माजी पूजऱ्याच्या मृत्यूने तिरुपती मंदिर बंद करण्याचा दबाव

माजी पूजऱ्याच्या मृत्यूने तिरुपती मंदिर बंद करण्याचा दबाव

तिरुपतीः तिरुमला येथील प्रसिद्ध वेंकटेश्वरा स्वामी मंदिरातील (तिरुपती मंदिर) माजी मुख्य पुजारी श्रीनिवास मूर्ती दीक्षितुलू (७५) यांचे कोरोना संसर्गाने

विरारमधील आयसीयूमध्ये आग, १३ रुग्णांचा मृत्यू
अब्दुल्लांविरोधातील देशद्रोहाची याचिका रद्द
उद्योग अग्रणीचे निधन !

तिरुपतीः तिरुमला येथील प्रसिद्ध वेंकटेश्वरा स्वामी मंदिरातील (तिरुपती मंदिर) माजी मुख्य पुजारी श्रीनिवास मूर्ती दीक्षितुलू (७५) यांचे कोरोना संसर्गाने सोमवारी निधन झाले. दीक्षितुलू यांच्या निधनाने तिरुपती मंदिर व्यवस्थापनावर मंदिर बंद ठेवण्याबाबत दबाव आला आहे. कारण या अगोदर मंदिरातील १८ पुजार्यांना कोरोनाची लागण झाली असली तरी मंदिर हे भाविकांसाठी खुले ठेवले गेले आहे.

दीक्षितुलू यांना गेल्या शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह व किडनीचे आजारही होते. त्यात कोरोनाची बाधा होऊ त्यांचे निधन झाले.

तेलुगू देसम सरकारने २०१८मध्ये दीक्षितुलू यांना मुख्य पुजार्याच्या पदावरून दूर केले होते. पण नंतर वायएसआर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दीक्षितुलू तिरुपती मंदिरातील काही धार्मिक पुजांमध्ये सहभागी होत होते.

८ जूनला हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. तर गेल्या आठवड्यात मंदिरातील ५० पैकी १८ पुजार्यांना कोविड-१९ची लागण झाली होती. सध्या मंदिर प्रशासनात १४० कर्मचारी असून त्यांच्या मार्फत मंदिराचा कारभार सुरू आहे.

तिरुपती शहराची लोकसंख्या साडेचार लाख असून तेथे कोरोनाच्या २००० केसेस आहेत. दररोज किमान १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. तिरुपती शहर चित्तूर जिल्ह्यात येते. तेथे २० जुलैपर्यंत कोरोनाचे ५१ बळी गेले आहेत.

ही परिस्थिती पाहता तिरुपतीमध्ये २० जुलैमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. पण त्याचा परिणाम भाविकांच्या वर्दळीवर झालेला दिसून येत नाही.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी दीक्षितुलू यांच्या निधनानंतर तिरुपती देवस्थान कमिटीचे संचालक वाय. व्ही. सुब्बू राव यांनी तातडीने मुख्यमंत्री वाय. एस. जगन रेड्डी यांची विजयवाडा येथे जाऊन भेट घेतली व मंदिर काही दिवस बंद ठेवण्याबाबत चर्चा केल्याचे समजते.

गेल्या महिन्याभरात तिरुपती शहरातील ५० वॉर्डपैकी ४० वॉर्डमध्ये कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले होते व प्रशासनाने अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून नागरिकांची वर्दळ कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करत तिरुपती मंदिर खुले करण्यात आले होते.

सध्या शहरातील ४३ पोलिसांना कोरोनाची लागण झालेली असून हे पोलिस मंदिराच्या परिसरात तैनात करण्यात आलेले होते. पण मंदिर प्रशासनाने एकही भाविक कोरोनाची लागण झालेला आढळून आलेला नाही व प्रशासनाचे कर्मचारीही सुरक्षित आहेत, असा दावा केला होता.

पण श्रीनिवास दीक्षितुलू यांच्या निधनाअगोदर १७ जुलैला मंदिराचे हंगामी मुख्य पुजारी रामण्णा दीक्षितुलू यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंदिर बंद ठेवण्याची विनंती केली होती. पुजाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे मंदिर प्रशासन कोरोनाची साथ रोखू शकले नाहीत, असाही आरोप त्यांनी केला होता. मंदिरातील पुजाऱ्यांची जागा कोणी घेऊ शकत नाहीत, त्यामुळे मंदिर बंद ठेवावे असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले होते.

इकडे पोलिसांनी असा दावा केला की, भाविकांना प्रसाद म्हणून जे लाडू दिले जातात ते लाडू तयार करणार्या कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने साथ पसरत आहे. तरीही भाविकांना प्रसाद दिला जात आहे. आता सरकारच्या निर्णयाची सर्वजण वाट पाहात आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: