अमेरिकन सैन्यानं कोंडी केल्यानंतर अबु बकर अल बगदादीनं स्वतःच्या अंगावर बाळगलेल्या स्फोटक बंडीचा स्फोट करून स्वतःला संपवलं. सीरियात इडलिब या प्रांतात ही घटना घडली.
सहाएक महिने अल बगदादीच्या हालचालीवर पाळत ठेवल्यानंतर बगदादीचा ठावठिकाणा सापडला. बगदादीचे डीएनए सँपल अमेरिकन सैनिकानी जवळ ठेवले होते. बगदादी जिवंत सापडणार नाही हे माहित असल्यानं मेलेला माणूस बगदादीच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे नमुने उपयोगी पडले. ओसामा बिन लादेनप्रमाणंच बगदादीच्या शरीराचे तुकडे दफन करण्यात आले किंवा जाळण्यात आले, पण कुठे ते अमेरिकनं गुप्त ठेवलं, कारण त्याचं स्मारक होऊ नये अशी अमेरिकेची इच्छा होती.
अल बगदादी आयसिल (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांट) या स्वतःच निर्माण केलेल्या संघटनेचा प्रमुख होता. इराक, सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन, इस्रायल, जॉर्डन या विभागाला लेवांट म्हणतात. या विभागाची एक स्वतंत्र एक इस्लामी राज्य त्याला निर्माण करायचं होतं. एकदा इराकमधे टिक्रीत या गावात आणि नंतर सीरियात राक्का येथे त्यानं त्या इस्लामी राज्याची खिलाफत स्थापन केली आणि तो त्याचा खलिफा म्हणजे प्रमुख झाला.
अबु बकर अल बगदादीचं एक नाव इब्राहीम अल सामराई. म्हणजे सामराई या गावातला इब्राहीम. आपण त्याला इब्राहीम सामराईकर असं म्हणू शकतो. पण अरब माणसं तसं म्हणत नाहीत. अमूक मुलाचा बाप अशी तिथं माणसाची ओळख सांगितली जाते. अबू म्हणजे बाप. बकर अल बगदादी या मुलाचा बाप म्हणजे अबू बकर अल बगदादी म्हणजे इब्राहीम सामराईकर. आपल्याला ओसामा बिन लादेन हे नाव परिचित आहे. बिन लादेनचा मुलगा ओसामा असं ते नाव आहे. खरं म्हणजे इराकी स्टाईलनं ओसामा बिन लादेनचं नाव ओसामा अबू हमझा असं असायला हवं होतं. पण जग त्याला अबू बकर अल बगदादी या नावानंच ओळखत असल्यानं आपण त्याचा उल्लेख बगदादी असा करूया.
ओसामा बिन लादेननं जगात इस्लामी राज्य तयार करायचं ठरवलं.त्या प्रयत्नात जगभरात अनेक ठिकाणी मुक्काम करून ओसामा शेवटी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात विसावला. अमेरिकेनं ओसामाला आधी निष्प्रभ केलं आणि नंतर मारलं. ओसामाच्या अल कायदाचं नेतृत्व अयमान अल जवाहिरी याच्याकडं आलं, ओसामाचा मुलगा हमझा याच्याकडं गेलं नाही. अयमान जवाहिरी सौदीही नाही, तो इजिप्शियन आहे. अयमाननं अल कायदा पसरवायचा प्रयत्न केला. अल कायदाची प्रेरणा घेऊन इराकमधे झरकावी यानं त्याच धर्तीवर इस्लामी राज्य करायचा प्रयत्न केला पण तेव्हां ओसामा जिवंत असल्यानं झरकावीकडं अल कायदाचं नेतृत्व आलं नाही. झरकावीच्या मृत्यूनंतर ते नेतृत्व बगदादीकडं आलं. बगदादीला ओसामानं तो जिवंत असतानाच मान्यता दिली. परंतू बददादीला साऱ्या जगात इस्लामी राज्य स्थापण्यात रस नव्हता, त्याला लेवांटपुरतीच खिलाफत तयार करायची होती.
१९७१ साली समारा या गावाजवळच्या एका वस्तीवर जन्मलेला इब्राहीम स्वतःला महंमदांच्या कुरेश या जमातीचा वंशज मानत असे. त्याचे वडील इमाम होते. घरात धार्मिक कर्मठ वातावरण होतं. १९९० च्या आसपास इराकमधलं वातावरण तणाव आणि हिंसेनं भारलेलं होतं, इराकनं कुवैत आक्रमणानंतर अमेरिकेकडून हार खाल्ली होती, अमेरिकेनं इराकवर-सद्दामवर आक्रमक कारवाया सुरु केल्या होत्या. सद्दाम विरुद्ध अमेरिका, इराक विरुद्ध अमेरिका, इस्लाम विरुद्ध ख्रिस्ती असं वातावरण इराकमधे तयार झालं होतं. तरूण अल बगदादी त्या वातावरणानं भारला होता.
अमेरिकाविरोधात निदर्शनं इत्यादीत भाग घेणं अल बगदादीला जमत नसे कारण त्याची दृष्टी अधू होती. घरातलं वातावरण आणि परंपरा याचा परिणाम म्हणून अल बगदादीनं धार्मिक शिक्षण घ्यायचं ठरवलं. बगदाद विद्यापीठातून त्यानं धर्म या विषयावर एम ए ची पदवी मिळवली, पीएचडी केली, डिलिट मिळवली.
इराकमधल्या अमेरिका विरोधी वातावरणात हात धुवून घेण्याचा प्रयत्न त्या काळात ओसामा बिन लादेननं केला. परंतू सद्दाम हुसेन आणि ओसामा यांत वितुष्ट होतं. ओसामाला इराकमधे प्रवेश देणं म्हणजे आपल्या एका प्रतिस्पर्ध्याला आपणच रान मोकळं करून देणं असा हिशोब करून सद्दामनं अल कायदाला इराकपासून दूर ठेवलं. परंतू ओसामाचं लक्ष अल बगदादीवर होतं.
अल बगदादीनं स्वतंत्रपणे समारा, टिक्रीत इत्यादी भागात आपल्या इमाम असण्याचा फायदा घेऊन युवकांना संघिटत केलं, अमेरिका विरोध आणि त्याच बरोबर कट्टर इस्लाम अशा दोन मुद्द्यांवर. सद्दामनं अल बगदादीला त्रास दिला नाही. यथावकाश २००३ मधे अमेरिकेनं इराकवर आक्रमण केलं, सद्दामला पकडलं, मारलं. अमेरिकेची ही खेळी इराकी माणसाला अर्थातच मान्य नव्हती. इराकमधलं वातावरण अमेरिका विरोधी होतं, अल बगदादीनं त्याचा उपयोग करून घेतला. अल कायदाच्या तंत्राचा वापर करून भूमिगत दहशतवादी संघटना उभारली, अमेरिकन सैन्यावर हल्ले सुरु केले.
अमेरिकेच्या हिशोबात अल बगदादी हा एक बच्चा होता, छोटा होता. इतर अनेक जिहादींप्रमाणंच एक असं मानून अमेरिकेच्या इराकमधल्या हस्तक सरकारनं अल बगदादीला पकडलं, तुरुंगात टाकलं. सुमारे वर्षभर बगदादी तुरुंगात होता.
याच काळात अमेरिकेनं एक फार मोठी चूक केली. इराकचं लष्कर बरखास्त करून टाकलं. बरखास्त जनरल, अधिकारी, जाणार कुठं? बेकार झाले. त्या पैकी काही लोक तर बगदादीच्याच तुरुंगात होते. बगदादीला आयतेच अनुभवी लष्करी अधिकारी मिळाले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर बगदादीसोबत अनेक जनरल आणि ब्रिगेडियर-कर्नल होते. हेच पुढं बगदीच्या सैन्यातले अधिकारी झाले.त्यांच्या मदतीनं बगदादीनं एक समांतर सैन्य उभारलं, त्यांच्याच मदतीनं एक समांतर सरकारही स्थापन केलं.
टिक्रीत हे सद्दामचंच गाव बगदादीनं सरकार तयार करण्यासाठी निवडलं. २००४ नंतर टिक्रीत या गावात त्यानं ठाण मांडलं, तिथं कर्मठ शरीया राजवट सुरु केली, स्वतःचं एक स्वतंत्र सरकार त्या गावात सुरु केलं. शाळा कॉलेजेस, पोलिस, नगर पालिका, सैनिक, अर्थव्यवस्था इत्यादी साऱ्या गोष्टी त्यानं टिक्रीतमधे उभारल्या. बगदादीकडं स्वतःचं सैन्य तर होतंच, आखाती प्रदेशातून पैसा आणि शस्त्रं आली. जगभरातून अनेक जिहादी टिक्रीतमधे आले.अल बगदादी खलिफा झाला, त्याचं रीतसर राज्य टिक्रीतमधे स्थापन झालं.
त्या काळात अल झरकावीची अल तौहिद वल जिहाद ही संघटना जोरात होती. झरकावी त्याच्या आगखाऊ भाषणांसाठी टीव्ही व सोशल मीडियावर लोकप्रीय होता. झरकावीच्या झगझगाटामुळं अल बगदादी झाकोळला होता. झरकावीला अल कायदानं मान्यता दिली होती. २००६ साली झरकावी मारला गेल्यानंतर जिहादी कारवायांचं नेतृत्व अल बगदादीकडं आलं. यथावकाश २०१० साली ओसामानं बगदादीला मान्यता दिली.
२०११ साली ओसामाला मारल्यावर अल बगदादी प्रभावी ठरू लागला हे दिसल्यावर अमेरिका अल बगदादीच्या मागं लागली, बगदादीवर हल्ले होऊ लागले. २०१४ साली अमेरिकेनं टिक्रीतवर हल्ला केला. अमेरिकेच्या बलाढ्य ताकदीसमोर बगदादीचे रणगाडे आणि किरकोळ विमानं टिकाव धरू शकली नाहीत. बगदादी सीरियात राक्कामधे पोचला.सीरियात यादवी चालू होती आणि सीरिया-इराकमधे वितुष्ट होतं. त्यामुळं सीरियानं बगदादीला शिरकाव करू दिला. आता खिलाफत राक्कामधे सुरु झाली.
राक्कामधे २०१४ ते २०१७ या काळात एक भयानक अमानुष क्रूर सरकार अल बगदादीनं चालवलं. तिथं त्याचं मंत्रीमंडळ होतं, उप खलिफा होते, संरक्षणमंत्री होता, अर्थमंत्री होता, रणगाडे होते, एकाद दोन विमानंही होती. जगभरातून जिहादी लोक त्याच्याकडं पोचले. जगभरातून पैसा मिळाला आणि सीरियातल्या तेल विहिरीचं उत्पन्न मिळू लागलं.
आता बगदादी हे अमेरिका आणि दोस्तांचं मुख्य लक्ष्य झालं होतं. एकीकडं सीरियातली यादवी आणि दुसरीकडं आयसिस या दोन आघाड्यांवर अमेरिका व दोस्त लढत होते. फ्रेंच सैन्य, सीरियाच्या सैन्यातून बाहेर पडून तयार झालेलं बंडखोराचं सैन्य आणि कुर्ड स्वतंत्रता वाद्यांचं सैन्य याच्या दिमतीला अमेरिकन शस्त्रं आणि मदत होती. या मंडळीनी २०१७ सालच्या ऑक्टोबरमधे राक्कावर हल्ला केला, राक्का बेचिराख केलं. बगदादी आपल्या साथीदारांसह राक्कातून पळाला.
बगदादी सतत ठिकाणं बदल सीरियाभर फिरत होता. ओसामा बिन लादेन आणि अल कायदानं गुप्त रहाण्याचं एक शास्त्रंच तयार केलं होतं. गाव, त्यात एक सुरक्षित जागा, त्या जागी कंपाऊंड आणि इमारत, इमारतीत तळघरं आणि भुयारी वाटा, सुरक्षित जागेवर टेहळणी आणि सुरक्षा व्यवस्था. अशीच जागा इडलिबमधे बगदादीनं तयार केली. तिचा मागोवा अमेरिकेला लागला आणि अमेरिकनं त्या जागेवर हल्ला करून बगदादीला मारलं.
बगदादी मेला म्हणजे आयसिस संपलं काय?
आयसिस, अल कायदा या संघटना नाहीत. इस्लामिक स्टेट वा अल कायदा या सामान्यतः ज्याला संघटना म्हणतात अशा तऱ्हेच्या संघटना नाहीत. सरकार, कंपनी, कॉर्पोरेशन इत्यादी संस्थांसारखं आयसिस नाही. नियम, बंधनं, आदेश, पदाधिकाऱ्यांची उतरंड, बजेट, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई अशा पद्धतीनं आयसिस किवा अल कायदा बनलेलं नाही.आयसिस किंवा अल कायदा म्हणजे आख्यायिका किवा दंतकथेच्या जागोजागी निघणाऱ्या स्वतंत्र आवृत्या असतात.
खरा इस्लाम आणि त्या खऱ्या इस्लामवर आधारलेलं राज्य अशी एक दंतकथा आहे. वेळोवेळी या दंतकथेच्या आवृत्या, व्हर्जन्स, निघत गेली. आयसिस ही त्या दंतकथेची एक ताजी आवृत्ती. दंतकथा किंवा आख्यायिकाच ती त्यामुळं तिच्यातल्या सत्याचा विचार तिचे भक्त कधीच करत नाहीत. संघटित धर्माच्या निर्मितीपासूनच धर्म या कल्पनेचा वापर राजकारण करणारे लोक करत आहेत. जनतेवर आपली सत्ता लादण्यासाठी देव आणि धर्म या कल्पनांचा वापर राजकारणी करत असतात. नाव देवाचं आणि धर्माचं असतं, प्रत्यक्षात सगळी खटपट राजसत्ता मिळवण्याची आणि टिकवण्याची असते. साऱ्या जगभर हे घडत असतं. आधुनिक काळात राजसत्तेनं धर्मापासून फारकत घेतली, लोकशाहीची कल्पना विकसित झाली आणि लोक आपल्या मर्जीप्रमाणं राज्य करू लागले, देव हा फक्त उपासनेपुरताच शिल्लक राहिला. परंतू धर्म या पुरातन दंतकथेवर विश्वास असणारी काही मंडळी मात्र शिल्लक राहिली. प्रत्येक देशात, प्रत्येक धर्मात अशी मंडळी आहेत. आयसिसची मंडळी त्या पैकी.
सौदी अरेबिया असो, येमेन असो, सुदान असो, नायजेरिया असो, अफगाणिस्तान असो की पाकिस्तान. दुनियाभर काही लोकं इस्लामी राज्य या आयसिस-अलकायदा वळणाच्या दंतकथेवर विश्वास बाळगून आहेत. एकविसाव्या शतकाला विरोध करणारी ही माणसं शस्त्रं एकविसाव्या शतकातली वापरतात, इंटरनेट-सेलफोन इत्यादी एकविसाव्या शतकातली संपर्क साधनं वापरतात, त्यांची व्यसनंही एकविसाव्या शतकातली असतात पण त्यांचं लक्ष्यं मात्र सातव्या शतकातला समाज हे असतं. जपमाळ घेऊन जप करतात शांततेचा आणि सर्रास घाऊक पद्धतीनं निष्पाप माणसांना मारतात. स्त्री ही त्यांच्या लेखी केवळ उपभोगाची वस्तू असते, मुलाना जन्म देणारा कारखाना असते.
त्यांना कोणी पुढारी लागत नाही, कोणी संघटक लागत नाही. शस्त्रं तयार करण्याची आणि वापरण्याची मॅन्युअल इंटरनेटवर मिळतात आणि त्याना प्रेरणा देणारं साहित्यही इंटरनेटवर मिळतं. बस. तेवढ्या बळावर अमेरिका, युके, जर्मनी, फ्रान्, बेल्जियम इत्यादी ठिकाणीही माणसं सहज जिहादी होतात.
म्हणूनच ओसामा मरतो, हमझा मरतो, झरकावी मरतो, बगदादी मरतो, तरीही जगभर हज्जारो जिहादी उद्योग करत असतात. इराक, सीरिया, लिबिया, इजिप्त, येमेन, सुदान, सोमालिया, नायजेरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, फिलिपिन्स अशा अनेक ठिकाणी हज्जारो जिहादी सक्रीय आहेत. अफगाणिस्तानात दररोज आयसिसचे लोक पाच पन्नास माणसं मारत असतात.
बगदादी मेला त्याची जागा एका कोणीतरी अब्दुल्ला कुरेशी या माणसानं घेतलीय म्हणतात. हा माणूस कोण आहे याच्या तपशीलात जगातले आयसिसवाले जात नाहीत. त्याला नेता मानून ते आपापले उद्योग चालू ठेवतील. खलिफा, नेता इत्यादी गोष्टी त्यांच्या लेखी केवळ प्रेरणा असतात. त्यामुळं एक नेता मेला तर त्याची जागा दुसरा नेता घेतो आणि उद्योग सुरु रहातात.
धर्माची भुरळ माणसाला हिंसा करायला प्रवृत्त करते. धर्म नावाची गोष्ट जोवर माणसाला भुरळ घालतेय तोवर आयसिस संपणं कठीण आहे.
बगदादी मेला, बगदादी अमर आहे.
COMMENTS