फी विजय

दिल्लीत ‘आप’चा एकतर्फी विजय

धर्मावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपने जोरदार प्रयत्न करूनही आणि केजरीवाल यांना दहशवादी ठरवण्याचा प्रयत्न करूनही आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये ६३ जागा मिळविल्या.

झारखंडनंतर आता दिल्लीचा कौल कुणाला?
४० टक्क्याहून मुस्लिम टक्केवारीचे ५ मतदारसंघ ‘आप’कडे
केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात उतरतील का?

दिल्लीमध्ये ७० पैकी ६३ जागा जिंकून आम आदमी पक्षा(आप)ने एकतर्फी विजय संपादन केला आहे. तर भारतीय जनता पक्षाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आम आदमी पक्षाला ५४ टक्के मते मिळाली, तर भाजपला ३९ टक्के मते मिळाली आहेत. कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण ४ टक्के मते मिळाली आहेत. भाजपला २०१५ साली ३ जागा आणि ३२ टक्के मते मिळाली होती, तर आम आदमी पक्षाला ६७ जागा आणि ५४ टक्के मते मिळाली होती.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, आतीशी मार्लेचा, गोपाल राय, असे आम आदमी पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते निवडून आले आहेत.

दिल्ली विधानसभेच्या केवळ ७० जागा असताना आणि दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसतानाही भाजपने प्रचारासाठी ११ मुख्यमंत्री ७० मंत्री आणि २०० खासदारांना प्रचारामध्ये आणले होते.

भाजपचे अमित शहा, प्रवेशसिंग वर्मा, मनोज तिवारी, प्रकाश जावडेकर अशा अनेक नेत्यांनी दिल्लीमध्ये चाललेल्या शाहीनबाग आंदोलनाचा सतत संदर्भ देत केजरीवाल यांना लक्ष्य केले आणि हिंदू-मुस्लीम धार्मिक धृवीकरणचा प्रयत्न केला होता. अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना केली होती.

सीएएच्या विरोध प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शाहीन बागच्या ओखला मतदार संघामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्लाह खान यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना २८५०१ मतांच्या फरकाने पराभूत केले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने दिल्लीतल्या सातही लोकसभा जागा ४६.६ टक्के मतांनी जिंकल्या होत्या. तर २०१५च्या विधानसभा निवडणुकांत ‘आप’ला ५४.३ टक्के मते मिळून त्यांनी ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपची मतांची टक्केवारी ३२ वर आली होती तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण त्यांना ९ टक्के मते मिळाली होती.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने ५८ टक्के मते मिळवून पुन्हा सातही जागा जिंकल्या तर काँग्रेसने २२ टक्के मते मिळवली. आपला १८ टक्के मते मिळाली होती.

हा केवळ दिल्लीचा नाही, तर भारतमातेचा विजय असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले आहे. दिल्लीमधील निवडणुकांचे निकाल स्पष्टपणे समोर आल्यानंतर ‘आप’च्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

केजरीवाल म्हणाले, “दिल्लीकतील जनतेने तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. हा माझा नाही तर २ कोटी दिल्लीकरांचा विजय आहे. स्वस्त वीज, चांगले शिक्षण मिळत असलेल्या, प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे. आज देशात नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. जो शाळा बनवणार, मोहल्ला क्लिनिक बनवणार, जो २४ तास वीज देणार, त्यालाच मत मिळणार, हा संदेश दिल्लीकरांनी दिला आहे.”

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले असून, दिल्लीत लागलेल्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. भाजपा हा पक्ष देशावरची आपत्ती आहे. ही आपत्ती दूर करायची असेल, तर वेगळे प्रयोग झाले पाहिजेत. किमान समान कार्यक्रमांवर विविध पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल याचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “केजरीवाल यांनी ‘जन की बात’ देशाला दाखवून दिली. आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही, हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे.” तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही,” असं उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ‘आप’ची रणनीती ठरवली होती त्यांनी दिल्लीच्या मतदारांचे आभार मानले आहेत. दिल्लीकरांनी भारताच्या आत्म्याचं रक्षण केले असल्याचे प्रशांत किशोर यांनी ट्वीट करून म्हंटले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या, “दिल्लीत भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील.” समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: