अ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट

अ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट

जगातल्या पॉवरप्लेमध्ये ब्राझीलच्या बोल्सॅनॉरोंचा प्रवेश तसा जरा उशीराच झाला पण सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर लगेचच आपल्या सामर्थ्याच्या आणि नैसर्गिक संसाधनाची बोल्सॅनॉरो यांनी चाचपणी केली. ब्राझील लवकरच महासत्ता व्हावा आणि या महासत्तेचा महान नेता आपण व्हावे यासाठी जगावर आपली हुकूमत कितपत चालते हे जगाला दाखवून देण्यासाठी बोल्सॅनॉरो यांनी आपण अ‍ॅमेझॉनची जंगले आपल्या हवी तशी तोडणार व जाळणार असून यात उर्वरीत जगाने उगीच आपले नाक खुपसू नये असे ठणकावले. त्यांचे समर्थकही तेच म्हणत आहेत.

पाँचजन्यची अॅमेझॉनवरही टीका; भ्रष्टाचाराचा आरोप
संगणकाचे भाऊबंद – २
अ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात

मुहूर्त खरा ‘सॅक्रेड गेम्स’चा रिव्यूव्ह लिहिण्याचा, पण ज्या त्रिमितीय परिस्थितीत या सीरिजमध्ये काळाचे आकलन मांडले गेलेय त्याचा विचार करता ही सीरीज पाहाण्यापेक्षा माणसांनी एकदा भवतालाकडे नजर टाकावी आणि मग गुरुजी काय म्हणताहेत ते पाहावे.

गुरुजींकडे पाहात असताना गोचीचे एकदोन डोस घ्यावेत आणि या जगात जे ‘तमस’ पसरलेय त्या तमसाचा तमाशा पाहून गप्पगार बसावे. अगदी सैफ अलीखान गप्पगार बसतो तसा. किंवा मग ज्या कुठल्या गाण्याने तो गप्पगार बसणे नाकारतो आणि स्वतःला समकालाचा नायक बनवू पाहतो त्या निर्णयाप्रत यावे.

समकालाचा हिरो बनण्याची आकांक्षा तशी या जमिनीला नवी नाही. कधीकाळी सेनापती बापटांना असा हिरो बनण्याची इच्छा झाली होती. आपल्या काळात आपले कर्तव्य केल्याचे सुख पांडुरंग महादेव बापटांना मिळाले, पुण्यात पहिल्या स्वातंत्र्यदिनचा झेंडा फडकाविण्याचा आद्यमानही मिळाला. हा इतका पुण्यसंचय करून वयाच्या ८७ व्या वर्षी बापट अनंतात विलीन झाले. त्यांच्या नावाने फारशा खऱ्याखोट्या व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट फिरविल्या जात नाहीत. अधूनमधून इकडचे तिकडचे त्यांचे अ‍ॅप्रोप्रियेशन करण्याचा प्रयत्न करतात, पण कुणाच्याही प्रयत्नाला म्हणावे असे यश मिळत नाही.

जग कुठे चाललय आणि त्याचे आता काय होणार याची कल्पना बापटांना आली असावी का? किंवा मग त्यांना दुसरेच काही प्रश्न पडले असावेत? काय प्रश्न पडले असावेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले होते का?  हे कळणं सध्यातरी अवघड आहे, दरम्यान व्यवस्थेने लोकांना आपल्या मुळांपासून उखडून विस्थापित करण्याचा जो सपाटा चालवला आहे तो पाहता या निष्कासनाविरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या या माणसाचा भारताला जगभर विसर पडला आहे.

जगभर प्रस्थापितांच्या आणि विस्थापितांच्या लढ्यात विस्थापितांचा आवाज इतका क्षीण होत चालला आहे की तो आता ऐकू तरी येईल की नाही यावर शंका यावी. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात राहून आपली उपजीविका करणाऱ्या निरनिराळ्या ३०५ आदिवासी जमातींची एकूण संख्या अवघी एक लाखांच्या आसपास आहे. ही लोकसंख्या निरनिराळ्या ६९० अधिवासांमध्ये विभागलेली आहे. हे आदिवासी जंगलालाच आपले सर्वस्व मानतात आणि मुख्य भांडलवादी जगाच्या प्रवाहापासून अलिप्त आहेत.

ब्राझीलच्या एकूण लोकसंख्येच्या अनुपातात या आदिवासींची संख्या आहे अवघी ०.४ टक्के. आणि या शून्य दशांश चार टक्के लोकांनी ब्राझीलची १३ टक्के जमीन व्यापलेली आहे. अर्थात हे लोक आपल्याला जंगलाचे राजे समजत नाहीत किंवा मग ते जंगल तोडायचा हक्क आपल्याला आहे असेही मानत नाहीत. या आदिवासींची जंगले तोडून तिथे शेती आणि औद्योगिक विकास करण्याचा मानस आहे तो ब्राझीलमध्ये जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जाईर बोल्सॅनोरो या महान नेत्याचा.

बोल्सॅनॉरो कुठल्या राजकीय विचारधारणेचे असतील, त्यांचे समर्थक त्यांच्या समर्थनार्थ कुठल्या पातळीवर जात असतील, सध्या जगभरातले उटपटांग नेते ज्या पॉवरप्लेमधून जात आहेत त्यात बोल्सॅनॉरो यांची भूमिका काय आहे याबद्दल वेगळे सांगण्याची काही गरज नाही. जॉन्सनला झाकावे आणि नेत्यान्हुला काढावे, नेत्यान्हुला झाकावे आणि पुतिनला काढावे, पुतिनला झाकावे आणि ट्रम्पला काढावे, आणि मग ट्रम्पला झाकावे आणि बोल्सॅनॉरोला काढावे अशी सगळी ही परिस्थिती.

या सगळ्या पॉवरप्लेमध्ये बोल्सॅनॉरोंचा प्रवेश तसा जरा उशीराच झाला पण सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर लगेचच आपल्या सामर्थ्याच्या आणि नैसर्गिक संसाधनाची बोल्सॅनॉरो यांनी चाचपणी केली. ब्राझील लवकरच महासत्ता व्हावा आणि या महासत्तेचा महान नेता आपण व्हावे यासाठी जगावर आपली हुकूमत कितपत चालते हे जगाला दाखवून देण्यासाठी बोल्सॅनॉरो यांनी आपण अ‍ॅमेझॉनची जंगले आपल्या हवी तशी तोडणार व जाळणार असून यात उर्वरीत जगाने उगीच आपले नाक खुपसू नये हे बॉल्सॅनॉरो आणि त्यांच्या समर्थकांनी जगाला ठणकावून सांगितले. गरम डोक्याचा हा बाबा आता सत्तेत आल्यावर तिथल्या आदिवासींशी आणि निसर्गाशी क्रूर खेळ करील हे माध्यमांतल्या अनेकांना माहिती होते पण हा मनुष्य क्रौर्याच्या कुठल्या पातळीवर जाईल याबद्दल कुणालाही अंदाज आलेला नव्हता.

पृथ्वीवरच्या सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक म्हणवली जाणारी अ‍ॅमेझॉन नदी ब्राझीलच्या मोठ्या भूभागवरून वाहते. ही नदी १ कोटी १० लाख वर्षांपेक्षाही जास्त प्राचीन असून आपल्या आयुष्याच्या अनेक कालखंडात तिच्यात अनेक बदल झाले आहे. अ‍ॅमेझॉनचे सध्याचे स्वरुप हे २४ लाख वर्षे जुने असून या २४ लाख वर्षांत अ‍ॅमेझॉनमध्ये लाखो प्रजाती नव्याने जन्माला आल्या, त्यांनी तिच्या आधाराने आपले अधिवास बनविले, कोट्यवधी महावृक्षांनी तिच्या किनाऱ्यावर आपली वस्ती वसवली. जगाच्या एकूण ऑक्सिजन निर्मितीत २०% ऑक्सिजन हा एकटा अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातल्या वृक्ष आणि वनस्पतींकडून येतो.

एका पद्धतीने अ‍ॅमेझॉनचे खोरे आणि या खोऱ्यातली जंगले आपल्या पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. आणि या फुफ्फुसांत गेल्या काही दिवसांपासून भयानक वणवे लागले आहेत. या वणव्यांची तीव्रता इतकी जास्त आहे की ब्राझीलच्या १४ राज्यांपैकी चार महत्त्वाची राज्ये आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. या आगीचे लोट हजारो किलोमीटरच्या परिसरात पसरले असून त्यातून बाहेर पडलेल्या धुराकडे उपग्रह चित्रांच्या मदतीने पाहिल्यास दिसणारी परिस्थिती आणीबाणीची आहे. हा धूर अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यापासून २८०० किलोमीटरहूनही जास्त दूर असणार्‍या ब्राझीलच्या साओ पावलो शहरात पोहचला असून मंगळवारी या शहरातल्या लोकांनी जे काही पाहिलेय त्यामुळे त्यांचा जगण्यावरचा विश्वासच उडून गेला आहे.

मंगळवारी भर दुपारच्या उन्हात साओ पावलो शहरात या वणव्याचा धूर पोहचला आणि पाहता पाहता त्याने सगळा आसमंत व्यापून टाकला. या धुराची घनता इतकी जास्त होती की दुपारी दोन वाजता साओ पावलो शहरात रात्रीसारखा मिट्ट काळोख पडला. एरव्ही खग्रास सूर्यग्रहणात भरदुपारी रात्रीचा अनुभव काही क्षण बऱ्याच जणांनी अनुभवलेला असेल, पण भर दुपारी असा इतका वेळ पडलेला अंधार माणसाने आपल्या लाखो वर्षांच्या इतिहासात एकदाही पाहिलेला नाही त्यामुळे मानवी इतिहासातला हा शब्दशः सर्वात काळा दिवस होता.

इतिहासातला हा सर्वात काळा दिवस आज जरी आला असला तरी त्यासाठी एकट्या बॉल्सेनॉरोला जबाबदार धरणे योग्य होणार नाही. आगीचा आणि माणसाचा संबंध तसा फार जुना आहे. आगीवर नियंत्रण मिळविणे, त्यात मांस व अन्न शिजवून खाण्याचा शोध माणसाला लाखो वर्षांपूर्वीच लागला होता. याशिवाय एखाद्या छोट्याशा जंगलाला वा गवताळ प्रदेशाला बाहेरून चहुबाजूंनी आग लावून मग त्या आगीत होरपळून मेलेले प्राणी आणि वनस्पती मिटक्या मारीत खाण्याचा शोधही माणसाने कित्येक हजार वर्षे अगोदरच लावून ठेवला. आफ्रिकेत जन्माला येऊन जगाच्या विविध भूभागांत पसरतांना माणूसप्राणी आगीवर नियंत्रण मिळवित तिचे नवनवे प्रयोग करीतच होता.

सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी नाईलच्या खोऱ्यात माणसाने शेतीचा शोध लावला. माणसाने ‘हंटर्स गॅदरर्स’ म्हणजे शिकारी-संकलक ही भटकी जीवनपद्धती सोडून एकाच परिसरात कायमचा मुक्काम ठोकून पशुपालन आणि वनस्पतीपालन सुरू केले. दिवस गेले तसे छोट्याशा भूभागातून शिकारी संकलक पद्धतीपेक्षा कैक जास्त पटीने अन्न पिकविता येते हे माणसाच्या लक्षात आले आणि माणसाची प्रजाती शेतीवर अधिकाधिक अवलंबून राहू लागली.

भटकेपण गेल्याने माणसाची अपत्ये बाह्यधोक्यांपासून जास्त सुरक्षित झाली आणि त्यांना शेतीतून पिकविलेल्या अन्नातून त्यांना सर्वंकष पोषण मिळाले नसले तरी अन्न सुरक्षितता लाभल्याने त्यांची संख्या वाढू लागली. लोकसंख्या वाढू लागल्यानंतर अर्थात शेतीचा आकारही वाढू लागला आणि माणसाला शेती करण्यासाठी नवनव्या भूभागांची गरज भासू लागली. हे नवे भूभाग निसर्गाच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात घेण्यासाठी माणसाने शक्कल लढवली.

‘स्लॅश अँड बर्न’ म्हणजेच एखाद्या भूभागावरची झाडे आणि निरुपयोगी वनस्पती वेगाने कापणे आणि अशी मृतझाडे पुरेशी सुकल्यानंतर त्यांना एकाच वेळी आग लावून देणे ज्यामुळे जमिनीतले सर्व निरुपयोगी जीव आणि गवत एका झटक्यात नष्ट होई. या प्रक्रियेत मागे उरलेल्या प्रचंड राखेवर एकदा पाऊस पडला म्हणजे मग ती जमिन सुपीक होऊन जाई आणि मग तिथे माणसे शेती करीत. ही शेती तीन ते पाच वर्षे उत्पन्न देई आणि मग एकदा ती नापीक झाली की माणसे आपला मोर्चा दुसऱ्या भूभागाकडे वळवित जिथे पुन्हा जंगले तोडण्याचा आणि जाळण्याचा सिलसिला चालू राही.

यथावकाश अगोदर नापीक झालेल्या जमिनीत ५ ते २० वर्षात नव्याने झाडी झुडपे आणि वनस्पती उगवून आल्यानंतर तिथेही ‘स्लॅश अँड बर्न’ पद्धती वापरून पुन्हा एकदा लागवडी योग्य बनविले जाई. जंगले जाळून तिथे शेती करण्याची ही पद्धती अजूनही प्रचलात असून जगभरातल्या काही महत्त्वाच्या जंगलात आजही तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

भारताच्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, आणि नागालँडमध्ये या पद्धतीला ‘झुम’ असे म्हटले जाते. याच पद्धतीने बांग्लादेशातल्या ‘खाग्राचारी’ आणि ‘सोयलेट’ भागातही शेती केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या ‘एकोसॉक’ आणि ‘युनेस्को’सारख्या सल्लागर समित्यांच्या समकक्ष दर्जा मिळालेल्या ‘युआयए’ या संस्थेच्या अहवालात जगभरातल्या ५० कोटी शेतकऱ्यांपैकी २० कोटी शेतकरी या पद्धतीचा वापर करत असल्याची माहिती दिली आहे.

‘स्लॅश अँड बर्न’च्या बाबतीत आघाडीवर येतो तो ब्राझील. इथे पाच लाखांहूनही अधिक लहान शेतकरी दरवर्षी काही लाख एकर जागेतली जंगले जाळून तिथे शेती करीत असतात. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सॅनॉरो यांनी सत्तेत आल्यानंतर काही तासांतच आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जंगलांची जबाबदारी शेती मंत्रालयाकडे वर्ग केली आणि जंगलातल्या आदिवासींची जबाबदारी महिला व बालकल्याण मंत्रालयाकडे वर्ग केली. या दोन्ही खात्यांच्या मुख्य पदांवर शेतीतले अनेक गबर व्यापारी बसलेले होते आणि बोल्सॅनॉरो यांनी हा निर्णय असाच घ्यावा म्हणून त्यांनी अगोदरच त्यांच्याबरोबर अलिखीत करार करून घेतला होता.

बॉल्सॅनोरोंचे हे निर्णय अतिशय भयंकर आहेत ज्यामुळे अ‍ॅमेझॉनची जंगले कॉर्पोरेट लॉब्यांच्या हातात जातील ज्यातून अपरिमित हानी घडून येईल असे स्थानिक पर्यावरणवाद्यांनी ओरडा सुरू केला ज्यावर बॉल्सॅनोरो आणि त्यांच्या भक्तांनी कशा प्रकारची उत्तरे दिली असतील हे इथे सांगायला नको.

अ‍ॅमेझॉनचे जंगल हे ब्राझीलच्या संकल्पित भूमीवर असले तरी ते या पृथ्वीच्या पर्यावरणाचा घटक आहे आणि त्याच्याशी चालविलेला हा खेळ जागतिक पर्यावरणावर भयंकर वाईट परिणाम करू शकतो अशी भीती जगभरातल्या विचारवंतानी आणि पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनाही काय उत्तरे मिळाली आहेत हे इथे वेगळे सांगायला नको.

यथावकाश ऋतु पुढे सरकले आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आगी लागायला सुरुवात झाली. या आगी आठवड्याभरात मानवी नियंत्रणाच्या बाहेर गेल्या आणि ११ ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉनच्या राज्यांनी आणीबाणी जाहीर केली. १३ ऑगस्ट रोजी या वणव्यांचा धूर उपग्रहांनी टिपायला सुरुवात केली. हा लेख लिहिला जात असताना अ‍ॅमेझॉनच्या जंगलात ४० हजारहून अधिक ठिकाणी वणवे लागले आहेत. गेल्या वर्षी लागलेल्या आगींपेक्षा हे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असून  वणवे असेच चालू राहिल्यास गेल्या वर्षी नष्ट झालेल्या जंगलापेक्षा दुप्पट जंगले यावर्षी जळून खाक होणार आहेत.

अ‍ॅमेझॉनचा ऐतिहासिक वणवा या महिन्याच्या सुरुवातीपासून धगधगत असला तरी स्थानिक माध्यमांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात होऊन दोनतीन दिवसच झाले आहेत. इतर सर्व बातम्यांप्रमाणे हीही एक बातमी भारत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजलीच असेल पण या समस्येची तीव्रता नेमकी किती आहे आणि त्याचे संभाव्य धोके काय आहेत याचे सविस्तर विश्लेषण बाहेर येईलच असे नाही, त्यामुळे हा सगळा लेखप्रपंच.

सरतेशेवटी पुन्हा एकदा ‘सॅक्रेड गेम्स’ आठवतांना त्यातल्या सरताज सिंगने द्विधा मनस्थितीच राहावे की बात्या एबलमन या गुरुजींच्या पट्टशिष्येचे म्हणने स्वीकारून या धगधगत्या जगाकडे दुर्लक्ष करून सुरक्षित बंकरमध्ये आश्रय घ्यावा या तिढ्यापाशी आपण पुन्हा एकदा येऊन उभे राहतो.

जगभरात वाढत चाललेले तामसी वातावरण पाहता कलियुगाचा अंत आता फार दूर नाही असा निष्कर्ष या सीरीजचे काही फॅन्स काढू शकतील पण यातून पुन्हा सत्ययुग येईलच याची कुठलीही शाश्वती नाही आणि नेमकी हीच आपल्या काळाची गोची आहे.

राहुल बनसोडे, हे मानववंशशास्त्राचे अभ्यासक असून ते सॉफ्टेवअरमध्ये कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0