आमच्या विषयी

संस्थापक संपादकांचे मनोगत

वर्तमानपत्रांचे, संकेतस्थळांचे व टी.व्ही. वाहिन्यांचे पारंपरिक प्रारूप, हे एखाद्या घराण्याची मालकी असणारे, उद्योगांनी पैसे पुरविलेले आणि नियंत्रित केलेले किंवा जाहिरातींवर अवलंबून असलेले, असे आहे. याऐवजी, पत्रकार, वाचक आणि जबाबदार नागरिक यांच्यातील सार्वजनिक संयुक्त उपक्रम, असा माध्यमांचा पुनर्विचार आपण करू शकतो का? एक असे प्रारूप, की ज्यामध्ये कुठली घटना वार्तांकित करायची, कोणाला, कसे नेमायचे व वार्ताहार व छायाचित्रकारांना कुठे पाठवायचे, हे निर्णय संपादक त्यांच्या व्यावसायिक सूज्ञतेच्या आधारावर घेऊ शकतील. निर्णय घेताना संपादकांना मालक, राजकारणी, जाहिरातदार किंवा कुठले अधिकारी काय विचार करतील, याची काळजी करावी लागू नये.

लोकशाही व्यवस्थेमध्ये वाचक किंवा प्रेक्षक, ही किमान अपेक्षा ठेवू शकतात. तरीही, भारतातील वृत्त माध्यमांच्या व्यावसायिक प्रारूपामध्ये संपादकांना हे स्वातंत्र्य क्वचितच मिळते. याउलट, वार्तांकनाच्या व्यावसायिक मानकांची अधोगती झाली आहे व वृत्त माध्यमांची यंत्रणा अनेक घातक पद्धतींनी दूषित झाली आहे. या पद्धतींमध्ये, बातम्यांमध्ये सर्रासपणे संपादकीय हस्तक्षेप करणे, पैसे घेऊन बातम्या छापणे (‘पेड न्यूज’) आणि ‘गुप्त करार’ करणे, यांचा समावेश होतो. उत्तरोत्तर, बातम्या गोळा करण्यासाठी पैसे खर्च करण्याबाबत, माध्यमसंस्था अनुत्सुक होत आहेत. जसजशी त्यांच्या अनुषंगिक व्यावसायिक हितसंबंधांमध्ये आणि त्याचबरोबर वार्तांकनास निषिद्ध गोष्टींमध्ये वाढ होते आहे, तसतसे वृत्तकक्ष कमकुवत होत आहेत. हे हितसंबंध अनेकदा राजकारण्यांशी किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळीकीवर अवलंबून असतात. या पार्श्वभूमीवर, वाचकांना व्यावसायिक मानकांमधील अधोगती, नैतिक मुल्यांचा भंग आणि दर्जामधील अधोगती लक्षात येऊ लागली आहे, यात काय नवल आहे? वाचकांमध्ये आता त्यांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

‘द वायर’ची संस्थापकीय भूमिका अशी आहे – चांगली पत्रकारिता टिकून राहण्यासाठी व तिचा उत्कर्ष होण्यासाठी, ती आर्थिक व संपादकीयदृष्ट्या स्वतंत्र हवी. यासाठी स्वतंत्र पत्रकारितेला  अशा वाचकांच्या व जबाबदार नागरिकांच्या देणग्यांची गरज आहे, ज्यांचा हेतू केवळ दर्जेदार पत्रकारिता टिकवून ठेवणे, एवढाच आहे!

एक प्रकाशन म्हणून, ‘द वायर’ जनहित व लोकशाही तत्त्वांना बांधील राहील. अधिकारयुक्त विश्लेषण व भाष्य करताना, आमचे उद्दिष्ट हे असे व्यासपीठ उभे करणे आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्दयांवर, पत्रकारितेच्या मूळ मुल्यांना धरून वार्तांकन करता येईल. हे प्रकाशन हे एक इंटरनेट माध्यम असल्याने, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बातम्या सांगण्याची पद्धतही बदलायला हवी. यामध्ये गरजेनुसार संवादात्मक (इंटरअॅक्टिव्ह) तक्ते, व्हिडीओ आणि ऑडिओ, हे बातमीचा अविभाज्य घटक असतील.

आम्ही आज एका मर्यादित कक्षेमध्ये सुरुवात करीत आहोत. आमची मर्यादा आमची दृष्टी नाही पण संसाधने आहेत. आम्ही एक साधे आवाहन करीत आहोत: आमच्या बातम्या/लेख वाचा, शेअर करा, ट्वीट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा.

सिद्धार्थ वरदराजन

सिद्धार्थ भाटीया

एम.के. वेणू

(संस्थापक संपादक, ‘द वायर’)

संध्या गोखले

(संयोजक, ‘द वायर मराठी’)

नितीन ब्रह्मे

(समन्वयक, ‘द वायर मराठी’)

 

द वायरला निधी कसा मिळतो

‘द वायर’ हे ‘फाउंडेशन फॉर इंडिपेंडंट जर्नलीझम (एफआयजे)’ या नफा नं घेण्याच्या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेद्वारे प्रकाशित केले जाते.

‘एफआयजे’च्या स्थापनेपासून आत्तापर्यंत, या संस्थेचे सर्व खर्च तिच्या संस्थापकांद्वारे, सेवाभावी संस्था, व्यक्ती व वाचक यांनी दिलेल्या देणग्यांमधून भागविले जातात. कायद्यानुसार, सर्व देणगीदार हे भारतीय नागरिक असायला हवेत. याव्यतिरिक्त, काही उत्पन्न हे जाहिरात व संहिता वितरणातून मिळविले जाते.

देणगी ऑनलाइन देण्यासाठी तुम्ही आमचे सपोर्ट पेज बघू शकता. जर तुम्हाला चेकद्वारे देणगी द्यायची असेल, तर ‘फाउंडेशन फॉर इंडिपेंडंट जर्नलीझम’च्या नावाने, तुम्ही तो आम्हाला या पत्त्यावर पाठवू शकता:

व्यवस्थापक

‘द वायर’

एफ-४४-४५, शहीद भगतसिंग मार्ग,

जैन भवनच्या समोरची गल्ली,

गोल मार्केट, नवी दिल्ली – १०० ००१

‘फाउंडेशन फॉर इंडिपेंडंट जर्नलीझम’ विषयी :

‘द वायर’, हे ‘फाउंडेशन फॉर इंडिपेंडंट जर्नलीझम (एफआयजे)’ या नफा नं घेण्याच्या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेद्वारे प्रकाशित केले जाते. ही संस्था, ‘कंपनी कायदा २०१३’च्या कलम ८खाली नोंदविलेली आहे. (CIN U74140DL2015NPL285224). याचे नोंदणीकृत कार्यालय, नवी दिल्ली, भारत, येथे आहे. ‘एफआयजे’ ‘माहिती तंत्रज्ञान कायदा १९६१’च्या कलम १२एए (ए)खाली नोंदविली गेली आहे व आयकर (ई) आयुक्तांच्या कार्यालयामधील नोंदवहीमध्ये तिचा नोंदणी क्रमांक  DEL – FR25178 – 14062016 असा आहे.

COMMENTS