रिहाना, ग्रेटाच्या एका ट्विटमुळे सरकार हादरले

रिहाना, ग्रेटाच्या एका ट्विटमुळे सरकार हादरले

नवी दिल्लीः दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, पर्यावरण चळवळीतली आघाडीची

या फेसबुकचं काय करायचं?
६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचे देशभर चक्का जाम आंदोलन
गृहराज्यमंत्री प्रामाणिक बांगलादेशी असल्याचा आरोप

नवी दिल्लीः दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, पर्यावरण चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले.

बुधवारी उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणताही दुष्प्रचार भारताच्या एकतेला संपवू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताची प्रगती रोखू शकत नाही. भारत विकासाच्या दिशेने एकजूट असल्याचे ट्विट केले.

या दोन व्यक्तींव्यतिरिक्त अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस, यूट्यूबर लिलि सिंह आदींनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला.

बुधवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तातडीने एक ट्विट करून भारतातील शेतकरी देशाचा एक अविभाज्य भाग असून त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे हरप्रकारे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे व त्यावर उत्तरही मिळत आहे. अशावेळी फूट पाडणार्या वक्तव्यांकडे लक्ष न देता सौहार्दपूर्ण वातावरण राहावे व त्याचे समर्थन करावे, अशी विनंती केली. यासाठी परराष्ट्र खात्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” असा हॅशटॅगही लावला होता.

या घटनेनंतर तासाभरात बॉलीवूडमधील काही सरकार समर्थक सेलेब्रिटींनी सरकारच्या बाजूने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” हा हॅशटॅग वापरत ट्विट केले. या सेलेब्रिटींमध्ये अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगण, एकता कपूर, सुनील शेट्टी आदींचा समावेश आहे. तसेच बहुसंख्य मंत्र्यांनीही हे ट्विट रिट्विट केले. नंतर भारतरत्न व जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले.

भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेः शेतकरी भारताचा अत्यंत महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. त्यांच्या प्रश्नाचा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सरकारच्या प्रयत्नांना साथ देणे महत्त्वाचे असून मतभेद निर्माण करणार्यांकडे दुर्लक्ष करणे या घडीला महत्त्वाचे आहे.

करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये आपण सर्वांनी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे त्यातून हित साधले जावे, कुणीही त्यापासून वंचित राहू नये, असे म्हटले आहे.

एकता कपूर यांनी आपल्या ट्विटद्वारे, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचाराविरोधात एकत्र उभे राहूया असे आवाहन केले आहे.

अजय देवगण यांनी जनतेने अशा प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

सुनील शेट्टी यांनी असा प्रचार अर्ध सत्याहून अधिक भयंकर असल्याचे मत व्यक्त करत परराष्ट्र खात्याचे ट्विट शेअर केले आहे.

संगीतकार कैलाश खेर यांनी भारत असा प्रचार सहन करणार नाही, असे ट्विट केले.

रिहानाच्या ट्विटमुळे खळबळ

मंगळवारी जगप्रसिद्ध गायिका रिहानाने शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी शेतकरी आंदोलन करत असताना, पोलिसांशी संघर्ष सुरू असताना शेतकर्यांची इंटरनेट सुविधा काढून घेतली, ही सीएनएनवरची बातमी शेअर करत, या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत का? असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आंदोलनाला आपले समर्थन असल्याचे मत व्यक्त केले.

रिहानाचे ट्विट काही तासांत एक लाखाहून अधिक जणांनी रिट्विट  केले व २ लाख जणांनी ते ‘लाइक’ केले.

रिहाना यांचे ट्विटरवर १० कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग यांनीही ट्विट करत आम्ही भारतातल्या शेतकर्यांच्या बाजूने एकजूट ठेवून असल्याचे मत व्यक्त केले.

रिहाना व ग्रेटाच्या ट्विटला बॉलीवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा व स्वरा भास्करने पाठिंबा दिला पण रिहाना ही मूर्ख असल्याचे सांगत दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी दहशतवादी असल्याचा आरोप कंगना राणावतने केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: