अखेर नवज्योत सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष

अखेर नवज्योत सिद्धू पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष

नवी दिल्लीः पंजाबचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांचे आव्हान तोडत अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या गळ्यात पंजाब काँग्रेस प्रदेश

प्रकाश बादलांकडून पद्म विभूषण परत
पंजाबमधील विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या
‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’

नवी दिल्लीः पंजाबचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांचे आव्हान तोडत अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या गळ्यात पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची माळ पडली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सिद्धू यांच्या नियुक्तीचे पत्र रविवारी रात्री जारी केले. आगामी पंजाब विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने सिद्धू यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या मदतीला ४ कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती केली. या सर्व नियुक्त्या पंजाब काँग्रेसमधील असंतुष्टांना खुश करण्यासाठी व पक्ष अमरिंदर सिंग व सिद्धू यांच्यात विभागला जाऊ नये म्हणून केल्या गेल्या आहेत.

नियुक्त केलेले कार्यकारी अध्यक्ष संगत सिंग गिलजियां, सुखविंदर सिंग डैनी, पवन गोयल, कुलजित सिंह नागरा हे पंजाबमधील वेगवेगळ्या जातींचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सिद्धू यांच्या नियुक्तीतून पक्ष नेतृत्वाने अमरिंदर सिंग यांच्या विरोधाला फारसे महत्त्व दिले नसल्याचे दिसून आले. ७९ वर्षांच्या अमरिंदर सिंग यांनी ४ वर्षांपूर्वीच आपली ही अंतिम निवडणूक असल्याचे जाहीर केले होते पण त्यांनी पक्षावरील आपली पकड सोडली नव्हती. आता सिद्धू यांच्या मदतीला पक्ष नेतृत्वच धावल्याने पक्षात नवी ऊर्जा व उत्साह येईल, असा प्रयत्न आहे.

सिद्धू हे पंजाबमधील लोकप्रिय नेते असून त्यांच्या सभांना गर्दी होत असते. त्यांचा कार्यकर्त्यांचा गोतावळा असून प्रचार मोहिमांना एक गती देण्याचे काम ते सुरू करू शकतात. सध्याच्या पंजाब काँग्रेसमध्ये एक प्रकारचे सुस्ती आली असून ती दूर करण्यासाठी नवे नेतृत्व देण्याचे काँग्रेस नेतृत्वाने ठरवले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व उ. प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सिद्धू यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने सिद्धू यांनी अखेर बाजी मारली.

सोमवारी सिद्धू यांनी एक ट्विट करून आपल्या स्वप्नाला पुरे करण्यासाठी व पंजाब काँग्रेसला पुन्हा विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. आपल्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी विश्वास दाखवल्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0