एका ब्राझिलियन एनजीओच्या मते आगींचा थेट संबंध जंगले नष्ट करण्याशी आहे. हा पाऊस नसल्याचा परिणाम आहे, या दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे त्यांना आढळलेले नाहीत.
ब्राझिलमध्ये जंगले नष्ट करण्याचे प्रमाण खूप वाढलेले असतानाच ब्राझिलमधील अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये आगींचे प्रमाण नाट्यमयरित्या वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या विषुववृत्तीय वनांच्या भविष्याबद्दल जगभरच्या पर्यावरणवाद्यांना चिंता वाटू लागली आहे.
१ जानेवारी ते २० ऑगस्ट या काळात लागलेल्या आगींची संख्या ७४,१५५ इतकी मोठी आहे. ब्राझिलियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रीसर्च (INPE) मधील डेटा नुसार २०१८ च्या तुलनेत आगींमध्ये ८५% इतकी वाढ झाली आहे. या वर्षातील आगीच्या निम्म्या घटना मागच्या २० दिवसांत घडल्या आहेत असेही INPE डेटावरून दिसते.
२० ऑगस्ट रोजी ब्राझिलियन एनजीओ IPAM (इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल रीसर्च इन अॅमेझोनिया) यांनी प्रसिद्ध केलेल्या एका तांत्रिक टिप्पणी मध्ये म्हटले आहे, या आगी पावसाच्या कमतरतेमुळे लागत आहेत या दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नाहीत.
“आपल्याला आज ज्या आगी दिसत आहेत त्यांचा थेट संबंध जंगले नष्ट करण्याशी आहे,” असे IPAM च्या विज्ञानविषयक संचालिका ऍन ऍलेन्कर म्हणाल्या.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या तांत्रिक टिप्पणीच्या सहलेखिका ऍलेन्कर यांनी या आगी म्हणजे वणवे नव्हेत यावर भर दिला. त्यांच्या मते या आगी माणसांनी लावल्या आहेत, जे जंगलाच्या एकेका भागाला लक्ष्य करून दर वर्षी केले जाते. तसेच या प्रकारच्या आगी अॅमेझॉन भागात नेहमीच जंगले नष्ट करण्याचा शेवटचा टप्पा म्हणून लावल्या जातात.
“ते झाडे तोडतात, त्यांची लाकडे तिथेच सुकवतात आणि नंतर त्यांना आगी लावतात, जेणेकरून राखेमुळे माती सुपीक होईल,” त्यांनी स्पष्ट केले. पाऊस आल्यानंतर थोड्याच काळात तिथे त्या राखेत उरलेल्या पोषक द्रव्यांमुळे चाऱ्याचे गवत फोफावते.
Folha de São Paulo या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, अती-उजव्या विचारांचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी २१ ऑगस्ट रोजी याला उत्तर देताना सूचित केले, की कदाचित एनजीओंचे सदस्यच या आगींच्या मागे असू शकतील.
“हे माझ्या विरोधात, ब्राझिल सरकारच्या विरोधात लक्ष वेधून घेण्यासाठी या एनजीओंच्या सदस्यांनी केलेले गुन्हेगारी कृत्य असू शकते,” असे बोल्सोनारो एका मुलाखतीत म्हणाल्याचे बातमीत नमूद केले आहे. ही मुलाखत नंतर सरकारने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.
अध्यक्षांच्या मते नॉर्वेने ऍमॅझॉन फंड साठीचा ३३.२ दशलक्ष डॉलरचा निधी थांबवल्याचा सूड घेण्यासाठी हे कृत्य केलेले असू शकते, असेही बातमीत म्हटले आहे.
साओ पावलोमध्ये काळे आकाश
१९ ऑगस्टच्या दुपारी जेव्हा साओ पावलोमधील आकाश अचानक काळे झाले, तेव्हा ब्राझिलमधील या आगी अचानक चर्चेत आल्या. #PrayforAmazonas या हॅशटॅग खाली ट्विटरवर “Amazon Fires” ट्रेंड होऊ लागले. आणि या आगी आणि आकाशातले काळे ढग यांच्यात काय संबंध आहे याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या.
माध्यमांमध्ये लवकरच बातमी आली की या अभूतपूर्व घटनेचे कारण एकमेकांशी संबंधित नसलेल्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय थंड हवा, ज्यामुळे शहरावर खालच्या थरातील ढगांचे आणि धुक्याचे प्रमाण वाढले. दुसरी गोष्ट म्हणजे ही थंड हवा पसरत गेली तसे वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल होऊन हजारो मैलांवरचा, अॅमेझॉन तसेच दक्षिण अमेरिकेतील इतर ठिकाणच्या जंगलांच्या आगीमुळे तयार होणारा धूर शहराकडे आला.
तज्ञांच्या मते हा “स्मोक कॉरिडॉर” तयार होण्यामागे अनेक कारणे आहेत.
“वर्षाच्या या काळात नेहमीच आगी लागतात. पण दर वर्षी स्मोक कॉरिडॉर तयार होत नाही त्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की आगींची संख्या आणि तीव्रता, इंधनाचा प्रकार, मातीतील आर्द्रता, आणि हवामानशास्त्राशी संबंधित घटक,” नासा येथील एक संशोधक सँतियागो गॅसो यांनी UOL Noticias ला सांगितले.
विशेषतः अॅमेझॉन प्रदेशात परिस्थिती खूपच भयानक आहे. ऍकर या राज्याने तसेच अॅमेझोनास या राज्याच्या काही भागांनी आगीशी सामना करण्यासाठी आणीबाणीची परिस्थिती घोषित केली आहे.
हवामानाच्या घटनांच्या दृष्टीने पाहिले तर हे वर्ष काही फार असाधारण नव्हते, आणि याच गोष्टीची वैज्ञानिकांना अधिक चिंता वाटते आहे. या वर्षी फार मोठे दुष्काळ किंवा एल निनो सारख्या हवामानशास्त्रविषयक घटना नव्हत्या, ज्या १९९८, २००५ आणि २०१५ मध्ये या प्रदेशात आगींच्या घटनात जी तीव्र वाढ झाली होती त्यांच्याशी सहसा संबंधित असतात.
या वर्षीच्या आगींचा जंगले तोडली जाण्याशी जवळचा संबंध असल्याचे दिसते: IPAM च्या डेटावरून दिसते की जिथे जंगले नष्ट होण्याचा दर सर्वात अधिक होता अशा १० नगरपालिकांच्याच हद्दीत सर्वाधिक आगींच्या घटनाही झाल्या आहेत.
ऍलेन्कार यांच्या मते, या वर्षी आगी लवकर सुरू झाल्या. जमीनमालक सहसा त्यांच्या जमिनीवरची झाडे पाऊस येण्याच्या १ महिना आधी तोडतात आणि जाळतात. पण पाऊस तर सप्टेंबरच्या शेवटी शेवटी येतो – अॅमेझॉनच्या उत्तर भागात त्याहूनही नंतर! “म्हणजेच आता यापुढे आणखी भरपूर आगी लागणार आहेत.”
मूळ लेख
COMMENTS