‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग १

‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग १

रामदेवबाबांच्या आस्था आणि संस्कार टीव्हीच्या यशानंतर धार्मिक दूरचित्रवाणी वाहिन्यांचे पेव फुटले आहे. जो तो आध्यात्मिक व्यवसायातून स्वतःची तुंबडी भरायला बघतो आहे.

‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग २
कोरोना औषध : रामदेव, बाळकृष्णवर फिर्याद दाखल
रामदेव बाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराःआयएमए

बाबा रामदेव यांनी २०१०च्या सुरुवातीला भारतात “योगनामक तुफान आणले. योग जगताला कल्पनेपलीकडे विस्तारित नेणाऱ्या त्यांच्या शीर्षासनाने भारतातील बहु-अब्ज डॉलरच्या ग्राहक वस्तू उद्योगांना मागे टाकले. हिंदू संन्यासी, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा नेता आणि ‘पतंजलि’ साम्राज्यामागील मार्गदर्शक शक्ती असे अनेक अवतार गेल्या काही वर्षांत रामदेव बाबांनी घेतले आहेत. पण त्यांच्या कहाणीचा शेवटचा अध्याय जेव्हा लिहिला जाईल तेव्हा, भारतीय जनतेला अध्यात्माचे बाजारीकरण करून विकणारा एक उत्साही, हसरा आणि माध्यमांवर पकड असणारा चेहरा म्हणूनच त्यांची नोंद होईल; त्या प्रकरणाविषयी सगळ्यात जास्त कुतूहल असेल. गेल्या दोन दशकात, भारतात अध्यात्मिक टीव्हीच्या उद्योगाचे पेव फुटले आहे. हा उद्योग प्रचंड वेगाने विकसित झाला आहे. हे क्षेत्र किती झपाट्याने बदलले आहे याचा आलेख रामदेव बाबाच्या प्रवास आणि प्रगतीवरून समजते.
या अब्जाधीश योगी बाबांचा माध्यमांशी नेहमीच घनिष्ठ स्नेह राहिला आहे. आस्था टीव्हीचे संस्थापक संपादक माधवकांत मिश्रा आणि रामदेवबाबा यांची पहिली भेट २००२मध्ये हरिद्वारला एका छोट्या योग शिबिरादरम्यान झाली होती. दूरचित्रवाणीशी त्यांचा संबंध तेव्हापासून आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना मिश्रा यांनी सांगितले, “रामदेवला मी पहिल्यांदा पहिले तेव्हाच मला तो मोठं काहीतरी घडवून आणू शकेल याची खात्री पटली होती. दोन गोष्टींमुळे माझ्यावर त्याची छाप पडली, एक म्हणजे तो संन्यासी आहे आणि दुसरं म्हणजे तो ‘नवली क्रिया’ (पोट आतमध्ये ओढून आवळून घेण्याची क्रिया) करू शकतो. मी ज्या क्षणी त्याला ‘नवली क्रिया’ करताना बघितले, मला माहित होते की दूरचित्रवाणीवर हे जाम आवडणार. हा माणूस स्वतःचे वेगळे स्थान मिळवणार. पण वरिष्ठ व्यवस्थापनाला माझे म्हणणे पटले नाही. तो हिट होईल याची खात्री वाटली नाही आणि आमच्या प्रतिस्पर्धी वाहिनीने, ‘संस्कार टीव्ही’ने त्याला हेरले.”
त्यावेळी संस्कार टीव्हीने हरिद्वार मधल्या कुणालाही परिचित नसलेल्या ह्या योगगुरुवर मोठा जुगाराचा डाव लावला; कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला आणि वाहिनीचे टीआरपी आभाळाला जाऊन भिडले. रामदेवबाबाची प्रसिद्धी आणि त्यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून आस्था टीव्हीवाल्यांना स्वतःची चूक लक्षात आली आणि पुढच्या एका वर्षात त्याच स्लॉटमध्ये रामदेवबाबाला आणले गेले. या दोन वाहिन्यांच्या माध्यमातूनच रामदेव बाबाला त्याचे प्रचंड अनुयायी मिळाले आहेत. आज जरी रामदेव बाबा हे नाव पतंजलिच्या विविध वस्तूंशी जोडलेले असले तरी अध्यात्मिक टीव्हीवरील योगगुरु ही त्यांची प्रतिमा त्यांच्या अवतार यादीतील सगळ्यात जुनी आहे.
साधारण २५ वर्षांपूर्वी रामदेव बाबाने योग आणि आयुर्वेदाच्या स्व-नियुक्त प्रचार आणि प्रसार अभियानाला भारतात सुरुवात केली. हरिद्वारमध्ये १९९५ साली आचार्य बालकृष्णन आणि कर्मवीर यांच्या सहयोगाने त्याने दिव्य योग ट्रस्टची स्थापना केली. संस्कार टीव्हीवरच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली नसती तर त्यांच्या अनेक समकालीन सहकार्यांप्रमाणे तेही आज हरिद्वारमध्येच असते.
कट टू २०१९. आज रामदेव बाबाकडे संस्कार आणि आस्था टीव्हीची मालकी आहे. या दोन अधिग्रहणांनंतर अतिशय आक्रमकपणे त्यांनी त्याच्या माध्यम व्यवसायाच्या कक्षा विस्तारात नेल्या आहेत. त्यांच्याकडे दहा हिंदू आध्यात्मिक वाहिन्यांचे नियंत्रण आणि संचलन आहे. त्यावेळी एका अपरिचित योगगुरूच्या निमित्ताने संस्कार वाहिनीने घेतलेल्या आव्हानामुळे, वाहिनीचे आणि रामदेव बाबाचे भाग्य तर उजळलेच पण टीव्हीवरील अध्यात्मिक कार्यक्रमांच्या विभागाला आकार आला. २०००च्या मध्यात सुरु झालेल्या या दोन्ही वाहिन्यांना आज त्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्यासारखेच स्वरूप असलेल्या अनेक वाहिन्यांची रांग लागली. दूरदर्शनवरचा प्रत्येक योगी अधिक प्रेक्षकांच्या शोधात दिसायला लागला आणि त्यासाठी रामदेव बाबाने जे जे केले तेच हुबेहुब करण्याकडे प्रत्येकाचा कल राहिला. येणाऱ्या प्रत्येक नव्या आध्यात्मिक वाहिनीला संस्कार किंवा आस्था बनायचे होते. आज पन्नासहून अधिक अध्यात्मिक वाहिन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. अशावेळी यातल्या प्रत्येकाला फायदा होतो आहे का आणि भविष्यात होईल का, हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो.
भजनाचा इतिहास
२०००च्या दशकाच्या सुरुवातीआधी फक्त धार्मिक विषयांना समर्पित अशी टीव्हीवर एकही वाहिनी नव्हती. तोपर्यंत, अध्यात्मिक आणि भक्तीभावाशी संबधित कार्यक्रम हे मनोरंजन वाहिन्यांवरच पण शनिवार-रविवारी सकाळीच्या कार्यक्रमापुरतेच मर्यादित होते. आस्था टीव्ही आणि संस्कार टीव्ही या पहिल्या अशा वाहिन्या आहेत ज्या चोवीस तास आठवडाभर फक्त अध्यात्मिक कार्यक्रम दाखवतात. दुबई मधील व्यापारी किरीट सी. मेहता यांनी जून २०००मध्ये आस्था टीव्हीची सुरुवात केली. त्यांनी २००६ पर्यंत आस्था टीव्ही चालवला. त्यानंतर रामदेवबाबाने १६ कोटी रुपयांना ही वाहिनी विकत घेतली. २०१५ साली रामदेवबाबांच्या झोळीत पडण्याआधी एकदा संस्कार टीव्हीची मालकी बदललेली होती. दिलीप आणि दिनेश काबरा यांनी किशोर मोहोट्टा यांच्यासह संस्कार टीव्हीची सुरुवात केली होती. पिट्टी (Pittie) समूहाचे प्रमुख आदित्य पिट्टी यांनी २००८ साली ही वाहिनी विकत घेतली. पतंजलि साम्राज्याशी पिट्टी समूहाचे जुने लागेबंधे आहेत. पिट्टी समूहाने पुढे संस्कार टीव्ही रामदेवबाबाला विकला.
रामदेवचे माध्यम साम्राज्य
रामदेवबाबाचा माध्यम व्यवसाय सध्या तीन संस्थांच्या माध्यमातून चालतो. वेदिक ब्रॉडकास्टिंग लिमिटेड, आस्था ब्रॉडकास्टिंग नेटवर्क लिमिटेड आणि संस्कार इन्फो टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड. पतंजलि आयुर्वेद प्रमाणेच, या कंपन्यांमध्ये रामदेवबाबाचा कोणताही हिस्सा नाही आणि बहुतेक समभागांचे मालक आचार्य बाळकृष्ण आणि त्यांच्या नियंत्रणाधीन कंपन्या आहेत.

रामदेव बाबाचे मिडिया साम्राज्य
वेदिक ब्रॉडकास्टिंग लिमिटेड संस्कार इन्फो टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड आस्था ब्रॉडकास्टिंग लिमिटेड
आस्था टीव्ही संस्कार टीव्ही अरिहंत टीव्ही
आस्था भजन टीव्ही सत्संग टीव्ही
आस्था टीव्ही (कन्नड) शुभ टीव्ही
आस्था टीव्ही (तमिळ)
आस्था टीव्ही (तेलगु)
वेदिक टीव्ही

या क्षेत्रातील स्त्रोतांच्या माहितीनुसार संस्कार इन्फो टीव्हीने अलीकडेच आणखी एक अध्यात्मिक वाहिनी – शुभ टीव्ही विकत घेतला आहे. शुभ टीव्हीची मालकी पिट्टी समूहाची होती, ज्यांनी काही वर्षांपूर्वी संस्कार इन्फो टीव्हीची विक्री रामदेवबाबा यांना केली होती. पतंजलिशी याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी या प्रकल्पाची पुष्टीही केलेली नाही आणि ही माहिती नाकारलेलीही नाही.
पैसा कसा खेळतो?
आध्यात्मिक टीव्ही वाहिन्यांचे अर्थकारण अतिशय वेगळ्या पद्धतीने चालते. उर्वरित प्रसारण उद्योगांशी तुलना करता अतिशय वेगळ्या अशा दोन महत्वाच्या मार्गांनी व्यवहार होतात.
एक म्हणजे सर्व आध्यात्मिक वाहिन्या प्रेक्षकांसाठी मोफत आहेत. याच्याउलट, इतर वाहिन्या एकतर त्यांचे स्वत:चे कार्यक्रम तयार करतात किंवा त्याच्यासाठी पैसे देतात. उदाहरणार्थ, क्रीडा वाहिनी सामान्यत: एखाद्या क्रीडा कार्यक्रमाचे प्रसारण अधिकार खरेदी करते. मनोरंजन वाहिनी चित्रपटाचे टेलिव्हिजन हक्क खरेदी करते किंवा टीव्ही शो तयार करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन करण्यासाठी स्वत:चे पैसे गुंतवते.
दुसरे, अध्यात्मिक टीव्ही वाहिन्या जाहिरातीच्या कमाईवर अवलंबून नाहीत. ते जाहिरातीचे स्लॉट्स विकतात परंतु कंपनीच्या एकूण कमाईमध्ये त्याचा सहभाग अल्प असतो.
या वाहिन्या मोफत असल्या तरी त्यांना वितरण खर्च आहेच. डीटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, केबल ऑपरेटर्स यांच्या माध्यमातून घराघरात वाहिनीचे वितरण व्हावे यासाठी खर्च करावाच लागतो. उपग्रहाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे  अपलिंकींग आणि डाऊनलिंकींग करण्यासाठी हा खर्च येतो.
“आस्था टीव्ही, संस्कार टीव्ही, साधना टीव्ही सारख्या अध्यात्मिक टीव्हीचे नेतृत्व करणाऱ्या वाहिन्यांच्या नफ्यातला १०/२० टक्के भाग जाहिरातीतून आलेला असतो. नव्या आणि लहान वाहिन्यांना जाहिरातीतून फारच तुरळक कमाई होते.” अशी माहिती या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीने ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर द वायर ला दिली आहे.
बड्या हस्तीं असतील तर एका महिन्यासाठी २० मिनिटांच्या कार्यक्रमासाठी साडेचार- पाच लाख रुपये खर्च असतो. नव्या किंवा फारसा परिचय नसलेल्या चेहऱ्यांसाठी याच स्लॉट्स मधला खर्च ३० ते ५० हजार इतका येतो. जाहिरातीच्या दरामध्येही अशीच विसंगती दिसू शकते. प्रत्येक दिवशी एक महिन्यासाठी दहा सेकंद जाहिरातीचा खर्च अंदाजे आस्था टीव्हीवर ८०,००० आणि संस्कार टीव्हीवर १,१५,००० रुपये इतका आहे.  टीव्हीवर जाहिरातींसाठी स्लॉट्स खरेदी करणा-या (media buying) द मीडिया अँट या एजन्सी कडून मिळालेल्या माहितीनुसार,साधना टीव्ही आणि भक्ती टीव्हीवरील जाहिरातीच्या एका स्लॉटसाठी सुमारे ५०,००० रुपये खर्च येतो. पण तेच दिशा टीव्हीवरचा तोच स्लॉट निम्म्या किमतीत उपलब्ध होतो. अध्यात्मिक टीव्हींना मिळणारा पैसा हा स्लॉट विक्रीतून येतो. या क्षेत्रातील अजून एक ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले की, या वाहिन्यांचे पैसे कमावण्याचे सगळ्यात मोठे साधन म्हणजे बाबा मंडळी स्वतः असतात. कल्पना करा, एखादा आयपीएलचा आयोजक स्वतःहून एखाद्या क्रीडा वाहिनीकडे जातोय आणि त्याने आयोजित केलेल्या स्पर्धा दाखवल्या जाव्यात म्हणून पैसे देतोय. हेच आज अध्यात्मिक वाहिन्यांचे वास्तव आहे.
एरवी कुठल्याही प्रसिद्ध वाहिनीवर एक सेकंदही कुणी फुकट देत नाही. पण इथे स्लॉट्स सर्वसाधारणपणे विक्रीला उपलब्ध असतात. एखादा आध्यत्मिक गुरु हे स्लॉट विकत घेतो आणि स्वतःचे कार्यक्रम दाखवतो. किंवा ब्रँड स्वतःच्या एखाद्या वस्तूच्या जाहिरातीसाठी स्लॉट विकत घेते आणि प्रेक्षकांपुढे वस्तूची जाहिरातबाजी करते. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास आध्यात्मिक वाहिन्यांवरचे सगळे कार्यक्रम ब्रँडेड असतात; जाहिरातबाजीचे असतात. विशेषतः अध्यात्मिक गुरु स्वतःच्या नावाचा प्रचार करण्यासाठी वाहिन्यांना हवे तितके पैसे द्यायला उत्सुक असतात.
तीन दशके साधना, कत्यानी, दिशा टीव्ही आणि इतरही अध्यात्मिक वाहिन्यांबरोबर काम केलेले, आस्था टीव्हीचे संस्थापक-संपादक माधव कांत मिश्रा अधिक माहिती देताना म्हणाले, “एक काळ होता जेव्हा आस्था आणि संस्कार टीव्हीवरच्या स्लॉट्ससाठी अनधिकृत लिलाव चालायचे. आपल्या प्रतिस्पर्धी बाबाला स्लॉट मिळू नये यासाठी अनेक बाबा मंडळी हिरीरीने वरचढ पैशांची बोली लावत असत. या वाहिन्यांवरचे स्लॉट्स मिळवणे अध्यात्मिक गुरूंसाठी प्रतिष्ठेची बाब बनली होती.”
तीन प्रकारचे मालक
लवकरच इतर उद्योजकांना यात संधी दिसली आणि नवनव्या अध्यात्मिक वाहिन्यांचे पेव फुटले. ज्यांना आस्था आणि संस्कार टीव्हीवर स्लॉट्स मिळू शकलेले नाहीत अशांना स्लॉट्स विकणे हा या नव्या अध्यात्मिक वाहिन्यांचा प्रमुख व्यवसाय होता. सध्या भारतातल्या अध्यात्मिक वाहिन्यांच्या व्यवसायात तीन मालक आहेत. पहिला, गुरु किंवा योगी ज्याला स्वतःची वाहिनी सुरु करण्यात रस आहे. दुसरा व्यावसायिक जो आधीपासूनच माध्यम उद्योगात आहे आणि ज्याला धार्मिक वाहिनीच्या निमित्ताने अजून एका क्षेत्रात पाऊल ठेवायचे आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे असा उद्योजक जो वेगळाच कुठला तरी व्यवसाय करतो आहे पण जो अध्यात्मिक गुरूचा, योगीचा उत्साही अनुयायी आहे. आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो धार्मिक वाहिनी सुरु करतो.
या क्षेत्रातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, जो अध्यात्मिक गुरु स्वतःच वाहिनी सुरु करतो त्याच्या यशाच्या शक्यता अधिक असतात कारण त्या वहिनीला उचलून धरण्यासाठी त्या अध्यात्मिक गुरुकडे तयार अनुयायी असतात. पण मिश्रा यांच्या मतानुसार, “बाबाने चालवलेली वाहिनी असेल तरीही खात्रीने यश मिळेलच असे नाही. रामदेवबाबा यशस्वीपणे वाहिन्या चालवतो आहे कारण त्याच्या पाठीशी यशस्वी FMCG कंपनी आहे. बाबानेच वाहिनी चालवली तर ती यशस्वी होते या गृहीतकाला छेद देणारी कितीतरी उदाहरणे आहेत.”
उदा. आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी मीडिया गुरु ब्रॉडकास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड बरोबर एकत्र येऊन २०११मध्ये आनंदम टीव्ही चालू केला होता. पण ही वाहिनी चालली नाही आणि काही वर्षातच वाहिनीला स्वतःचे दुकान बंद करावे लागले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २०१८मध्ये या वाहिनीचा परवाना रद्द केला.
ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक संस्थेचा पाठिंबा असलेला ‘पीस ऑफ माईंड टीव्ही’ २०१४ मध्ये सुरु झाला होता. BARCच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक बघितली जाणारी ही वाहिनी होती. पण या वाहिनीने कधीच अर्थकारणावर लक्ष केंद्रित केले नाही. आज रामदेवबाबाच्या किंवा इतर अध्यात्मिक वाहिन्यांच्या स्पर्धेत ही वाहिनी कुठेही  नाही.

(क्रमश:)

ज्योतींद्र दुबे हे व्यापार पत्रकार आहेत.

मूळ इंग्लिश लेख येथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0