अमेरिकेत व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक बळींची भीती

अमेरिकेत व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक बळींची भीती

गेल्या तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने अमेरिकेत सुमारे ५० हजार रुग्ण दगावले आहेत आणि सध्या या विषाणूचा संसर्ग पाहता पुढील आठवड्यात हा आकडा अजून काही हजारांत वाढत जाईल. ७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे सुमारे ५८ हजार सैनिक मरण पावले होते, त्यापेक्षा अधिक अमेरिकी नागरिक कोरोना विषाणू साथीत बळी पडण्याची भीती आहे. व्हिएतनाम युद्ध सुमारे एक दशक लढले गेले होते, पण कोरोनाविरोधातील केवळ तीन महिन्याच्या लढाईत अमेरिकेला हजारोच्या संख्येत आपल्या नागरिकांना गमवावे लागले आहे.

अमेरिकेची आर्थिक सुबत्ता, तेथील उत्तम आरोग्य व्यवस्था, जगातील उत्तमोत्तम वैज्ञानिक, डॉक्टर, संसोधन संस्था दिमतीला असूनही ट्रम्प प्रशासनाला वाढत्या मृत्यूची संख्या रोखता आलेली नाही.

५०च्या दशकातल्या कोरिया युद्धात अमेरिकेने ३५ हजार सैनिक गमावले होते. तो आकडा कोरोनाच्या साथीत अमेरिकेने केव्हाच मागे टाकला आहे. आता कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून पुढील काही महिने मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत जाईल, असे नॉर्थइस्टर्न विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे.

१ मार्चला न्यू यॉर्कमध्ये कोरोना साथीची लागण झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती, त्यानंतर या शहरात कोरोनाची लागण झालेले २,६३,४९० रुग्ण असून १५,७४० रुग्णांचा मृत्यू तर २३,८८७ रुग्ण बरे झाले आहेत. या घडीला १५,०२१ रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहे. न्यू यॉर्कमध्ये कोरोनाची चाचणी न झालेले अन्य ५,१२१ नागरिकही मृत्यू पावले आहेत पण त्यातील बहुतांश नागरिकांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता आहे.

अमेरिकेत आता कोरोनामुळे मृतांचा आकडा असा वाढत गेला तर युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेला जेवढी झळ बसली होती त्यापेक्षा अधिक झळ सोसावी लागणार आहे.

युद्धाच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळलेली नव्हती किंवा बेरोजगारी दराने सर्वोच्च पातळी गाठली नव्हती पण आता तसे चित्र राहिलेले नाही. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या ७० लाख १४ हजार इतकी झाली आहे तर रोजगाराची संख्या २० लाख ९९ हजाराहून १५ लाख ५७ हजार अशी घसरली आहे.

अमेरिकेतील १६.२ टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष रोजगारक्षम आहे. हा आकडा गेल्या तीन महिन्यात घसरत चालला आहे. २००९च्या आर्थिक मंदीत अमेरिकेतील बेरोजगारीचा दर १० टक्के होता तर १९३३च्या आर्थिक महामंदीत हा आकडा २४.९ टक्के इतका होता. पण आता कोरोनामुळे तीन महिन्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबर हादरे बसल्याने बेरोजगारी वेगाने वाढेल असे चित्र आहे.

अनेक बड्या कंपन्यांनी आपले ताळेबंद मांडण्यास सुरवात केली आहे. अनेक कर्मचार्यांच्या नोकर्यांवर गदा आली आहे. कोणीही या घडीला भविष्य काय असेल याचा अंदाज बांधू शकत नाही.

सीएनएन, यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिकवर आधारित.

COMMENTS