एबीपी न्यूजसारख्या आघाडीच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीला एखाद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत सादर केल्या जाणाऱ्या परिसंवादामध्ये पंतप्रधान मोदीधार्जिणा सूर सापडला नाही तर ती वाहिनी काय करते? धादांत खोटेपणा करते. कार्यक्रम खोटा आणि विद्यार्थीही भाडोत्री !
अलिकडेच एबीपी न्यूज वाहिनीने आपल्या ‘२०१९ के जोशिले’ या आयआयटी बॉम्बेच्या परिसरात घेतलेल्या कार्यक्रमासाठी, संस्थेबाहेरील तरुणांना बोलावून त्यांच्याकडून मोदी सरकारच्या समर्थनार्थ वक्तव्ये वदवून घेतली असा आरोप या वाहिनीविरुद्ध करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ मार्च रोजी संध्याकाळी ४ ते ५ या दरम्यान प्रसारित करण्यात आला. दुसऱ्या दिवशी १० वाजता “आयआयटी बॉम्बे आहे मोदींच्या पाठीशी”, “२०१९ के जोशिले: आयआयटी मुंबईतील विद्यार्थी मोदी सरकारचे समर्थक” अशा ठळक शीर्षकासह त्याचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आले.
या घडवून आणलेल्या कार्यक्रमाची चित्रफीत वाहिनीने संकेत स्थळावरुनदेखील प्रसारित केली होती आणि हा लेख छापून आल्यावर ६ मार्च रोजी ती काढून टाकली.
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता या कार्यक्रमाबाबत त्यांना त्यांच्या कॉलेजच्या ईमेल पत्त्यावर आलेल्या ईमेलमधून माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये संस्थेच्या परिसरात एबीपी न्यूजने आगामी निवडणुकांवर परिसंवाद आयोजित केला असून सहभाग ऐच्छिक असल्याचे नमूद केले होते.
विद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र चित्र काहीसे वेगळे होते. तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या घोळक्यामध्ये अनेक चेहरे अनोळखी असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. “आमच्या संस्थेचा परिसर खूप मोठा आहे आणि विभागही अनेक असल्याने एखादी व्यक्ती इथली आहे की बाहेरील हे सहजपणे ओळखणे अवघड असते. तरीसुद्धा परिसंवादामध्ये अचानक इतके अनोळखी चेहरे एकत्र पाहिल्यावर मात्र आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यातही भर म्हणजे त्यातला प्रत्येक जण शासनाचे समर्थन करत होता.” या कार्यक्रमात सहभागी झालेला एक विद्यार्थी आम्हाला सांगत होता.
विद्यार्थ्यांच्या तोंडी चुकीचे वक्तव्य घालणे आणि खोटी मते तयार करण्याच्या या गैरप्रकाराला प्रथम आयआयटी बॉम्बेच्या ‘आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल’ने (एपीपीएससी) वाचा फोडली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी ११ जण (कार्यक्रमात सहभागी झालेल्या एकूण ५० तरूणापैकी ) “बाहेरचे” होते असे आता विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे. त्यापैकी एक तरुण हिंदू युवा वाहिनी या हिंदू संघटनेचा सदस्य असल्याचे समजले आहे.
“हा कार्यक्रम आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता तर वाहिनीने बाहेरील लोकांना कशासाठी बोलावले? त्यातील प्रत्येक जण भाजपची बाजू उचलून धरत होता हा निव्वळ योगायोग होता का?” असा सवाल एका विद्यार्थ्याने केला.द वायरने ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ते संस्था त्यांच्यावर कारवाई करेल या भीतीने आपली नावे उघड करण्यास कचरत होते.
एबीपी न्यूजने भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अखिल भारतीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राफेल करार आणि अलीकडेच केंद्रीय राखीव पोलीस दलावरील (सीआरपीएफ) पुलवामा येथील हल्ला अशा अनेकविध विषयांवर सहभागी मंडळींनी चर्चा केली. ३८ मिनिटे चाललेल्या या परिसंवादामध्ये पहिली १८ मिनिटे दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी आपापल्या पक्षांच्या भूमिका स्पष्ट करत सत्तेत असताना तुम्ही सक्षमपणे कार्य करत नसल्याचे आरोप एकमेकांवर केले.
चर्चेत सहभागी झालेल्या आणखी एका विद्यार्थ्याने बोलण्याची संधी मिळावी म्हणून वारंवार मायक्रोफोन त्याच्याकडे देण्याची मागणी करूनही त्याला बोलू दिले नाही, “संयोजक त्यांच्या नियोजित लोकांना बरोबर घेऊन आले होते आणि त्यांनी पुढील रांगेतील खुर्च्यांवर ताबा मिळवला होता. कार्यक्रमाचा सूत्रधार केवळ त्याच लोकांकडे जात होता आणि त्यांनाच तज्ञांना प्रश्न विचारण्याची संधी देत होता. संस्थेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक मायक्रोफोन मिळवून कॉलेजमध्ये भरतीसाठी नव्याने लागू केलेली१३ मुद्द्यांवर आधारित रोस्टर पद्धती आणि शेतीवरील संकट या विषयांवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर त्यांना मध्यातच थांबवून तज्ञांनी त्यांचे प्रश्न विचारार्थ घेतले नाहीत.” केमिकल इंजिनियरिंग विभागातील पीएचडीच्या एका विद्यार्थ्याने आमच्याकडे तक्रार केली.
चर्चेमध्ये अनिल यादव नावाच्या एकाने पहिला प्रश्न उपस्थित केला. त्याने चतुर्वेदींना १९७१ सालच्या भारत पाकिस्तान युद्धावर प्रश्न विचारला. तसेच १९९० सालच्या बॉम्बस्फोटात १४ पाकिस्तानी नागरिकांना ठार मारल्याच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या सरबजीत सिंगला परत आणण्यात कॉंग्रेस अपयशी का ठरले, असा सवाल केला. या प्रश्नात आक्षेपार्ह असे काही नव्हते, पण यादव हा आयआयटीचा विद्यार्थी नव्हता. त्याच्याफेसबुक प्रोफाईलवरून तो हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्ता आहे हे कळते.
आयआयटी बॉम्बेच्या प्रवक्त्या फाल्गुनी बॅनर्जी यांनी संगितले, “आम्ही या कार्यक्रमाचे केवळ यजमान होतो आणि यात आमची कोणतीही भूमिका नव्हती. चर्चेत भाग घेण्यासाठी बाहेरून लोक आणण्याची परवानगी संस्थेने दिली नव्हती. हे असे कसे घडू शकते याचे मला आश्चर्य वाटते आहे”. त्या पुढे म्हणाल्या, “मी हा कार्यक्रम पाहिला असून आयआयटी बॉम्बे मोदींचे समर्थन करते असा दावा त्यांनी केला आहे. असे दावे ते कसे काय करू शकतात? संस्थेतील काहीच विद्यार्थी चर्चेत सहभागी झाले आणि त्यांच्यात मतमतांतरे नक्कीच होती. आवश्यक ते बदल करावेत या संदर्भात आम्ही लवकरच वाहिनीला कळवणार आहोत.”
एपीपीएससीने आयआयटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडे या सर्व प्रकारचे स्पष्टीकरण मागितले असून त्यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्याप आले नसल्याचे एका सदस्याने द वायरला सांगितले.
या कार्यक्रमामध्ये आयआयटीचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सांगितल्याने मी आमंत्रण स्विकारले असे असे चतुर्वेदी यांनी द वायरला सांगितले. “वृत्तवाहिनीने यासाठी विचारल्यावर मी पहिल्यांदा नकार दिला. प्रेक्षकांना सहभागी करून घेणाऱ्या कार्यक्रमात मला सहभाग घ्यायचा नव्हता, कारण सहसा प्रेक्षकाच्या बन्दिस्त अशा ठोस राजकीय भूमिका असतात आणि त्यामुळे सकस चर्चेला वाव उरत नाही. परंतु नंतर आयआयटीमधील विद्यार्थी सहभागी होणार असे कळल्यावर मी होकार दिला. चर्चा अर्थपूर्ण होईल अशा आशेने मी आले, परंतु माझा भ्रमनिरास झाला कारण चर्चा एकांगी झाली.” असे चतुर्वेदी यांनी सांगितले.
द वायरने एबीपी न्यूजच्या मुंबई केंद्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता यावर कोणतेही वक्तव्य करण्याचे आम्हाला अधिकार नसून त्यासाठी दिल्लीचे संपादक रजनीश आहुजा यांच्याशी संपर्क करावा असे उत्तर मिळाले. आम्ही आहुजा यांना ईमेल आणि मेसेज करून एक प्रश्नावली पाठवली असून आत्तापर्यंत तरी त्यांनी उत्तर पाठवलेले नाही. वाहिनीकडून माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवूच.
(आयआयटी बॉम्बेचे बीजेपीला कथित समर्थन असल्याचा दावा करणारा एबीपीचा वादग्रस्त कार्यक्रम.)
हा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.
अनुवाद: श्वेता देशमुख
COMMENTS