“छत और आसमां” – एका असामान्य प्रेमाची कथा…

“छत और आसमां” – एका असामान्य प्रेमाची कथा…

त्या काळात इमरोज आणि अमृताचे असे एकत्र राहणे, हे समाजाला मान्य नव्हते, पण दोघांनी कधीच समाजाची पर्वा केली नाही. त्या दोघात मैत्री होती, प्रेम होते. इमरोज अमृतावर प्रेम करायचा आणि अमृता साहिरवर...

पितापुत्राच्या नात्याचा कोलाज
देशात २१ हजार शिबिरात साडे सहा लाख स्थलांतरित
४६ दिवस तुरुंगात कोंडल्यासारखे

जहाँ भी आझाद रूह की झलक पड़े

समझना वह मेरा घर है

-अमृता प्रीतम

आपण आजपर्यंत फार प्रेमकहाण्या ऐकल्या आहेत. लैला-मजनू हीर-रांझा किंवा देवदास वैगेरे. त्यात प्रेम, त्याग समर्पण हे सर्व ऐकले आहे. आज आपण एका जगावेगळ्या प्रेमाच्या नात्याबद्दल जाणून घेऊया, ती म्हणजे अमृता प्रीतम – साहिर- इमरोज यांच्या जगावेगळ्या प्रेमाविषयी.. “इमरोज मेरे घर कि छत है और साहिर मेरा खुला आसमां” असे अमृताने एका प्रश्नाला उत्तर देताना उद्गारलेले हे वाक्य होते!

तुम्ही म्हणाल आता हा इमरोज आणि साहीर कोण आणि त्यातल्या त्यात अमृता “प्रीतम” मधला प्रीतम कोण? अमृताने जन्मभर साहीरवर प्रेम केले आणि इमरोजने अमृतावर! आणि प्रीतम आणि अमृता हे नात्याने पती -पत्नी. प्रेमाला कुठल्याच बंधनात न बांधणारी ही खरीतर जगावेगळीच प्रेमाची गोष्ट म्हणता येईल अशी होती. अमृता प्रीतम ठाऊक नाही असा एकही साहित्यप्रेमी तुम्हाला सापडणार नाही. भारतीय कवयित्रींतील आजवरचं सर्वात लोकप्रिय नाव. जितक्या त्या एक साहित्यकार म्हणून सर्वांनाच प्रिय होत्या, तितकीच त्यांची प्रेमकहाणी देखील लोकप्रिय आहे. त्यांच्या प्रेमाला कोणतीही सीमारेषा नव्हती, ज्यांचे प्रेम जात, पात, धर्म अथवा काळाच्या चौकटीत बंदिस्त नव्हतं, असं थोडक्यात हा प्रेमाचा त्रिकोण होता. त्यांचं आयुष्य म्हणजेच एक कविता होती.

ही गोष्ट आहे भारताची फाळणी होण्याआधीची. पाकिस्तानमधील गुजारानवाला येथे ३१ ऑगस्ट १९१९ रोजी अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. केवळ ६ वर्षाची असतांना त्यांचा विवाह व्यापारी प्रीतमसिंह यांच्यासोबत झाला. लग्न झाले मात्र तिची पाठवणी सासरी झाली नव्हती. याच दरम्यान तिला कविता लिहायची सवय लागली. ती वयाच्या १६ व्या वर्षी प्रीतमकडे गेली, मात्र अमृता -प्रीतमचे वैवाहिक जीवन काही खास राहिले नव्हते. शरीराची देवाण-घेवाणीपलीकडे ते नातं सरकूच शकले नाही. या एकाकी आयुष्यात जगताना, अमृताला सर्वात मोठा भावनिक आधार मिळाला तो तिच्या कवितांचा! दिवसेंदिवस कविता लिहिण्याची आवड वाढत गेली आणि केवळ वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा ‘अमृत लहरे’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर अमृता यांनी शायरी लिहिण्यास सुरुवात केली.

१९४४ मध्ये झालेल्या एका मुशायऱ्यात अमृता आणि साहीर लुधियानवी यांची भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अमृताच्या कल्पनेमध्ये दिसणारा हळवा, प्रतिभाशाली आणि कवी मनाचा प्रियकर तिला प्रत्यक्षात भेटला होता. हळूहळू भेटीगाठी होऊ लागल्या, त्यांच्यातले प्रेम फुलू लागले. साहिर यांनी अमृता यांचे भावविश्व व्यापून टाकले होते. अमृता तिच्या आत्मकथेत म्हणते की, “आम्ही भेटायचो पण आमच्यात बोलणे नाही व्हायचे. साहिर जेव्हाही मला भेटायचा तेव्हा वाटायचे की एक शांतता मला भेटली आणि थोड्या वेळाने ती निघून गेली. त्याच्यात प्रेमाच बीज उमलत असतानाच १५ ऑगस्ट १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली आणि आणि दोघांच्या नात्यात विरह आला. अमृता दिल्लीमध्ये तर साहिर पाकिस्तानमध्ये राहिले. शरीराने दूर मात्र मनाने मात्र ते एकमेकांच्या जवळच राहिले ते कवितांच्या माध्यमातून! (साहिर नंतर मुंबईत आले)

त्या दरम्यान अमृताला दोन अपत्य झालेली होती. आणि प्रीतमला अम्रिताचे साहिर सोबतचे नाते मान्य नव्हते त्यामुळे वैवाहिक जीवनात मात्र यामुळे खळबळ माजली आणि १९६०मध्ये त्या मोठ्या हिंमतीने त्या आणि प्रीतम विभक्त झाले. पण तिने जीवनातून जरी प्रीतमला काढले, तरीही नावातून तिने प्रीतमला कधीच काढले नाही, का? तर शेवटपर्यंत याचे उत्तर स्वतः अमृताही देऊ शकली नाही. अमृताने सार्वजनिकरित्या साहीर सोबतच्या नात्याला मान्य केले होते. पण साहिर मात्र कधीच या नात्याला उघडपणे मान्यता देण्याची हिंमत करू शकला नाही. विशेष म्हणजे अमृताने देखील या गोष्टीची कधीच तक्रार केली नव्हती. साहिर हिंदी चित्रपटात गाणे लिहायला लागला, चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून साहिर यांनी अभूतपूर्व ख्याती मिळवली

त्यानंतर साहिर मुंबईत आणि अमृता दिल्लीत राहात असायचे. अधून मधून दिल्लीला साहिर येत असे पण हे साहिरच्या दृष्टीने एक नाव नसलेले नाते होते. आणि अमृताच्या दृष्टीने हे प्रेम होते. साहिर हा चेन स्मोकर होता, जेव्हाही तो अमृताला भेटायचा, तर सिगरेट प्यायचा. तो तिथून गेल्यानंतर अमृता त्याने विझवलेल्या सिगरेट काढून प्यायची. साहिर हळू हळू अमृतापासून दूर व्हायला लागला. अमृताच्या हिस्स्याचे प्रेम अजूनही तिच्या वाट्याला आलेले नव्हते. त्यातच साहिर यांना नवे प्रेम गवसले. त्यावेळे च्या नव्याने नावारूपाला आलेली गायिका सुधा मल्होत्रा हिच्या प्रेमात पडला. परंतु तरीही अमृता यांचं प्रेम साहिरवर होतंच आणि सुधाचं देखील. अमृता एकटी पडायला लागली. त्या उदास क्षणी त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे ‘आखरी खत’ हे पुस्तक. या पुस्तकाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला.

१९५८ साली अमृताचे पुस्तक ‘आखरी खत’ची कव्हर डिजाईन करायचे होते आणि त्याच बाबत इमरोज यांच्याशी तिचा परिचय झाला. त्यावेळी इमरोज हा ‘शमा’ नावाच्या उर्दू वर्तमानपत्रात काम करत असे. तसेच इमरोज हा एक उत्तम चित्रकार होता. दोघात हळूहळू मैत्री झाली. भेटीगाठी वाढत गेल्या. इमरोज अमृताच्या प्रेमात पडला. इमरोज त्यांच्या भेटीचा किस्सा रंगवून सांगत असत, “अमृता यांना कलाकृती तर आवडलीच, पण कलाकारही त्यांच्या पसंतीस उतरला. आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. आमची घरं जवळपासच होती. मी दिल्लीच्या दक्षिण पटेल नगरात राहत होतो, तर त्या पश्चिम पटेल नगरमध्ये”

इमरोजला माहीत होते की, अमृता साहिरवर प्रेम करते पण त्याला कधीच या गोष्टीचे वाईट वाटले नाही. कारण इमरोज अमृतावर प्रेम करत होता. आपले आयुष्य आपल्याच विचारानुसार जगणाऱ्या अमृता मुक्त होत्या, पण त्या स्वैर नव्हत्या. आपल्याला हवं तसं जगताना त्यांनी जगाची पर्वा केली नाही याची जाणीव इमरोजला होती त्यामुळे त्याने कधीही अमृतावर अधिकार गाजवला नाही. अमृता आणि इमरोज हे एकमेकांना फार समजून घ्यायचे आणि एकमेकांच्या खूप जवळ आलेले. आणि मग त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र भारतामधील ‘लिव इन रिलेशनशिप’ वाली पहिली जोडी सुद्धा मानली जाते. अमृता-इमरोज रिलेशनशीपमध्ये तर होते, मात्र त्यात स्वातंत्र्यही खूप होतं.

खूप कमी जणांना माहीत आहे, की ते एका घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत. याबाबतीत इमरोज लिहितो की, “स्त्री आणि पुरुष एकाच खोलीत राहण्याची परंपरा आहे. आम्ही दोघं एका छताखाली राहायचो… पण आमच्या खोल्या वेगवेगळ्या होत्या. त्या रात्रीच्या वेळी लिखाण करायच्या. कारण या वेळा ना कुठला आवाज असतो, ना कोणाचा टेलिफोन, ना कोणाची ये-जा”. आणि विशेष म्हणजे दोघांनी कधीच एकमेकांना प्रेमाबद्दल विचारले नाही. त्याची गरजही भासली नाही. आपलं प्रेम व्यक्त करण्याची, थोडक्यात प्रेमाचा इज़हार करण्याची इच्छा प्रत्येक प्रेयसी-प्रियकराची असते. मात्र अमृता आणि इमरोज या बाबतीत वेगळेच ठरले. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही.

अमृता यांना इंदिरा गांधीनी राज्यसभा सदस्यत्व म्हणून निवडले होते. त्या काळात इमरोज अमृताला दररोज संसद भवनात सोडायला जायचा आणि दिवसभर तिच्या येण्याची वाट पाहायचा. संसदेतील पुष्कळ खासदार सुरक्षा रक्षक इमरोजला अमृताचा ड्रायव्हर समजायचे. त्याचा काहीही फरक इमरोजला कधीच पडला नव्हता. त्यांच्यातले नाते मात्र फुलत राहिले. एक किस्सा असाही आहे की, इमरोज अम्रिताला म्हणाला की, “मला जन्मभर तुझ्यासोबत राहायचे आहे”, तेव्हा अमृता त्याला म्हणाली की, तू संपूर्ण जग फिरून ये, त्यानंतरही तुला वाटले की तुला माझ्या सोबत राहायचे आहे तर, मी इथेच उभी असेल तुझी वाट पाहत!” हे ऐकून इमरोजने रूम मध्येच ७ चक्कर मारल्या अन म्हणाला, “फिरलो संपूर्ण जग, अन मला आत्ताही तुझ्याच सोबत राहायचे आहे!” हे असे त्यांचे जगावेगळे नाते होते. एकमेकांविषयी आदर ही तितकाच होता आणि दोघे त्या नात्यात स्वतंत्र देखील होते.

अमृता एकदा बाथरूममध्ये पडली, दुखापत झाल्यामुळे पुष्कळवेळा आजारी पडायला लागली. इमरोजने तिची खूप काळजी घेतली, तिची सेवा करण्यातच स्वतःला वाहून घेतले. या आजारपणातच तिने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी इमरोजचा आणि या जगाचा निरोप घेतला. तेव्हा तिची शेवटची कविता होती, “मै तुम्हे फिर मिलूँगी.. कहाँ, कैसे पता नहीं “.

अमृता तिच्या साहित्याच्या काव्यरूपाने आजही आपल्यात आहे. अमृता प्रीतम या साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला मानकरी होत्या. साहित्य जगतातला सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण हे किताब तसेच देशविदेशातील अनेक मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सहा विद्यापीठांनी डी. लिट. पदवी देवून त्यांचा सन्मान केला. ‘आवाज-ए-पंजाब’ या किताबाने त्यांना गौरविण्यात आले असून त्यांना ‘सहस्त्रकाची कवयित्री’ मानले जाते. जितके प्रेम तिला भारतातील रसिकांनी दिले तितकेच पाकिस्तानातही ती लोकप्रिय होती.

त्या काळात इमरोज आणि अमृताचे असे एकत्र राहणे, हे समाजाला मान्य नव्हते,  पण दोघांनी कधीच समाजाची पर्वा केली नाही. त्या दोघात मैत्री होती, प्रेम होते. इमरोज अमृतावर प्रेम करायचा आणि अमृता साहिरवर…साहिरने अमृताला कधीही मान्य केले नाही, तरीही तिने कधीच साहिरला याचा दोष दिला नाही. अमृताच्या हृदयात साहिर आहे हे माहीत असूनही, इमरोजचे अमृतावरचे प्रेम कमी झाले नाही किंवा त्याने कधी अमृताला त्या पासून रोखले नाही. दोघांच्या प्रेमात आदर होता, स्वातंत्र्य होते, एकमेकांना समजून घेण्याची आवड होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: