अमेरिका भेटीतून इम्रानने बरंच कमावलं

अमेरिका भेटीतून इम्रानने बरंच कमावलं

पूर्वी अफगाणिस्तानात पाकिस्तान दहशतवाद पसरवत असल्याने तेथे शांतता नांदत नाही, असा आरोप अमेरिकेचा असे. तीच अमेरिका आता पाकिस्तानची मदत घेणे हाच अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचा तोडगा आहे असे मानू लागली आहे. हा अमेरिकेच्या भूमिकेतील बदल पाकिस्तानसाठी मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर इम्रान खान यांची पहिली अमेरिका भेट ही त्यांच्या राजकीय वाटचालीतील अत्यंत महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या मीडियाने, तेथील राजकीय विश्लेषकांनी इम्रान यांनी अमेरिकेकडून जे काही साध्य केलेले आहे त्याचे स्वागत केले आहे. ही इम्रान खान यांची परराष्ट्र राजकारणाच्या पातळीवर वर्षभरातील कमाई म्हणता येईल.

सत्तेत येऊन एक वर्ष झाल्यानंतर परराष्ट्रनीतीत आपण काही भरीव केले आहे- विशेषत: अमेरिकेसंदर्भात- हे देशापुढे दाखवायचा इम्रान यांचा  प्रयत्न होता, तो प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे केला हे गेल्या चार दिवसांतल्या घडामोडीवरून दिसून येते.

२०१६मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रधोरण पूर्णपणे बदलले. ट्रम्प यांच्या स्वभावात जसा लहरीपणा, बेदरकारपणा आहे तसा लहरीपणा, बेदरकारपणा अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणात दिसून आला. अमेरिकेने त्यांचे मित्र असलेल्या नाटो देशांशी पूर्वापार असलेले मैत्रीचे, सलोख्याचे, आर्थिक आदान-प्रदानाचे संबंध बाजूला ठेवले व स्वदेशी व्यापाराचे, स्वत:ची बाजारपेठ अधिक सक्षम करण्याचे धोरण अवलंबले. क्युबा व इराणसोबतचे करार िवनाकारण मोडले. पराकोटीचा शत्रू असलेल्या उत्तर कोरियाशी संबंध सुधारले. भारतालाही फार चांगली अशी वागणूक त्यांनी दिलेली नाही. आयात शुल्क, इराणकडून मिळणाऱ्या तेलाला बंदी व एचवनबी-१ व्हिसावरून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. तो इतक्यात कमी होण्याची चिन्हे नाहीत. परंपरागत मित्र असलेल्या पाकिस्तानलाही ट्रम्प यांनी या दोनअडीच वर्षांत फारसे काही दिलेले नाही.

अनेकांना आठवत असेल ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर पाकिस्तानवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले होते की ‘गेली अनेक वर्षे अमेरिका पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत करत आहे पण त्याबदल्यात पाकिस्तानने अमेरिकेला काहीही दिलेले नाही. हा देश पूर्ण खोटारडा आहे.’

ट्रम्प यांच्या अशा अनपेक्षित विधानाने भारतातील मोदी सरकार खूष झाले होते. दहशतवादाच्या मुद्द्यावर आता तरी अमेरिका पाकिस्तानची आर्थिक रसद बंद करेल, त्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर खडे बोल सुनावेल, त्यांच्या वर दबाव आणेल असे मोदी सरकारला वाटत होते. प्रत्यक्षात गेल्या दोन अडीच वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला फारशी मदत केलेली नसली तरी पाकिस्तानला त्यांनी पूर्ण बहिष्कृतही केलेले नाही. कालच्या इम्रान खान यांच्या अमेरिकाभेटीत अमेरिका पुन्हा पाकिस्तानच्या जवळचा मित्र झाला आहे.

इम्रान खान यांची अमेरिका भेट अत्यंत कुशलतेने आखण्यात आली होती. त्यांनी या वेळेस अमेरिकेला जाण्यामागची परिस्थितीही त्याला बरेच बळ देऊन गेली. अफगाणिस्तानात लोकशाहीची स्थापना व शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून अमेरिकेने तालिबानशी चर्चा करण्यास तयारी दाखवली आहे आणि तालिबानही त्यांच्या काही शर्ती मान्य झाल्यास हिंसाचार, दहशतवाद थांबवण्यास तयार आहे. या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर इम्रान अमेरिकेस गेले.

पण अशी शांतता साध्य व्हावी म्हणून अमेरिकाला भारत नव्हे तर पाकिस्तानची अात्यंतिक गरज आहे. पाकिस्तान जर तालिबानच्या चर्चेत बऱ्याचशा अटी घेऊन आला तर त्याचा फायदा अमेरिकेला होईल असा अमेरिकाचा डाव आहे. तर डबघाईला आलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची आर्थिक मदत, गुंतवणूक हवी आहे. त्यांना या प्रदेशात शांतता हवी असल्याने ते अमेरिकेशी संबंध सुधारण्यास तयार आहेत.

अफगाणिस्तानातील दहशतवादाने दोन्ही देश त्रस्त आहेत. अमेरिकेला तर अफगाणिस्तानातून आपले लष्कर बाहेर काढायचे आहे पण क्षेत्रीय राजकीय हितसंबंधांमुळे त्यांना या प्रदेशातून लवकर बाहेर पडता येत नाही. पाकिस्तानला अमेरिकेची ही अडचण माहिती आहे. पण त्यांना अफगाणिस्तान प्रश्नात भारताची लुडबूडही नको आहे. त्यामुळे ट्रम्प यांना मनवण्यासाठी ज्या काही राजकीय खेळी करायला लागतील त्याची तयारी करून इम्रान खान अमेरिकेला गेले होते.

इम्रान यांनी आपल्यासोबत पाकिस्तानचे लष्करप्रमुख व त्यांचे शिष्टमंडळही नेले होते. असे प्रसंग पाकिस्तानच्या राजकारणात विशेषत: दिसून येत नाहीत. पण पाकिस्तानचे लष्करप्रमुख अफगाणिस्तानासंदर्भात अमेरिकेच्या लष्कराशी चर्चा करतात यावरून पडद्याआडून बऱ्याच घडामोडी घडत असल्याचा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. अशा भेटीचा एक अर्थ असाही निघू शकतो की, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आता पाकिस्तानकडून सर्वंकष साथ घेण्यास पूर्ण तयार आहे.

पूर्वी अफगाणिस्तानात पाकिस्तान दहशतवाद पसरवत असल्याने तेथे शांतता नांदत नाही, असा आरोप अमेरिकेचा असे. तीच अमेरिका आता पाकिस्तानची मदत घेणे हाच अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचा तोडगा आहे असे मानू लागली आहे. हा अमेरिकेच्या भूमिकेतील बदल पाकिस्तानसाठी मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.

त्याचे प्रत्यंतर ट्रम्प यांच्या विधानात दिसून आले. इम्रान यांच्याशी चर्चा केल्यानंतर अमेरिकेचे पाकिस्तानशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले झाले आहेत असे वक्तव्य त्यांनी केले. अमेरिकेची अशी भूमिका बदलणे पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची असली तरी भारतासाठी ती चिंताजनक आहे. पाकिस्तानने भारताचे अफगाणिस्तानातील हितसंबंध कमी करण्याच्या उद्देशाने ज्या चाली आखल्या आहेत त्यापैकी अमेरिकेला त्यांचे धोके दाखवून आपणच त्यांना मदत करतो ही पाकिस्तानची चाल महत्त्वाची आहे.

मुत्सद्देगिरीत व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव पडत असतो. नेत्याची देहबोली, त्याची संवादफेक, प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याचे कौशल्य याचा राजनयावर मोठा परिणाम पडत असतो. इम्रान खान यांचे व्यक्तिमत्व भारदस्त वाटत नसले तरी ते राजबिंडे, आकर्षक आहे. ते तंदुरुस्त दिसतात. इंग्रजीवर प्रभुत्व आहे शिवाय गेली दोन दशके राजकारणात असल्याने त्यांच्याकडे राजकीय कुशाग्र बुद्धी आहे. ‘नया पाकिस्तान’ अशी घोषणा जनमानसात लोकप्रिय करून ते बहुमताने निवडून आले होते. अशा ‘नया पाकिस्तान’चे नायक म्हणून ते अमेरिकेला अत्यंत थाटात पण आदबशीर गेले होते. वॉशिंग्टनमधील त्यांचे पाकिस्तानी समुदायासमोरील झालेले भाषण अनेकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यात राष्ट्रवाद ठासून भरला होता. तरुणांच्या इच्छा-अपेक्षांना त्यात साद घालणारे आवाहन होते. मध्यमवर्गीय व निम्नमध्यमवर्गीय पाकिस्तानी समुदायाला ते आकर्षित करणारे होते.

नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर न्यू यॉर्कमध्ये असेच भाषण केले होते. त्याची आठवण करून देणारे इम्रान खान यांचे भाषण होते. असे राजकीय व नाटकीय नेपथ्य कुशलतेने रचल्याने वातावरणावर प्रभाव पडतोच आणि तो प्रभाव व्हाइट हाऊसमध्ये दिसून आला.

ट्रम्प व इम्रान खान यांच्या चर्चा झाल्यानंतर दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत द. आशियातील प्रश्नावर अमेरिकेची काय भूमिका आहे असा प्रश्न विचारला असता. इम्रान खान यांनी तत्परतेने पाकिस्तान दहशतवादासंदर्भात भारताशी चर्चा करण्यास तयार आहे पण तेथील नेतृत्व कोणत्याही चर्चेस तयार नसल्याचे सांगितले. त्यांचे वाक्य कोणत्याही असहाय्यतेतून आलेले नव्हते तर तो ट्रम्प यांना दिलेला फुलटॉस होता. ट्रम्पनी या फुलटॉसवर सिक्सर मारून मोदींची भारतात कोंडी केली. नेहमीप्रमाणे मोदी या विषयावर गप्प बसले. त्यांच्यावर संसदेत विरोधक तुटून पडले आहेत पण मोदी संसदेत फिरकलेले नाहीत.

पण अशा राजकीय खेळीतून इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीपर्यंत आणून ठेवला आहे आणि त्याने सामान्य पाकिस्तानी जनतेत वेगळाच उत्साह आला आहे. अर्थात भारताच्या इच्छेवरही ते अवलंबून आहे. पण ट्रम्प यांच्या एकूण खोटारड्या स्वभावामुळे हा प्रसंग पेल्यातले वादळच ठरणार आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिकेला जाणार आहेत तेव्हा हे विधान मीडिया उकरून काढेल तेव्हा ट्रम्प व मोदी या दोघांचाही कस लागणार आहे. त्यामुळे मोदींना आपली अमेरिका भेट अत्यंत कुशलतेने हाताळावी लागणार आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवण्याची मोहीम जरा बाजूला ठेवून अफगाणिस्तान प्रश्नावर भारत काय करू शकतो हे अमेरिकेला पटवून द्यावे लागणार आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या आदिवासी-डोंगराळ पट्‌ट्यातील दहशतवाद ही एक सर्वमान्य व्यवस्था झाली आहे. तिचा स्वीकार करून भारताला पावले टाकावी लागणार आहे.

इम्रान खान यांनी अमेरिका भेटीतून काश्मीरप्रश्नावर भारताने संवाद सुरू करावा असाही दबाव आणला आहे. त्याला मुत्सद्देगिरीने उत्तर द्यावे लागणार आहे. मुत्सद्देगिरी संवादातून केली जाऊ शकते, अबोला धरून नव्हे.

COMMENTS