मेरी आवाज ही पहचान है…

मेरी आवाज ही पहचान है…

(‘देश की सुरीली धडकन’ असणाऱ्या ‘विविध भारती’च्या स्थापनेला आज म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी ५३ वर्षं पूर्ण होत आहेत. श्रोत्यांना पंचरंगी मनोरंजनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर १९५७ रोजी सुरू झालेल्या ‘विविध भारती’ने अनेक अजरामर कार्यक्रम दिले, अनेक उत्तमोत्तम कलाकार दिले. यासोबतच अनेक दिग्गजांनीही ‘विविध भारती’च्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यापैकीच एक नाव म्हणजे बिनाका गीतमालाचे सर्वेसर्वा आणि रेडिओच्या दुनियेतील जगप्रसिद्ध आवाज अमीन सायानी. ‘विविध भारती’च्या स्थापनादिनाच्या निमित्ताने त्यांची मुलाखत.

महासंकट आणि हॉलीवूड
कस्तुरी : न्यूनगंडात दडपलेल्या मनाचा आत्मशोध
‘नोमडलँड’ला ऑस्कर

“नमस्ते बहनो और भाईयो | मैं आप का दोस्त अमीन सायानी बोल रहा हूँ |” हे जादुई शब्द कानावर पडताच क्षणी रेडिओ आणि विविध भारतीच्या कोणत्याही चाहत्याला ‘बिनाका गीतमाला’च्या युगात घेऊन जाता आणि त्यांच्या कानात घुमायला लागतो तो अमीन सायानी नावाच्या जादुगाराचा खासमखास आवाज. अमीन सायानी, जगातील सर्वात गाजलेल्या रेडिओ निवेदकांपैकी एक ज्यांनी जवळपास अर्ध्या शतकाच्या आपल्या कारकिर्दीत ५४,००० कार्यक्रमांची निर्मिती केली आणि त्यांना आवाज दिला. हा एक लिमका बुक विक्रम आहे.

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये प्रो. डॉ. उज्जला बर्वेंच्या मार्गदर्शनाखाली रेडिओची इंटर्नशिप करत असताना मी या खोल, गंभीर, तरीही आपल्याशा वाटणाऱ्या आवाजाच्या प्रेमात पडले. नंतर जेव्हा एका रेडिओ निर्मात्याची किंवा रेडिओ उद्घोषकाची मुलाखत घेण्याची असाईनमेंट रेडिओ पत्रकारितेच्या विषयात मिळाली तेव्हा साहजिकच जे पहिलं नाव डोक्यात आलं ते होतं अमीन सायानींचं. एकमेवाद्वितीय आवाजाची देणगी लाभलेल्या या आभाळाएवढ्या माणसाची मुलाखत घेणं हे मी उघड्या डोळ्यांनी पाहात असलेलं दिवास्वप्नच होतं, पण मला अशी वेडी स्वप्नं पाहायला आवडतातच, त्यामुळे एका दुपारी मी कुठूनतरी त्यांचा ईमेल आयडी शोधून काढला, त्यांना मेल टाकला आणि मला मुलाखत देण्याची विनंती केली. एकतर ईमेल आयडी बरोबर असल्याची शाश्वती नाही, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे इतका मोठा आणि प्रसिद्ध माणूस, त्यामुळे उत्तर येईल अशी अपेक्षा अजिबातच नव्हती. पण एक डुलकी काढून मी उठले तेव्हा माझ्या मेलचं उत्तर माझी वाट पाहात बसलेलं होतं! अतिशय सुंदर शब्दांत लिहिलेलं, “अंकिता बेटी” अशा मायन्याचं. त्यांनी लिहिलं होतं की ते मला २० मिनिटांची मुलाखत देतील, एका अटीवर. मी आधी माझे प्रश्न त्यांना पाठवावेत, जेणेकरून त्यांना तशी तयारी करता येईल. साहजिकच, माझे हात स्वर्गाला टेकले! त्यानंतर दोन आठवडे अनेक मेल्सची देवाणघेवाण झाली, “सर” ते “अमीन अंकल” अशी बढती मला मिळाली आणि १ ऑक्टोबरला दुपारी त्यांच्या मुंबईला गेट वे ऑफ इंडियापासून अगदी जवळ असलेल्या महाकवी भूषण मार्गावरच्या त्यांच्या ऑफिसची बेल मी वाजवली.

दोन-पाच मिनिटांतच “द अमीन सायानी”, फोटोत पाहिले होते त्यापेक्षा बरेच वयस्कर, पण तरीही तितकेच हँडसम, निळा शर्ट आणि पँट घातलेले, माझ्यासमोर आले. चष्म्यामागे असूनही तितकेच भेदक आणि तीक्ष्ण असलेले त्यांचे निळसर हिरवे डोळे त्यांनी माझ्यावर रोखले आणि क्षणभर वाटून गेलं की माझा एक्स-रेच काढतायत! त्यांनी मला आत येऊन बसायला सांगितलं, माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले, आधीच येऊन बसलेल्या एका टिपिकल “फॅन” माणसाला चटकन वाटेला लावलं आणि माझ्याकडे वळले. माझ्याकडून त्यांनी प्रश्नांची यादी घेतली आणि तपासायला लागले. हातातल्या पेनने भराभर काही चुका दुरुस्त केल्या, एक प्रश्न कापून टाकला (माझ्या डोक्यात त्याजागी विचारण्याजोगा दुसरा प्रश्न तयार होताच!) आणि म्हणाले, “मेरा नाम अमीन सयानी नही, सायानी है | वह ‘सा’ है|” मग त्यांनी मला सुरू करण्याची खूण केली. मी मोबाईलचा व्हॉईस रेकॉर्डर सुरू केला आणि आमच्या मधल्या टेबलावर ठेवला. अमीन अंकलच्या अंगात रेडिओ किती भिनलाय याची पहिली साक्ष त्यावेळी मिळाली. त्यांनी लगेच मला रेकॉर्डिंग व्यवस्थित होतंय ना हे तपासायला सांगितलं. मी हसून त्यांना तो काम करत असल्याची खात्री दिली आणि मला शिकवलेली सगळी मुलाखततंत्रं एकवटून पहिला प्रश्न विचारला.

त्यांचा कमाल आवाज आणि शैलीसोबतच आणखी एका गोष्टीसाठी ते प्रसिद्ध आहेत, ती म्हणजे श्रोत्यांना संबोधण्याची त्यांची वेगळी पद्धत. आपण नेहमी “भाईयो और बहनो” असं ऐकतो, पण ते मात्र दरवेळी “बहनो और भाईयो” म्हणायचे. माझा पहिला प्रश्न याचबद्दल होता ज्याचं उत्तर त्यांनी फारच साध्या आणि गोड पद्धतीने दिलं, की ते ‘लेडीज फर्स्ट’वर विश्वास ठेवतात आणि स्त्रीयांचा आदर करतात. ते म्हणाले, “छोटी हो तो मेरी बेटी बन जाती है, जरा बड़ी हो तो बहन बन जाती है, और बहुत बड़ी हो तो मैं उनको मामी या चाची कहता हूँ |

माझा दुसरा प्रश्न होता रेडिओ सलोनमधून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या पदार्पणाबद्दल. त्यांच्या उत्तरातून मला कळलं की त्यांनी या कामाची सुरुवात आकाशवाणीच्या इंग्लिश विभागातून बालकलाकार म्हणून केली होती. त्यांचे मोठे भाऊ हमीद सायानी हे अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्व होते आणि ते आकाशवाणीचे प्रसिद्ध उद्घोषक होते. गंमतीदार हसत त्यांनी मला एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते शाळेत होते. ‘हमीद भाईं’नी त्यांना एक कविता म्हणायला सांगितली आणि त्यावेळी नवीनच आलेल्या वायर रेकॉर्डरवर त्यांचा आवाज रेकॉर्ड केला. त्यांना ती कविताही आठवते. ‘Tartary’.

“If I were Lord of Tartary,

Myself, and me alone,

My bed should be of ivory,

Of beaten gold my throne…”

अमीन सायानी हे नाव आणि त्यांचा आवाज त्यावेळी आणि आजही इतका का गाजतो हे मला कळण्यासाठी या चार ओळी पुरेशा होत्या. वयाच्या ८७व्या वर्षीही त्यांच्या आवाजतली जादू तशीच आहे. पण हा किस्सा घडला त्यावेळचं त्यांचं वय आणि वायर रेकॉर्डरच्या ध्वनीमुद्रणाचं तंत्रज्ञान यामुळे जेव्हा त्यांनी ही कविता पुन्हा ऐकली, तेव्हा त्यांचा आवाज ‘चीं चूं, चीं चूं’ असा आला आणि ते चटकन म्हणाले, “हमीद भाई, इट साऊंड्स टेरिबल!” यानंतर आपल्या थोरल्या भावाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आकाशवाणीच्या बालकार्यक्रम विभागात काम करायला सुरुवात केली.

अमीन यांच्या आई, ज्यांना ते ‘अम्मा’ म्हणतात, महात्मा गांधीजींच्या शिष्या होत्या. बापूंनी त्यांना एक पाक्षिक चालू करायला सांगितले जे तीन स्थानिक भाषांमध्ये असेल- हिंदुस्तानी, गुजराती आणि उर्दू. या पाक्षिकाचं नाव होतं ‘रहबर’ म्हणजेच मार्गदर्शक. अमीन अंकलनी या पाक्षिकासाठी कारकून म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते सांगतात की इथे ते हिंदुस्तानी वाचू लागले आणि या भाषेत लेख लिहू लागले. पण त्यांचं शिक्षण इंग्लिश आणि गुजरातीत झालेलं असल्यामुळे या दोन्ही भाषांचा त्यांच्या हिंदी उच्चारांवर फारच प्रभाव होता. नंतर ते शिक्षणासाठी ग्वाल्हेरच्या सिंदिया विद्यालयात केले आणि हिंदी आणि उर्दू शिकले.

अमीन यांना अजूनही तो दिवस लख्ख आठवतो ज्यादिवशी भारत इंग्रजी सत्तेतून मुक्त झाला. त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने या दिवशी शाळेत तिरंगा फडकवला आणि देशभक्तिपर गाणी गायली. अमीन अंकलही या गटात होते. ते सांगतात की त्यादिवशी त्यांनी ठरवलं की “नए हिंदुस्तान का नया शागिर्द, नया विद्यार्थी” व्हायचं. त्यांनी हिंदी उद्घोषक व्हायचं ठरवलं आणि मुंबईला परतल्यानंतर आकाशवाणीचा दरवाजा ठोठावला. त्यांची परीक्षा घेतली गेली आणि त्यांचं वाचन चांगलं होतं, तरीही बोलण्यातल्या “गुजरातीपन” आणि “अंग्रेजियत”साठी त्यांना नापास करण्यात आलं! (आकाशवाणीने द अमीन सायांनींना नापास केलं होतं!)

साधारण याच काळात रेडिओ सिलोनने मुंबईत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती आणि हमीद सायानी तिथे कार्यक्रम निर्देशक म्हणून काम पाहात होते. हिंदी आवाजाच्या दुनियेतले अनेक दिग्गज तिथे कार्यरत होते, त्यामुळे हमीद भाईंनी पुन्हा एकदा अमीन अंकलना उच्चारांवर काम करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ते सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकत होते आणि याच महाविद्यालयाच्या स्टूडिओमध्ये रेडिओ सिलोनच्या कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग होत असे. ते या रेकॉर्डिंग्सना जाऊ लागले. एकदा असंच रेकॉर्डिंग चालू होतं आणि ‘ओव्हल्टीन’ या एनर्जी ड्रिंकची जाहिरात वाचणारा इसम गायब होता. त्यावेळी बालगोविंद श्रीवास्तव यांनी हमीद सायानींचा छोटा भाऊ म्हणून अमीन अंकलना ही संधी दिली. सुरुवातीला “यह जो शक्तिदायक पेय है ओव्हल्टीन…” हे शब्द त्यांनी अशा काही आवेशाने म्हटले की बालगोविंदजी त्यांना म्हणाले, “बेटा, यह कुश्ती का आखाडा नही है |” सरावाने त्यांना हे जमलं आणि नंतर ते ही जाहिरात नेहमीच वाचू लागले, ज्याच्या मोबदल्यात त्यांना ओव्हल्टीनचा एक छोटा डबा मिळत असे!

साधारण याच सुमाराला आकाशवाणीने हिंदी चित्रपटसंगीतावर बंदी आणली आणि या संधीचं सोनं करत रेडिओ सिलोनने त्यांच्या तूफान गाजलेल्या ‘बिनाका हिट परेड’ या इंग्लिश कार्यक्रमाच्या धर्तीवर हिंदी कार्यक्रम आणण्याचा निर्णय घेतला. त्यांना असा एक हिंदी निर्माता हवा होता जो गाणी निवडेल, संहिता लिहील, बोलेल, एडिटिंग करेल, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सिलोनला पाठवेल आणि श्रोत्यांकडून आलेल्या पत्रांमधून निवडही करेल. या सगळ्या कामांसाठी बिदागी होती २५ रुपये! साहजिकच इतर सर्वांनी कामाचं प्रमाण आणि मानधनाची कमतरता पाहून हे काम नाकारलं आणि अमीन अंकलचा रेडिओ सिलोनमध्ये प्रवेश झाला.

अमीन सायानी या नावाशी समानार्थी शब्दाप्रमाणे जोडल्या गेलेल्या आणि अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘बिनाका गीतमाला’बद्दल मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मूळ इंग्लिशमधल्या ‘बिनाका हिट परेड’ला त्यावेळी दर आठवड्याला २००-३०० पत्रांचा प्रतिसाद मिळायचा. त्यामुळे हिंदी कार्यक्रमाला ५०-१०० पत्रं जरी आली तरी कंपनीला चालणार होतं. पण त्यावेळी रेडिओ सिलोन लोकप्रियतेच्या शिखरावर होता आणि संपूर्ण आशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युरोप आणि अमेरिकेच्याही काही भागांमध्ये ऐकला जायचा. अमीन अंकलनी प्रचंड मेहनत करून, योग्य त्या जागी कविता, विनोद, शेरोशायरी पेरून या कार्यक्रमाचा पहिला भाग तयार केला, पाठवून दिला आणि देवाकडे प्रार्थना केली, “ऐ खुदा, कहते थे वह लोग की साहब, सौ letters भी आ जाए तो चलेगा | मगर मुझे please सौ letters नहीं चलेंगे | कम से कम तीन-चार-पांचसौ आ जाए तो बहुत अच्छा है | दुवा माँगी मैंने |” त्यांची इच्छाशक्ती फारच जबरदस्त असली पाहिजे, त्यांच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाला तब्बल ९,००० पत्रं आली! इतक्या वर्षांनंतर मला हे सांगतानाही त्यांच्या चेहऱ्यावरून तोच आनंद ओसंडून वाहात होता!

काही वर्षांनंतर रेडिओ सिलोनला काही तांत्रिक अडचणी यायला लागल्यामुळे कार्यक्रम ऐकताना त्रास होऊ लागला, ज्यामुळे श्रोते दुरावले. त्याचवेळी नुकत्याच सुरू झालेल्या आकाशवाणीच्या ‘विविध भारती’ने संधीचं सोनं केलं. अमीन विविध भारतीकडे आले आणि त्यांच्यासोबत आली त्यांची ‘बिनाका गीतमाला’. हा कार्यक्रम दर आठवड्यातील सर्वात प्रसिद्ध आणि गाजलेली गाणी सांगत असे. सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम अर्ध्या तासाचा होता तेव्हा आठ, नंतर तो एक तासाचा झाल्यानंतर सोळा. पण ही गाणी निवडली कशी जायची? सुरुवातीला गाण्यांच्या फर्माइशींवरून ही गाणी ठरायची. पण काही काळाने त्यांना अशी स्पॉन्सर्ड पत्रं यायला लागली. याबाबतचा एक किस्सा त्यांनी मला सांगितला. अशीच एकदा एकाच गाण्याची फर्माइश करणारी, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली अनेक पत्रं त्यांना मिळाली. पण जेव्हा त्यांनी ही पत्रं उलटली, त्या सगळ्यांवर एकच पोस्टाचा शिक्का होता, ‘कळबादेवी, मुंबई’! मग त्यांनी रेडिओ क्लबची कल्पना पुढे आणली. २० जणांचा समूह तयार करायचा, सर्वांनी एकत्र येऊन बिनाका गीतमाला ऐकायची आणि आपल्या आवडीनुसार पुढच्या गीतमालासाठी पत्रं पाठवायची. ५०-१०० पत्रं येण्याच्या क्षुल्लक अपेक्षेसोबत सुरू झालेली बिनाका गीतमाला जवळपास अर्धं शतक चालली आणि त्यावेळचा सर्वात लोकप्रिय आणि आशियातला सर्वात जास्त काळ चाललेला रेडिओ कार्यक्रम ठरली.

माझा पुढचा प्रश्न जो होता तो विचारायला त्यांचं माझ्या मेलला उत्तर आल्यापासूनच माझी जीभ फारच शिवशिवत होती. त्यांना येणारी सगळी पत्रं, मेल्स ते वाचतात आणि त्यांना उत्तरं देतात का? त्यांनी मला सांगितलं की आजही त्यांना साधारण १५-२०-३० पत्रं दर आठवड्याला येतात. रोज ५-७ पत्रं असं करून ते ती सगळी वाचतात आणि छोटी छोटी उत्तरं देतात. याबाबतीतला त्यांचा निकष मोठा गंमतीशीर आहे. जर त्यांना असं वाटलं की हे पत्र पाठवणारी व्यक्ती ही चांगला माणूस, चांगली स्त्री, चांगली मुलगी/मुलगा आहे, त्या व्यक्तीला खरोखरच संगीतात आवड आहे तर ते उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. ते म्हणाले, “इसलिए जब तुम्हारा letter आया, मुझे अच्छा लगा कि भाई, this girl seems to be really interested, तो मैंने जवाब दे दिया तुमको |” हे ऐकून मला मूठभरच काय, चांगलं किलोभर मांस चढलं!

माझ्या पुढच्या प्रश्नाबद्दल मलाच फार उत्सुकता होती. जर अमीन सायानी आवाजाच्या दुनियेत आले नसते तर ते काय झाले असते? आणि त्यांचं उत्तर अगदीच अनपेक्षित होतं! ते म्हणाले, “मैं चाहता था कि मैं हिन्दुस्थान का Prime Minister बनूँ |” अमीन अंकलवरही महात्मा गांधींच्या विचारांचा खूप प्रभाव आहे. त्यांची  ‘सर्वधर्म प्रार्थने’ची कल्पना त्यांना फार भावते. सगळ्या धर्मांचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि ज्या प्रकारे ते याचं सार मांडतात, ते फार सुंदर आहे. ते म्हणतात, सगळे धर्म हे देवाचं एकत्व सांगतात. आपण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतींनी त्याला समजून घेतो आणि त्याची आराधना करतो. एवढं सांगून त्यांनी आपल्या धीरगंभीर आवाजात ऋग्वेदातली ऋचा म्हटली, “एकम् सत् विप्रा बहुधा अवधंती”. नंतर लगेचच कुराणातला श्लोक म्हटला, “अल्-हमदु लिल्लाही रब इल-आलमी |” (जो जगन्नयंता आहे त्या अल्लाची आराधना करा.) अमीन स्वतः संगीताचे मोठे जाणकार चाहते आहेत, त्यामुळे त्यांनी ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ हे गाणंही लगोलग समोर पेश केलं. ते म्हणाले, आवाज, राष्ट्रप्रेम, धार्मिक ऐक्य, मैत्रीभावना याबद्दलच्या त्यांच्या ध्यासाने त्यांना वाढवलं, बळ दिलं. इथे विषयापासून जरासे दूर जात त्यांना फाळणीचे दिवस आठवले. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी ज्याप्रकारे आपल्याला मूर्ख बनवलं आणि हिंदुस्तानाचे तुकडे केले, ते पाहून त्यांना वाईट वाटलं. “मैं politics join कर के कोशिश करता कि देश की सेवा करूँ अलग अलग तरह से | Social work के साथ, politics के साथ | और सब को मिलाने की कोशिश करूँ, ताकि आजकल जो गडबड हो रही है हमारे देश में, वह कभी ना होती |” आता त्यांचा आवाज भावनाविवश होऊन बारीक थरथरत होता.

याच उत्तराचा धागा पकडून मी त्यांना विचारलं की त्यांना अजूनही राजकारणात रस वाटतो का? ते म्हणाले की त्यांनी तो रस घेणं थांबवलंय कारण आता राजकारण गलिच्छ झालंय. लैंगिक शोषण, बलात्कार, भ्रष्टाचार, लाचखोरी या सगळ्या गोष्टींचा पाढा त्यांनी एका कमालीच्या लयीत म्हटला आणि म्हणाले, “ऐसी अगर politics है, तो मुझे नहीं आना है उसमें |” त्यांचं आजच्या राजकारणाचं वर्णन ऐकून माझी उत्सुकता चाळवली की मग जेव्हा त्यांना राजकारणात जायचं होतं आणि पंतप्रधान व्हायचं होतं तेव्हाचं राजकारण कसं होतं? यावर ते पुन्हा काहीसे भूतकाळात गेले आणि म्हणाले की ज्याप्रकारे ब्रिटिशांनी आपल्याला माकडासारखं नाचवलं आणि आपला देश तोडला, ते वेदनादायक होतं. ते बोलून गेले, “मैंने कहाँ, यह अब नहीं कर सकता, चलो जो कर सकूँ, करूँ |” त्यांच्या आवाजातली वेदना अजूनही तशीच आहे.

माझा पुढचा प्रश्न होता तो आवाजाच्या दुनियेपलीकडच्या अमीन सायानींबद्दल. या प्रश्नामुळे मुलाखतीचं वातावरण पुन्हा एकदा जरा खेळकर झालं आणि त्यांनी एक पूर्ण वेगळं जग माझ्यासमोर ठेवलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच, खट्याळ चमक आली आणि ते सांगू लागले की राज कपूर आणि देवानंद यांच्या केसांची आणि कपड्यांची स्टाईल ते कशी कॉपी करायचे! त्यावेळी त्यांना फिल्म स्टार व्हायचं होतं! पण याबद्दल मात्र त्यांचा दावा देवाविरुद्ध आणि काही काळ त्यांना लागलेल्या बॉक्सिंगच्या नादाविरुद्ध आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा चेहरा वाकडातिकडा आहे! (का हे तो देवच जाणे, कारण मला मात्र ते फारच हँडसम दिसतात!) त्यांनी सांगितलं की कसे हे फिल्मस्टार होण्यासाठी दोनतीन लोकांना भेटले, पण अमीन अंकलचा चेहरा बघून ते लोक नाराज होऊन निघून गेले आणि त्यांचं हे स्वप्न स्वप्नर राहिलं!

पण अमीन अंकलनाही स्वप्नं बघायला आवडतात, त्यामुळे त्यांनी त्यांचं एक स्वप्नही मला सांगितलं, जिथे त्यांचा सिनेमा रॉयल ओपेरा हाऊसमध्ये लागलेला आहे. ते जातात, तिकीट काढतात आणि आत जायला लागतात तर दारात उभा असलेला पठाण त्यांना अडवतो. ते कारण विचारतात तेव्हा तो सांगतो की सिनेमाच्या निर्मात्यांनीच त्याला सांगितलंय की शो सुरू झालाय, त्यामुळे कुणालाही आत सोडू नकोस. कारण जर त्याने सोडलं, तर आत बसलेले सगळे लोक भराभर बाहेर निघून जातील! “तो इस तरह से मैं सपनों में भी star नहीं बन सका |” हे उद्गार त्या अमीन सायानींच्या तोंडून आले ज्यांनी रेडिओच्या दुनियेवर असं काही राज्य केलं की माझ्यासारख्या कित्येक लोकांसाठी ते सुपरस्टारपेक्षा कुठेही कमी नाहीत!

आता माझ्या भात्यात होता शेवटचा प्रश्न, जो खरंतर त्यांनी मला कापायला सांगितला होता. पण अगदी सुरुवातीला त्यांनी कापलेल्या आणखी एका प्रश्नाची जागा माझ्या मनात या प्रश्नाने घेऊन टाकली होती. सुप्रसिद्ध पार्श्वगायक, अभिनेते, निर्माते किशोर कुमार यांच्या अमीन अंकलनी घेतलेल्या एका मुलाखतीबद्दलचा तो प्रश्न होता. ही मुलाखत मी माझ्या इंटर्नशिपच्या काळात ऐकली होती आणि मी अक्षरशः वेडावून गेले होते. या मुलाखतीबद्दल प्रत्यक्ष अमीन सायानींकडून ऐकण्याची संधी मी थोडीच सोडणार होते? मी जरा दबकतच हा प्रश्न टाकला आणि न विसरता हेही सांगितलं की मी या मुलाखतीची जबरदस्त फॅन आहे आणि नेम लागला! त्यांनी फक्त एवढंच विचारलं की हा शेवटचा प्रश्न आहे ना, आणि ते पुन्हा भूतकाळात गेले. किशोर, त्यांचा खूप चांगला मित्र, अतिशय उत्तम आणि तितकाच खट्याळ माणूस. त्यांनी सांगितलं की वर्षाच्या शेवटी ते गीतमालामध्ये प्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकारांना आमंत्रित करायचे आणि नववर्षासाठीचा खास संदेश त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे. अमीन अंकलची अशी इच्छा होती की किशोरनीही यासाठी यावं. पण किशोर मात्र टाळत राहिले. शेवटी ते तयार झाले आणि त्यांनी अमीन अंकलना एका स्टूडिओत बोलावलं जिथे त्यांच्या फिल्मचं शूटिंग सुरू होतं. अमीन भलाथोरला रेकॉर्डर टॅक्सीत घालून पार दुसऱ्या टोकाला असलेल्या त्या स्टूडिओत पोहोचले तर त्या फिल्मच्या निर्मात्याने त्यांना अडवलं आणि सांगितलं की का कुणास ठाऊक, पण किशोरनी सांगितलंय, “अमीन भाई आए तो बोलना कि किशोर नहीं है | और आएंगे तब जब अमीन भाई आ कर चले जाएँगे |” साहजिकच, अमीन अंकलना आला राग! माझ्यासमोर त्या प्रसंगाचं वर्णन करतानाही आपल्या फर्ड्या इंग्लिशमध्ये ते म्हणाले, “What bloody nonsense!”

पुढे किशोर कुमार दिग्दर्शक-निर्माते झाले आणि त्यांच्या ‘बढती का नाम दाढी’ या फिल्मच्या प्रसिद्धीचं काम अमीन अंकलकडे आलं. आता टांग खेचून घेण्याची पाळी किशोरची होती! त्यावेळी अमीन अंकलचा ‘सॅरिडॉन के साथी’ हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर होता आणि त्या शेवटच्या कार्यक्रमासाठी किशोरनी अतिथी म्हणून यावं अशी अमीन अंकलची फार इच्छा होती. त्यादिवशी जेव्हा किशोर ‘बढती का नाम दाढी’च्या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे नाचत-उडत स्टूडिओत आले तेव्हा अमीन अंकलनी ठरल्याप्रमाणे चेहरा गंभीर केला आणि (पुढचं सगळं त्यांच्याच शब्दांत वाचायला हवं!) ते म्हणाले,

“क्या? आपने देखा नहीं?”

“क्या नहीं देखा?”

“मैंने दरवाजे के पीछे कोने में दो पहलवान रखे है | बड़े पहलवान, ऊँचे तगड़े पहलवान है | उनसे कहाँ है कि आज किशोरदा आ रहे है, बढ़ती का नाम दाढ़ी के लिए | लेकिन आज अगर उन्होंने Saridon Ke Saathi के आखरी program का interview record नहीं किया, तो उनको पीट देना |

हे ऐकून ‘डरपोक’ किशोर चांगलेच घाबरले, पण त्यांच्या लक्षात ही गंमत आल्यानंतर ते लगोलग मुलाखत द्यायला तयारही झाले, पण एका अटीवर. त्यांनी त्यांच्या ‘अमीन भाई’ना जाऊन एका कोपऱ्यात बसायला सांगितलं आणी जाहीर करून टाकलं की आज तेच त्यांच्या स्वतःच्या तीन साथींची मुलाखत घेतील- लहान मुलगा असलेला किशोर, तरुणपणातला किशोर आणि पुढे म्हातारा होणारा किशोर. त्यांनी हा मुलाखत घेतलीही आणि या दोन जिवलग मित्रांमधली केमिस्ट्री अशी काही जमली की त्यादिवशी जे काही रेकॉर्ड झालं ते निव्वळ अफलातून आहे!

या शेवटच्या आणि सगळ्यात लाडक्या प्रश्नासोबत मुलाखत संपली. अमीन सायानी यांच्यासाठी मी तयार केलेली बुकमार्क्स त्यांना देण्यासाठी पाकिटात घालत असताना त्यांनी मला त्या पाकिटावर “To Ameen Uncle from Ankita” असं लिहायला लावलं. तोंडभरून आशीर्वाद दिला आणि मी बाहेर पडले. परतीच्या प्रवासाच्या चिंतेने कितीतरी वेळानंतर घड्याळाकडे पाहिलं तर एक तास उलटून गेलेला होता! सुरुवातीला त्यांनी मला दिलेला २० मिनिटांचा वेळ तब्बल तिप्पट वाढला होता आणि अनेक कारणांनी हा दिवस माझ्यासाठी कायमचा अविस्मरणीय होऊन गेलेला होता…

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0