तालिबानची स्त्रियांच्या अभिनयावर बंदी

तालिबानची स्त्रियांच्या अभिनयावर बंदी

तालिबानने स्त्रियांना टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये अभिनय करण्यास बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे पत्रकार व निवेदक स्त्रियांनीही काळ्या रंगाच्या स्कार्फ्सने डोकी झाकावीत, असा आदेश दिला आहे. बीबीसीने ही बातमी दिली आहे.

‘धार्मिक मार्गदर्शक तत्त्वांचा’ नवीन संच प्रमोशन ऑफ व्हर्च्यू अँड प्रिव्हेन्शन ऑफ व्हाइस मंत्रालयाने जारी केला आहे. त्यानुसार, स्त्रियांचा सहभाग असलेली नाटके व मालिका प्रसारित करू नयेत अशी सूचना अफगाण टीव्ही वाहिन्यांना देण्यात आली आहे.

चित्रपट ‘शरियाच्या तत्त्वांविरोधात’ समजले जात असल्याने त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे “परदेशी संस्कृतीतील मूल्यांना महत्त्व देणाऱ्या परदेशी चित्रपटां”वरही बंदी घालण्यात आली आहे.

धर्माचा अपमान करणाऱ्या विनोदी व मनोरंजक कार्यक्रमांना मंत्रालयाने मनाई केली आहे.

“हे नियम नाहीत, तर ‘धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे’ आहेत,” असे मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपीला सांगितले.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून लष्कर मागे घेतल्यानंतर तालिबानने देशाचा ताबा घेतला. मात्र, यावेळची राजवट सौम्य राखावी यासाठी जागतिक समुदायांकडून तालिबानवर दबाव आणला गेला.

मात्र, तालिबान आपल्या मूळ तत्त्वांकडे परत जाणार असा अनेकांचा अंदाज होता. हळुहळू जनतेवर कडक निर्बंध लादले जात आहेत. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे.

स्त्रियांच्या काम करण्यावर तसेच मुलींच्या शिक्षणावर आणलेली बंदी ‘तात्पुरती’ आहे असा दावा तालिबान करत आहे. कामाची ठिकाणे तसेच शिक्षणाचे वातावरण स्त्रियांसाठी ‘सुरक्षित’ करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्त्रिया काम करू शकतील, मुली शिक्षण घेऊ शकतील असे तालिबानचे म्हणणे आहे.

मात्र, तालिबानने २० वर्षांपूर्वी सत्तेवर असताना अफगाणिस्तानला ज्या जगात नेले होते, त्याच जगात पुन्हा घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत. या जगात टेलिव्हिजन, चित्रपट यांसह मनोरंजनाची सर्व माध्यमे अनैतिक ठरवण्यात आली होती आणि त्यावर बंदी घालण्याच आली होती.

COMMENTS