‘भिंती’ पलीकडील ‘भारता’ची ओळख घडवणारी कलाकृती

‘भिंती’ पलीकडील ‘भारता’ची ओळख घडवणारी कलाकृती

नागराज मंजुळे यांची ‘झुंड’ ही कलाकृती द्वेष, तिरस्कार करणाऱ्या राष्ट्रीयत्त्वाच्या परंपरेला नाकारते. व शोषित-वंचित जनसमूहाच्या संघर्षाच्या प्रेरणेतून आलेल्या राष्ट्रीयत्त्वाच्या कल्पनेला व्यक्त करते.

एल्गार परिषदः ८ जणांवर एनआयएचे आरोपपत्र
इस्थर ड्युफ्लो, राजन, सुब्रह्मण्यम तामिळनाडूचे अर्थसल्लागार
जम्मू व काश्मीरमध्ये कलम ३११ची अंमलबजावणी

नुकताच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच समाज माध्यमावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. व्यवस्थेने बहिष्कृत, बेदखल, सतत अपमानित केलेल्या घटकांना ‘हिरो’च्या भूमिकेत आणून भारतीय चित्रपटाचा उच्च जात-वर्ग-वर्ण वर्चस्वाने बांधलेल्या ‘भिंतीं’ला धडक देण्याची हिम्मत नागराज यांनी आतापर्यंत केली आहे. चित्रपट क्षेत्रातील कोणताही अनुभव किंवा त्याचा वारसा नसलेले, कोणतंही प्रशिक्षण न घेतलेले, ग्रामीण भागातील व वस्तीतील वेगवेगळे कलागुण अंगी असलेल्या सामान्य घटकातील कलाकारांना ते स्वतंत्र ओळख मिळवून देतात. त्यामुळे अशा कलाकारांना घेऊन त्याचं वास्तविक जगणं हीच चित्रपटाची कथा बनवणं, मुख्य प्रवाहात (mainstream)  हस्तक्षेप करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं हे नागराज याचं खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या चित्रपटातील वेगळेपणा भावतो.

अलीकडे जात किंवा दलित, आदिवासी यांच्यावर आधारित काही मोजक्या चित्रपटांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हे विषय हाताळलेले दिसतात. परंतु जिथे आजही काही गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जातो. अशा काळात भारतातल्या बहुतांश मोठ्या चित्रपटगृहात डॉ. आंबेडकर जयंती ‘झुंड’च्या निमित्ताने साजरी करण्याचे धाडस नागराज यांनीच केले. (अर्थांत जयंती कशा प्रकारे साजरी केली जावी का? याबाबत माझी वेगळी मते असू शकतात.) त्यामुळे ऑस्ट्रेलियासारख्या देशातील चित्रपटगृहात सुद्धा ‘भारतीयांनी’ जल्लोष साजरा केला. बॉलीवूडमधील आमीर खान, अनुराग कश्यप सारख्या बड्या कलाकारांनी सुद्धा नागराज यांचं भरभरून कौतुकही केलं; तर काहींना विचार करण्यास भागही पाडले.

नागपूर येथील एका महाविद्यालयाचे खेळ प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्याशी निगडीत व वस्तीतील मुलांच्या संघर्षमय आयुष्यावर आधारित कथा म्हणजे ‘झुंड’ ही कलाकृती आहे. चित्रपटाच्या सुरूवातीला मुस्लिम, दलित, आदिवासी लोकांचं वस्तीतील रोजचं जगणं दृश्य केलं आहे. येथे मला वसंत मून यांच्या ‘वस्ती’ या आत्मकथनातील नागपूरच्या गुड्डी गोदाम या वस्तीतील चित्रण आठवते. रेल्वे रुळाच्या कडेला, शहरातील कुडा-कचरा टाकण्याच्या जागा व मोठ-मोठे नाले यांच्या आजूबाजूला ही वस्ती वसलेली. चोरी, लुटमार, नशा, हाणामारी यातून पोलीस कस्टडी असे ‘वस्ती’तील वर्णन ‘झुंड’मध्ये दृश्य रुपात पाहायला मिळते. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात जिथे कामगारांचे मोठ्या प्रमाणत वास्तव्य असते तिथे अशा वस्त्या उभ्या राहतात. अशा वस्त्यातून येणारी मुलं शिक्षणाचा अभाव, गरिबी व भयंकर दारिद्र्य यामुळे ते नशा करणे, गुन्हेगारीकडे वळणे हे स्वाभाविक बनते.

हजारो वर्षापासून गावाच्या बाहेर बहिष्कृत करून ठेवेलेला दलित, आदिवासी समाज औद्योगिकीकरणामुळे कामगार म्हणून शहरातील अशा वस्त्यात जाऊन राहू लागला. यामुळे गावातील सवर्णांकडून होणारा अत्याचार, छळ, अपमान, अवहेलना यापासून काही प्रमाणात सुटका मिळाली. परंतु शहरातही त्यांची जात, त्यांच्या दारिद्र्यामुळे त्यांना लुटारू, चोर, गुन्हेगार म्हणून ओळख मिळाली. अलीकडे तर ‘नक्षलवादी’, राष्ट्रविरोधी (Anti-National) म्हणूनही त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जातं. अशा वस्तीतील मुलांना त्यांच्यातील कौशल्य (skills) ओळखून फुटबॉल या खेळाद्वारे त्यांचे माणूस म्हणून जगण्याचं अस्तित्त्व ‘झुंड’मधून उभे केले जाते. अर्थातच फुटबॉल खेळ हा या चित्रपटाचा विषय नाही, तर कामगारांच्या वस्तीतील अनेक निम्न जात-जमातीय वर्गातील मुलांच्या जीवन संघर्षाची कहाणी आहे. जी त्यांना ‘भारत’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळख, अस्तित्व निर्माण करण्याचे भान, आत्मविश्वास मिळवून देते. जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत अशा भेदभावाची जी ‘भिंत’ समाजव्यवस्थेने उभी केलेली आहे तिला भेदून जाण्याचं स्वप्न निर्माण करणारी ही कथा आहे.

नागपूरच्या गुड्डी गोदाम या वस्तीचं चित्रण चित्रपटात दाखवलं आहे. तेथेच वस्तीतील मुलं एका छोट्याशा मैदानावर खेळ खेळतात. त्या वस्तीच्या दुसऱ्या बाजूला एक कॉलेज व तेथील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठं मैदान. कॉलेज व त्या वस्तीला विभाजित करणारी एक ‘भिंत’ उभी असते. ही भिंत समाजातील माणसातील भेद स्पष्ट करण्यासाठी प्रतिकात्मक (symbolic) म्हणून चित्रपटात शेवटपर्यंत उभी असते. खरं तर ही ‘भिंत’ कुणी उभी केली? कोणत्या समाजाने केली? याचं प्रतिकात्मक उत्तर ‘अपुन कि बस्ती गटर मे है, पर तुम्हारे दिल मे गंद है!  या गाण्यातून मिळते. अशिक्षितपणा, नशा, गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या वस्तीतील मुलांना ती ‘भिंत’ ओलांडून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आत्मविश्वास विजय (अमिताभ बच्चन) या पात्राद्वारे निर्माण केला जातो.

जीवनात नैराश्य व हतबल होऊन ट्रेनपुढे आत्महत्या करण्यास निघालेल्या तरुणास (जगदीश) ‘भिंती’ पलीकडील मैदानात खेळणाऱ्या मुलांचा गोंगाट/आवाज जगण्याची उमेद देतो. तोच आत्मविश्वास त्याला ती ‘भिंत’ ओलांडून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अवकाश देतो. कोणत्याही प्रकारची संधी व अवकाश नसलेल्या वस्तीतील मुलांनी कॉलेच्या प्रशिक्षित मुलांसोबत ‘सद्भावना सामना’ (match) जिंकल्यानंतर हाच आत्मविश्वास कॉलेजमध्ये गार्डची नोकरी करणाऱ्या खेलचंदच्या चेहऱ्यावरील हास्यातून दिसतो. हाच आत्मविश्वास त्याला ती ‘भिंत’ ओलांडून आपले कौशल्य (talent) दाखवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी बळ देतो. पितृसत्तेची बळी असलेल्या, तीन मुलींची आई रजिया आपल्या पतीच्या जाचामुळे कंटाळून घर सोडते. आपल्या मेहनत व जिद्दीच्या बळावर स्वतःला सिद्ध करण्यास सज्ज होते.

दारिद्र्यामुळे शिक्षणाचा अभाव व त्यातून आलेली बेकारी यामुळे नशा, मारहाण करणे अशा प्रकारचं ‘वस्ती’तील तरुणांचं जगणं अपरिहार्य बनतं. अशा परिस्थितीतून आलेला डॉन (अंकुश गेडाम) हा तरुण स्वतःला बदलाची संधी मिळताच त्याच्यासमोर उभी असलेली ‘भिंत’ ओलांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्या नावासमोर लागलेली ‘गुन्हेगारीची’ ओळख वारंवार त्याचा पाठलाग करत राहते. शेवटी राष्ट्रीय टीममध्ये त्याचे सिलेक्शन होते. आणि जेव्हा विमानतळावर चेकिंगच्या वेळेस त्याच्या जीन्समध्ये सापडलेले कटर फेकून देताना अंकुशच्या चेहऱ्यावरील भाव व त्याला अनावर झालेले अश्रू त्याला त्याच्या नव्या आयुष्याचा, नव्या ओळखीचा आत्मविश्वास निर्माण करून देतात. आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या मोनिका (रिंकू) व तिच्या वडिलाचा पासपोर्ट मिळण्यासाठीचा संघर्ष आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करतो. भारताच्या जमिनीवर राहून भारत नावाच्या ‘देशात’ राहण्याचा कागदी पुरावा त्यांच्याकडे नसतो. तो प्राप्त करण्याची त्यांची पायपीट देशातील हजारो आदिवासी समूह ज्यांच्याकडे राष्ट्र म्हणून ओळखीचा पुरावाच उपलब्ध नाही, व ज्यामुळे (CAA, NRC) त्यांना भारताचे नागरिकत्त्व नाकारले गेले त्याची आठवण करून देतो.

अशा रीतीने ज्यांना समाजाने सतत ‘ये लोग’, ‘ऐसे लोग’, अशी ओळख देऊन अपमानित केले; हेटाळले गेले. ज्यांचे ‘भारत’ म्हणून या देशातील नागरिकत्त्वाचे अधिकारच नाकारले गेले, ज्यांच्याकडे नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र (रहिवाशी) मिळवण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. अशा समूहाचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या तरुणांना घेऊन विजय सर एक राष्ट्रीय टीम बनवतात. आणि हेच तरुण आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये ‘भारता’चं प्रतिनिधित्व करतात. हा आत्मविश्वास व आशावाद निर्माण करण्याचं काम ‘झुंड’ हा चित्रपट करतो.

आज आपण भारत हे एक राष्ट्र म्हणून आपल्या राष्ट्राप्रती प्रेम, आदर या भावना व्यक्त करतो. परंतु अनेक विद्वानांनी आपण आणखी राष्ट्र बनलेलो नाही किंवा बनत असलेले राष्ट्र आहोत असे स्पष्टपणे म्हटले आहे. राष्ट्र म्हणजे काय याची अगदी प्रगल्भ व्याख्या करताना महात्मा फुलेंनी ‘एकमय लोक म्हणजे राष्ट्र’ असे म्हटले. त्या अर्थाने आपण एकमय झालो आहोत का? कोणत्याही देशाच्या इतिहास व संस्कृतीमधून ते राष्ट्र किंवा राष्ट्रवाद उभा राहत असतो. परंतु भारत हे राष्ट्र व राष्ट्रवाद म्हणून कोणता इतिहास व संस्कृतीला समोर ठेऊन उभा केलेला आहे? मागील काही वर्षापासून देशात राष्ट्र व राष्ट्रवादाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यावरून आपण पाहू शकतो की आपल्यासमोर कोणत्या स्वरूपाचा राष्ट्र किंवा राष्ट्रवाद उभा केला जातो आहे. तेव्हा आपल्याला दिसेल की एका विशिष्ट जातवर्गाच्या इतिहास व संस्कृतीचा गौरव व अभिमान आणि इतर संस्कृती व परंपरांचा द्वेष व तिरस्कार म्हणजे राष्ट्रवाद अशी मांडणी केली जाते. टिळक, सावरकर, गोळवलकर यासारखे विद्वान या राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून पुढे आणले जातात. या मांडणीतून शोषित-वंचित घटकाच्या इतिहास व संस्कृतीला नाकारले जाते. एवढेच नव्हे तर न्याय, समतेच्या चळवळी व त्यांचे प्रणेते फुले, शाहू, आंबेडकर यांना ‘देशद्रोही’ म्हणून हिणवले जाते. या परंपरेतील विचारप्रवाह किंवा चळवळी आजही देशविरोधी (Anti-National) म्हणून त्याकडे पहिले जाते.

आज एका विशिष्ट समूहाचा द्वेष व तिरस्कार करणाऱ्या राष्ट्रवादाची परंपरा आक्रमक व हिंसक बनत चालली आहे. त्यातही सांस्कृतिक क्षेत्रातील चित्रपट, टीव्हीसारख्या कलाकृतीतून अशा प्रकारच्या राष्ट्रवादाला खतपाणी घालण्याची भूमिका निभावली जाते.  ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘उरी’, ‘मिशन मंगल’ यासारख्या चित्रपटातून सत्ताधाऱ्यांच्या संस्कृतीचे गोडवे व सत्तेचे गौरव करणारे विचार रूढ केले जातात.

अशा पार्श्वभूमीवर नागराज यांची ‘झुंड’ ही कलाकृती द्वेष, तिरस्कार करणाऱ्या राष्ट्रीयत्त्वाच्या परंपरेला नाकारते. व शोषित-वंचित जनसमूहाच्या संघर्षाच्या प्रेरणेतून आलेल्या राष्ट्रीयत्त्वाच्या कल्पनेला व्यक्त करते. देश, विदेश (आंतरराष्ट्रीय) या कल्पनापासून अनभिज्ञ असलेल्या वेगवेगळ्या झोपडपट्टीतील मुलांना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास जाण्यासाठी विजय (अमिताभ बच्चन) तयारी करतात. तेव्हा त्या लहान मुलाचा ‘सर, भारत मतलब’? हा प्रश्न त्यांचं भारत म्हणून अस्तित्त्व काय आहे याचा शोध घेण्यास भाग पडते. त्याचवेळेला लगोलग त्यातल्याच एका मुलाकडून हसतहसत आलेलं ‘भारत मतलब अपना गुड्डी गोदाम हे चपखलपणे दिलेल्या उत्तरातून भारत नावाच्या गोष्टीचा बोध होतो. यातून गुड्डी गोदाम सारख्या असंख्य वस्त्यांमध्ये खरा भारत वसत असल्याचे दिग्दर्शकाला सांगायचे असे सूचित होते.

खरंच आपल्याला ‘भारत’ म्हणून काय बोध होतो? कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात? असे जेव्हा प्रश्न आपल्याला पडतात तेव्हा आपल्याला १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, तिरंगा, वंदे मातरम, भारत-पाकिस्तान युद्ध की क्रिकेट मॅच की आणखी काही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ व त्यात भारताचा होणारा विजय हा आपल्यासाठी आनंदाची, अभिमानाची आणि हीच राष्ट्रीयत्त्वाची भावना म्हणून तयार होते. परंतु भारत म्हणून प्रतिनिधित्त्व कोणत्या घटकातील समूह किंवा व्यक्तीकडून केलं जातं हे आपण अनेकवेळा पाहतो. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचं सिलेक्शन कसं, कुठे आणि कोण करतात हे आपल्याला माहितही नसते. म्हणूनच न्यायाधीशांसमोर बोलताना विजय (अमिताभ बच्चन) म्हणतात, ‘मुंबई या स्पोर्टस् अकॅडमीमे इन बच्चों का सिलेक्शन नही होता है, स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी के दिवारो के उस पार एक भारत रहता है.’  हा संवाद वस्ती, झोपडपट्टीतील जनतेला ‘भारत’ म्हणून ओळख देतो, त्यांचं अस्तित्त्व निर्माण करतो. त्यामुळे हा चित्रपट हजारो वर्षापासून बहिष्कृत, बेदखल केलेल्या दलित, आदिवासी, मुस्लीम समूहाला राष्ट्रीयत्त्वाची ओळख प्रदान करतो. व्यवस्थेने उभी केलेली भिंत ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारत’ म्हणून या समाजाला प्रतिनिधित्त्व मिळवून देतो. अर्थांत हे फक्त एका चित्रपटाची कथा आहे, जे दाखवण्याचं धाडस नागराज यांनी केलं आहे. प्रत्यक्षात मात्र हा ‘भारत’ आणखी उदयास यावयाचा आहे!

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट जसा कौतुकास पात्र आहे, तसेच याची चिकित्साही होऊ शकते. परंतु बॉलीवूडची एवढ्या वर्षाची दीर्घ परंपरा असताना आणि किंबहुना तशी संधी व अवकाश असतानासुद्धा असे चित्रपट बनवण्याची तयारी किंवा धाडस कुणी करू शकले नाही. त्यामुळे चित्रपटात अनेक जागा, प्रसंग चिकित्सेसाठी असूनदेखील हा चित्रपट अधिक वास्तविकतेकडे जातो. त्यामुळे नागराज सहित, गीत, संगीत व पूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0