सर्जनाच्या दिशा उकलणारी विदुषी

सर्जनाच्या दिशा उकलणारी विदुषी

मराठीमध्ये रानडे आगरकरांच्या प्रबोधन परंपरेचा वारसा ख-या अर्थाने पुढे नेण्याचे कामही पुष्पाताईंनी निष्ठेने पुढे नेले.

प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनाने मराठी सामाजिक व साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. दीर्घ व दुर्धर आजारासाठी शुश्रुषा घेत असतानाच वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी ३ तारखेला अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्याचे विचक्षण आकलन मांडणा-या पुष्पाताई भावे या मराठी रंगभूमीचा चालता बोलता इतिहासच होत्या. पुष्पाताईंच्या नाट्यसमीक्षेने विजय तेंडुलकर यांच्यापासून ते राजीव नाईक, मकरंद साठे यांच्या नाट्यसंपदेवर मार्मिक भाष्ये केली आणि मराठी रंगभूमीचा पट २१ व्या शतकातील वाचक प्रेक्षकापर्यंत सहजगत्या आणून ठेवला. अनेक साहित्यविषयक चर्चासत्रे आणि परिसंवादांमधून त्यांनी साहित्य व्यवहारातून समाजाला कसे भिडावे आणि समाजाच्या बाजूने साहित्यदृष्टी कशी घडवावी याचे वस्तुपाठच सादर केले.

मराठीतील नाट्य आणि इतर साहित्याच्या अभ्यासकांच्या किमान तीन पिढ्यांवर त्यांच्या लेखणीचे आणि वाणीचे खोल संस्कार झालेले आहेत. मुंबई या महानगरापासून ते खेड्यातल्या वाचकापर्यंत त्या आपल्या सहज वाणीने संवाद साधत असत. त्यांच्या निधनाने नाट्य आणि साहित्य समीक्षेतील सर्जनाच्या दिशा उकलून दाखवणारी विदुषी अस्तंगत झाली आहे.

मराठी साहित्याने समाजाचे सतत भान राखले असले तरी स्वत: साहित्यिक हे कृतीशील राजकारणात आणि सामाजिक चळवळीत अभावानेच सहभागी झाल्याचे आढळून येईल. याला अपवाद असणा-या मोजक्या साहित्यिक, विचारवंतांमध्ये प्रा. पुष्पा भावे यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. साहित्यापासून ते राजकारणापर्यंत असलेल्या त्यांच्या संचारामुळे त्या पुष्पाताई म्हणूनच ओळखल्या जायच्या. सामाजिक व सांस्कृतिक जीवनात पुष्पाताई हे नाव आले की ते निश्चितपणे प्रा. पुष्पाताई भावे यांचेच असणार हे सर्वजण समजून असत. आयुष्याच्या उमद्या वयात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उडी घेतल्यानंतर राजकारण आणि समाजकारणाचा प्रवाह त्यांनी क्षणभरासाठीही सोडला नाही.

मराठी साहित्यिकांना कोशातून बाहेर काढून रस्त्यावर आणले ते काही प्रमाणात आणीबाणीने. पण आणीबाणी उठल्यानंतर केवळ सभा गाजवणा-यांपैकी पुष्पाताई नव्हत्या. आणीबाणीच्या आधीच मुंबईमध्ये महागाईच्या विरोधात महिलांनी युध्द पुकारले होते. कॉ. अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्या खांद्याला खांदा लावून पुष्पाताईंनीही त्या गाजलेल्या लाटणे मोर्चांचे नेतृत्व केले. तो अनुभव गाठीला असल्यानेच आणीबाणीच्या काळातही त्या निर्भीडपणे रस्त्यावर उतरल्या. आणीबाणीनंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकाधिकारशाहीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रभर दाैरे काढून त्यांनी इतरांसोबत सभा गाजवल्या.

जातीव्यवस्था ही एका बाजूला दलितांवर आणि दुस-या बाजूला पितृसत्तेच्या अंगाने महिलांवर अत्याचार करत असते. या दुहेरी शोषणाविरुध्द जागृती करण्यासाठी त्या अहर्निश झटल्या. खेड्यापाड्यांमध्ये रुजलेली वर्णजातीवर्चस्वाची मुळे उखडून काढण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या प्रेरणेने व त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या एक गाव एक पाणवठा या ऐतिहासिक चळवळीची धुरा देखील त्यांनी समर्थपणे वाहिली. या चळवळीत खेड्यापाड्यातील दलित जीवनाचे त्यांना सखोल दर्शन झाले. त्याविषयी राज्यभरात मोठे विचारमंथन झाले. तेही त्यांनी आपल्या विद्वत्तेने सकस आणि सघन करण्याचा प्रयत्न केला. तडजोडवादी दलित नेत्यांच्या राजकारणाला आव्हान देणा-या नवशिक्षित, विचारी दलित तरूणाच्या बंडाचे त्यांनी स्वागत केलेच पण त्याहीपुढे जात दलित पँथरच्या जडणघडणीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. हीच विचारधारा पुढे नेत मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करण्यासाठी झालेल्या लढ्यात त्या हिरीरीने उतरल्या.

मराठीमध्ये रानडे आगरकरांच्या प्रबोधन परंपरेचा वारसा ख-या अर्थाने पुढे नेण्याचे कामही पुष्पाताईंनी निष्ठेने पुढे नेले. हा वारसा समाजात रुजवण्यासाठी पुढे हौतात्म्य पत्करणा-या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीत त्यांनी त्या चळवळीचे निशाणही आपल्या खांद्यावर पेलले. या कामाचा भाग म्हणूनच शनिशिंगणापूरच्या देवालयात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी केलेल्या सत्याग्रहासाठी त्यांनी तुरुंगात जाण्यासही मागेपुढे पाहिले नाही. देवाधर्माचा वापर महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी अनेक प्रथा निर्माण झाल्या आहेत. त्यापैकीच दक्षिण महाराष्ट्रातील दॆवदासी ही अमानुष प्रथा होय. या प्रथेच्या विरोधातील चळवळीतही त्या उतरल्या.

पारंपरिक शोषणाला जोडून येणारे नवे आर्थिक शोषण हेही त्यांच्या कार्यापासून अलग राहू शकले नाही. महागाई आंदोलनात त्यांचा कामगार स्त्रियांशी संबंध आलाच होता. मुंबईतील कापडगिरण्या बंद पडू लागल्या तशा पुष्पाताई कामगारांच्या हक्कांसाठी देखील लढ्यात उतरल्या.

गिरणीकामगारांच्या पाठोपाठ हमाल पंचायतीच्या माध्यमातून उभ्या होत असलेल्या आंदोलनातही त्यांनी पाऊल टाकले. तसेच शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न देखील त्यांच्या चिंतनापासून मुक्त राहिले नाहीत.

मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून त्या एम ए झाल्या व मुंबईतीलच अनेक महाविद्यालयातून त्यांनी मराठीचे अध्यापन केले. 1999 मध्ये त्या रूईया महाविद्यालयातून निवृत्त झाल्या. अर्थात निवृत्तीनंतरही त्यांचे अध्ययन अध्यापनाचे काम थांबले नाही. विविध विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यासकेंद्रे चालवण्यासाठी त्यांनी आपल्या अनुभवाचे व अभ्यासाचे पुरेपूर सहाय्य दिले. चळवळींच्या सोबतच त्यांना आधार व दिशा देणारे काम म्हणून विविध संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा मॊठा सहभाग होता. सामाजिक कृतज्ञता निधी, केशव गोरे स्मारक, य.दि. फडके संशोधन केंद्र , साने गुरुजी स्मारक अनुवाद सुविधा केंद्र , भारत पाकिस्तान फोरम, मृणाल गोरे दक्षिण आशियाई केंद्र आदि संस्था उभारून त्या चालवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली.

हे सर्व असले तरी सामाजिक राजकीय दहशतीच्या विरुध्द त्या अगदी वैयक्तिक स्तरावर देखील धैर्याने उभ्या राहिल्या. मुंबईच्या मध्यवस्तीत रहाणाऱ्या रमेश किणी यांच्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याकडे सुईची दिशा जाते हे सांगायला त्या डगमगल्या नाहीत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या बाबतीतही वयाच्या उत्तरार्धात त्या तोफा डागत राहिल्या. त्यांची सार्वजनिक समारंभातील शेवटची उपस्थिती ही चटका लावणारी ठरली.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा नारा देणा-या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा साहित्य संमेलनाने निमंत्रण रद्द करून अवमान केला त्याची चीड येऊन मुंबईतील शिवाजी मंदिरात श्रीमती सहगल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अंथरूणाला खिळलेल्या पुष्पाताई व्हील चेअरमध्ये बसून त्या कार्यक्रमाला तर आल्याच पण त्यांनी आपल्या प्रखर भाषणातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवण्याचे जमलेल्या श्रोतृवर्गाला आवाहन केले. अहिल्याताई, मृणालताई यांची लढाऊ परंपरा तितक्याच जोमाने पुढे चालू ठेवणाऱ्या पुष्पाताई भावे यांच्या स्मृतीला शतश: अभिवादन!

‘जीवनमार्ग’ बुलेटिन क्र. १८७ मध्ये ४ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेला लेख साभार. 

COMMENTS